मोहनथाळ
॥ मोहनथाळ ॥
——©MKभामरेबापु
मोहनथाळ पाहिल्यावर तुमच्या जीभेला जरुर पाणी सुटेल.
पण
माझ्या मात्र डोळ्यात पाणी येते,नि तोंड कोरडं पडतं,
एका कार्यक्रमात मला आग्रह करुन करुन मोहनथाळ वाढत होते.
यजमान ने स्वतः येवुन त्यांच्या हाताने मोहनथाळचा तुकडा माझ्या तोंडात कोंबला.
त्यावेळी का कुणास ठाऊक माझ्या डोळ्यात पाणी आले,
त्याचं ते प्रेम व आग्रह पाहुन वा मोहनथाळचा मोठा तुकडा कोंबल्यामुळे पाणी आले असेल असं सर्वांना वाटले.
पण मी भुतकाळात शिरलो होतो,
माझी परीस्थिती पाहुन प्राचार्यांनी मेस मध्ये मला सवलतीच्या दरात जेवणाची सोय केलेली होती,
कमवा व शिका योजनेंतर्गत मी काॅलेजचे बागकाम करत काॅलेजात जात असे,
एक दिवस काॅलेजचे तास आटोपुन कडक उन्हात बगिच्यातले काम करुन १२॥ च्या सुमारास मेसमध्ये जेवायला गेलो.
मी ताटावर बसणार तोच मॅनेजर माझ्याजवळ आले,
“आज फिस्ट आहे,सवलतवाल्यांना जेवण नसते”
ते ऐकुन मला घाम फुटला,
मी ताटावरुन तसाच उठलो,तसा एक मित्र म्हणाला
अरे मालकाला भेटुन घे.
म्हणुन मी किचनमध्ये बसलेल्या मालकाकडे गेलो.
मालक त्यावेळी ट्रे मधल्या मोहनथाळचे चाकुने छोटेछोटे तुकडे कापत होता.
मी हात जोडुन विनंती केली.
परोपरीने सांगुन पाहीले,प्राचार्यांचे नाव सांगीतले,
“बिल्कुल परवडता नही भै,आज नही कलसे आ जाना,प्राचार्य साबने बोला ईसके लिए कमरेटमे खिलाते”
असं बोलत ते डायनिंग हाॅलकडे निघुन गेले,,
मी हिरमुसलो,पोटात भुकेचा डोंब.
लालपिवळी मोहनथाळचे दर्शन,जेवणावळचा घमघमाट त्यात माझी भुक अधिकच उसळली,
पण गरीबीने ती दाबली,
मालकाचे हे बोलणे,मॅनेजरचे ताटावरुन उठवणे,,
मनात नुसता आक्रोश पण हतबल होतो,
मेसच्या पायर्या उतरलो,
दिवसभर उपाशी राहीलो.
कामात,अभ्यासात दिवस तर निघुन गेला.पण रात्र निघेना,
भुक काय असते ते तेंव्हा जाणले,
निसर्ग मोठा बेरका असतो,
काही तरी जिद्द निर्माण होणेसाठी तोच असे प्रसंग घडवतो,
पुढे माझ्या ट्युशन्स बहरल्या,पालक विद्यार्थींमध्ये नावारुपाला आल्या,
ही बाब मेस मालकाच्या लक्षात आली.
एक दिवस मालक आला नि त्याच्या दोन्ही पोरांच्या ट्युशन्स माझ्याकडे लावल्या,
भुकेची व मोहनथाळची किंमत मला कळली होती.
पोटतिडकीने पोरांना शिकवले,त्यांची प्रगती पाहुन त्या मालकाने मला दोन वर्षे एक पैसा न घेता मला जेवु घातले होते,
ते सारं आठवल्याने त्या मोहनथाळने माझ्या डोळ्यात पाणी आणले.
ती आंसवे
भुकेची होती,
ताटावरुन उठल्याची होती,
गरीबीच्या वेदनांची होती,
आणि
त्या मालकाच्या कृतज्ञतेची ही होती,,,
——©MKभामरेबापु
९८५०५१५४२२