प्रसूत वेदनेच्या आई कळा

प्रसूत वेदनेच्या आई कळा
प्रसूत वेदनेच्या आई कळा

प्रसूत वेदनेच्या आई कळा

प्रसूत वेदनेच्या आई कळा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*********************
… नानाभाऊ माळी

           माझ्या उजव्या हाताचीं उशी करून,  डोक ठेवून ‘ती’ निर्धास्त झोपत असे!दररोज तोच शिरस्ता असे!तिला माझा हात डोक्याखाली घेतल्याशिवाय झोप येत नसे!मी देखील तिची ती हौस पूर्ण करीत राहिलो!सुंदर स्वप्न होतं तें!दुसरं,तिसरं,चौथे असे करता करता अनेक वर्षं मागे जात राहिली!काळ सरकत राहिला!काळा सोबत वय सरकत राहिलं!तिच्या बाराव्या वर्षांपर्यंत असंच सुरू होतं!काय कुणास ठाऊक १३-१४व्या वर्षी 💐तिला समज आली होती!’ती’ थोडी मोठी झाली होती!तिने माझा उशीरूपी हात हलका केला होता!माझ्या हाताची उशी माझ्याचं डोक्याखाली घेऊ लागलो होतो !’ती’ मोठी झाली होती!ती वेगळी झोपू लागली होती!ती बालपण सोडून पुढे पुढे जात राहिली!बापपण देखील पुढे सरकत राहिलं!ती वयाने,मनाने मोठी झाली होती!तिच्यात बदल झाला होता!काळजाचा तुकडा मोठा झाला होता!अन ……

प्रसूत वेदनेच्या आई कळा
प्रसूत वेदनेच्या आई कळा



नऊ महिन्यांचें स्वप्न
आई झाले गं झाले
कळा यातना वेदना
‘आई’ झाले गं झाले!🌹

पान्हा दाटतो आतून
दूध येतं गं  फुटून
ओठी ओढीतं अमृत
डोळे घेतं गं मिटून!🌹

पुत्र जन्माच्या कळा
वेदना सहतें आतून
हास्य फुललेना गाली
माय ममता ओतून!🌹

प्रसूती पुनर्जन्मातुनी
एक श्वासाश्रू झाले
ममता आतुर झाली
तान्ह वासरू आले!🌹

बाई आई होतांना
यम भेटावयास येतो
कळा,वेदना आतल्या
घर थाठावयास जातो!🌹

आई होऊनीं जाऊ
जन्म देऊनिया पाहू
मातृ जन्माचं गं देणं
आई होऊनिया दावू!🌹

                         ‘ती’ मोठी झाली!बी.ई.मेकॅनिकल झाली!अशाचं ऐके दिवशी अंगाला हळद लागली अन लग्न झालं! ‘ती’ भुर्रकन उडून गेली!’ती’ सासरी गेली होती!माझ्या छातीवर डोकं ठेवून खूप खूप रडली होती!तो नव यात्रेचा प्रारंभ होता!पाऊले पडत राहिली!माझे हात तिच्या डोक्यावरून फिरत होते!डोळ्यात अश्रू तरळत होते!मी चेहरा लपवीत होतो!अश्रू पापणीत लपवीत होतो!पण लग्न आनंदी क्षण असतो!सात्विक, मांगलीक विधी असतो!दान संस्कार असतात!त्यातून निर्मितीचां प्रारंभ होतो!ती तिच्या नव्या घरी निघून गेली!जन्म घेऊन मोठी झाली!नव्या प्रवासाला निघून गेली!

              ‘ती’ नव्या विश्वात रमून गेली!सासरी नव्यानुभव नात्यांशी जोडली गेली!नवरा,नणंद, दिर, सासू-सासऱ्यांचें मन जिंकत राहिली!नवं नाते घट्ट होऊ लागलं तशी ती तिकडचीचं झाली!खूप बरं वाटायचं!नव्या घरात रुळली होती!नव्यांच्या गोतावळ्यात रमली होती!कधीतरी हक्काने फोन येत राहिला!”काळजी घ्या!” म्हणून सांगत राहिली!मुलगी आईची सावली असतें!तिचा तोच आवाज कानी पडला की मन भरून यायचं!किती ओलावा तिच्या बोलण्यात!!हक्क गाजवणारं नातं अनुभवत होतो!तिचं बालपण आठवतं राहिलो!जीवनाचा अर्थ शोधित राहिलो!आपली उपयोगिता ओळखीत राहिलो!खोलवर विचार करूनही उत्तरं मिळत नव्हतं!आपलं जगणं असंच असतं का? मी स्वतःस विचारीत राहिलो!

          पहिलं बाळंतपण आलं तसं तिला घेऊन आलो होतो!बालपणी माझ्या हाताच्या उशीवर डोक ठेवून हक्काने झोपलेली ,तीच आई झाली होती!आई होण्याच्या सुखद यम यातना सहन करीत,कळा सोशीत प्रसूतीतून पुनर्जन्म व्हावा तशी ती ही ‘आई’ झाली होती!सुंदर,गोंडस मुलीला जन्म दिला!माझ्या जुन्या डोळ्यातून तिच्यातील नवी आईपण पाहात होतो!झोपतांना माझ्या हाताच्या उशीला विचारीत होतो,’ती आता खूप मोठी झाली आहे!या जन्माचं देणं संपलं बरं!’ डोळ्यात अंदाश्रू तरळू लागायचे!असेच साडेतीन वर्षें निघून गेली!

           ‘ती’ पुन्हा आली होती!माहेरी आली होती!दुसऱ्या बाळाच्या प्रसूतीसाठी आली होती!दिनांक ०७ जानेवारी २०२५ रोजी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली!ती आत होती!आम्ही बाहेर होतो!तिच्या असह्य वेदना कानी येत होत्या!आम्ही बाहेर तडफडतं होतो!बाळंतीणच्या यातना असह्य असाव्यात!कानावर तिचां आवाज कानी येत राहिला!तिची वेदना मी घेतली असती तर? मन चरकून गेलं!निसर्गाचा अपमान होता का?प्रसूत परीक्षेत १००% गुणांनी उत्तीर्ण झाली!पण जीव धोक्यात घालून हा जय साकार झाला होता!शारिरीक यम यातनेतून सुटका झाली होती!बाळाचा आवाज कानी पडला तशी ‘ती’ वेदनेतूनही अत्यंत सुखावली होती!आनंदली होती!पुनर्जन्माचा हा सोहळा होता का तो?यमाला जिंकलं होतं!🌹

प्रसूत वेदनेच्या आई कळा
प्रसूत वेदनेच्या आई कळा



        स्त्रीपण सहनशीलतेचा खोल अथांग सागर असतें!आईपण प्राप्तीसाठी एवढी मोठी परीक्षा असतें?सारं असहनीय असतं!’ती’ जिंकली होती!बाळ कुशीत सुखावलं होतं!तिचा तो तृप्तीचा क्षण होता!’ती’ आई झाली होती!बाळ अनंत नात्यांनीं जोडलं गेलं होतं!ती…. ती… माझी लाडकी मुलगी जिंकली होती!मी आजोबा झालो आहे!मुली घरोघरी अशाचं असतात!मृत्युंशी लढत आई होतं असतात!नात्यांचा विस्तार होत राहातो!प्रेम, ममता, कनवाळूपण पेहरीत जीवन सुखी करीत असतात!स्वतः सहन करीत मायेचां मोहमयी पसारा, पिसारा फुलवीत असतात!इतर सर्व मुलींसारखीचं माझी मुलगी सासरच्या नावेत बसून निघाली आहे!
उज्वल भवितव्य डोळ्यासमोर आहे!नाव निघाली आहे!डोळ्यात भावनेचा तलाव आहे!अश्रूतं सुख शोधित नाव निघाली आहे!जगणं सुंदर असतं!मन सुंदर असतं!मुलगी जन्म देवानें केलेला उपकार असतो!उपकाराची भेट मुलगी असतें!मुलगी अशीच असतें!’ती’ अशीच आहे!
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**************************
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१० जानेवारी २०२५