गुलाबाईची गाणी GulabaiGeet

GulabaiGeet
गुलाबाईची गाणी GulabaiGeet

गुलाबाईची गाणी GulabaiGeet

गुलाबाईची गाणी

खशिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी :

“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

( उत्सव /प्रा.बी.एन.चौधरी) 

खान्देशात भाद्रपद महिन्यात गावखेड्यात संध्याकाळ झाली की गल्लीगल्लीत लहान मुलींचा चमू, मेळा हातात टिपऱ्यांचा जोड घेवून, दंगामस्ती करत एकमेकांच्या घरी जातात. हे दृष्य खेड्यांमध्ये हमखास दिसते. मुली एकमेकींच्या घरी जावून गुलाबाईची गाणी म्हणतात. प्रसाद वाटतात. मनोरंजन करतात आणि आपापल्या घराकडे जातात. पूर्वीच्याकाळी मनोरंजनाची साधनं नव्हती. त्यामुळे गुलाबाईचा उत्सव महिनाभर मुलींचं मनोरंजन करायचा. कोजागिरी पोर्णिमेला समारोप आणि भोजनावळ असा दुहेरी आनंद असायचा. या उत्सवात गाण्यांना खूप महत्व होतं. हलकीफुलकी गाणी, सहज सुलभ शब्दरचना, बडबड गीतांची चाल यामुळे ही गाणी सहज पाठ व्हायची. मुलींच्या तोंडावर रेंगाळायची. हा मुलींचा सण असला, मुलांना त्यात बंदी असली तरी मुलांची, घरातल्या माणसांचीही ही गाणी आपसूक पाठ व्हायची. मलातर आजही ही गाणी तोंडपाठ आहेत. ही गाणी वरवर बडबड गीतं वाटत असली तरी त्यात गहन अर्थ दडलेला आहे. मात्र, या गीतांकडे डोळसपणे, सजगतेने पाहिले तर त्यात जीवनाचा, संसाराचा मंत्र दडलेला आहे असं लक्षात येतं. नातेसंबधांची वीण, उकल लक्षात येईल. जुन्याकाळातील चाली, रिती, प्रथा समजून येतात. म्हणून या गीतांकडे त्या नजरेने बघायची गरज आहे. 

                     आज मी शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी ? या गीताबद्दल बोलणार आहे. फक्त बारा ओळींचं हे गीत घरातल्या एका महत्वाच्या म्हणजे नणंद आणि भावजयी या नात्याचे अनेक पदर उलगडते. एखाद्या मुलीचे लग्न होवून ती सासरी जाते. नवं गांव, नवं घर, नवी माणसं, नवी नाती अश्यावेळी नववधू बावरुन जाते. घरात लहान दीर, नणंद असेल तर त्यांची उपस्थिती घराचं वातावरण हलकंफुलकं करतं. त्यांची बडबड, त्यांचं चिडवणं, टिंगलटवाळी करणं घराला हसरं ठेवते, जे नववधूला मोकळं वातावरण तयार करुन देते. ती घरात रुळली म्हणजे ही नाती दृढ होतात. संवादी होतात. एकमेकांशी गुजगोष्टी करु लागतात. तश्या पठडीचं हे गीत आहे. 

                         या गीतात एक भावजयी आणि तिची चुणचुणीत, बोलकी, लडीवाळ लहान नणंद आहे. गावखेड्यात भाद्रपदाचा महिना म्हणजे शेतात राबण्याचा मोसम. यावेळी घरातील सारी मंडळी शेतात कामाला जातात. नवीन आलेली सून घरातच असते. ती घर आवरुन ठेवेल किरकोळ कामं करेल हा उद्देश. तिला सोबत, मदत म्हणून तिची नणंदही घरीच असते. फावल्या वेळात या दोघांचा एकमेकात संवाद होतो. तीच त्यांची करमणूक आणि विरंगुळा. नणंद-भावजयी घरात असतांना नणंदेला भावजयीची खोडी काढायची हुक्की येते आणि ती गाणं म्हणते. 

नंदा भावजयी दोघीजणी दोघीजणी

घरात नाही तिसर कोणी तिसर कोणी

शिक्यावरचं लोणी खाल्लं कोणी

तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी

आता माझे दादा येतील गं येतील गं

दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं

दादाच्या कानात सांगेल गं सांगेल गं

दादा तुझी बायको चोरटी चोरटी

घे काठी लगाव पाठी

विसर गुलाबाई माहेरच्या गोष्टी. 

असू दे माझी वहिनी चोरटी

घरादाराची ती लक्ष्मी मोठी ! 

                   या गीतात नणंद आपल्या वहिनीवर खोडकर आरोप करते. शिंक्यावरचं लोणी कुणी खाल्लं.? हा तिचा प्रश्न. ते वहिनीनी खाल्लं असणार ही शंका. ही तक्रार ती भावाकडे (दादा) करणार आहे, असं सांगते. पुढे “दादा तुझी बायको चोरटी” असा शब्दप्रयोग करून हसतखेळत वहिनीवर आरोपही करते. दादा किती हक्काचा आहे हे सांगण्यासाठी त्याच्या मांडीवर बसून चहाडी करीन असा सज्जड दम भरते. जरी ती वहिनीवर आरोप करत असली तरी शेवटी “असू दे माझी वहिनी चोरटी, घरादाराची ती लक्ष्मी मोठी” असं म्हणून तिचं महत्व अधोरेखीत करते आणि तिच्याबद्दलचा आदर, अभिमान व्यक्त करते. इथे घरातील वहिनी हीच घराची लक्ष्मी आहे, ही पारंपरिक संकल्पना अधोरेखित होते.

                    एखादी लेक माहेरी असते तेव्हा तिथं ती राजकुमारी असते. तिला हवं ते ती करु शकते. हवं ते खावू शकते. मात्र, लग्न होवून ती सासरी गेली तर माहेर तिला परकं होतं आणि सासर तिला लवकर स्विकारत नाही. तिची वारंवार सत्व परिक्षा घेतं. कस लावतं. सासू, सासरे, मोठी नणंद जणू तिच्यावर पहारेकरी असतात. समवयस्क नणंद हे अनेक घरात भावजयीची स्पर्धकच असते. अश्या नणंदामुळे अनेक सुनांची घरं उध्वस्त झाली आहेत. या उलट काही घरात समवयस्क नणंद भावजयी मैत्रीणी होतात. एकमेकींची सुखदुःख वाटून घेतात. सासरी साऱ्यांचा मान ठेवण. त्यांची उठबस करणं, खातरजमा करणं, सारं घर आवरणं यातच तिचा दिवस जातो. माहेरी राजकन्या असणारी लेक सून बनून सासरी येते तेव्हा ती जणू मोलकरीणच बनून जाते. याला काही सन्माननीय अपवाद असतीलच. परंतू सासर म्हणजे बंदीखानाच हे चित्र सर्वदूर आहे. माहेरी स्वतंत्र असणारी लेक सासरी पारतंत्र्यात येते. इथं तिला तिच्याच घरात शिंक्यावर टांगलेलं चमचाभर लोणी खायचाही अधिकार नसतो, ही वस्तूस्थिती मनोरंजक आणि खोडकर पद्धतीनं मांडणार हे गीत आहे. चूकून तिनं ते खाल्लं असेल तर किती जणांना तिला घाबरावं लागतं.? याचं ओझरतं दर्शन या गीतात आहे. हा सारा जाच संयमाने सोसला. भोगला तर तिलाच त्या घराचं लक्ष्मीपद, मानाचं स्थानही मिळणार आहे, याचं आश्वासनही हे गीतच देतं. माहेर सासर यांचं महत्व आणि दोघांतील तफावत सांगणारं हे गीत आहे. 

                    खरंतर हे गीत हास्यरसाने ओथंबलेलं आहे. “लोणी खाल्लं कोणी?” किंवा “बायको चोरटी” अशा शब्दांतून केलेल्या टिंगलीतून हशाच उत्पन्न होतो. त्याचवेळी यातून चोरीचं लांछन सूचीत होतं. वहिणी जर भांडकुदाळ असेल तर ती या आरोपाला अन्यथा घेवून घरात कलह, क्लेषही उभा करु शकते. मात्र पूर्वीच्याकाळी भावजय आणि तिची लहान नणंद यांचं नात फार स्नेहाचं, सौख्याचं असायचं. आई-लेकीचं असायचं. अनेक जुन्या चित्रपटातून ते आलं आहे. तेच या गीतातील शेवटच्या कलाटणी युक्त ओळीतून लक्षात येते. नणंदेचा सुरवातीचा सूर आरोपाचा, मध्यंतरात भांडणाचा तर समारोपात कौतुकाचा होतो, हेच या गीताचं श्रेष्ठत्व आहे. 

                   आई, बाबा, दादा शेतातून घरी आले की मी दादाच्या मांडीवर बसून कानात सांगेन या ओळीतून प्रेम, लाघव आणि विश्वास व्यक्त होतो. दादाचा तिच्यावर विश्वास आहे आणि तिनं सांगितलं तर तो हातात काठी घेवून ती पाठीवर मारुही शकतो ही भोळी धमकी आहे. तू माहेरी असतांना असं येताजाता खातपीत असशील तर ते आता विसर असा सल्ला, समज दिलेली आहे. म्हणजे घरात सासू, सासरे नसतील तेव्हा सूचना देणं, लक्ष ठेवणं, रुबाब करणं याचा अधिकार नणदेकडे आहे हे सूचित होते. भले ती वयाने लहान असेल. यातला खोडकरपणा क्षणात दूर करण्याचं सामर्थ्य नणंदेच्या शेवटच्या ओळीतून येणाऱ्या भक्तीभाव आणि गौरवभावात समाविष्ट झालेला आहे. नणंद शेवटच्या ओळींत वहिनीला “घराची लक्ष्मी” म्हणते. तिला सुखद धक्का देते. खुश करते आणि तिचं घरातील महत्वं, पावित्र्यं अधोरेखीत करते तेव्हा भावजयीला आपलं घरात काय स्थान आहे ? याची जाणीव होते आणि ती सुखावून जाते. या आपलेपणाने ती नणदेला आपसूक कडेवर घेत असेल. तिचा गालगुच्चा घेत असेल. दोघं मिळून एक छानशी गिरकी घेत असतील असं गीतात न आलेलं चित्र मला नजरेसमोर दिसतं आणि हे गीत माझ्या भावविश्वातील मोठी जागा व्यापून घेतं. 

                  हे गीत म्हणजे एक लयबद्ध ओवी आहे. ही लयबद्धता तीची ताकद आहे. यमक, पुनरुक्ती हे गीताचे बलस्थानं आहेत. “येतील गं येतील गं”, “वहिनीनी वहिनीनी” यामुळे गीताचा संगीतात्मक गोडवा वाढतो. ते पाठांतराला सुलभ होते. मुलींचं बडबड गीत, गुलाबाईचं गाणं असलं तरी या गीताला सांस्कृतिक संदर्भ आहे. काळाचा संदर्भ. प्रथा, परंपरा, चालीरितींचं कोंदण आहे. अशा लोकगीतांतून स्त्रियांचं दैनंदिन जीवन, त्यांचं घरगुती नात्यांमधलं स्थान, विनोदाची शैली आणि पारंपरिक मूल्ये आपल्याला दिसून येतात. जी मौखिक परंपरेने येवून लिखीत स्वरुपात देवरुप अक्षर झाली आहेत. 

                        वरवर गुलाबाईच्या उत्सवात लहान मुलींनी म्हणायचं हे गीत तत्वज्ञानाचं एक चिंतन आहे. ते नणंद-भावजयीच्या नात्याचं विनोदी, खोडकर, पण शेवटी आपुलकी आणि आदर व्यक्त करणारं चित्र उभं करतं. यातून “घरातील स्त्री ही घराची खरी संपत्ती आहे” हा विचार अधोरेखित होतो. हास्य, लाघव आणि कुटुंबातील प्रेमळ वातावरण यांचं सुंदर दर्शन या गीतातून घडतं. समाज जीवनाचं यथार्थ दर्शन या गीतात दडलं आहे. या अंगाने मी या गीतांकडे बघतो तेव्हा मला आपल्या पूर्वजांचे चिंतन, कल्पना शक्ती आणि ते मोजक्या शब्दात मांडण्याचं शब्द सामर्थ्य याचं मनोमन अप्रूप वाटतं. श्रध्देने माझे दोन्ही हात जोडले जातात आणि गावात, गल्लीत दूरवर कुठे गुलाबाईची गाणी, टिपऱ्यांचा ठेका ऐकू येतोय कां याचे कान शोध घेवू लागतात. त्यासाठी हा ठेवा जपायला हवा. हा संस्कार रुजवायला हवा. 

© प्रा.बी.एन.चौधरी. 

     देवरुप, धरणगाव. 

गुलाबाईची गाणी GulabaiGeet
गुलाबाईची गाणी GulabaiGeet