satyashodhak samaj सत्यशोधकी लिखाणातून दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज

satyashodhak samaj
सत्यशोधकी लिखाणातून दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज

satyashodhak samaj सत्यशोधकी लिखाणातून

सत्यशोधकी लिखाणातून दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज satyashodhak samaj

श्रद्धा कुंभोजकर

महात्मा जोतीराव फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सदुपदेश व विद्या यांच्या द्वारे आपले वास्तविक अधिकार माणसांना समजावून सांगावेत’ या हेतूने सत्यशोधक समाजाची स्थापना दीडशे वर्षांपूर्वी केली. हे खरे अधिकार कसे मिळवता येतात याचं भूतकाळातलं उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सत्यशोधकांनी विविध प्रकारचं लेखन केलं. महात्मा फुले यांनी रचलेला महाराजांचा पोवाडा, त्यांचे अखंड, लोखंडे, भालेकर यांच्यासारख्या त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांनी आणि केळुसकर, वानखेडे अशा सत्यशोधक समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत लिहिलं आहे. या लिखाणातून दिसणारं महाराजांचं चित्रण अभ्यासलं तर सत्यशोधकांना कोणकोणत्या गोष्टी एका आदर्श नेत्याकडून अपेक्षित होत्या हे समजतं.

satyashodhak samaj
satyashodhak samaj


छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामधला मुक्तिदायी आशय जगासमोर मांडणारे महात्मा जोतिराव फुले यांनी आधुनिक महाराष्ट्रामध्ये महाराजांची स्मृती सार्वजनिक स्वरूपात जागवली जावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. रायगडावर प्रत्यक्ष जाऊन महाराजांच्या समाधीची जागा शोधून, तिथे लोकांना शिवाजी महाराजांप्रति आदर व्यक्त करता येईल अशी व्यवस्था जोतिराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. त्यापूर्वी १८६९ मध्येच या रयतेच्या राजाला आपण आपलंसं करायला हवं हा विचार त्यांनी महाराजांच्या पोवाड्याच्या माध्यमातून समाजापुढे  ठेवला.

हा राजा म्हणजे ‘क्षत्रियांमध्ये होऊन गेलेला महावीर’ आहे याची जाणीव ते वाचकांना करून देतात.  ही विशेषणं जोतिरावांनी निष्कारण वापरली नसून त्यामागे ऐतिहासिक कारणं आहेत. १८५७च्या उठावापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये भारतातील विविध जातीधर्मांचे सैनिक असत. परंतु १८५७च्या उठावानंतर इंग्लंडचे तत्कालीन युद्धखात्याचे मंत्री मेजर जनरल जोनाथन पील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पील आयोगानं १८५९ मध्ये आपला अहवाल सादर केला.

satyashodhak samaj
satyashodhak movie

या अहवालात अशी शिफारस केली होती, की इंग्रजी सैन्यामधून भारतीय सैनिकांची संख्या कमी करायला हवी. आणि मुंबई आणि मद्रास इलाक्यात दर तीन भारतीयांमागे किमान एक इंग्रजी सैनिक अशा प्रमाणात सैन्याची पुनर्रचना करायला हवी. भारतीय लोक जोवर प्रत्यक्ष सामाजिक जीवनात जात पाळतात तोवर इंग्रजांनाही तिकडे दुर्लक्ष करणं परवडणार नाही असं निवेदन या आयोगापुढे मांडलं गेलं. त्यामुळे मारशिअल रेस थिअरी किंवा लढवय्या जातींच्या सिद्धांतानुसार काही जातींमध्ये शौर्याचा अभाव असल्याच्या समजापोटी त्यांना लष्करात भरती करणं अयोग्य ठरवलं गेलं.

या पार्श्वभूमीवर १८६९मध्ये महात्मा फुले या पोवाड्यात ज्या गोष्टी मांडतात त्या विशेष अर्थपूर्ण ठरतात. पोवाड्याच्या शेवटी व्हिक्टोरिया राणीला “सत्ता तुझी राणीबाई| हिंदुस्थानीं जागृत राही||” असं साकडं घालतात त्यामागेही ही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. म्हणजेच शिवरायांच्या पोवाड्याच्या माध्यमातून जोतिरावांना असा सदुपदेश अभिप्रेत होता, की शौर्यादि गुणांचा विचार जन्मजात श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या समजांच्या पलीकडे जाऊनच करायला हवा.

महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले जयंती


महाराजांचे गुण वर्णन करताना जोतिराव त्यांचे आदर्श कळतनकळत महाराजांच्या रूपामध्ये पाहताना आढळतात. पतिपत्नींमधल्या स्नेहभावाचं जोतिरावांना अभिप्रेत असणारं रूप ते महाराजांच्या कहाणीतून चित्रित करतात. मोकळेपणाने आणि आदरपूर्वक पत्नीसोबत सल्लामसलत करणारे महाराज आणि सहचरीच्या भूमिकेतून सूचना देणाऱ्या सईबाईंचं चित्रण हे जोतिरावांच्या भावविश्वाचंही सूचन करतं.

शहाजीला पीडा दीली कळलें शिवाजीस| ऐकून भ्याला बातमीस||
पिताभक्ति मनीं लागला शरण जायास| विचारी आपल्या स्त्रियेस||
साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस| ताडा दंडी दुसमानास||
स्त्रीची सूचना सत्य भासली लिहिलें पत्रास| पाठवी दिल्ली मोगलास||
चाकर झालो तुमचा आतां येतों चाकरीस| सोडवा माझ्या पित्यास||

लढाईत मित्र शत्रूंचा विचार न करता सर्व जखमी सैनिकांना उपचार देऊन आधी बरं करायचं आणि नंतर ते आपल्या पक्षातील आहेत की शत्रुपक्षातील याचा विचार करायचा. त्यातही ज्यांना आपल्या सैन्यात सामील व्हायचं आहे त्यांना सामावून घ्यायचं हे महाराजांचं धोरण जोतिराव पोवाड्यात अधोरेखित करतात.


लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला| पाठवी रायगडाला||
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला| खिदाडी औरंगबादेला||
रायगडीं नित्य शिवाजी घेई खबरीला| गोडबोल्या गोवी ममतेला||
एकसारखें औषध पाणी देई सर्वांला| निवडलें नाही शत्रुला||
जखमा बऱ्या होतां खुलासा सर्वांचा केला| राहिले ठेवी चाकरीला||
शिवाजीची कीर्ती चौमुलखीं डंका वाजला| शिवाजी धनी आवडला||
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला| हाजरी देती शिवाजीला||

खुद्द जोतिरावांच्या चरित्राचा अभ्यास केला तर सहज लक्षात येईल की शत्रूलाही प्रेमानं जिंकण्याचं महाराजांचं हे धोरण सत्यशोधक समाजानं आणि जोतिरावांनी अंगीकारलेलं होतं. बालहत्येचा रोग जडलेल्या  तथाकथित उच्चजातीयांना मदतीसाठी आधी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करणं आणि आपल्या लढ्यात जे सामील होतील त्यांच्या बाबतीत स्वागतशील भूमिका घेणं हे महात्मा जोतिरावांनी अंगीकारलेलं तत्त्व छत्रपतींच्या पोवाडयामध्ये सहज दिसतं.


जोतिरावांच्या नंतरदेखील सत्यशोधकांनी महाराजांबाबत प्रेम आणि आदर सातत्यानं मनात ठेवलेला दिसतो. सावित्रीबाई आणि यशवंतराव फुले, धोंडिराम नामदेव कुंभार, नारायण मेघाजी लोखंडे, कृष्णराव भालेकर अशा अनेक अनुयायांनी सत्यशोधक विचाराचा वेल गगनावेरी नेला.

प्रथम नमूं शिवरायाला| शाहाजी सुताला||…ज्ञानबळें उन्नती व्हाया| बसविण्यास श्री शिवराया| तुझ्यावीण शक्ती द्याया| नसेबा कुणाला||३|| उठ रायगडच्या राया| नको बसूं अंत पाहाया| वेळ नसे देश बुडाया| अशा समयाला|| आणीबाणिचीही वेळ| परक्यांचा होतो खेळ| स्वदेशाचें सर्वच बळ | गेले लयाला||५||
(शंकर बळवंतराव भोंसले उर्फ बारवकर, भरीव ठोशांचे गुद्दे, वरवंड, पुणे. वर्ष ? पृ. १.)

पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागामधल्या शंकर भोंसले यांच्या सत्यशोधकी रचनेतून महाराजांना पृथ्वीवर परत एकदा अवतार घेण्याची प्रार्थना कवी बारवकर करतात.


दासराम तथा रामचंद्र बाबाजी जाधव हे कोल्हापुरातले सत्यशोधक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण सांगतात. संपत्ती असूनही बेताने खर्च करणारे, युद्धाची शक्ती असूनदेखील फितूर म्हणजे वैचारिक समन्वयाची वाट आधी चोखाळणारे शिवाजी महाराज आपले आदर्श म्हणून त्यांनी चित्रित केले आहेत.


शिवाजी आपुला नेता| कसा हो शूर तो होता|| …लढवी अचाट बुद्धीला| आचंबा भूमीवर केला||
बाळगी जरी संपत्तीला| तरी बेतानें खर्च केला|| वांटणी देई शिपायांला| लोभ द्रव्याचा नाही केला||
चतुर सावधपणाला| सोडिलें आधी आळसाला|| लहान मोठ्या पागेला| नाहीं कधीं विसरला||
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला|| नाहीं दुसरा उपमेला|| कमी नाही कारस्तानीला| हळूच वळवीं लोकांला||
युक्तीनें बचवी जीवाला| कधीं भिईना संकटाला|| चोरघरती घेई किल्ल्याना| तसेंच बाकी मुलखांला||
पहिला झटे फितुराला| आखेर करी लढाईला|| युद्धीं नाहीं विसरला| लावी जीव रयतेला||
टळेना रयत सुखाला| बनवी नव्या कायद्याला|| दाद घेई लहानसानाची| हयगय नव्हती कोणाची||
आकृती वामनमूर्तीची| बळापेक्षा चपळाईची||



विसाव्या शतकातदेखील सत्यशोधक समाजाची अनेक वृत्तपत्रं आणि प्रकाशनं सुरू होती. त्यांत राष्ट्रवीर, विजयी मराठा, अशा अनेक वृत्तपत्रांचे शिवाजी महाराजांवरचे विशेषांक निघत. अनेकांच्या बोधचिन्हातच महाराजांची प्रतिमा असे. याखेरीज सत्यशोधकी जलशांतून, नाटक मंडळींतून आणि शिवजयंतीसारख्या अतिशय लोकप्रिय कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराजांची एक आदर्श नेता म्हणून प्रतिमा मराठी मनामध्ये बिंबविण्यात महात्मा फुले आणि सत्यशोधकांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं.



(पूर्वप्रसिद्धी- साप्ताहिक राष्ट्रवीर, बेळगांव.)

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *