प्रणय रंगात रंगावे
(वृत्तबद्ध मराठी रचना)
लगावली- लगागागा ची चार आवर्तने.
(वृत्त- वियदगंगा)
प्रणय रंगात रंगावे
अशा रिमझिम सरींचे मी, किती आभार मानावे
सखे उपकार वर्षेचे, कुण्या शब्दात वर्णावे?
मुलायम रेशमी कुंतल, हसत वा-यासवे झुलती
अधर अधरास भिडल्यावर, तुझेही भान हरपावे
बहू भावूक होइल मी, तुला मीठीत घेताना
खुळ्या स्वच्छंद पाण्याने, तुझे सर्वांग भिजवावे
ढमाढम ढोल मेघांचे, कडाडे वीज लखलखती
गडद अंधार झाल्यावर, भितीने घट्ट बिलगावे
बळीचे भाग्य उजळाया, पिकांनी मस्त बहरावे
मिळो मग मोल मालाला, असे संकेत लाभावे
उघड राणी नयन थोडे, कशाला पापण्या मिटते?
उसळती सागरी लाटा तसे बिनधास्त खिदळावे
विठूचरणात नतमस्तक, ‘किरण’ आषाढले मन हे
सरी श्रावण करित गुंजन, प्रणय रंगात रंगावे
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.