माणुसकी अजूनही जिवंत आहे
दि. 18 ऑगस्ट 2024
धुळे येथे सुमनबाई माळी या 70 वर्षांच्या निराधार वयोवृद्ध आजीच्या कष्टमय जीवनाचा एक हृदयस्पर्शी अनुभव सांगायला मिळाला. गेल्या पन्नास वर्षांपासून सुमनबाई धुळ्यात कष्टकरी जीवन जगत होत्या. सुरूवातीला धुणे-भांडी करून, आणि नंतर भिक्षा मागून आपले जीवन जगत असत. वाढत्या वयामुळे त्यांना निवाऱ्याची गरज होती, परंतु धुळ्यात त्यांच्यासाठी कोणतीही सोय मिळत नव्हती.
मी, गीतांजली कोळी, सामाजिक कार्य करत असताना सुमनबाईंची ओळख झाली. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना औषध, किराणा, आणि खाऊच्या स्वरूपात मदत करत आले आहे. धुळ्यातील विविध निवाऱ्यांमध्ये त्यांची सोय करण्याचा प्रयत्न केला, पण वृद्धापकाळामुळे त्यांना सांभाळायला कोणीही तयार नव्हते. शेवटी, त्यांना चांगला निवारा मिळावा म्हणून मी सुमनबाईंना 17 ऑगस्ट रोजी धुळ्यातून शिर्डीच्या वृध्दाश्रमात दाखल करण्यासाठी प्रवास सुरू केला.
प्रवासाची सुरुवात:
धुळे येथून बसने शिर्डीला रात्री पाच वाजता पोहोचले. मात्र, शिर्डीहून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वृध्दाश्रमात प्रवेश न मिळाल्याने, रात्री एक वाजता परत निघावे लागले. रात्रभर प्रवास करून पुणे गाठले. पुण्यातील नवी पेठेतील निवारा आणि सिंहगड रोडवरील मातोश्री वृध्दाश्रमांमध्ये सुमनबाईंची सोय करण्याचा प्रयत्न केला. पण हे दोन्ही ठिकाण फक्त नियम सांगून आठ दिवसांची वाट पाहण्यास सांगत होते.
निराधारांसाठी झगडणारी माणसं
शेवटी मंगळवार पेठेतील रिक्षाचालक बापू मोहोळ आणि जंगी खान यांच्या माणुसकीमुळे, स्वामी निवास या पौड गावातील आश्रमात प्रवेश मिळवण्यासाठी पत्ता मिळाला. त्या ठिकाणच्या संचालिका गौरी धुमाळ यांनी ताबडतोब सुमनबाईंच्या स्वागताची तयारी केली. मात्र, पुणे स्टेशनपासून पौड गाव हे खूप दूर असल्याने, रिक्षावाले 1300 रुपयांचे भाडे सांगत होते. घरून येताना जेमतेम 2000 रुपये घेऊन आले होते, त्यापैकी बस-रिक्षाच्या प्रवासातच 1600 रुपये खर्च झाले होते. शेवटी एका मैत्रिणीकडून उधार घेऊन, पावसात भिजत, सुमनबाईंच्या जड सामानासह, पुणे ते पौड गावचा प्रवास केला.
स्वामी निवास वृध्दाश्रमाचा आधार
पौड गावातील स्वामी निवास वृध्दाश्रमात पोहोचल्यावर, तिथल्या सर्वांनी सुमनबाईंना आनंदाने स्वीकारले. त्यांना पाहून माझे मन गहिवरून आले. तिथे सुमनबाईंना योग्य आश्रय, प्रेम आणि आधार मिळाला, हे बघून माझी अर्धी चिंता मिटली. माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे समजले.
वाढत्या वयातील आव्हाने आणि समाधान
या अनुभवातून कळले की, काही तथाकथित वृध्दाश्रम फक्त मोठे नाव घेऊन, नियमांचा आधार घेत असतात, परंतु सच्ची माणुसकी फक्त अशा ठिकाणी दिसते जेथे लोकवर्गणीतून आणि स्वतःच्या मेहनतीने निराधारांना आश्रय दिला जातो. स्वामी निवास वृध्दाश्रमासारख्या सेवाभावी संस्थांना समाजातील दानशूर व्यक्तींनी भरघोस मदत करावी, अशी विनंती आहे.
सुमनबाईंचे योग्य निवाऱ्यात सोय करण्यासाठी सहकार्य करणारे मा. श्री गोपीभाऊ शिंपी, नितीन शेलार, जितु बहारे, संचालिका मा. गौरी धुमाळ, नानाभाऊ माळी, संतोष बोईनवाड यांचे मनापासून आभार. शेवटी, सुमनबाईंना व्यवस्थित ठिकाणी ठेवून परतीचा प्रवास सुरू केला, जड अंतःकरणाने, परंतु समाधानाने.
✍🏽 सौ. गीतांजली कोळी
विरांगना झलकारी बाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था, धुळे
मो. गुगल पे नं: 9527850742