अक्षय तृतियेचा सण

अक्षय तृतियेचा सण

अक्षय तृतियेचा सण

कोण होतस तू? काय झालास तू?

आजचा हा अक्षय तृतियेचा सण खान्देशातील शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा सण समजला जातो असे म्हणण्यापेक्षा समजला जात असे, असे म्हणायची आज पाळी आलेली आहे. त्याच्या सर्वात आवडत्या सणाचे आजचे बदललेले विदारक स्वरूप जवळून बघत असताना काळीज अक्षरशः पिळवटून निघते.

Akshaya Tritiya Celebration In Khandesh
Akshaya Tritiya Celebration In Khandesh

ज्याच्या शेतकी व्यवसायावर सारं गाव अवलंबून राहत असे, त्यालाच आज सरकार, सवकार, बँक आणि व्यापाऱ्यांवर अवलंबून रहायची दुर्दैवी वेळ आलेली आहे. आपल्या कुटुंबियांसोबतच आपल्या शेतात राबणा-या सलदाराचा, घरगड्याचा, गावातील, सुतार, लोहार, न्हावी, गुराखी, सोनार, शिंपी अशा बलुतेदारांचा पालनहार असलेला हा बळीराजा आज देशोधडीला लागलेला बघताना खूप दुःख होते.

आखाजीचे जेवण
आखाजीचे जेवण

आपल्याकडे सायकल, दुचाकी व चार चाकी अशी वाहने असल्याचा आपण उगाच वृथा अभिमान बाळगतो, तोरा मिरवतो, परंतु शेकडो वर्षे मागे वळून बघितले तर हा बळीराजा एखाद्या राजासारखाच ऐशआरामात राहत असे, असे आपणाला दिसते. छकडा, दमणी, बैलगाडी, रेंगी, पालखी,  तर त्याच्या दीमतीला नेहमी सज्ज असायचेच, शिवाय बग्गी, घोडागाडी किंवा टांगाही त्याच्याकडे असायचा. हिरवाकंच चारा, अलप व ताक पाजून काळजीपूर्वक पोसलेली पटाची जोडी तर तो फक्त पटासाठीच वापरीत असे. त्या पटाच्या जोडीला ईतर कुठलीच कामे करु दिली जात नसत. त्यांच्या पाठीवर चाबूक किंवा साधी काठी देखील उगारली जात नसे.

खान्देशी संस्कृती आनी आखाजीना सण
खान्देशी संस्कृती आनी आखाजीना सण

धन्याने, चल ढवळ्या चल पवळ्या आज आपल्याला या पटात पैज जिंकायचीच आहे असा निर्वाणीचा ईशारा करताच ती पटाची जोडी मालकावर जीव ओवाळायची व जिवाचे रान करुन पळत सुटायची आणि अखेर पैज जिंकूनच दम घ्यायची. धन्याने पाठीवर शाबासकीची थाप देताच त्यांच्या अंगाखाद्यावर आनंदाचे शहारे उठायचे, आनंदाश्रूंच्या रुपात आलेला घाम  तो धनी मोठ्या अदबीने तितक्याच प्रेमाने पुसून काढायचा!
एवढे ऐश्वर्यसंपन्न जीवन जागणारा हा बळीराजा आज ज्याच्या त्याच्या हातचे कळसुत्री बाहुले बनलेला बघून खूपच वाईट वाटते.

बदलत्या जागतिक अर्थ व्यवस्थेने त्याचे पार कंबरडेच मोडून टाकलेले दिसते. आठवडाभर साजरे होणारे सण आता एका दिवसात व काही तासतच आटोपते घ्यावे लागतात, याच्यामागची कारणमिमांसा शोधायचा प्रयत्न केल्यास मन छिन्नविछिन्न होते, आणि नाईलाजाने, कोण होतास तू? काय झालास तू? असे म्हणायची पाळी येते.

शिवाजीआप्पा साळुंके,
चाळीसगाव, जि. जळगाव.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *