बॅलन्स असून उपयोग नाही

बॅलन्स असून उपयोग नाही

काटकसर जरूर करावी
पण चिकटपणा नको,
भरभरून जगावं आयुष्य
हातचं राखून नको..

विटक अन आखूड कपडे
घरी घालून बसायचे,
स्वच्छ चांगले कपडे का
फक्त बाहेर जातांना वापरायचे

कपाटं भरून ठेवण्यापेक्षा
घरातही टापटीप रहावं,
राजा राणी सारखं रूप
आपल्या वास्तूलाही दाखवावं..

महागाच्या कपबश्या म्हणे
फक्त पाहुण्या रावळ्यांसाठी,
जुन्या पुराण्या फुटक्या
का बरं घरच्यांसाठी ?

दररोजचाच सकाळचा चहा
घ्यावा मस्त ऐटीत,
नक्षीदार चांगले मग
का बरं ठेवता पेटीत ?

ऐपत असल्यावर घरात सुद्धा
चांगल्याच वस्तू वापरा,
का म्हणून हलकं स्वस्त
उजळा कोपरा न कोपरा..

अजून किती दिवस तुम्ही
मनाला मुरड घालणार,
दोनशे रुपायची चप्पल घालून
फटक फटक चालणार..

बॅलन्स असून उपयोग नाही
वृत्ती श्रीमंत पाहिजे,
अरे वेड्या जिंदगी कशी
मस्तीत जगली पाहिजे..

प्लेन कशाला ट्रेन ने जाऊ
तिकीट नको एसीचं,
गडगंज संपत्ती असूनही
जगणं एखाद्या घुशीचं..

क्वालिटी हवी असल्यास
जास्त पैसे लागणार,
सगळं असून किती दिवस
चिकटपणे जगणार..

ऋण काढून सण करावास
असं आमचं म्हणणं नाही,
पण सगळं असून न भोगनं
असं जगणं मात्र योग्य नाही..

तू गरिबी पाहिलीस
सगळं सगळ मान्य आहे,
तुझ्या बद्दल प्रेमच वाटतं
म्हणून तर हे सांगणं आहे..

तुला टोमणे मारावे
हा उद्देश नाही,
तुला चांगलं मिळावं
बस बाकी काही नाही..

लक्झरीयस रहा एन्जॉय कर
नको चोरू खेटरात पाय,
खूप कमावून ठेवलंस म्हणून
चांगलं कुणीही म्हणणार नाय..

आयुष्याच्या संध्याकाळी तरी
ऐश्वर्य भोगलं पाहिजे,
ऐपत असल्यावर माणसाने
मजेत जगलं पाहिजे..