Paus Marathi Kavita
paus marathi kavita पावसाची मराठी कविता
शोध पावसाचा
शोध पावसाचा
कुठे कसा शोधावा रे
कळेनाच पावसास
जारे जारे कुणी तरी
याचा करा रे तपास॥धृ॥
निसर्गाच्या परिक्षेत
गमे झाला हा नापास
सांगा कुणीतरी याला
कारे हिरमुसलास॥१॥
येरे पावसा नको रे
असा होऊस उदास
आज नाही तर उद्या
बघ होशिलच पास॥२॥
झालो अधिर कधीचे
आम्ही तुझ्या ओलाव्यास
नदी नाले धरणास
पाणी देरे तलावास॥३॥
किती सांगू थकले रे
तुला पावसा खुळ्यास
केंव्हा येशिल कधी रे
माझ्या जळगांव धुळ्यास॥४॥
आला म्हणे इथे तिथे
आला म्हणे केरळास
आला आणि कुठे कुठे
आला माझ्या महाराष्ट्रास॥५॥
मनी योजिले उद्दिष्ट
पुरे कर उद्दिष्टास
फळ देरे प्रतिक्षेचं
माझ्या बळीच्या कष्टास॥६॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३

अरे पावसा पावसा
अरे पावसा पावसा
तुझी होऊ देरे ख्याती
अरे पावसा पावसा
तुझी बरसू दे प्रिती
पण ऐक माझे जरा
नको कुठेही रे अति॥धृ॥
जिथे अति तिथे कर
जरा धिमी तुझी गती
आम्हातून स्विकारुन
बघ मानवता निती॥१॥
ओसंडेल गाण्यातून
मग येरे ये ची प्रिती
जिथे निती तिथेच रे
बघ फुलणार प्रिती॥२॥
अति तिथे नको करु
अति पावसारे माती
बळी होवो बळवंत
फुलू देरे शेती भाती॥३॥
नाव तुझे जीवन रे
नको जीवनांची माती
जीवनास अनमोल
तुझी होऊ देरे ख्याती॥४॥
–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
