शतायुष्याच्या वाटेवरी

शतायुष्याच्या वाटेवरी

शतायुष्याच्या वाटेवरी

शतायुष्याच्या वाटेवरी

नानाभाऊ माळी

गुडघ्याच्या किरकिरीला
नजरंदाज करायचं
घालूनी ‘नि कॅप’ आता
श्वासात दम भरायचं..!

साठीच्या काठीला अहो
पार दूर दूर ठेवायचं
हसून,उधळून आनंदाने
खूप तरणाबांड व्हायचं!

गर्दी नकोचं गोळ्यांची
पथ्य खूप पाळायचं
प्राणायाम व्यायामसंगे
खूप खूप खेळायचं!…

‘वय झालं हो माझं ‘
त्याला दूर भिरकून द्यायचं
जगायची न्यामी संधीही
थोडं घोड्यागत व्हायचं!

जेष्ठतेचा बिल्ला गळ्यात
कधी भटकंतीला जायचं
छोटी मोठी मुलं होऊन
थोडं हट्टीही व्हायचं!….

आपण  शत प्रतिशत, १००% , शतदा असे शब्द शतदा ऐकत असतो!’शतक महोत्सव’ शब्द देखील कानावर येतं असतो!शून्याचा शोध लावणाऱ्या भारतीयांने शून्यातून शंभरीकडे वाटचाल करायला सांगितलं!शून्याला खरी किंमत आली!शून्याशिवाय सर्व व्यवहार अपूर्ण आहेतं!व्यर्थ आहेत!मी ‘शत’चा अर्थ शोधित होतो!शतक सापडला!१०० सापडला!पुढे शतायु शब्द नजरेसमोर आल्यावर नेमका १०० चं असल्याचं कळलं!माणसाचं आयुष्य असंच असावं!शतायुषी असावं हे कळलं!

जन्माला आल्यापासून एक एक वर्षांनी आयुष्य वाढत असतं!पुढे रौप्य, सुवर्ण, अमृत, हिरक अन शतकाकडे वाटचाल सुरूचं राहते!शतकी आयुष्य जगणारे खूप खूप भाग्यवान असावेत!मोजकेच असावेत!खरंय शतक पूर्ण करणारे मोजकेच खेळाडू असतात!’जीवन म्हणजे क्रिकेट राजा  थांबला तॊ संपला’!हुकला तॊ संपला! आयुष्य असंच असतं!शतकी महापुरुष महाभाग्यशाली असतात!बोटावर मोजण्या इतकी ही संख्या असतें!माझी आई १०२ वर्षांच्या वाटचालीस आहे!स्वतःच्या पायांवर स्वतः सगळं करते!फिरते आहे!

शून्याचा भोपळा फोडणारा अन शून्यातून उभा राहणारा माणूस आपलं आयुष्य एक एक वर्षांनी जगत असतो!मी दोन वर्षांपासून एका जेष्ठ नागरिक संघाचा सदस्य झालो आहे!त्या संघाचं नावचं मुळी ‘शतायु जेष्ठ नागरिक संघ’आहे!प्रत्येक व्यक्तीला वाटतं,’मला शंभरी पार आयुष्य मिळावं!सुदृढ, आरोग्यदायी आयुष्य मिळावं!’ सकारात्मक सोच असेल, positive thought असतील तर शतकीचं काय, शतकापुढे आयुष्य जगणं शक्य होईल!रोगांवर विजय मिळवीत, तणावमुक्त आयुष्य जगत राहायचं!अन शतक साजर करायचं!शंभर वर्षं जगूण दाखवून द्यायचं!Be positive चा इफेक्ट शरीर,मनावर होत असतो!आनंदी मन आरोग्याचं गुणकारी औषध असतं!

खेडे गावात राहणारा माणूस घर-दार,शेतीतं राबत असतो!मजुरी करूनही जगत असतो!शेत सर्वस्व असतं!उत्पन्नाचं साधन असतं!मेहनत असतें!घाम निघत असतो!शुद्ध हवा,पाणी,ताज्या भाज्या खाऊन जगत असतो!पोटासाठी पळत असतो!घरी आल्यावर अंथरुणाला पाट टेकवल्याबरोबर शांत झोपी जात असतॊ!चांगल्या आहार विहारामुळे खेडेगावातील माणसं तुटपुंज्या पैशातही सुखी समाधानी राहतं असतात!आयुष्याची दोरी वाढवत आनंदाने जगत असतात!पैशाने श्रीमंत नसतीलही!

कधी कधी उभं पीक अति पाऊस अन दुष्काळ हिरावून नेतो!अति हव्यास नसतो!सहनशक्तीचं आगर असलेले बांधव मन अन आरोग्याचें धनिक अन श्रीमंत असतात!अशीचं माणसं शतकी आयुष्याकडे वाटचाल करीत असतात!!मिळालं त्यातं समाधान मानणारी माणसं शेतीत राबत असतात!निसर्गाचा मारा अंगावर झेलून जगत असतात!गावातल्या पारावर गप्पा मारीत,चेष्टा मष्करीतं आपलं आयुष्य आनंदात घालवत असतात!शरीर अन मन सुदृढ असणारी माणसं आयुष्य शतकीपार वाटचालीस सिद्ध होतांत!

जेष्ठ म्हणजे काय मग ?वयाच्या साठी नंतर जेष्ठतेचा पक्का शिक्का आपल्या नावासमोर बसला जातो! तरीही या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळतांना दिसत नाही!वयाने वाढलेला,मनाने तरुण असलेला माणूस स्वतःस ‘म्हतारा’ तरी कसं समजेल बरं?सरकारी नियमाप्रमाणे वयाची साठी गाठली की जेष्ठ समजावं?अलीकडे माणसाची कार्यक्षमता वाढलेली आहे!अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे वयाची जेष्ठता वाढत चालली आहे! ‘अभी भी दिल जवान हैं’!अभी भी मैं जवान हुं,असं झालंय!तरीही.

जेष्ठांच्या आरोग्याविषयी समस्या वाढत चालल्या आहेत!वाढते शहरीकरण,वाढते प्रदूषण,कौटुंबिक समस्या-कलह,जीवन साथीदारापैकी एकाचं निधन झालेलं असतं, एकाकीपण,वाढत नैराश्य,हतबलता, वृद्धात्वामुळे शरीराची अति झिज होते!आदी समस्यांमुळे शहरात रुद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे!दुःखी,व्याधीग्रस्त शरीर जेव्हा नकोसं वाटत तेव्हा आपलं मन स्पर्धेतून बाहेर पडतं!’हरलो आता’ असं सांगायला लागतं!अशा व्यक्ती वृद्ध झाली असा गोड गैरसमज होतो!मनाने खचलेली जेष्ठ व्यक्ती स्वतःस अकाली वृद्ध समजू लागते!…पण

पण समस्यावंर उपाय असतात!सकारात्मक विचार करणे!मागचं झालं गेलं विसरून पुढे वाटचाल करणे!मन एकचित्त होण्यासाठी अध्यात्मिक होणे!स्वतःस श्रद्धेला, चिंतनाला, मनोरंजला अर्पित करणे!बोलके राहणे, माणसं जोडतं राहणे!ताण तणावापासून दूर राहणे!आपल्या घरात जास्त लुडबुड न करणे!प्राणायाम, व्यायाम करणे!मनाला आवडलेला एखादा छंद जोपासणे!जेष्ठ नागरिक संघात जाऊन मनाच आनंदी औषधं शोधणे!वयाच्या शतकी मार्गांवरील भेटलेलीं ही स्थळं सुंदर स्टेशनं आहेत!

मी पुण्याच्या हडपसर येथील “शतायु जेष्ठ नागरिक संघाचा” सदस्य आहे!यात पन्नास टक्के सदस्यांनी वयाची ७५ री ओलांडली आहे!संघाच्या अध्यक्षांच वय देखील ७८ वर्षांचं आहे!श्री.एम.एन.कोंढाळकर सर अध्यक्ष आहेत!बहुआयामी, चतुरस्र व्यक्तिमत्व!प्रत्येक गोष्ट अभ्यासून बोलत असतात!मुद्देसूद बोलत असतात!त्यांच्याकडे बुलेट गाडी आहे!या वयातही तें बुलेट गाडी चालंवतांतं याचं आश्चर्य वाटतं!वयाच्या पंचवीशीचा फिल अनुभवत असतात!वेगळ्याच अनुभूतीचा आनंद आहे!७८ व्या वर्षी चढत्या पायरीवर देखील आनंद देतं जगण्याची एक वेगळीचं कला अवगत आहे आदरणीय कोंढाळकर सरांना!वय वाढत असलं, शरीर साथ देतं असलं,मनाने तरुण असलो की बस्स शतायुष्याकडे वाटचाल करणारी ही जेष्ठ मंडळी नेहमीचं उमेद देतं असतात!उत्साह देतं असतात!आनंद देतं असतात!मार्गदर्शक असतात!वेळोवेळी समजही देतं असतात!निखळ आनंद वाटीत राहिलं की वयाची जाणीव होत नाही!

मोठंमोठ्या शहरांमध्ये ‘जेष्ठ नागरिक संघ’ असतात!जेष्ठांच्या नेमक्या कोणत्या समस्या असतात?त्यांचं अध्ययन करून उपाय शोधून,एकत्रित काम करण्याची गरज असतें!शतायु जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष आदरणीय कोंढाळकर सर अन त्यांचे सहकारी उत्साहाने संघाच्या सर्व सदस्यांना आनंद देतं आहेत!सदस्यांचे वाढदिवस साजरा करीत आहेत!सहलीच आयोजन करीत असतात!आरोग्याविषयी शिबीर आयोजित करीत आहेत!मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करीत असतात!आपलं वय विसरून निखळ आनंद देणारी ही मंडळी शतकाकडे वाटचालीस सिद्ध झालेली आहेत!

आपलं मन प्रसन्न असलं की जगणं सुद्धा सुंदर होत जातं!उतार वयातील शरीरिक व्याधीनां आत्मविश्वासाने सामोरे जात राहायचं!घराच्या समस्या मुलांवर ढकलून मोकळे व्हायचं!आयुष्यभर कष्ट केलेत!दुःख भोगलेत!आता असह्य दुःख अंगावर न घेता खोल दरीत ढकलून मोकळ व्हायचं!फक्त मनाप्रमाणे जगत राहायचं!आपल्या पंखात जान ओतायची!प्राण ओतायचे!पंखात नवीन ऊर्जा भरायची!श्वास भरायचेतं!आकाशी उडत राहायचं!वयाच्या शतकाकडे वाटचाल करीत वेदनामुक्त आयुष्य जगत राहायचं!संध्याकाळी आयुष्याला डोंगरापलीकडे न्यायचं!मावळतीचा लपलेला सूर्य दाखवत राहायचा!आयुष्याला अश्व करुनी शतकी आरूढ व्हायचं!

नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१८ ऑक्टोबर २०२४