Fathers Day Poem In Marathi
माझे बाबा
माझे बाबा
माझे बाबा होते तेव्हा महत्त्व त्यांचे कळले नाही.
कौतुक त्यांचे करण्याला मन माझे कधी वळले नाही ।।
कामी येती आजही त्यांचे आध्यात्मिक ते संस्कार।
त्या संस्कारांमुळेच आज मी करतो यशस्वी संसार।।
कठोर वागणे बालपणी मज उगाच वाटे त्यांचे भय।
चुकलो जर का कधी कुठे मी करीत नव्हते माझी गय।।
काळजी होती मनात त्यांच्या बाहेर कधी ती दिसत नसे
आजारी मी असता त्यांना झोप रात्रीची येत नसे।।
बाहेरून ते होते कडक पण आतून होते प्रेमळ खूप।
साधी राहणी होती तरीही रुबाबदार होते त्यांचे रूप।।
आज जगी या ते नसताना आठवण करते मला उदास।
जगात वावरतांना त्यांचा क्षणोक्षणी मज होतो भास।।
© अजय बिरारी नाशिक
बाप
बाप
वेदना गोठल्या ज्याच्या,
कधी विव्हळला नाही…
काव्यास कळली आई,
बाप का कळला नाही….ध्रु
पात्यास घासतं जातं,
तसी झिजविली काया…
जात्यास अर्पिता दाणा,
त्याग तो दळला नाही…..1
सुर्याला घेऊनी माथी,
जाळली कातडी ज्याने…
जाळली मनाची स्वप्ने,
निर्धार जळला नाही….2
काहिल मनाची केली,
अन भट्टी आयुष्याची…
उकळे अंतरी व्यथा,
जराही ढळला नाही…..3
पाठीला देउनी वाक,
नित पोटार्थीची सोय…
ढेकर लब्बाड झाला,
ढुंकाया वळला नाही……4
पुढच्या पिढीस व्हावी,
प्राप्त अलौकिक गुढी…
मातीत मुरला रोज,
तो आत्मा मळला नाही..5
कवी.प्रकाश जी. पाटील
पिंगळवाडेकर
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बाप
(पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा)
अवतार जमदग्नी, बाप भासतो कठोर
वरवर दावी धाक, आत मायेचा पाझर
ताप वाटे उन्हाळ्याचा, वागे कडक मास्तर
देत जोड संस्काराचे , लावी जीवना अस्तर
प्रेम पोटात ठेवत, सत्य जगाचे दावतो
छडी वेताची देऊन, मना वळण लावतो
राब राब राबताना, होते देहाचे चिपाड
घर जाते झोपी राती, बाप जागतो सताड
भेगाळल्या पावलाने, वाट निर्मितो उजळ
मनी पोरांच्या जागतो, भाव पवित्र निर्मळ
पाचवीला पुजलेलं, तुझ्या झिजणं खंगणं
पोरं डोळ्याला दिसता, मनी खुलतं चांदणं
पोर जन्माला येताच, मनी पाझर फुटतो
खेळवता वाढवता, बा चा थकवा निघतो
कन्यादान करताना, दान काळीज करतो
पोर जाताना सासरी, कोपऱ्यात बा रडतो
जन्म देऊन दावते, जग पोरांना माऊली
जीवनात लेकरांना, बाप हक्काची सावली
तुझ्याविना बाबा घर, होते भयाण स्मशान
तुझं असणं मायच्या, कपाळाचं रे भूषण
लतिका चौधरी
दोंडाईचा ,जि.धुळे