खान्देशातील नवदर्गा सतीमाता
दोन रेल्वे रुळातली चमत्कारी
चांदणीकुऱ्हाची श्री सतीमाता :
(खान्देशातील नवदर्गा – १० / प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३)
धरणगाव – अमळनेर रस्त्यावर चांदणी-कुऱ्हे गावाजवळ दोन रेल्वे रुळाच्या मधोमध असलेले सती मातेचे मंदिर म्हणजे भाविकांच्या श्रध्देला पावणारे जागृत देवस्थान आहे. चमत्काराची अनुभूती आली की भक्तीला उधाण येते. अशीच काहीशी या मंदिराची कहाणी आहे. जेमतेम ४फूट उंचीचे मंदिर आणि त्यात फूटभर उंचीची मातेची अनघड स्वयंभू मूर्ती असे याचे स्वरुप आहे. एका विशाल निंब वृक्षाच्या खाली विराजमान सती मातेचे मंदिर, त्याच झाडाला लटकवलेले असंख्य घंटा, पाळणे, मुंडावळ्या प्रवाश्यांचे सहज लक्ष वेधून घेतात. या मार्गाने जाणारा प्रत्येक प्रवासी उत्सुकतेने मातेचे दर्शन घेतो. मातेची महती ऐकून आपल्या मनातली ईच्छा बोलतो. ईच्छापूर्ती झाल्यावर पुन्हा पुन्हा दर्शनाला येतो. आजचे मंदिर चार पिढ्यांपासून याच जागेवर असल्याचे मंदिराचे पुजारी सुदामा आखडू गुरव सांगतात. त्यांची ही पाचवी पिढी. १५ वर्षांपूर्वी येथे सिंगल रेल्वे लाईन होती. तिचे दुहेरीकरण झाले. तेव्हा रेल्वे मार्गात अडथळा ठरणारे हे मंदिर हटवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी जेसीबी आणण्यात आले. या प्रयत्नात पाच जेसीबी मशिन नादुरुस्त झाले. रेल्वे प्रशासनाचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. इंजिनिअर, तंत्रज्ञ, कामगार, रेल्वे प्रशासन मंदिर हटविण्यात हतबल ठरले. शेवटी मातेची ईच्छा समजून मंदिर आहे त्याच जागेवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिराबाजूने नवीन रेल्वे लाईन टाकण्यात आली. हा मातेने दाखविलेला चमत्कारच मानण्यात आला. या घटनेसंदर्भात अनेक आख्यायिका परिसरात चर्चेत आहेत. यामुळे मंदिराचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच गेले. रेल्वे रुळावर असलेले हे भारतातील एकमेव मंदिर असावे. गेल्या काही वर्षात मंदिरावर अनेक सुविधा झाल्या आहेत. त्या भाविकांनीच स्वप्रेरणेने केल्या आहेत. शुक्रवार हा देवीचा वार असल्याने या दिवशी दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रांग लागलेली असते. देवीला नवस म्हणून घंटा, पाळणा, मुंडावळ्या भेट देण्याची प्रथा असल्याने परीसरात असंख्य लहान मोठ्या पितळी घंटा व पाळणे दिसून येतात. रेल्वे रुळाच्या मधोमध मंदिर असूनही देवीच्या कृपेने आजपर्यंत एकही अप्रिय घटना झाल्याची नोंद नाही. ही देवीचीच कृपादृष्टी मानली जाते. मंदिराचे कामकाज कुर्हे येथील विश्वस्त मंडळ सांभाळत असून याठिकाणी सुशोभीकरण सह रंगरंगोटी, वृक्षारोपण, बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. निसर्गरम्य व थंडगार वातावरण तयार झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मंदिरात एकच सेवेकरी व पुजारी असून तेच मंदिरात पूजाअर्चा करुन निगाही राखत असतात. याठिकाणी मातेचे दर्शन, नवस आणि नवस फेड याच गोष्टीना प्राधान्य दिले जाते. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या इतर गोष्टीना इथे थारा दिला जात नाही. एकंदरीत मंदिराचे वाढते प्रस्थ लक्षात घेता भविष्यात हे मंदिर महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध होईल असा विश्वास भाविक व्यक्त करतात.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३).