तुंग किल्ला

तुंग किल्ला
तुंग किल्ला

तुंग किल्ला

तुंग किल्ला

चला जाऊया गड-किल्ल्यांवर
(तुंग किल्ला ता.मावळ,जि.पुणे)
     
नानाभाऊ माळी

कणखर कातळ लढ म्हणत
मावळा किल्यावरी जातो
सह्याद्रीचा कडा कठोर हा
        उंच शिखरावरी नेतो!

बुरुजाची पाषाणी छाती
     तोफा अंगावरी घेतो
होऊनि गेलें कित्येक राजे
  इतिहास किल्ल्यावर नेतो!

तटबंधी वज्रमूठीत किल्ला
        वारा गुणगान गातो
तोफ तलवार भाला हाती
    मावळा किल्लेदार होतो!
  
शतका मागून शतकं गेली
    ग्वाही किल्ला रोज देतो
     भगवाधारी सिंह छावा
    हाती शौर्य देऊनी जातो

वादळ पाऊस सूर्य तापतो
      किल्ला अंगावरी घेतो
स्मृती बोलक्या अजूनि शिवबा
     इतिहास शिखरावरी नेतो!



                  निसर्गाचा नयनसुंदर  अविष्कार प्राचीन महाराष्ट्र भूमीत अवतरला असावा!गगनाला भिडणारे,हिरवाईचीं शाल नेसलेले उंच उंच पर्वतं!सह्याद्रीच्या त्या अनंत पर्वतरांगा!उभट कडे!खोल दऱ्या त्यावर निळसर पाणी घेऊन खळखळून वाहणाऱ्या अनेक नद्या!उंचावरून खोल दरीत कोसळणारे धबधबे!झाडं वेलींनी सह्याद्रीवर घातलेले हिरवेगार पांघरून!त्यावर विहार करणारे अनंत पशु, पक्षी, जलचर, सरपटणारे अनंत जीव!विविध फुलंफळांनी फुललेलें विशाल जंगलं!नद्या वाहातं वाहात एका विशाल समुद्रात येऊन मिळतात!लांबवर पसरलेला समुद्रतट!आव्हान देणाऱ्या, प्रचंड उंच उसळणाऱ्या रौद्र लाटा!पावसाळा-हिवाळ्याचं स्वर्गीय नैसर्गिक रूप!डोळ्यांना, मनाला मोहविणाऱ्या दऱ्या खोऱ्यांचं सुंदर रूप!दऱ्या-डोंगर पोकळीतून संगीतावर ताल धरणारा घोंगवणारा वारा!विविध वैशिष्ट्यांनी नटलेलं सृष्टीचं सुंदर रूप!आनंद, प्रसन्नतेसोबतचं ही सह्याद्रीचीं रांग असुरक्षित अन भीतीही दाखवीत असतें!काळ सरकत राहिला! निसर्गसौंदर्य मोहिणीरूप ओरबाडण्यासाठी माणूस नावाच्या अति्बुद्धीवादी, धूर्त प्राण्यांमध्ये सत्तालोलूप हिंसा होऊ लागली असावी!असा हा डोंगर दऱ्यांनी व्यापलेला सह्याद्री डोंगर!त्यावर सुरक्षित बस्थान बसविण्यासाठी माणसांनी आरंभीलेला सत्तालोलूप चढाओढ!

              सह्याद्रीच्या विविध उंच पर्वतांवर,शिखरावर सुरक्षित किल्ले बांधून इतरांवर सत्ता गाजवण्याची अहमिका सुरू झाली असावी!सह्याद्रीच्या विविध पर्वतरांगामध्ये उंच शिखरांवर अनेक मजबूत किल्ले दिसतात!अनेक शतकं आपलं अस्तित्व जपून उभे असणारे किल्ले आज ही आव्हान,शौर्य, शक्ती, ऊर्जा देत उभे आहेत!चालुक्य घराण्यातील राजांच्या कालावधीत सुरक्षित बांधलेले अनेक किल्ले राज्यकर्त्यांच्या अस्तित्वढाली होत्या जणू!ढालीवर शत्रूस पेलून सत्तास्थानी बसणारे अनेक राजे इतिहास मागे ठेवून गेलेंतं!त्यानंतर छत्रपती शिवरायांनी अनेक किल्ले बांधले होतें!अनेक प्राचीन किल्ले देखील नव्याने बांधले होतें!पवना मावळात अनेक किल्ले आहेत!छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पूनीत असे अनेक किल्ले आहेत!त्यांतीलचं एका किल्ल्यावर आम्ही गेलो होतो!आम्ही *तुंग किल्ल्यावर* गेलो होतो!

                               ‘चला जाऊया गडकिल्ल्यांवर’ग्रुपचे, आमच्या टिमचे कॅप्टन आदरणीय श्री.वसंतराव बागूल सरांसोबत आम्ही तुंग किल्ल्यावर गेलो होतो!नजरेत उत्तुंग दिसणाऱ्या,तुंग किल्ल्यावर गेलो होतो!’सुनियोजित प्लॅन,किल्ला चढाईची हमखास हमी’ देणारे बागूल सर आमच्या टिमची आंतरिक ऊर्जा होतें!नेहमीप्रमाणे आज दिनांक २३फेब्रुवारी २०२३च्या सकाळी आमची टिम पुण्याच्या चंदननगरहून निघाली!पाषाण,सुस रोडमार्गे नांदे, चांदे, मुलखेड रोड,नेकलेस पॉईंट, घोटावडे,कोळवण,हाडशी रोड, करीत तुंगवाडीतं पोहचलो!तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो!

          ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देत तुंग किल्ल्यावर
चढाईला सुरुवात केली होती!उद्दिष्ट एकचं होतं ‘मावळ्यांनी किल्ल्यावर चढाई करायची!’ तत्पूर्वी  एक गोष्ट लक्षात आलीं होती की फेब्रुवारीतचं मार्च-एप्रिल महिन्याचा उन्हाळी चटका बसू लागला आहे!उन्हाळ्याने खूप आधी आपलं खरं रूप दाखवायला सुरवात केली आहे!तुंग किल्ल्याच्या सभोवती पवना डॅम आहे!पाणी उत्सर्जनामुळे उन्हाची तीव्रता तशी कमीचं होती!!किल्ला तीनही बाजूनीं पवना डॅमच्या बॅक वॉटरनें वेढलेला आहे!पवना खोरं  पश्चिम महाराष्ट्राचीं जीवन दायीनी आहे!संजीवनी आहे!

                    उन्हामुळे धरणातील पाणी पातळी घटत आहे!बॅकवॉटर झोनमध्ये पाण्याच्या अनेक शेपट्या दऱ्या खोऱ्यात दिसायला लागल्या आहेत!सहयाद्रीच्या कुशीतील डोंगर पायथ्याशी बॅकवाटर पाणी शेपट्या सभोवती दिसतात!निसर्गाचा अतिशय विलोभनीय चमत्कार म्हणजे तुंग किल्ला नेमका या पाणी शेपट्यामध्येचं येऊन उभा राहिलेला नैसर्गिक अविष्कार असावा!तुंग किल्ल्याने आपलं अस्तित्व नेटाने जोपसलं आहे!मावळात अनेक किल्ले आहेत!तिकोना,कोरीगड, लोहगड, विसापूर त्यांतीलच एक तुंग किल्ला सह्याद्रीच्या गळ्यातील महत्वपूर्ण दागिना शोभून दिसतो आहे!

           ‘शिवाजी महाराज की जय!जय भवानी!जय शिवाजी’असा अंतरीचा उदघोष करून किल्ला चढाईला सुरुवात केली होती!नजरेत किल्ला बसवीत चढाईला सुरुवात केली होती!मान उंचावून पाहिले असता आकाशाला गवसणी घालणारा पाषानी कातळ उभा दिसतं होता! किल्ला काही अंतर पार केल्यावर पाषणात उत्तम कोरीव काम केलेल्या अनेक विरगळं दिसल्या!तुंग किल्ल्याच्या पायथ्याला दगडात कोरून ठेवलेल्या या विरगळं कदाचित त्या काळी युद्धात विरगती प्राप्त झालेल्या वीर योध्याच्यां स्मरणार्थ त्यांची स्मृती सतत डोळ्यासमोर राहावी म्हणून अनेक विरगळ बनवून किल्ल्याच्या पायथ्याशी स्मृतीस्थळ म्हणून राजांनी जपून ठेवल्या असतील त्यांचं आदराने पूजन होत असावं!आम्ही नतमस्तक होत त्यांना नमन केले!

                         किल्ला चढाईला सुरुवात केली होती!अलिकडे काही अंतरापर्यंत दगडी पायऱ्या बांधलेल्या दिसतात!आम्ही तेथवर सहज चढून गेलो होतो!पुढे पायऱ्या नसल्याने खडकाळ, उभट, अरुंद चढाला सुरुवात झाली होती!वरती मान करून पाहिल्यावर अंगावर येणारा उभट काळा पाषाण दिसत होता!काही अवघड ठिकाणी लोखंडी रेलिंगचा उपयोग केला आहे, त्याचा आधार घेत किल्ला चढत होतो!कधी तुंग किल्ला चढाईला अवघड वाटत होता तरी कधी सहज चढता येईल असा योग्य किल्ला वाटत होता!उत्तुंगतेचं शिखर गाठत उभा तुंग किल्ला समुद्र सपाटीपासून ३००० फूट उंचावर आहे!आम्ही एक एक पावलं पुढे टाकत चढाई करीत होतो!

खाली खोल वाटत होतं!वरती अंगावर येणारा चढ वाटत होता!अरुंद खडकाळ पायवाटेने हळूहळू पुढे सरकत होतो!मध्येच कोरून ठेवलेल्या गुहेत दगडी हनुमानाची मूर्ती दिसली!एक हात वर करून कोणाला चापटी मारावी अशा स्वरूपात उभ्या असलेल्या मूर्तीचं दर्शन घेतलं!चापट हनुमानाच दर्शन घेऊन पुढे निघालो!पुन्हा अरुंद खडकाळ पाय वाटेने एक एक पावलं टाकीत, स्वतःचा तोल सांभाळीत चढाई सुरू होती!चालतांना उभट कड्याचा वरील एखादा तुकडा निखळून अंगावर येईल की काय अशी भीती वाटत होती!जीव मुठीत घेऊन उद्दिष्टाकडे मार्गक्रमण सुरू होतं!दुरूनच एक महाद्वार दिसलं!दगडात बांधलेलं महाद्वार अतिशय भक्कम दिसलं!त्यावरील बुरुजही भक्कम होता!महाद्वार गोमुखी आकाराच बांधलेलं दिसलं!

आजही उत्तम स्थितीत असलेलं नारायण महाद्वार आम्हा मावळ्यांचं स्वागत करीत,स्फूर्ती देत उभं असावं जणू!काही वेळ सावलीत बसलो!उन्हाची तीव्रता वाढली होती!आम्ही हार मानणारे नव्हतो!नारायण महाद्वारातून प्रवेश करीत वळसा घालून पुन्हा महाद्वाराच्या भक्कम बुरुजावर चढलो!खाली पाहिले असतें!गोमुखी वास्तुकलाशिल्प मन मोहून घेत होतं!

                पून्हा चढाई करीत वरती जात होतो!बाले किल्ल्याकडे निघालो होतो!उंच ठिकाणी गणेशाचं मंदिर दिसलं!त्याच्या शेजारीचं खोल खोल अतिभव्य पाण्याचं टाकं दिसलं!त्यात हिरवेगार पाणी साचलेलं दिसलं!पाणी पिण्यायोग्य नसावं!येथेच आवक जावंकसाठी भग्नावस्थेतील इमारती दिसल्या!जिथं फक्त इमारतीचा दगडी पाया शिल्लक दिसला!तुंग किल्ला प्राचीन काळी बोरघाटमार्गे होणाऱ्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा!व्यापारी मार्ग म्हणूनही या किल्ल्याला महत्व प्राप्त झालेलं असावं!एवढ्या उंचावर येऊनही बाले किल्ल्यापर्यंत पोहचलो नव्हतो!

                     पुढे अतिशय अवघड कडा होता!पाहिजे तर उभा खडकाळ सुळका म्हणाव त्याला!अरुंद खडकाळ पाय वाटेने बालेकिल्ल्यावर पोहचलो होतो!वरती भगवा ध्वज फडकत होता!छत्रपती शिवराय आमच्या मनात, तनात अवतरले होतें जणू!सुळक्यावरील अतिउचं,अरुंद सपाटी पाषानी बालेकिल्ल्यावरून सभोवतालंच दृश्य नजरेस पडत होतं!कडक उन्ह असूनही निसर्गाविष्काराच्या मोहात पडलो होतो!बाले किल्ल्यावरून सभोवती पाहात होतो!उंच उंच सह्याद्री पर्वतरांगेने तुंग किल्ल्याला घेराव घातला होता जणू!उंच डोंगरावरील घनदाट जंगलं डोळ्यांनां मोहवीत होतें!आम्ही अत्यानंदाने सर्व दृश्य टिपून घेत होतो!पवना धरणाचं पाणी सभोवती दिसतं होतं!

                    साहसी चढाईचां आनंद काही वेगळाचं होता!थकलो, घमेंजलो, घाबरलो, उन्हाचा चटका घेत आम्ही तुंग किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर चढलो होतो!निसर्गाच्या सानिध्यात सुखानंद असतो हे कळलं होतं!तुंग किल्ल्यावर भक्ती भावाने नतमस्तक झालो होतो!उंच खांबावर फडकणाऱ्या भगव्या ध्वजास मुजरा करीत!अविस्मरणीय दृश्य डोळ्यात साठवीत आम्ही बालेकिल्याचा निरोप घेऊन परतीच्या उतराला मागे निघालो होतो!निजामशाही, आदिलशाही, मोघल शाहीचा पाडावं करीत छत्रपती शिवरायांनी इ स १६४७ मध्ये सह्याद्री मुलुखातील सर्वचं किल्ले जिंकून घेतले होतें!शिवप्रतापी ढाली,तलवारी खणखणल्या होत्या!तोफांचाभयंकारी आवाज कानी पडत राहिला!शूर मावळ्यांचं रक्त सांडलं होतं!अशा महापराक्रमी राजा छत्रपती शिवराय यांच्या पावलांच्या स्पर्शाने पूनीत तुंग किल्ल्यावर चढण्याचं भाग्य लाभलं होतं!असा उतुंग, कठीण किल्ला तुंग म्हणून नावारूपाला आलेल्या किल्ल्यावर साहसी परिश्रमपूर्वक चढाई करण्याचीं मानसिक भूक भागवत निरोप घेऊन निघालो होतो
जय शिवाजी!जय भवानी!

नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२४ फेब्रुवारी २०२५