पोशिंद्याचा धर्म
पितृ पक्षामध्ये बाप
माझा नितनेमे येतो…
खोल डोहातील सल
पुन्हा पापणीत घेतो………1
बाप ताळेबंद बघे
तेच..घर…तेच..दार…
शब्द अंतरीचे येता
पडे ओठावरी भार………2
कर्ज तिजोरीचं मीही
दरसाली घेत होतो…
तळ फुटलेली नाव
पैलतीरी नेत होतो……….3
पूर्वापार हाच धंदा
नाव वल्हवीत गेलो…
पैलथडी येता येता
तिथे बुडूनिया मेलो………4
रोज उकरली माती
तरी सापडेना घास…
तया शोधतांना बेटा
होई बिनसुदी श्वास………5
सदा तयासंगे चाले
चोर शिपाईचा खेळ…
दुष्ट दिशाभूल गांजे
टाळे पोटोबाची वेळ………6
माझं नशिबात होतं
तुझ्या पदरीही तेच…
देवा,मेल्यावर सुद्धा
चित्र डोळ्यापुढे हेच………7
देव दानवांचा सध्या
घट्ट बसलाय मेळ…
घड उपर्याच्या हाती
तुला मात्र अर्धं केळ………8
देतो हवनात घास
नाही लागतच गोड…
आरं ह्येच्यापुढं लेका
श्राद्ध करणंही सोड………9
श्राद्ध निमित्ताने बाप
गोड भोजनाला येतो…
परि पोशिंद्याचा धर्म
ताट एकाक्षांना देतो……..10
““““““““““““““““““““`