शाळा तेव्हा आणि आता
शाळा तेव्हा आणि आता
शाळा तेव्हा आणि आता भाग-1
नानाभाऊ माळी
शाळेच्या गेटबाहेर खूप गर्दी दिसते आहे!गर्दी पालकांचीचं आहे!गेटला लोखंडी दरवाजा बसवला आहे!गेटची कडी आतून ओढलेली दिसतें!गेटच्या आत छानसं,छोटंसं सुशोभीत मैदान दिसतंयं!लहान मोठी झाडंही दिसताहेत!गेटच्या आत नजर टाकल्यावर शाळेचे वर्ग दिसताहेत!वर्गात बाल गोपाळांचा मेळा भरला असावा!आत जाता येत नाही!पालक गेटच्या बाहेरूनचं आपल्या डोळ्यांनी आतलं दृश्य टिपून घेत आहेत!शिक्षिका अर्थात मॅम मुलांना गोड गीतं शिकवीत आहेत!मुलं मागोमाग एका सुरात म्हणताहेत!आता शाळा सुटायची वेळ झालेंली दिसतेय! त्यात बालवाडी,नर्सरी,एल -केजी, यु-केजीचें,Ist प्रायमरी वर्ग दिसताहेत!ही इंग्लिश मेडीयम शाळा आहे!शाळेची इमारत खूप मोठी आहे!सहा मजली दिसते आहे!मी ही लहान नातूला घ्यायला आलो आहे!
![शाळा](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/img-20240626-wa00204886727493001008723-576x1024.jpg)
गेटच्या बाहेर पालकांमध्ये महिलांचीं उपस्थिती जास्तचं दिसते आहे!अर्थात ९०% हुन जास्त असेल! मातृ हृदय विशाल असतं!कनवाळू असतें!मम्मी गोड असतें!मम्मा जीव लावते!ममतेचा पान्हा हृदयातून असतो!ममता ओतत असतें!आईचे बोल मुलांच्या मनात जाऊन बसतात!मम्मी हट्ट पुरविते!आई ती आईचं असतें!शाळेत दुडूदुडू जाणारं छोटंसं बाळ काळजाचा तुकडा असतो!रक्ताचा अंश असतो!काही तासांसाठी दुसऱ्याच्या स्वाधीन करणे देखील अवघड असतं तिला!बाळाला सोडूच नये असं वाटतं असतं!शेवटी शाळेच्या पायऱ्या चढल्या शिवाय संस्कार होत नसतात!शाळा संस्कार जननी असतें! दारातून बाहेर न गेलेल्या बाळासं आई शाळेच्या स्वाधीन करते!शिक्षकांच्या स्वाधीन करते!आईचा अर्धा जीव घरात असतो!अर्धा जीव शाळेत अडकलेला असतो!’माझं बाळ शाळेत काय करत असेल?’…घरातही पदोपदी विचारात असतें!चित्त बाळाकडे लागून राहिलेलं असतं!…
…..अन शाळेची घंटा वाजली हो!शाळा सुटली तसें पालक गेटच्या आत जाऊ पाहात होते!शिस्तप्रिय शाळा नियमांचे पालन करण्यात आदर्श होती!आहे!शाळेत इंग्रजी अक्षरं A,B,C,D या प्रमाणे वर्ग(Class) आहेत!त्याप्रमाणे मुलं विध्यार्थी पालकांच्या स्वाधीन करत होती!
एक एक वर्ग सोडले जात होते!विध्यार्थी पालकांना,पालक आपल्या मुलांना शोधत उभे होते!एक एक पालकांना आत प्रवेश मिळत होता!A-class सुटला होता!तसेच एक एक वर्ग सुटत राहिले!वर्गात कोंडलेली बंदिस्त मुलं बाहेर पडतं होती!चांगला दीर्घ श्वास घ्यावा तसं मुलं वर्गातून बाहेर पडत होती!’सुटलो एकदाचा’ असं म्हणतं असतील!नावाप्रमांणे बाळाला पालकांच्या स्वाधीन केलं जात होतं!बाळ अन आईची नजरा नजर होताच,बाळ धावत जाऊन आईच्या कडेवर बसत होतं!याला बाल हक्क म्हणतात!बाल हट्टही म्हणतात!छोटी छोटी मुलं,त्यांची छोटीशी पावलं आईकडे धावत होती!असं हे दृश्य संपूचं नये असं वाटत होतं!मुलांचं शाळेत येतांना रडणं असतं!घरी जातांना हसणं असतं!हसणं, रडणं, शिकण्यातून शाळा असतें!बालमनाचं शास्र खरचं गोड आहे,अवीट आहे!त्यांचं मन हसरं, रडकं, निर्मळ असतं!मला तर त्यांच्या रूपात खोडकर कृष्ण दिसत असतो!
आई आपल्या बाळास पटकन उचलून घेत छातीशी लावत होती!किती भावस्पर्शी दृश्य दिसत होतं ते!यशोदेचा कान्हा खोडकर फार! शाळेत आल्यावर खोड्या घरी ठेवून येत असतं!या शाळेत आई-बाळ एक झाले होते!कोवळ्या जीवात ममता ओतली जात होती!
१५ जूनपासून शाळा उघडली तशी लहान मोठी पावलं पळतांना दिसत आहेत!जून महिन्याच्या पहिल्या पावसा नंतर जमिनीतून कोवळी, हिरवी तृनपुष्प जमिनीतून वर यावीत!चौफेर हिरवाईचीं भुरळ पडावी!मन फुलपाखरू व्हावं!ही लहान मुलं शाळेत आनंद भरत होती!!रड-बोंबलं करून बालहट्ट गाजवत होती!पाठीशी छोटंसं दप्तर अडकवलेली कोवळी मुलं नंदनवन फुलवीत होती!शाळा नावाच्या दुसऱ्या घरात पहील्यांदाच पाऊल ठेवत होती!मुलांच्या चेहऱ्यावरील निर्मळ हावभाव पाहून वेगळा आनंद मिळत होता!सर्व कान्हामय झाल्यासारखं वाटत होत !मुलं…आई-वडील,आजोबा-आजींच्या बोटाला घट्ट धरून शाळेत येतांना दिसत होती!
![शाळा](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/img-20240626-wa00195715314616029122292-576x1024.jpg)
आईचा घट्ट धरलेला बोट सोडायला तयार नव्हती!रडका चेहरा करून पालकांच्या अंगाला घट्ट पकडून ठेवत होती!आई हळूच शिक्षकांच्या स्वाधीन करून अदृश्य होतं होती!आई कोमल कनवाळू असतें!आई संस्कारी असतें!मुलांना वर्गात बसवलं गेलं तसं मुलांचं रडणही थांबत होतं!पालक बोट सोडवून शिक्षकांच्या स्वाधीन करून हळूच घरी निघून जात होती!मुलांना निमूटपणे इतर मुलांसोबत वर्गात जावं लागतंय!जिकडे बघावं तिकडे पालक, शिक्षक अन विध्यार्थी दिसताहेत!सर्वचं वेळेचा नियम काटेकोरपणे पाळताहेत!शाळा फुलांगत फुललेली दिसते आहे!वेलीवर अनंत फुलं उमलून हसत राहावी!तशी शाळा दिसत असतें!
… मी ही नुकताच नर्सरीतं गेलेल्या माझ्या लहान नातूला शाळेत सोडवण्यासाठी शाळेत जात आहे!मी देखील नातूसोबत लहान होऊन फिरतो आहे!माझ्या बालपणात जात आहे!मी स्वतःच “तेव्हा आणि आताची” तुलना करीत आहे!
(पुढील भाग-०२मध्ये याचं विषयावर पुन्हा भेटू )
![शाळा](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/img-20240626-wa00178524073952722143508-1024x576.jpg)
शाळा तेव्हा आणि आता भाग-०२
शाळा तेव्हा आणि आता भाग-०२
नानाभाऊ माळी
म्हणत नव्हते कोणी आम्हा
‘शाळेत जा रें पोरा’
आमुची होती फाटकी चड्डी
या पोरांचा आहे तोरा….!
भाकरीसंगे खाल्ली मिर्ची
जीवन होतं जगण्यापुरतं
भरल्याताटी उठतात पोरं
बाहेरचं यांचं पोट भरतं….!
आता सुट बूट टाय पाहिजे
नवा स्कुल ड्रेस अंगावरती
आम्ही फफूट्यात चालत होतो
सूर्य चटका देत राही वरती..!
बस,गाडी शाळेत सोडते
नखरे यांचे पाहात राहावे
पाय ओढत शाळा गेलो
केले नाहीत कसले दावे…
सुख ओतूनी ताटी वाढतो
शाळा बदललीयं आता
तेव्हा खायलाही नव्हते हो
मी मारत नाही बाता……..!
![शाळा](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/img-20240626-wa0023652425838869626749-576x1024.jpg)
मी नातूला शाळेत घ्यायला आलो होतो!सभोवतालचा परीसर डोळे भरून पाहात होतो!शाळा संस्कार करीत असतें!डोळे देत असतें!नजर देत असतें!नातू वर्गात होता!शाळा सुखाचं घर असते!सुंदरतेचं झाडं असते!ज्ञान पाजणारी ज्ञानाई असतें!अशा ज्ञान संस्कार वास्तुच्या बाहेर आम्ही पालक बाहेर बसलो होतो!आधुनिकतेचा रंग लावून शाळा उभ्या दिसतात!आम्ही शाळा सुटायची वाट पाहात होतो!शाळेच्या मैदानावर डेरेदार वृक्षाला गोलाकार व्हरांडा बांधला आहे!अनेक पालक त्यावर बसले होते!मी ही त्यावर जाऊन बसलो!नातूच्या आधुनिक शाळेकडे पाहात मी ही शांतपणे बसलो होतो!येणारे जाणारे विध्यार्थी पाहात बसलो होतो!
…….माझं मन हळूहळू भूतकाळाकडे मागे जाऊ लागलं!छोट्याश्या खेडेगावातील बालपणात जाऊ लागलं!जिल्हा परीषदच्या प्राथमिक शाळेत रेंगाळू लागलं!मी वयाने सात वर्षांचा झालो असेल,वडिलांचं बोट धरून शाळेत गेलो होतो!मुलं पूर्ण सात वर्षाचें झाल्याशिवाय शाळेत प्रवेश मिळत नसे!मामांचं गाव तीन चारशे उंबऱ्याचं असेल!तिथेच गावाच्या बाहेर रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा होती!पहिली ते सातवी पर्यंत वर्ग होते!आताही ती शाळा उभी आहे!जुन्या बांधकामाचं अस्तित्व जपत उभी आहे!मी पहिल्याच दिवशी शाळेत गेलो होतो!गुरुजींनी माझ्याकडे निरखून पाहिलं!खालीवर पाहिलं होतं!उंची पाहिली अन प्रवेश मिळाला होता!
जन्म तारखेचा पुरावा नव्हता! गुरुजींनी अंदाजानेचं माझी जन्मतारीख ठरवली असावी!पुढे मी शाळेत लागलो!गुरुजींनी त्यांच्या रजिस्टरला जी जन्मतारीख लिहिली होती,तिचं कायमची Birthdate आयुष्याला चिकटली!
……..गावातं गुरं-ढोरं,शेळ्या-मेंढया एका चौकात गोळा करून नेमलेला गुराखी चरण्यासाठी जंगलात दूर घेऊन जात असे!शेळ्या-मेंढया, गुरं दिवसभर जंगलात चरायच्या!सूर्य मावळतीला परतीच्या प्रवासाला लागायच्या!गुराखी हातात काठी घेऊन पाठीमागून हाकाऱ्या भरत चालत रहायचा!गुरं-शेळ्या मेंढया गवतात तोंड खूपसून पुढे सरकत राहायच्या!संध्याकाळी,पुढे पोट भरल्यावर परतीचे वेध लागलेले असायचे!संध्याकाळी ज्यांच्या त्यांच्या शेळ्या-गुरं घरी घेऊन जात असतं!
……आम्ही देखील कोकरू,वासरू होतो का तेव्हा?आमचें गुरुजी म्हणजे ‘गुराखी’ तर नव्हते तेव्हा?गुरुजी आम्हाला जीवनज्ञान पाजायला वर्गात कोंबायचेतं!रठ रठ रटायचे!कच्च्या मातीवर पाणी पडायचं!चिखल कुस्करून,घट्ट मातीतून ‘विध्यार्थीरुपी’ छानशी मूर्ती घडतं राहायची!गुरुजीचं समर्पण कुंभारागतं होते का मग?
मला नेहमीचं जाणवत राहतं,मोलमजुरी करून आमची पोटं भरणारे आई-वडील शाळेत कधीच आले नाहीत!’काय शिकतो’ ही सुद्धा कधी चौकशी केली नाही!गुरुजींवर ठाम विश्वास होता!गुरुजी परमेश्वर स्वरूप होते!गुरुजी आदर्श होते!आम्हाला घडविणारे गुरुजी ‘सुतार’ होते का मग?लाकडातून योग्य आकार देत सुरेख वस्तू घडावी तसें आम्ही घडत होतो!गुरुजी कदाचित ‘लोहार’ होते का मग?सुंदर विचार घनांनी विध्यार्थी घडत होते!ताज्या तप्त लोखंडास आकार देत होते!आमचीं शाळा देवत्व गाभारा होती!गुरुजी माळी,गुरव, सोनार, शिंपी होते का मग?आम्हाला फुलवीत होते!घडवीत होते!
आई-वडिलांच्या जीवावर जगणारे आम्ही,त्यांच्या घामावर शाळेत जात होतो!चप्पल कधी पाहिली नव्हती!शाळा ज्ञानाई असतें!गुरुजन ‘बारा बलुतेदार’ होते असं माझ मत बनलं आहे!आम्ही सर्व बाजूनीं घडत होतो!बाल मनावर सुसंस्कार होत होते!
शाळेची घंटा वाजली कोंडलेला श्वास अन आवाज वाढायचा!शाळेचं आवार गजबजून जायचं!आवाज घोंगटाने मैदान गजबजून जायचं!मावळतीला गाय जशी वासराच्या ओढीने गावाकडे पळत सुटायची!तसें आम्ही ‘वासरू’ होतो!आईच्या ओढीने घराकडे पळत सुटायचो!घरचा ओढा पायाला पळवत असायंचा!शिवलेल्या कापडी पिशवीतं पाटी,खडू,एखादं पुस्तक असायचं पाठीवर ठेवून पळत सुटायचो!कधी चड्डीचीं नाडी सुटायची एका हाताने वर ओढीत पळत घरी पोहचायचो!खेळाचें मैदानं मोठी होती!सर्व देशी खेळ खेळण्यातील मज्याचं वेगळी होती!…..!’नातूच्या शाळेची घंटा वाजली तसें भूतकाळी गेलेलं मन जागेवर आलं!.. नातूला घ्यायला शाळेच्या गेटसमोर थांबलो!रांगेने येत असतांना “बाबा”असा आवाज आला!नातू कंबरेला धरून सांगत होता,’बाबा!मॅमनीं… जॉनी जॉनी एस पप्पा!लिटल शुगर नो पप्पा… ही पोयम शिकविली!’मी त्याचा बोट धरून चालत होतो!त्याची बडबड सुरूचं होती!.. आम्हाला पाचवीला देखील धड A,B C,D सुद्धा येत नव्हतं!हे नर्सरीतलं पोरगं इंग्रजाळलं होतं!
(याचाच अपूर्ण,भाग-०३ मध्ये पाहू!)
![शाळा](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/img-20240629-wa00246790513315850649396-576x1024.jpg)
शाळा तेव्हा आणि आता (भाग-०३)
नानाभाऊ माळी
शाळा ही श्वास होते,
आई होऊनि प्राण देते
जगणं अपुलं सिद्ध होतं,
नवी हद्द सुरु होते!
ज्ञानमोती वेचून वेचून,
माणूस ऋणात जगत असतो
ऋण विशाल शाळेचंही,
दर्शन घेऊनि जगत असतो!
शाळा आई दोन्ही महान,
माणूस तेथे वाकत असतो
जगले भागले दुःख आतलें
कुरवाळूनी झाकत असतो!
शाळा असतें विशाल हृदयी,
आई सारखी जपत असतें
वर्षं मागे निघुनी जातात
जिंदगी तिची खपत असतें!
कोण कुठले असतो आपण,
शाळा पोटी शिकत असतो
संस्कार जननी वंदन करोनी
आई समोर वाकत असतो!
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/06/img-20240629-wa00236990739800649474749-1024x576.jpg)
झाडाच्या खोडाखाली सिमेंटचा छान ओटा बांधला आहे!झाडाच्या फांदया छत्री सारख्या वाकल्या आहेत!शाळेचा किलबिलाट सुरु आहे!शाळेचें काही वर्ग मैदानावर येऊन खेळताहेत!काही वर्ग भरलेले आहेत!आम्ही झाडाखालीलं ओट्यावर बसून खेळणाऱ्या विध्यार्थ्यांना पाहात बसलो आहोत!
विध्यार्थी कळ्या आणि फुलांचं मिश्रण असतं!शाळेच्या वेलीवरील या कळ्या निरागस असतात!अल्लड असतात!चंचल असतात!शाळा नावाच्या ईश्वरी वास्तूत त्यांचं फुलणं,उमलणं सुरु असतं!घरी आई-वडील, शाळेत शिक्षक अन या दोघांमध्ये अभ्यासातून मंथन सुरु असतं!या अल्लड काळ्या-फुलांना जगाशी काहीही देणे घेणे नसतं!शाळा-घराच्या माध्यमातून यांचा कान,डोळे,बुद्धीचा विकास होत राहतो!शाळेत बाल मनावर संस्कार होत राहतात!
गुरुजनांच्या झोकून दिलेल्या शिकविण्यातून प्रश्नांची उत्तरं मिळत राहतात!बुद्धीचीं तहान भागत असतें!मनात घोळत असलेल्या प्रश्नांची उत्तरं गुरुजनांकडून मिळत असतात!शरीर-मन प्रश्नाच्या उत्तरांनी समाधानी होत राहतं!प्रश्नांची उकल होत राहते!मनाची भूक-तहान भागत राहते!उत्सुकतेच शिखर गाठून समाधान मिळू लागतं!
पंख बळकट होऊ लागतात!विध्यार्थी स्वतः उडायचा प्रयत्न करू लागतात!पंखात शक्ती भरणारी शाळा असतें!गुरुजन ज्ञानघुटी पाजत असतात!…मी ज्ञानवृक्षाखाली बसून शाळेचं निरीक्षण करीत होतो!वर्ग पाहात होतो!विध्यार्थी अन गुरुजन पाहात बसलो होतो!….माझा नातू ‘मानस’…लांब तिकडे एका वर्गात बसला होता!मी बालवाडी ते १२वी पर्यंत शिकणारे विध्यार्थी पाहात होतो!साधनेतून सिद्ध होता येतं!
अशा हडपसर, पुण्यातील रयत शिक्षण संस्थेच्या,साधना शाळेच्या मैदानातील झाडाखाली ओट्यावर बसलो होतो!मी शाळा सुटायची वाट पाहात बसलो होतो!नातूचा नर्सरी वर्ग सुटायची वाट पाहात बसलो होतो!
शाळा ही ज्ञान मंदिर असतें!पवित्र मंदिरं असतें!विध्यार्थी आई असतें!आई ममतेने कुशीत घेत असतें!साधना शाळेच्या कुशीत कित्येक विध्यार्थी शिकत आहेत!मी डोळे भरून पाहात होतो!मी ही मनाने माझ्या बालपणीच्या शाळेत विध्यार्थी होऊन बागडत होतो!
माणूस कितीही वृद्ध झाला तरी आपलं जन्मठिकाण अन आपली शाळा कधीही विसरत नसतो!कितीही लांब गेलात तरी ती माती बोलावित असतें!बालपणीच्या कुशीत जाऊन तेथील आठवणी हृदयी ठेवाव्याशा वाटतात!तेथील माती मस्तकी लावावीशी वाटते!लहानपणीच्या खाणाखुणा शोधाव्याशा वाटतात!आपल्यातील बालपण पुन्हा डोकावू लागतं!मी ही मनानें माझ्या गावी जात असतो!
प्राथमिक शाळा अन माध्यमिक शाळा पाहात असतो!वर्गात जाऊन बसत असतो!काही गुरुजी-सरांनी केलेली शिक्षा डोळ्यातून पाहतो!कधी शिक्षकांनी थोपटलेली पाठ आठवून उर भरून येतो!खाकी हाफ चड्डी आणि पांढरा शर्ट अंगावर निरखून पाहू लागतो!पाठीवर कापडी पिशवीतील पुस्तकं वह्या शोधू पाहतो!
सर्व दिसत असतं!शाळेची इमारत दिसते! मैदान दिसत असतं!मित्र शोधू लागतो!शिक्षक दिसत असतात!मी लहान होऊन नाचू लागतो!अंगावर एक इंची मांस चढून नाचू लागतो!आनंद पांघरून नाचू लागतो!मी लहान होतो!मी बाल होतो!मी विध्यार्थी होतो!
शाळेच्या चार भिंतीतून बाहेर येतो!ज्ञानरस चाखून बाहेर आलेलो असतो!निखळ आनंद घेत असतो!शाळेतील सर्व मित्र अन शिक्षक डोळ्यसमोर आहेत!वर्ग भरला आहे!दुपारची जेवणाची सुटी झाली आहे!आम्ही मित्र गोल राउंड करून बसलो आहोत!डबे फिरताहेत!वेगवेगळ्या भाज्यांची चव चाखतो आहे!
……अन अचानक भानावर आलो!वास्तवात आलो!घंटा वाजत होती!नातूची शाळा सुटली होती!हे भास होते बालपणीचें!बस!बस हे स्वप्नचं होतं!भूतकाळातं जाऊन आलो होतो! डोळे पानावलें होते!डोळ्यावर लावलेला चष्मा काढून हातरूमालाने पुसत होतो!ते बालपण अन शाळा या जन्मी पुन्हा नाही!
.. नातू जवळ येऊन विचारत होता,
‘बाबा तुम्ही रडताहेत?’
‘नाही रें सहज डोळ्यात पाणी आलं!’
अशी आमची शाळा होती!आता नातूला घ्यायला आलो होतो!आई -वडील शिकले नव्हते!आम्ही शिकावं, सुखी व्हावं म्हणून ते कष्ट करत होते!आमच्या सुखासाठी राबत होते!आम्ही शिकून शहरात आलो!….आता नातूला शाळेत आणतो आहे!…
…. ती गावाकडची माझी शाळा होती!आता शाळा खूप बादलली आहे!मुलं, शिक्षक सर्वचं बदलले आहे!बदल काळाची गरज आहे!मी मात्र अजून तिथंच आहे!
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२७ जून २०२४