तुमच्या आनंदी आयुष्याचे तुम्ही चोर तर नाहीत ना?

आनंदी आयुष्य
आनंदी आयुष्य

आनंदी आयुष्याचे तुम्ही चोर तर नाहीत ना?

स्वतःच्या नाकर्तेपणामुळे आपल्या अंगिभूत कलांचा शोध घेवून जीवनानंद शोधण्याऐवजी न्यूनगंडाचा बळी ठरणारा, केवळ राजकारणाच्या मोठ्या गप्पा मारीत वेळ फुकट दवडणारा, मनात आपुलकीचा एकही कप्पा न राखणारा, निव्वळ रिकामटेकडा असा प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या आणि सृष्टीतल्याही आनंदाची चोरी करणारा ‘चोर’ आहे!

प्रशिक्षण आणि समुपदेशनाच्या निमित्ताने विविध स्तरांतील विविध दर्जाची विविध माणसं जवळून पाहण्याची संधी मला मिळत असते. मला भेटणाऱ्या अशा माणसांचं बारकाईनं निरीक्षण करणं आणि त्या निरीक्षणाच्या आधारे निष्कर्षाप्रत जाऊन समस्यांची सोडवणूक करण्याचा माझा प्रयत्न असतो.

असं करताना माझी स्वतःचं शिकणं ही सुरू असतं. कोणत्याही पुस्तकांत मिळणार नाही असं दर्जेदार आणि वस्तुनिष्ठ शिक्षण मला भेटणाऱ्या या माणसांकडून मिळत राहतं. अशा रितीनं माणसांकडून शिकताना अनेक नव्या गोष्टी, नवे विचार, नव्या कल्पना आणि नवे सिद्धांत माझ्या दृष्टीपथात येतात. त्यानं माझं जगणं वैचारिक पातळीवर अधिक समृद्ध होत जातं.

माझ्या या समृद्ध जगण्याचा खरा आधार असलेली बहुतेक माणसं समस्यांनी ग्रस्त असतात. त्यातली काही माणसं भित्री असतात. काही माणसं अपयशी असतात. काही माणसं अगतिक आणि हतबल असतात. मोठ्या धाडसानं मला असंही म्हणता येईल की, यातली बरीच माणसं ‘चोर’ असतात! त्यांनी आपल्या स्वतःच्याच आयुष्यातल्या आनंदावर दरोडा टाकलेला असतो. असं करुन ही माणसं आपलं आयुष्य अत्यंत दुःखात जगत असतात.

मला भेटलेली अशी चोर माणसं अनेकदा आपल्या अवतीभवतीच असतात. कदाचित आपणही त्यांच्यापैकी एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही! आपण चोर आहोत का? अशी शंका एव्हाना वाचकांपैकी काहींच्या मनाला चाटूनही गेली असेल. आपल्या शंकेचं समाधान करण्यासाठी पुढील कविता नक्कीच आपल्या उपयोगी पडेल. समर्थ रामदासांनी लिहिलेल्या एका रचनेमध्ये त्यांनी मूर्खाची लक्षणे सांगितली आहेत. अगदी तशाच प्रकारे या रचनेत चोराची लक्षणे सांगीतली आहेत.

आनंदी आयुष्य
आनंदी आयुष्य

समर्थ रामदासांनी लिहिलेल्या एका रचना

चोरच समजा त्याला
खुशाल चोरच समजा त्याला ॥धृ॥

रिक्त हाताने घरात बसला
न्यूनगंडाचा विंचू डसला
कला अंगिभूत न कळे ज्याला
चोरच समजा त्याला
खुशाल चोरच समजा त्याला ॥१॥

स्वतःवरच्या विश्वासाला
चिरंतनाच्या अभ्यासाला
जो पुरता हरवून बसला
चोरच समजा त्याला
खुशाल चोरच समजा त्याला ॥२॥

नुसत्या मारीत असतो गप्पा
मनी रिकामा नाहीच कप्पा
कामापुरता अप्पा म्हणेल त्याला
चोरच समजा त्याला
खुशाल चोरच समजा त्याला ॥३॥

राजकारणावरती चर्चा
खानपान दुसऱ्याचा खर्चा
कर्मदरिद्री असेल फुकट्या त्याला
चोरच समजा त्याला
खुशाल चोरच समजा त्याला ॥४॥

श्रमावर ना निष्ठा आहे
खाऊन केवळ विष्ठा वाहे
न्यायासाठी जो न भुकेला
चोरच समजा त्याला
खुशाल चोरच समजा त्याला ॥५॥

तुम्ही चोर तर नाहीत ना? या प्रश्नाचं नेमकं उत्तर

स्वतःच्या नाकर्तेपणामुळे आपल्या अंगिभूत कलांचा शोध घेवून जीवनानंद शोधण्याऐवजी न्यूनगंडाचा बळी ठरणारा, केवळ राजकारणाच्या मोठ्या गप्पा मारीत वेळ फुकट दवडणारा, मनात आपुलकीचा एकही कप्पा न राखणारा, निव्वळ रिकामटेकडा असा प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या आणि सृष्टीतल्याही आनंदाची चोरी करणारा चोर आहे! असं स्पष्ट आणि परखड मत या कवितेत कवीनं मांडलं आहे. या कवितेच्या माध्यमातून विचार केलात तर तुम्हालाही “तुम्ही चोर तर नाहीत ना?” या प्रश्नाचं नेमकं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळवता येईल.

जागतिक पातळीवरच्या दोन प्रसिद्ध चोरांची साक्ष

या अनुषंगाने जागतिक पातळीवरच्या दोन प्रसिद्ध चोरांची साक्ष आपल्याला काढता येऊ शकते.

चोर पहिला-

अमेरिकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅलेंट लाभलेला एक प्रसिद्ध चोर होऊन गेला. अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही पहिल्या क्रमांकावर घेतलं जातं, इतका तो सफाईदार चोर होता.

एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता. तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा. त्याने चोरी करणं हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं होतं. चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये या चोराबद्दल प्रचंड आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.


त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला! पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन देत साधं सरळ जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला; पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.


लोकांनी या आरपार बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली. ती ऐकायला मोठा जमाव जमला होता. लोकांनी अनेक प्रश्न विचारले. आर्थरनेही त्यांची दिलखुलास उत्तरे दिली.
ही मुलाखत खुप रंगली होती.
मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली? आम्हाला खरं खरं उत्तर ऐकायचं आहे.”

“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.
“हो, हो!” एकच गलका झाला.

“मी सर्वात मोठी चोरी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे- “आर्थर बेरी” तो पुढे म्हणाला- “होय! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.”

जमावातले सगळे लोक त्याच्या या उत्तराने एकदम अवाक आणि शांत झाले.
बेरी पुढे म्हणाला- “मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो किंवा मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनू शकलो असतो; पण यातले काहीही न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”

चोर दुसरा

१८८७ च्या पावसाळ्यातील एके दिवशी भिजत भिजत एक ग्राहक एका किराणा दुकानात शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट देऊन तो बाहेर पडला. कॅश काऊंटरवर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य करीत ती नोट गल्ल्ल्यात टाकली. तो, दुकानाजवळच राहणारा त्यांचा नेहमीचा ग्राहक होता. तो एक होतकरु चित्रकार होता. इमॅन्युअल निंगर हे त्याचं नाव होतं.

पावसात भिजत आल्यामुळे इमॅन्युअलच्या हातातील नोटा भिजल्या होत्या. त्यानं दुकानात दिलेली नोट ओली असल्याने काऊन्टरवरच्या त्या बाईच्या हाताला शाई लागली. तिने बारकाईने नोट पाहिली. ती हुबेहुब नोट होती; पण नोटेची शाई सुटल्याने नोट बनावट असल्याचा संशय तिला आला. शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले.

ती एक बनावट नोट होती; पण नोटेची इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले. पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला. त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले. चित्रकार इमॅन्यूअल निंगर जेलमध्ये गेला.

कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले. तो जेलमध्ये असतानाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला. त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले. विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा.

तात्पर्य, आपली अंगभुत कला न ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे!
ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही!
ती व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही!

तो प्रत्येक रिकामटेकडा चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही. केवळ राजकारणावर फुकट चर्चा करण्यात आपला वेळ वाया घालवतो. आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे!

आता एवढं वाचून झाल्यावर आपल्यापैकी प्रत्येकानंच आपण चोर तर नाही ना? हे नक्कीच तपासुन पहायला हवं. तुम्ही चोर नसाल तर तुमचं मनःपूर्वक अभिनंदन! यश तुमचंच आहे!

दुर्दैवानं तुम्ही चोर असाल तर मात्र, त्वरीत स्वतःला सरेंडर करायला हवं. तुमच्या स्वतःचं टॅलेंट ओळखून ते योग्य कामात वापरुन तुमचं जगणं सुरु करायला हवं. तीच तुमच्या समृध्द जगण्याची सोनेरी पहाट असेल!

लेखक
©अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क : ९७६६६६८२९५

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *