लाजणंही आवश्यक आहे

marathi kavita prem lyrics
marathi kavita prem lyrics

लाजणं

लाजणंही आवश्यक आहे

“लाजू नका. पोटभर जेवा. लागेल ते मागून घ्या.” असं म्हणत जेवणाच्या पंगतीला बसलेल्या आम्हा पाहुण्यांना उद्देशून यजमान जेवणाचा आग्रह करीत होते. आमच्यातल्या एकानं त्यांना सांगीतलं-  “आम्ही लाजणारे नाहीत. आम्ही व्यवस्थित जेवतो. काळजी करू नका.” इतक्यात मोठा हशा पिकला. कारण हलक्या आवाजात कुणीतरी कमेंट पास केली होती- “आम्ही निर्लज्जच आहोत. लाजायचा प्रश्न येतोच कुठे?” हा प्रसंग जसा मला बुचकळ्यात टाकणारा होता, तसाच तो मला गांभिर्यानं विचार करायला लावणाराही होता. वास्तविक जेवणाच्या बाबतीत माझं स्वतःचं एक तंत्र आहे, जे मी माझ्यासाठी विकसित केलं आहे. “जेवताना लाजायचं नाही अन् लाज वाटेल असं जेवायचं नाही! हेच ते तंत्र, ज्याचा  वापर मी अगदी कटाक्षाने करतो.  

आपल्यापैकी अनेकजण जेवणाच्या पंगतीत बसल्यावर अशा प्रसंगाला अनेकदा सामोरे गेला असाल. त्यावेळी आपलीही गत माझ्यासारखीच झाली असेल किंवा कदाचित नसेलही; पण मला मात्र त्या क्षणीच माणसानं नेमकं काय करावं? टू बी? ऑर नॉट टू बी? च्या धर्तीवर माणसानं लाजावं की लाजू नये? असा एक प्रश्न छळू लागला. पाठोपाठ लाजणं म्हणजे काय? माणसं का लाजतात? लाजणं चांगलं की वाईट? अशा काही प्रश्नांनी मनात फेर धरायला सुरुवात केली.

लाज असणं, लाज बाळगणं, लाज वाटणं आणि लाजणं या वरवर सारख्याच वाटणाऱ्या बाबी प्रत्यक्षात मात्र वेगवेगळ्या बाबी असाव्यात असं मानण्यास पुष्कळसा वाव आहे. यातल्या प्रत्येक शब्दाचा संदर्भ वेगळा असतो असं आपण सहजपणे अनुभवू शकतो. ‘प्रत्येकाला लाज असायला हवी.’ किंवा ‘प्रत्येकानं लाज बाळगली पाहिजे.’ या वाक्यांमध्ये ‘लाज’ हा शब्द ‘मर्यादा’ या अर्थानं वापरण्यात आला आहे. आपल्या उक्ती व कृतीमध्ये ही मर्यादा दिसली पाहिजे. वय, ज्ञान, अनुभव, अधिकार, सत्ता आणि संपत्ती या क्रमाने आपल्याहून मोठे असणाऱ्या थोरा-मोठ्यांचा मान-सन्मान व आदर राखणं, त्यांच्याशी अदबीनं वागणं, अदबीनं बोलणं याला मर्यादा म्हणतात. ही मर्यादा न पाळणाऱ्या व्यक्तीला ‘जरा लाज बाळग!’ असं सुनावलं जाऊ शकतं.

कुटूंब, समाज, शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर व्यक्तीने व्यापक समाजहिताचे कायदे, नियम, प्रथा, परंपरा, संकेत, रितीरिवाज, मूल्ये, या प्रकारच्या विविध मर्यादा काटेकोरपणे पाळणे अपेक्षित आणि आवश्यक असते. त्यातच मानवी समाजाचं संपूर्ण हित सामावलेलं असतं. दुर्दैवानं काही माणसं या व्यापक समाजहिताचा विचार करीत नाहीत. अशी माणसं केवळ स्वतःच्या हिताचा स्वार्थी विचार करून वागताना मर्यादांचं उल्लंघन करतात. खरंतर वर नमुद केलेली कोणतीही मर्यादा सोडताना माणसाला लाज वाटली पाहिजे! एका बाजूला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असताना दुसऱ्या बाजूला आपण गुप्ततेचा अधिकारही मागत असतो. आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना इतरांच्या हिताला बाधा आणताना किंवा गुप्ततेचा अधिकार वापरून इतरांचं शोषण करताना त्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे.

“मला लाज आहे.” किंवा “मी लाज बाळगतो.” असं कुणीही आणि कधीच म्हणत नाही. त्याचवेळी “मला लाज वाटते!” असं मात्र नेहमी म्हटलं जातं. इथं लाज या शब्दांत न्यूनता, कमतरता किंवा उणीवांची जाणीव आहे. आपल्याला चार चौघांत काही बोलायचं असेल, सादर करायचं असेल, अभिव्यक्त व्हायचं असेल तर उपस्थितांच्या समोर आपलं ज्ञान, माहिती, अनुभव किंवा कौशल्य तोकडं असल्याची जाणीव आपल्या मनात लाज निर्माण करते. नवख्या किंवा अनोळखी व्यक्ती किंवा समूहांशी संवाद करतानाही असाच अनुभव येतो. एका विशिष्ठ मर्यादेत माणसाला आपल्यातील
न्यूनता, कमतरता किंवा उणीवांची जाणीव नक्कीच असायला हवी, मात्र यातून आपला आत्मविश्वास डळमळीत होईल इतकी लाज निर्माण होता कामा नये. असे झाल्यास त्याक्षणी आपले जगणे काहीसे लाजिरवाणे होऊ शकते.
         
लाजणे ही एक अदा आहे. सगळ्यांना चांगलं लाजता येत नाही. विशेषतः पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं लाजणं सरस आणि उजवं ठरतं.  स्त्रीच्या अंगी छत्तीस नखरे असतात असं म्हटलं जातं. लाजणं हा त्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा नखरा असावा. स्त्रियांचं लाजणं हे मोहक, वेधक आणि मनोहर म्हणता येईल असं विलोभनीय असतं. स्त्रियांचं लाजणं हा शृंगारीक अलंकार आहे असं मानलं जातं. एखादी स्त्री लाजते तेव्हा तिचा रंग गोरामोरा होतो. तिच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरते. समोरच्या व्यक्तीला तिचं हे रूप अधिक लाघवी आणि रोमांचक वाटू लागतं. या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी लाजलं पाहिजे! त्यामुळं त्यांच्या जीवनातलं प्रेम अधिकाधिक आनंददायी ठरू शकेल.

“माणसानं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी!” असं म्हटलं जातं. त्यामागे माणसानं आपल्या एका विशिष्ठ मर्यादेत राहिलं पाहिजे असा अर्थ अपेक्षित आहे. माणसाचं वागणं आणि बोलणं मर्यादाशील असायला हवं. मानवी उत्कर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसांच्या अंगी ही मर्यादाशीलता बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न त्या – त्या काळातल्या समाजधुरिणांनी सतत केला आहे. रामायण, महाभारत याखेरीज समग्र संतसाहित्याचा इतिहास याचीच साक्ष देतो. रामाला मर्यादा पुरुषोत्तम ठरवून समाजासमोर मोठा आदर्श देण्याचा महर्षि वाल्मिकी यांनी केलेला प्रयत्न आणि एकवचनी पितामह भीष्म, नीतिज्ञ विदूर, कुंती, गांधारी, द्रौपदी, कर्ण, युधिष्ठिर, अर्जुन यासारखी महाभारतातील विविध पात्रं याच शृंखलेतील आहेत.

लाज नसलेली किंवा लाज न बाळगणारी माणसं सहसा कुणालाच आवडत नाहीत. अशा माणसांना निर्लज्ज समजून प्रवाहाबाहेर ठेवलं जातं. अशा प्रकारच्या लोकांना बेपर्वा, बेफिकीर किंवा बेजबाबदार ठरवलं जातं. त्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारांपासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. अशी माणसं नकोशी ठरतात. बेईमानी, लाचारी, संधीसाधूपणा लाळघोटेपणा ही लक्षणं ज्या माणसांत दिसून येतात त्यांच्या पाठीचा कणा वाकलेला असतो. अस्मिता, अभिमान, स्वत्व, स्वाभिमान या गोष्टींशी त्यांना काही देणे घेणे नसते. इतरांना जमेल तेवढं फसवणं, दुसऱ्यांचे कष्ट चोरणं, दुर्बलांचं शोषण करणं हा आपला हक्क आहे असं समजून तसंच वागणाऱ्या प्रत्येकाला खरंतर या गोष्टींची लाज वाटायला हवी! ज्या दिवशी असं घडेल त्या दिवसापासून समाजात मोठे अनुकूल बदल घडू लागतील म्हणुनच म्हावं लागतं की लाजणं आवश्यक आहे!

लेखक
© श्री अनिल आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क: 9766668295