लोहगड किल्ला Lohagad fort
लोहगड किल्ला Lohagad fort
लोहगड किल्ला-भाग-०१ Lohagad fort
चला जाऊ गड-किल्ल्यांवर
(लोहगड किल्ला-भाग-०१)
नानाभाऊ माळी
या अंतर्मनातं माझ्या
दबलेले सारेचं असते
डोळ्यातुनी पाहता खोल
मला सारेच गहन दिसते!
दृष्टीतं बसेना माझ्या
ही सृष्टी लाजूनी हसतें
त्यावर असतात किल्ले
ही नजर अधाशी असतें!
हा कोणी रचिला पाया
नजर नजरेला फसते
विशाल बुरुज कडे ही
मज सारे अफाट दिसते!
दगडात ओतीला जीव
भिंतीत काळीज असते
अफाट काळे कातळ
मज माय भवानी दिसतें!
सह्याद्री विशाल छाती
वरती तोफ गर्जत दिसतें
जेव्हा लढ म्हणती शिवबा
तेव्हा तलवार तळपत असतें!
लोहगड किल्ला किल्ले शूर विरांची शक्तीस्थळं आहेत!स्फूर्तीस्थळं आहेत!स्मृती स्थळं आहेत!वीरश्रीने गाजलेलें किल्ले लढाऊ ढाल होऊन ग्वाही देतांना दिसतात!भारतीयांना जाज्वल्य देशभक्तीची, देशप्रेमाची हाक देत उभे दिसतात! प्रेरणा देत असतात!अस्मितेची जाणीव करून देत असतात!स्वराज्याची हाक देत असतात!किल्ल्यांची दगड-माती ऐतिहासिक घडामोडीची साक्षीदार आहे!अखंड बुरुजांचा दगड शतकानुशतके किल्ल्याला आधार देत आहेत!
किल्ल्यावरील माती सतत बोलावित असतें!ती मस्तकी लावून धन्य व्हावंसं वाटतं!त्या मातीत आमच्या राजांची पाऊले उमटलेलें दिसतात!त्यांच्या पाऊलखुणा हृदयाला जाणीव करून देत असतात!लढ म्हणायला सांगतात!किल्ल्यांवरील स्मृतीस्थळ छत्रपतीनी जीवंत केली होती!हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकास मुजरा करावासा वाटतो!
माझ्या राजास नतमस्तक व्हावंसं वाटतं!सतत जाणवत असतं,अजूनही शिवाजी राजे गडावर राज्य करताहेत!वाटतं,राजदरबार भरला आहे!रयतेचा राजा सर्वांसमक्ष सिंहासनावर बसला आहे!राजा प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करताहेत!… किल्ले ऊर्जा देत असतात!घोगावणारे वारे कानी पडतात!नजर मान वाकून उंचावर जाते तेव्हा गगन खाली आलेलं दिसतं!सह्याद्रीभूमी विरांची आहे!पौलादी छातीची आहे!
किल्ल्यावर अनंत पिढ्या शौर्य गाजवत निघून गेल्या!कर्तृत्वाचा ठसा ठेवून निघून गेल्या!पडके, झिजलेले, जिर्णावस्थेतील किल्ले अजूनही हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभे दिसतात!अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार किल्ले दिसतात!अजूनही शौर्य पताका घेऊन,अस्तित्व जपून किल्ले उभे दिसतात!आम्हास अजूनही छत्रपतीं शिवाजी राजे लढतांना दिसतात!भक्कम दगडांतील चुण्याचा आधार घेऊन किल्ले उभे दिसतात!प्रचंड जंगलांच्या आधारांने आजही सह्याद्रीच्या छातीवर किल्ले उभे दिसतात!
किल्ले आमचे श्वास होतात!अनेक पिढ्यांचे वैभवी साक्षीदार होतात!किल्ले जगण्याची नजर देत असतात! आम्हा पिढीला इतिहासातील कडू-गोड पानं उघडून देत आहेत !
अशा अनेक किल्ल्यांपैकी मावळातील लोणावळा-मळवलीजवळ असलेल्या उंच डोंगरावर,उभट कातळातील किल्ला म्हणजे ‘लोहगड’!!हा कठीण दुर्गकिल्ला आहे!लोहगड नावाप्रमांणे अवघड अन कठीण आहे!पण उत्तम पायऱ्या असल्याने चढायला सहज सोफा आहे!
तत्कालीन राजसत्तेचीं महत्वपूर्ण ओळख असलेला सुस्थितीत असलेला लोहगड किल्ला दुर्ग, गिरीभ्रमण करणाऱ्यांसाठी साहसी दर्शन स्थळ आहे!राजसत्तेसाठी महत्वपूर्ण मानला गेलेला हा किल्ला सहयाद्री पर्वत रांगेतील अतिशय भक्कम, अभ्यद्य सुरक्षित मानला गेलेला किल्ला आहे!नावाप्रमाणे लोह असलेला कठीण किल्ला “लोहगड” आहे!
सह्याद्रीच्या कुशीत,सुरक्षित आपलं अस्तित्व जपून ठेवलेला, घनदाट जंगलात उंचावरून दिमाखात, गर्वाने फडकणारा भगवा झेंडा उंचावरून दिसत असतो!पुण्यापासून अवघ्या ५२ किलोमीटर अंतरावर असलेल्या, लोणावळा-मळवली रेल्वे स्टेशन पासून अवघ्या ५ किलोमीटरवर अंतरावर असून विसापूर किल्ल्याजवळच उंच, धीप्पाड कातळकड्यांनी पौलादी छाती काढून उभा असलेला किल्ला आम्हास इतिसातील पाने उघडण्यास भाग पाडतो!
या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ३४०० फूट आहे!पायथ्या पासून काही अंतरावर पवना नदी वाहते!पवणेच खोरे जंगलांनी वेढलेलं आहे!काही अंतरावर पवना नदीवर बांधलेलं पवना धरण अफाट समुद्रा सारखा पसरलेलं दिसतं!निसर्गाचा अविष्कार अविस्मरणीय,अविश्वसनीय आहे!
अशा या निसर्गसानिध्यातील एकांतात उभा असलेल्या लोहगड किल्ल्यावर दिनांक ०२ जून २०२४ ला जाण्याचं भाग्य मिळालं!
(लोहगड किल्ला दर्शन पुन्हा पुढील भाग-०२मध्ये पाहू)
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-०३ जून २०२४
लोहगड किल्ला भाग-०२ Lohagad fort
चला जाऊया गड-किल्ल्यांवर
लोहगड किल्ला (भाग-०२)
… नानाभाऊ माळी
न थांबता प्रवास हा
चाललाय कुणीकडे
स्थळ वेळ काळ थेट
उभ्या छातीवर कडे!
उंच उंच डोंगरावर
उभे डोलणारी झाडे
घेई अंगडाई सृष्टी ही
येथे शूर शिपाई खडे!
उंच भू माथ्यावरी
पडती भिंतीस तडे
लढ म्हणता मावळे
चाले शस्र घेऊनि पुढे!
लोहगड किल्ला उभा
लोह पाऊल तें पडे
सुरतचीं लूट सारी
खजिना लोहगड चढे!
रविवार दिनांक ०२ जून २०२४ रोजी श्वास साहसात एकजीव झाले होतें!प्राण कंठात घेऊन शौर्याच्या ढालीवर तलवारीचे वार सहन करीत होतें!डोळे मावळे होऊन इंच इंच पुढे सरकत होतें!होय इतिहासातील पाने जीवंत झाली होती!शौर्याचं एक एक पान फडफडतं होतं!तलवारीचे खन्न खन्न आवाज कानी पडत होतें!तोफांचां बडीमार कानी येत होता!मी इतिहासातील युद्धभूमीवर होतो!चित्त रनांगणावर होतं!घनघोर युद्ध सुरु होतं!मावळे मायभूमीसाठी लढत होतें!शौर्य गाजवीत होतें!शत्रूला अस्मान दाखवीत होतें!पराक्रमाची शिकस्त सुरु होती!जीवन मरणाच्या भिन्न रेषा निकट येत होत्या!किल्ला रक्ताळला होता!घनघोर जंगलातून शिकस्त देत मावळे किल्ला सर करीत होतें!उंच उंच पर्वत विजय पताका फडकवीत होतें!किल्ला जिंकून ताब्यात घेतला होता!… मी… मी भानावर आलो होतो!
‘चला जाऊया गड किल्ल्यांवर’ या मोहिमेचें सरसेनापतीं आदरणीय वसंतराव बागुल सरांच्या आदेशानुसार आमची बस लोहगडाच्या दिशेने पळत होती!अंधारलेली प्रसन्न ताजी पहाट होती!५-३० वाजले होतें!पुण्यातील चंदन नगरहुन आम्ही निघालो होतो!सहप्रवासी शुद्ध प्राणवायुचा अनुभव घेत होतें!आम्ही लोहगड मोहिमेवर निघालो होतो!बस रस्त्याला गुंढाळीत निघाली होती!चंदननगर, शिवाजीनगर,पौड रोड,नेकलेस पॉईंट घोटावडे,पावनाडॅम पार करीत निघाली होती!पवना नदीच्या तिरावरून,डोंगर पायथ्याना स्पर्श करीत निघाली होती!डाव्या बाजूने पवनेचं खोरं, उंच उंच डोंगर,घनदाट जंगलातून रस्ता पार करीत बस लोहगडाच्या दिशेने पळत होती!
डोळ्यात सह्याद्रीचीं उंच उंच पण वेडीवाकडी पर्वतरांग बसेनाशी झाली होती!निसर्गाने मुक्तपणे उधळलेलं दान पाहात होतो!नजर जाईल तेथवर नजरेचे घोडे उधळत होतें!पवना नदीच्या खोऱ्यात हिरवी सृष्टी विसावलेली दिसत होती!तें अनमोल निसर्गदान नजरेला खेळवत होतं!नजरेचे बाण सुटत होतें!दृष्यावर मारा करून माघारी फिरत होतें!विलोभनीय दृश्यबाण हृदयाला आनंद झूल्यावर बसवीत होतें!आमची बस वेडीवाकडी वळणे घेत घाटमाथ्यातून पळत होती!हळूच पवना धरणाच्या पोटाशी येत, वळणदार घाटातून हिरवाईचा नजर अनुभवत आम्ही लोहगडाकडे निघालो होतो!
पवना नदी अन इंद्रायणी नदीच्या खोऱ्यातून उभा सह्याद्री पर्वत आभाळाशी मैत्री करीत उंच उंच चढत होता!अचानक आमची बस अरुंद डांबरी रस्त्यावरील घाटावर चढू लागली होती!जंगलात अदृश्य व्हावी तशी झाडांनी पांघरून टाकले होतें!घाट उंच,वेडावाकडा होता!मध्येच संपूर्ण उभा डोंगर कापून रस्ता तयार केलेला दिसला!उभट अरुंद खिंडीतून रस्ता पुढे सरकत होता!बस चढावर असल्यामुळे दम लागल्यागत पहिल्या गियरवर घरर घरर करीत हिरवाईतून जंगलघाट रस्ता चढत होती!एक ठिकाणी तर रस्त्याच्या उजव्या अन डाव्या बाजूला दोन झाडं अशी उभी होती जिथे एकमेकांना त्यांच्या फांदया आलिंगण देत उभी होती!दोघं झाडं बसला घासण्याची भीती वाटत होती!बस ड्रायवरचीं कसरत यशस्वी झाली,आम्ही त्या विरुद्ध कडेला उभ्या प्रेमिक झाडांमधून पार पडलो होतो!
बसच्या काचांमधून दूरवर नजर टाकली असता!लोहगड उंच डोंगरावर काळी पाषाणी टोपी घालून उभा दिसला!लांबची लांब टोपी उंच डोंगराच्या डोक्यावर शोभून दिसतं होती!आम्ही बसमधूनचं डोंगरावर ताट छाती काढून उभा असलेला किल्ला पाहिला!लोहगड किल्ला झाडांच्या शृंगाराने विलोभनीय दिसतं होता!हळूहळू किल्ल्याच्या पायथ्याशी आलो!अंगावर अतिशय सुरेख गोंदणं कोरावं तशा पायऱ्या त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत शृंगारून स्वागतास उभ्या होत्या!पायथ्याशी टूमदार, छोटंसं “घेरेवाडी” वसलेलं दिसलं!ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमची बस थांबली!
बस मधून उतरताचं घेरेवाडी ग्रामपंचायत समोर आम्हाला छत्रपती शिवरायांचा अतिशय सुरेख, भारदस्त पुतळा दिसला!तेथे जाऊन डोकं ठेवलं!नमन केलं, “छत्रपती शिवराय!जय भवानी!हरहर महादेव”असा जयघोष केला!अंगात स्फूर्ती अन चैतन्य संचारलं होतं!आम्ही लोहगड किल्ला पहायला आलो होतो!शिवरायांच्यां महा कर्तृत्वाचा इतिहास हृदयात साठविण्यासाठी आलो होतो!एका हॉटेलमध्ये जाऊन प्रथम नास्ता केला!बरोबर सकाळी ९-३० ला किल्ला चढाईस सुरुवात झाली!किल्ला उंच होता!चढायला अवघड नव्हता!पायथ्यापासून आखीव रेखीव,विस्तृत अन मजबूत दगडी पायऱ्यांवरून वर चढत होतो!आजूबाजूला झाडांची सावली पायऱ्यांना सावली देत होती!
काही पायऱ्या चढून गेल्यावर गणेश महाद्वार दिसलं!लाकडी,अतिशय भक्कम अनकुचींदार खिळे असलेला दरवाजा पाहून स्मित झाल्यासारखं वाटतं होतं!आजूबाजूचा संपूर्ण दगडी बुरुज लोहगडाची विशालता दाखवीत होता!नजरेत भरत होता!श्री.गणेशाची मूर्ती दगडी बुरुजात कोरलेली दिसतं होती!आम्ही पहिल्या गणेश महाद्वारातून प्रवेश करून पुढे निघालो!……..
(लोहगडाविषयी पुढील भाग-०३मध्ये पून्हा भेटू..)
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-०४ जून २०२4
kanifnath mandir trek Read More
Pingback: Lohagad लोहगड किल्ला - मराठी 1