kavita sangrah marathi मराठी कविता संग्रह
Table of Contents
बोली भाषा कुठलीशी
बोली भाषा कुठलीशी
कावळ्याची काव काव
चिमणीची चिवलीशी
सांग ससुल्या रे तुझी
बोली भाषा कुठलीशी॥धृ॥
बाळ खेळतो तुझ्याशी
बाळराजा खेळविशी
तरी नाही परिचित
कसा तुझ्या रे बोलीशी॥१॥
घर तुझे चंद्रावर
चांदोबाच्या हृदयाशी
सांग एकदाच कसे
बोलतोस रे त्याच्याशी॥२॥
मुळा गाजर खाऊन
गवतात रे लोळशी
मुलखाचा म्हणतात
तुला सारेच आळशी॥३॥
तुझ्या सारखीच तुझी
भाषा असेन मऊशी
डोक्या खाली घेतसे मी
रोज जशी काही उशी॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९९२३०३.
[प्रस्तुत कविता ८ फेब्रुवारी २००२ रोजी बालचित्रवाणी पुणे येथून प्रसारित झाली आहे.]

लेकुर्वाळी
लेकुर्वाळी
कशी कोठून ही येते
नाही कळत मांजर
घरदार छतावर
पहा फिरते मांजर॥धृ॥
इथे तिथे जिथे तिथे
हिचा म्यांव चा गजर
हिची नजर नजर
दही दुध ताकवर॥१॥
वास लागताच होते
कशी कोठून हजर
जणु म्हणते मी येऊ
भासवितो हिचा स्वर॥२॥
पिते दुध ही चोरुन
होते दुधासाठी चोर
खाते उंदीर नि घूस
अशी जिभेची चटोर॥३॥
आज इथे उद्या तिथे
अख्खं गाव हिचं घर
खाते चाटून पुसून
दुध साखर भाकर ॥४॥
पिले हिची फिरतात
इथे तिथे घरभर
घर वाटतं ग माझं
जसं गोकुळ दुसरं॥५॥
माझ्या घरात घर ग
असं हिचं हे साजरं
लेकुर्वाळी माय हिला
नका हाकलू रे दूर॥६॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगाव .
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
आलं विमान विमान
आलं विमान विमान
बोलू म्हणते तुझ्याशी
ऐक जरा ए विमान
तुझ्या सारखे वाटते
व्हावे मलाही विमान॥धृ॥
उंच उंच आभाळात
तुला दिले आम्ही स्थान
नाही येत रे उडता
पण तुझिया समान॥१॥
तुला दिला आम्ही मान
उंच आभाळी सन्मान
तुला पाहतो आम्ही रे
बघ उंचावून मान॥२॥
तुला निर्मिले आम्ही रे
तरी झालास महान
बघ तुझ्या पुढे आम्ही
किती वाटतो लहान॥३॥
तुला बघूनच खुश
होते माझे बालमन
रोज पाहते रे तुला
मान उंचावून पण॥४॥
तुला बनविले आम्ही
आम्हा याचा अभिमान
तुझं गातो आम्ही गाणं
आलं विमान विमान॥५॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोलजि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

सांग एकदाच माऊ
सांग एकदाच माऊ
तुला वाघाची मावशी
सारे म्हणतात माऊ
सांग जरा पाहू तुझे
कोण आई बाबा भाऊ॥धृ॥
दुध दही लोणी मऊ
असा हवा तुला खाऊ
उगीचच चालते ग
तरी तुझी म्याॅऊ म्याॅऊ॥१॥
पिले तुझी इवलाली
वाटे उचलून घेऊ
उचलून घेऊ आणि
जरा खेळायला नेऊ॥२॥
पिले इवली इवली
जसे कापसाचे पेळू
शाळा विसरु अभ्यास
जरा पिलांसवे खेळू॥३॥
तुझ्यापरी आम्हीही ग
पिलुड्याला जीव लावू
सांग एकदाच माऊ
पण कोण तुझे भाऊ ॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.
खूप खूप दूर वाटत होता हा चंदामामा. ह्या मामाच्या गावाला कधीच जाता येत नाही. आणि तिथे आमच्या शाळेची सहलही जात नाही. ही बालमनाची खंत मी माझ्या ह्या कवितेतून व्यक्त केली होती.पण आता चंद्रयान घेऊन गेला आम्हाला ह्या सहलीला.

नातं तुझं मी गाणार
नातं तुझं मी गाणार
चांदोमामा चांदोमामा
एक सांगते मी खरं
निळं आभाळाचं घर
तुझं आवडलं बरं॥धृ॥
सांगशिल काय तुही
मला एकदाच खरं
लुकलुक चांदण्यांना
कसं रेखलं त्यावर॥१॥
बंधुराज तू आईचा
तुझ्यासाठी हुरहुर
औक्ष मागते रे तुला
जरी राहतोस दूर॥२॥
यावे वाटते रे फार
अति दूर तुझे घर
सहलही जात नाही
आमुचीही तेथवर॥३॥
यंदाच्यारे सुट्टी साठी
घेना मामीचा विचार
भाची तुझीच मी काय
करशिल पाहुणचार ॥४॥
आहे ठाऊक सदा तू
उपाशीच राहणार
नातं तुझं माझं तरी
गाण्यातून मी गाणार॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.

कुठे माझा महाराष्ट्र ?
कुठे माझा महाराष्ट्र ?
नित्य आम्हा अभिमान
असा माझा महाराष्ट्र
पण लागली कुणाची
याला अवचित दृष्ट ॥धृ॥
कुणी पावन भुमीत
निपजले नतद्रष्ट
राजनिती साठी झाली
मानसिकताच भ्रष्ट ॥१॥
कोरोनाला हरवावे
आम्हापुढे हे उद्दिष्ट
वंदनीय कलावंत
गुणीजन झाले नष्ट ॥२॥
झाले शहीद ही सारे
असा माझा महाराष्ट्र
नेते निवडूही आता
एक मतानेच स्पष्ट॥३॥
केले असे यांनी काम
जगा वेगळे अनिष्ट
याद ठेविल अशांना
सर्वकाळ महाराष्ट्र ॥४॥
कधी सुजल सफल
होता माझा महाराष्ट्र
आता दिसेनाच त्याचे
कसे चित्र ही ते स्पष्ट ॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
चांदो मामाच्या ग घरी
बालगीतोत्सव ह्या माझ्या प्रकाशित कविता संग्रहामधून
चांदो मामाच्या ग घरी
चंदामामा चे ग घर
आई दूरदूर तिथे
चल जाऊ या का तिथे
अशी उगीच का भिते॥धृ॥
दुध भात माझ्या सवे
तुही त्याला भरविते
अंगाईच्या गाण्यातही
नित्य त्याला बोलाविते॥१॥
चिऊ काऊच्या माऊच्या
गोष्टी त्याला ऐकविते
लिंबोणीच्या झाडातून
डोकावता दाखविते॥२॥
मुलखाचा जो भितरा
गेला ससा ही ग तिथे
घर चंदा मामाचे ग
तुझे माहेरच की ते॥३॥
चांदोबाच्या अंगणात
लाख चांदण्या ग जिथे
सवे त्यांच्या खेळायला
बघ मामी बोलाविते॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

नको होऊस दगड
नको होऊस दगड
कुणी एक कवी म्हणे
माझ्या मना हो दगड
म्हणतसे तुजला मी
नको होऊस दगड॥धृ॥
असे जीवन संघर्ष
अरे त्यासाठी झगड
वाटा अति अवघड
सर करुनी जा गड॥१॥
एका ठायीच बसूनी
नको राहूस दगड
अति वेगाने येतिल
वारा वादळांचे फड॥२॥
एक दगड कसा रे
मग पुकारेल बंड
थांबणार जो अर्ध्यात
त्याच्या जीवनात खंड॥३॥
कसा झुंज त्या सार्यांना
एक देईल दगड
तुला झिजवून तुझा
रेव बनेल दगड॥४॥
नाहीतर बनशिल
देवळाचा तू दगड
एका ठायीच बसून
व्हावे का रे अवघड ॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.

चांदोबाच्या खिशात
आता थोडं छोट्यांसाठी. कंटाळले असतील ना घरात बसून. शाळांना सुट्ट्या लागल्या. चला तर मग आज पाहू आपण ससुल्याला चांदोबाच्या खिशात
चांदोबाच्या खिशात
एक ससुला ससुला
होता बसला घुश्यात
दूर बसला जाऊन
लाकडाच्या तो भुश्यात॥धृ॥
त्याने पाहिले तेथून
चांदोबाला आकाशात
आला मनात विचार
तसा हसला मिशात॥१॥
थेट बसला जाऊन
चांदोबाच्या तो खिशात
ससोबाला मिरविले
चांदोबाने आकाशात॥२॥
त्याने पाहिले तेथून
धरतीच्या नकाशात
नदी नाल्यात पाहिले
जणु काही आरशात॥३॥
बिंब पाहून स्वतःचे
पुन्हा हसला मिशात
मौज अशी ससुल्याची
चांदोबाच्या हो खिशात॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.