“गिरणा नदीची पौराणिक कथा: शिव आणि गिरिजाचा विवाह आणि खान्देशातील जीवनरेखा
गिरणा ही तापीची सर्वात मोठी उप नदी आहे. तिचा उगम दक्षिण खान्देशातील सुरगाणा तालुक्यातील केमच्या गिरी शिखरावर होतो. तर ही नदी सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अमळनेर हे तालुके भिजवत रामेश्वर येथे तापीला मिळते.
पार्वती खान्देशची लेक आणि शिव जावई
तिला आता आपण गिरणा म्हणत असलो तरी तीच खर नाव गिरिजा आहे. गिरी म्हणजे पर्वत केम (क्षेमकुशल) या गिरी शिखरावर तिचा जन्म झाला उगम झाला म्हणुन ती गिरी कन्या गिरिजा आहे. पुढे तिला लोक गिरणा म्हणु लागले. ती पार्वती आहे. पार्वतीचा अर्थ सुद्धा तोच आहे. पर्वत कन्या. पर्वतावर तिचा जन्म झाला म्हणुन ती पार्वती आहे.
तर ही गिरिजा पूर्व जन्मात सती नावाने ओळखली जायची. ती राजा दक्ष प्रजापतीची कन्या होती. शंकर हा जवाई म्हणुन दक्षाला पसंत नव्हता. अंगावर राख लावणारा, गळ्यात सर्प राखणारा नंदीवर बसणारा आणि स्मशानात राहणारा असा जावई नको अस सतीच्या आई वडिलांना वाटत होत. पण सतीच प्रेम होत शंकररावर. म्हणुन ती आई वडीलांचा विरोध जुगारून शंकरा सोबत प्रेम विवाह करून निघून गेली. या प्रसंगावर काही अहिराणी लग्न गीते आहेत.
सती-जटाधारी बैरागी रे तेरे साथ चलून्गी l
शिव-मेरे साथ चलेंगी तो तेरा बाप देखेन्गा l
सती-मेरा बाप देखेन्गा तो तेरा क्या करेगा?
सती शंकराला सांगते “जटाधारी बैराग्या माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्या सोबत येणार तुझ्याशीच लग्न करणार.” त्यावर शिव तिला म्हणतो, “तुझ्या आई वडिलांचा विरोध आहे आपल्या लग्नाला. तू माझ्या सोबत आली आणि तुझ्या बापाने पाहिल तर?”
त्यावर सती म्हणते, “वडिलांनी पाहिल तर पाहू दे मी घाबरत नाही. जे व्हायचे ते होऊ दे, माझा निश्चय ठरला. मी तुझ्या सोबत येणार म्हणजे येणार.”यावर तो तिला पुन्हा समजावतो. “अग मी भणंग गोसावी आहे, स्मशान, डोंगर पर्वतात राहणारा माणुस, तू सुकुमार राजकन्या. तू माझ्या सोबत राहू शकणार नाहीस. माझा निवास झाम्बोर्या वनात आहे. तिथ खायला प्यायला काहीच मिळत नाही!”
शिव-झाम्बोर्या बनमे भूक लगेन्गी!
यावर सती म्हणते हरकत नाही मी सर्व काही सोबत आणले आहे.
सती-लड्डू होना बर्फी होना पेडा उडा देउंगी झामोर्या बन मे.
शिव-झामोर्या बन तीस लगेन्गी!
सती-दूध होना, लस्सी होना, सरबत उडा दुन्गी झामोर्या बनमे.
अशी ही शिव पत्नी सती निमंत्रण नसताना माहेरी यज्ञ समारंभात जाते. तिथे सर्व माहेरची माणस तिचा अपमान करतात. म्हणुन मग ती यज्ञ कुंडात उडी घेऊन आत्महत्या करते.
नंतर शिव अत्यंत क्रोधित होऊन यज्ञ समारंभात तांडव करून त्या समारंभाची नासधूस करतो. सतीच प्रेत हातात घेऊन वेड्या सारखा तिन्ही लोकात भ्रमण करतो. त्याची संहाराची कामे बंद करतो. त्यातून सृष्टीचे चक्र थांबते. ते पूर्ववत करण्यासाठी विष्णु सुदर्शन चक्राने त्या प्रेताचे 65 तुकडे करतो. ते भारतीय खंडात सर्वत्र भिरकावून देतो. ते तुकडे जिथे जिथे पडतात तिथे एक एक शक्तिपीठ तयार होत.
नंतर बागलाण तालुक्यात आता देवळाने नावाचे गाव आहे. तिथे पूर्वी जंगल होते. त्या जंगलात शंकर तपश्चर्याला बसले. तिथे त्यांनी घोर तप सुरू केले.
पुराण कथेनुसार सती हिमालयाच्या पोटी पुनर्जन्म घेते ती पर्वत कन्या पार्वती.पण खांदेशी लोक कथेनुसार सतीने गिरीराज केम (क्षेमकुशल) या गिरीराजाच्या पोटी जन्म घेतला, म्हणुन ती गिरी कन्या आहे. तीच गिरिजा आपली गिरणा नदी होय.
इथे थोड विषायांतर करतो. वाघ्या मुरळी जागरणात बानूबाईच्या बापाच नाव केम गावडा सांगतात. तो केम गावडा सुद्धा हाच केमचा डोंगर आहे.गिरीजा वयात आल्यावर केमगिरी तिच्या साठी वर शोधू लागला. तेंव्हा गिरजेने, गिरीराज केमला सांगितले. बाबा मी माझा पती शोधला आहे. मागच्या जन्मी जो माझा पती होता तोच महादेव माझा होणारा पती आहे. अस सांगुन ती रोज महादेव ज्या जंगलात तप करत होते, तिथे जावून तीने महादेवाची सेवा सुरू केली.
पण महादेव प्रसन्न होऊन लग्न करायला तयार होत नव्हता. सर्व देव चिंतेत होते. त्यांनी मग महादेवाचे चित्त विचलित करण्यासाठी कामदेव आणि रती यांना शिवाची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठविले. त्यांनी आपले कामपाश आणि कामक्रिडा यातून शंकराचे मन विचलित करण्याचा प्रयत्न केला पण महादेवावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. मग कामदेवाने शेवटाचा उपाय म्हणुन मदनबाण मारला. तो शरीराला स्पर्श करण्यापूर्वीच शंकराने रोखला आणि तिसरा डोळा उघडून कामदेवाला जागीच जाळून खाक केला. इथे मला एक गुजराथी म्हण आठवते,
जेंनू काम तेंनू थाय बिजू करे गोता खाय
शंकराला समाधीतून जाग करण हे गिरजेचे काम होते. ते गिरिजाच करणार. ज्याच ते काम नाही त्या काम देवाला पाठवून त्याला बिचाऱ्याला उगीच मृत्यूच्या हवाली केले.
देवांचे सर्व उपाय संपल्यावर गिरिजा पुढे सरसावली. तीने एक नामी युक्ती शोधून काढली. तिने आपल्या अंगाच्या मळा (क्लो न) पासून भिल्ल परवान (प्रजा) तयार केली. त्यांच्या हातात, पावरी (तारपा, ढोल, ढोलकी ही भिल्ल वाद्य दिली. स्वतः भिल्ल स्त्रिया करतात तसा पेहराव केला. मुळातील सुंदर गिरिजा भिल्लनीची वेषभूषा केल्यावर अधिक मोहक दिसायला लागली. मग तिने ही आपली भिल्ल परवान (प्रजा), भिल्ल वाद्य घेवून ते सर्व शंकरा भोवती फेर धरून, भिल्ल घाई वर नृत्य करू लागले. ते कर्ण मधुरी संगीत, भिल्ल नृत्य आणि गिरिजेच रूप पाहून शंकर मोहित झाला भान हरपुन तेही त्यांच्या सोबत नाचायला लागले. आणि त्याच क्षणी शिव गिरजेचा विवाह झाला.
ज्या जागेवर कामदेव जाळला तिथे कामेश्वर महादेवाचे मंदिर उभारले गेले. तिथे शिव गिरिजा यांच वास्तव्य आहे. त्या मंदिरा भोवती काम रती यांच्या काम क्रिडेची दगडात कोरलेली भरपुर सुंदर शिल्प आहेत. या शिल्पांची तुलना केवळ खजुराहो येथील काम शिल्पासी करता येईल.
अशी ही गिरिजा/गिरणा अर्ध्या खान्देशला पाणी पुरवते. नार पार योजना केंद्र सरकारने रद्द केल्यामुळे गिरणा खोर्यातील जनजीवन धोक्यात आल आहे. तस होऊ नये म्हणुन खांदेशी माणसाला एकत्रित येवून हा लढा उभा करावा लागेल. नार पारचे पाणी खान्देशात आणले तर गिरणा, मोसम, बोरी, पांझरा, बुराई या नद्या बारमाही करता येतील. त्यातून खान्देशच नंदनवन होईल. नवकोट कल्याण होईल.
तापी वर आणि एकूण सर्वच नद्यावर मानवी जिवन अवलंबून आहे. अशा प्रकारे तापी नदीवर होड्यातून येणार्या जाणार्या प्रवाशांची ने आण करणार्या भोई नावाड्याच्या जीवनाचे एक अहिराणी लग्नगीत सोबतच्या लिंक मध्ये पाठविले आहे. ते गाणे आवडले तर त्याला लाईक, पुढे फॉरवर्ड करा.