खान्देशातील कानबाई रानबाई उत्सव
पूर्वार्ध
खान्देशच्या कुलदेवता कानबाई रानबाई यांचा महोत्सव सध्या जोरात सुरू आहे. स्थलांतरित अहीर खांदेशी बांधवांकडून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात हा उत्सव अत्यंत विराट रूपात साजरा केला जात आहे.
हा सण सामान्यतः लोक आपल्या घरांमध्ये साजरा करतात, परंतु मागील वर्षापासून चाकण, जिल्हा पुणे येथे काही अहीर खांदेशी बांधवांनी याला सामूहिक रूप दिले. एका प्रशस्त सभागृहात कानबाईची स्थापना करण्यात आली, आणि पाहिल्याच वर्षी लाखो अहीर जमले, ज्यामुळे या उत्सवाने लोकप्रियतेचा विक्रम केला.
या वर्षी चाकणमध्ये दोन ठिकाणी आणि चिंचवड येथे एक अशा तीन ठिकाणी कानबाईची स्थापना करण्यात आली. 11 ऑगस्टला मी या तिन्ही ठिकाणी भेट दिली, आणि तिथे लोकांचा उत्साह प्रचंड ओसंडून वाहताना पाहिला. भक्तगण बेभान होऊन नाचत होते.
चाकणमध्ये मागील वर्षी सुरू झालेल्या मुख्य मानाच्या कानबाई मंडळाचे नेतृत्व किशोर भाऊ अहिरे आणि त्यांचे सहकारी करत आहेत. या वर्षी चाकणमध्ये अजून एक नवीन कानबाई मंडळ स्थापन करून कानबाई बसवली गेली. या मंडळाचे नेतृत्व हिरालाल पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. चिंचवडमध्ये आहेर गार्डन येथे तिसरी कानबाई बसवली आहे, ज्याचे नेतृत्व नामदेवभाऊ ढाके आणि सहकारी करत आहेत.
तिन्ही ठिकाणी तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. तरुण, मुली-मुलगे, प्रौढ, आणि वृद्ध स्त्री-पुरुष बेभानपणे नाचत होते. जात, पात, वय, लिंग हे सर्व भेद विसरून प्रत्येकाच्या अंगात जणू काही कानबाई संचारली होती. या उत्सवामुळे खान्देशपासून 500 कि.मी. लांब राहूनही आपली संस्कृती जपली जात असल्याचा अभिमान वाटत होता.
यावेळी अहिराणी गाण्यांचा धमाका सुरू होता, आणि स्थलांतरित होऊन बाहेर पडलेले अहीर कानबाई निमित्ताने एकत्र जमल्यामुळे, त्यातून आपले शक्ती प्रदर्शनही दिसत होते. दृष्ट लागावी इतका सुंदर कार्यक्रम झाला.
कानबाई रानबाई कन्हेर देव कोण आहेत, या बाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. कानबाई म्हणजे लक्ष्मी, म्हणजेच धन दौलत, पैसा, आडका, सोने-चांदी, जड जवाहर. तर रानबाई वन देवता, म्हणजे रानातील शेतातील धन, जसे ज्वारी, बाजरी, गहू, कपाशी आणि इतर सर्व पीक. कानबाई रानबाई यांचे पती कन्हेरे राजा, म्हणजेच कान्हा आहेर आहे. ‘कान्हा आहेर’ शब्दाची संधी ‘कन्हेर राजा’ आहे. या बाबत सविस्तर माहिती पुढील भागात बघूया.
क्रमशः
लेखक: बापू हटकर