डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काव्य स्पर्धा dr babasaheb ambedkar
नालंदाविश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव” आयोजित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काव्य स्पर्धा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा
महामानवाची गौरव गाथा
दिनांक १४/४/२०२४
विषय … महामानवाची गौरव गाथा
( अष्टाक्षरी काव्य )
अस्पृश्यता बालपणी
भोगतात भीमराव
जाण ठेऊन मनात
आणतात समभाव ….१
शाळा शिकून विद्वान
झाले जगी ज्ञानसूर्य
दिला संदेश जनाला
त्यांचे वाढे मनोधैर्य ….२
दिली समता,बंधुता
स्त्रिया पुरुष समान
नाही कोणी उच्च नीच
असे दिले संविधान …३
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत
ध्जज तिरंगी निशाण
एकात्मता बंधुभाव
राखा देश अभिमान. ..४
सामाजिक, राजकीय
श्रध्दा ठेवा देशाप्रती
हक्क आणि अधिकार
होई सर्वांची उन्नती ….५
क्रांतीसूर्य, विश्वरत्न
धुरंधर, युगंधर
गाथा अशी गौरवाची
श्रेष्ठ ते आंबेडकर ….६
जयद्रथ आखाडे पुणे
भीम माझा (अभंग)
नालंदा विश्व साहित्य समूह
बहादरपूर जळगाव
आयोजित
स्पर्धेसाठी
भीम माझा (अभंग)
खरा प्रज्ञा सूर्य । तोचि क्रांतिसूर्य ।।
दलितांचे धैर्य । भीम माझा ।।
वाचनाचा भोक्ता । उत्तमची वक्ता ।।
घेई दीन मक्ता । भीम माझा ।।
अस्पृश्यता कथा । जाणुनी रे व्यथा ।।
सोडवी रे गुंथा । भीम माझा ।।
समता बंधुता । भोक्ता विषमता ।।
संविधान दाता । भीम माझा ।।
उच नीच भेद । देऊनिया छेद ।।
घाली साम्य साद । भीम माझा ।।
घटना निर्माता । कर्तव्य जाणता ।।
अधिकार दाता । भीम माझा ।।
पेरी मानवता । अज्ञान जाळीता ।।
महान रे नेता । भीम माझा ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
जिल्हा:- सोलापूर
8275171227
माणुसकीचे भान
नालंदाविश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव आयोजित काव्यलेखन स्पर्धा दिनांक – १४/४/२०२४
वार – रविवार
विषय – महामानवाची गौरव गाथा
शीर्षक – माणुसकीचे भान
भीमा, तुझ्या प्रेरणेने
मनी जागला विवेक
घेता समजून तुला
बोध जाहले अनेक!
इतिहासाच्या गढीत
होती झाकलेली सत्ये
आली वाचताना ध्यानी
कशी मुक्ती कोण पथे!
आम्ही पूर्वसंचिताच्या
स्मृती मानल्या गुमान
जिणे झाले गुलामीचे
जणू पायीची वहाण!
तळी खापरी दिव्यांच्या
किती डुयांचा अंधार
तुझ्या प्रज्ञा प्रकाशाने
झाला क्षणात पसार!
भीमा, तुझ्या कर्तृत्वाचे
काय गावे गुणगान
चेतविलेस तू दिव्य
हे माणुसकीचे भान!!
महादेव भोकरे, वडूज (सातारा)
9921515594
बाबाची आठवण
शीर्षक__बाबाची आठवण
फुलाची कहाणी
वसंतानी लिहिली
आणि कोणाची कधीच
गुलामगिरी नाही ठेवली.
__१___
कुराण मुसलमानांचे
बायबल ख्रिश्चनांचे
भगवत गीता हिंदूंची
बाबाचे संविधान मनुष्याचे.
__२__
बाबांच्या चरणीच
आमचे आयुष्य देऊ
पूजेचा योग्य मान
पायी फुले ठेऊ.
__३__
सन्मान आम्हा मिळाला
संविधान केल्या गेल्यावर
मुखाने म्हणून जय भीम
आयुष्य आम्हा आहे तोवर
__४__
जय भीम म्हणता
माणसाला जोडतो
अशी शिकवण बाबांची
वादळाची ठक्कर करतो.
__५__
वैशाली चांदेकर.
संविधान जपू या
नालंदा विश्व साहित्य समुह बहादपुर जळगाव. १४एप्रिल विश्व भुषण, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्पर्धा आयोजित काव्यलेखन…
दिनांक:-१४/४/२०२४
विषय:- महामानवाची गौरव गाथा
शीर्षक :संविधान जपू या
विश्वात सार्या देश महान
चला स्वाभिमान जपू या
अखंड जयघोष गर्जत राहो
आपले संविधान जपू या
संविधान दिधले बाबासाहेबांनी
चरणी नतमस्तक होऊ या
न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता
या चतु:सूत्रीची जाण ठेऊ या
हक्क बजवताना आपण आपले
कर्तव्यांचेही भान राखू या
भारतीय जागरूक नागरिक म्हणून
सर्वांना एकसमान लेखू या
समाजवादी,धर्मनिरपेक्ष, गणराज्य
घडविण्यासाठी निर्धार करू या
नागरिकांस सामाजिक आर्थिक न्याय
मिळण्यास आता आग्रह धरू या
विश्वास,श्रद्धा,उपासना
यांचे स्वातंत्र्य वरदान मागू या
राष्ट्रीय एकता आणि एकात्मता
यांचेही आश्वासन घेऊ या
संविधानाने दिली संजीवनी
त्याचा आदर करू या
विश्वात अवघ्या विशाल संविधान
त्याला आधार ठरू या
देशाच्या विकासकामी आपण
आपला हातभार लावू या
स्वच्छ सुंदर भारत करण्यास
एकजूटीची मशाल ठरू या
देश माझा मी देशाचा
चला देशासाठी खपू या
आत्मनिर्भर भारत घडविण्यास
चला संविधान जपू या
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत जि.रायगड
मो.नं.९०९६७२१०६३
न्यायहक्क
नालंदाविश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव
१४ एप्रिल विश्वभुषन, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा
विषय:–“महामानवाची गौरव गाथा”
दिनांक:–१४/०४/२०२४
न्यायहक्क
विश्वरत्न कायदेतज्ञ तळपे सूर्यापरी
दलितांचा सर्वश्रेष्ठ नायक शोभे भूवरी
शिक्षण विद्याव्यासंग भिमा मुलाधारी
पिढ्यांपिढ्या वंचितांना जगी उद्घारी
अविदयेच्या गर्तेत घेरला होता समाज
बधीर झाल्या होत्या मनातील संवेदना
केले संवेदनेस जागृत बाबासाहेबांनी
जागृतीने आत्मविस्मृतीस आत्मभाना
शिक्षण असे वाघिणीचे गुरगूरणारे दूध
बाबांनी जाणिले गत समाजक्रांतीला
शिकण संघटित होणं संघर्षदिला मंत्र
विद्या मोल बिंबवून नष्टीले न्यूनगंडाला
विद्या प्रज्ञा करुणा शील आणि मैत्री
असावे प्रत्येकाठायी जाणिले भीमानी
शोध घेऊन स्वतःतील तो माणसाचा
नेले प्रगती पथावर मानवास बाबांनी
जीवनावश्यक अधिष्ठान मनी जपून
विचार एकवटले स्वातंत्र्या समतेवर
राज्यघटनेत तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून
वंचित लोकांस न्यायहक्क दिले भरपूर
हजारो पिढ्यांच्या जुलमी गुलामगिरी
जातीयतेच्या अस्पृश्यतेच्या बेड्यातून
भिमाने जगवले योग्य दिशा दाखवून
एकच साहेब बाबासाहेबांस नमन
वैशाली रुपेश पाटील
कर्जत,रायगड
राज्य घटना शिल्पकार
नालंदा विश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव आयोजित स्पर्धे साठी काव्य लेखन
दिनांक
14-4-2024
विषय
महामानवाची गौरव गाथा
शिर्षक;राज्य घटना शिल्पकार
महामानवाची गौरव गाथा
गाऊ सारे त्यांच्या जन्म दिनाला
बनवून श्रेष्ठ राज्य घटना
लाजविले भिमाजींनी जगाला
(1)
बाबासाहेबजी आंबेडकर
एक धगधगता ज्वालामुखी
चवदार तळे करता खुले
झळकळे नाव सर्वांच्यामुखी
(2)
बुध्दीशाली ज्ञानानेच महान
कायदेच केले जन हिताचे
उपकार कर्ते महामानव
केले दहन ही मनसृतीचे
(3)
किर्तीमान बनले संविधान
मुलभूत हक्कांनाच जाणून
बनवले महाच प्रयासाने
कर्तव्याच्या धारेस उमजून
(4)
अधिकार ही दिले शिक्षणाचे
हित पाहूनच बहूजनांचे
बनवला माहिती अधिकार
धर्म मनमर्जी स्विकारण्याचे
(5)
सुभाष देवचंद शहा
दापोडी ( पुणे )
जिल्हा- पुणे
मोबाईल नंबर
( 9370049835 )
बोधिसत्व
नालंदाविश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा
रविवार
दिनांक:-१४•४•२०२४
विषय:- महामानवाची गौरव गाथा
( काव्यलेखन)
शिर्षक:- बोधिसत्व (अष्टाक्षरी)
भारतीय घटनेचे
भीमराव शिल्पकार
लोकशाही भारताची
जगी एक चमत्कार…
भारतीय स्त्रियांसाठी
आरक्षण योगदान
स्त्री पुरुष समानता
कायद्याचे संविधान…
मानवता हाच खरा
धर्म भीमाने पाळला
स्पृश्यअस्पृश्य भेदाचा
दंभ भीमाने जाळला…
काळाराम मंदिराचे
दार त्यांनी उघडले
पाणी चवदार तळे
भीमरायाने प्राशले…
बुध्दीवंत ज्ञानवंत
भीम महा धुरंधर
बहिष्कृत भारताचा
विर योद्धा युगंधर …
बोधिसत्व भारताचा
विश्वव्यापी प्रकाशतो
बुद्ध धम्म संघ मंत्र
जगी साऱ्या निनादतो…
नं. भा. कोहळे
नागपूर ९३७१८३०१५०
कोण आहेस तू ? तू आहेस महामानव
नालंदा विश्व साहित्य समूह बहादपुर. जळगांव जिल्हा आयोजित स्पर्धा.
दिनांक १४.०४.२०२५
महामानवाची गौरव गाथा..
बा तू आहेस, महामानव.
शीर्षक :-कोण आहेस तू ? तू आहेस महामानव…(मुक्तछंद)
तुज जवळ जाता जाता तुझा वलय मोठा होत जातो,इतका मोठा की कवेत न मावणारा, डोंगर पर्वता हुन महान, सागरा एवढा,नाही नाही त्याहुनही महान..
कोण आहेस तू ? ,किमयागार, ?जादूगार, ?की आमच्या सर्वस्वी जीवनाचा शिल्पकार, ?
चंद्रा कड पाहिलं असताना, तो देखील कले कलेने बदलतो
पण तू अविचल, अढळ ,आत्मविश्वासाचा महामेरू, प्रखर सूर्याला ही लाजवेल असा, तेजोमय तारा, निश्चयाचा पाया,
कोण आहेस तू ? अन्याया विरुद्ध पेटून ऊठलेला क्रांतिसूर्य , ? शीतल तर कधी खवळलेला सागर? मायेचा झरा ? बोधीरूक्षाची शीतल झुळूक ? दिन दुबळ्यांची माया,? तथागतांची छाया ? कोण आहेस ? कोण आहेस तू ?
तू आहेस बा राखेतून विझणाऱ्या निखाऱ्याला फुंकर घालतात ना, तसा आमच्या जीवनाला फुंकर घालणारा शीतल वारा, आमच्या पंखांत सळसळणारी ताकद देणारी ऊर्जा, आजच्या वास्तव्यात असणारा दर्जा , आज जे काही आहोत ना ते देणारा दाता ,तथागतांचा सिद्धांत, शिवबांचा झंझावात, फुलेंचा वारसा, जगण्याचा मार्ग दाखविणारा आरसा
सुटला प्रश्न सुटला बा ! मनोजास पडलेला प्रश्न सुटला ,बा तू आहेस आमचं अस्तित्व ,प्रेरणास्थान,जगणं आणि मरणं ..
बा तू आहेस तू आहेस आमच्या जीवनाचा शिल्पकार महामानव
डॉ भीमराव आंबेडकर डॉ भीमराव आंबेडकर
कवी.मनोज कासारे
रेवली, म्हसळा रायगड
दुरध्वनी.७९७७७३९५०८.

दीन सोनियाचा दावला
दीन सोनियाचा दावला
उगवली १४ एप्रील ला ती
सोन्याची हो सकाळ
जन्माला आले ते
धरती मातेचे भीम बाळ
खरा देवच आपुल्या
हकाले तो धावला
डॉ बाबासाहेब आंबेडकर
सर्व देशवासियांना पावला
जात वादिंचा केला नाश
भरून दावलि ओंजळ चवदार
प्रत्येक संघर्षात लढले
ना मानली कधी त्यांनी हार
संविधान लीहूनी दिला
देशवासीयांच्या जीवना आकार
असे हे बाबा साहेब आहे
या भारतीय घटनेचे शिल्पकार
प्रत्येक जन आपुले
ही दिली करुनी जानव
आहे बाबा साहेब या
देशांचे महामानव
गुरुदेव ईंग्लिश मीडियम स्कूल्
शिक्षिका.कु.प्रणोती राम शेंडे
पिंपळगाव यवतमाळ
भारताचा महानायक
नालंदा विश्व साहित्य समुह बहादपुर जळगाव. १४एप्रिल विश्व भुषण, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्पर्धा आयोजित काव्यलेखन…
दिनांक:-१४/४/२०२४
विषय:- महामानवाची गौरव गाथा
शिर्षक :-भारताचा महानायक
जन सामान्यच्या मनामनावर
राज्यघटनेच्या पानां-पानांवर
न्याय हक्क मिळवुन दिला
उजळविले दलित समाजाला…
!!१!!
कळतच नाही बाबासाहेब
काय लिहावं तुमच्या वरती
कार्य ही तुम्हे तेवढेच अन्
नि तेवढीच आहे किर्ती
!!२!!
बुध्दीमत्तेने होते हुशार केले युगप्रवर्तक बॅरिस्टर हे नाव
होते दलितांचे भिमराव
घेत असे दलितांचा काळजाचा ठाव!!३!!
एक दिवस विचार केला बाबासाहेब
लिहावं तुमच्या वरती काही
पण फार प वाईट वाटले पाहुन
आताची स्थिती
!!४!!
हयातभर कार्य केले देशासाठी
त्या कार्याची जाणीव नाही
बाबासाहेब तुम्ही काहींना
उभ्या जन्मातच कळले नाही
!!५!!
विशवातल्या पाच विद्वानांत
तुम्ही गणले जात होते
दोन वर्ष,अकरा दिवस मात्र ते खरे होते!!६!!
ऐकुन तुमची कहाणी येते
डोळ्यात पाणी
आमच्यासाठी केलं तुम्ही हाडाचं मणि आणि रक्ताच पाणी
!!७!!
सौ कविता डी जाधव सटाणा नाशिक.
कर्तृवाचा महामेरू
स्पर्धेकरीता
नालंदाविश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव
१४ एप्रिल विश्वभुषन, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
दिनांक:१4//4//2024/
वार- रविवार
विषय – महामानवाची गौरव गाथा
शिर्षक : कर्तृवाचा महामेरू
भारतरत्न तुम्हीच
परमपूज्य आम्हास
जयंतीच्या निमित्ताने
स्मरतो आज तुम्हास ||१||
भारतीय घटनेचे
तुम्ही थोर शिल्पकार
दलितांना न्याय दिला
केले किती उपकार ||२||
आंबेडकरांचा भीमा
दलितांचा झाला वाली
बहुजनांस त्यांनी हो
एकात्मता शिकविली ||३||
चवदार तळे त्यांनी
अस्पृश्यांना खुले केले
चवदार तळ्यातले
पाणीच अमृत झाले ||४||
शांततेचा मंत्र दिला
युध्द नको बुध्द हवा
सर्वधर्म समभाव
संदेश हा दिला नवा ||५||
सोसले कित्येक घाव
शिक्षण घेण्यास तुम्ही
आदर्श प्रत्येकाचा आज
ठरलात बाबा तुम्ही ||६ ||
न्याय, स्वातंत्र्य,समता
शिकण्यासाठी ठरले
मोलाचे ते संविधान
हातात आम्ही धरले ||७||
संविधानाचीच पुजा
व्हावी रोज घरोघरी
आंबेडकरांचे विचार
जपू सारे नरनारी ||८||
कवयित्री,सौ.अनिता वलांडे
शिरूर -अनंतपाळ, लातूर
उपकार माझ्या भीमाचे
नालंदाविश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव
१४ एप्रिल विश्वभुषन, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
दिनांक:१4//4//2024//
वार- रविवार
वेळ:सकाळी १० ते रात्री १2 वाजे पर्यंत
विषय – महामानवाची गौरव गाथा
( काव्यलेखन)
दि.१४/०४/२०२४
शीर्षक : – उपकार माझ्या भीमाचे
उपकार माझ्या भीमाचे
सांगा फेडू तरी कसे
शिक्षणाचे बाळकडू दिले
भीमाने मला जसे //१//
शिक्षणाची दारे खुली करून
ज्ञानाचा दिवा भीमाने लावला
भीमा या आदर्शाचा ठेवा
माझ्या हृदयाला खूप भावला //२//
जाती धर्माच्या नावाखाली
राजकारण बघा वाढले
दुबळ्या दिन दलितांसाठी
बाबासाहेबांनी कायदे काढले //३//
रात्र रात्र अभ्यास करून
बाबासाहेब बॅरीस्टर झालात गडे
गोर गरिबांच्या हितासाठी
दिले सर्वांना संविधानाचे धडे //४//
लिहून नवनवीन कायदे
केले शोषितांचे रक्षण
व्हावी प्रगती जनमाणसात
म्हणूने दिले आम्हा आरक्षण //५//
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे
आता पिल्याशिवाय जमत नाही
अन जो पितो तो
गुरगुरल्या शिवाय राहत नाही //६//
दावुनी भीमा प्रकाश
मिटविला अंधकार
आठवण येते भीमा तुझी
कसा विसरू मी तुझे उपकार //७//
अॅड. उमाकांत आदमाने
रा. वारजे, ता.हवेली, जि.पुणे
मो.नं.९८२२५३६१४३
भीम विचार समतेचा
नालंदाविश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव
विषय – महामानवाची गौरव गाथा ……!!!!!!
भीम विचार समतेचा
भीम सागर ज्ञानाचा
देऊन हातात पुस्तके
भीम मार्ग जीवनाचा
भीम दलितांचा विधाता
भीम शोषितांचा दाता
कष्टकऱ्यासाठी झटणारा
भीम पहिला मजूर नेता
भीम शाई लेखणीची
भीम धार शब्दाची
रात्र जागून लिहिली
भीमा तूच प्रत संविधानाची
भीम नम्र महामानव
भीम आदर्श मूर्ती
चंद्र सूर्य असे पर्यंत
भीमा तुझी रे कीर्ति
भीम जयंती आनंदात
भीम जल्लोष
भीम समजला जर तुम्हा
बुद्ध दिसेल हर मानवात
देव थोरात…
मु.पो.ता सिन्नर
जि .नाशिक
8668743568

श्रेष्ठ संविधान
स्पर्धेसाठी
नालंदा विश्व साहित्य समूहनालंदा विश्व साहित्य बहादपूर जळगाव आयोजित स्पर्धा
विषय : महामानवाची गौरव गाथा
दिनांक: 14/4/24
शीर्षक: श्रेष्ठ संविधान
दिली लोकशाही धर्मनिरपेक्ष
आचार, विचारांचे स्वातंत्र…
वंश,जात,लिंग आणि प्रांत
भेद न करण्याचा देती मंत्र…!!
बेडीतुन भारता करण्या मुक्त
लिहिले जगी श्रेष्ठ संविधान..
वाचूया आपण त्यातील
प्रत्येकची पान अन पान ..!!
ठेवुनी कष्टाची त्यांच्या जाण..
संविधानाचा करू सन्मान..
राखुया बाबासाहेबांचा मान
अनादर नको उन्मत्त होऊन..!!
समता, बंधुता,आणि न्याय
असे बाबासाहेबांची शिकवण
सुसूत्रता ठेवी सगळ्या जोडून..
कायद्याचे घालुनीया कुंपण..!!
अनेक पंथ,धर्म,भाषा, जात..
भारत देश विविधतेची खाण..
विषमतेचा करण्या संहार..
प्रेमाचेच येथे पिकवू रान…
प्रत्येकाचा राखुनी मान
जागवीले बाबांनी अपुले भान..
करू शोभेसे आचरण..
आठवोनी त्यांचे बलिदान..!!
सौ.अर्चना धानोरकरवर्धा.
अंधारातला दिवा
स्पर्धेसाठी
नालंदाविश्व साहित्य समुह बहादुर पूर जळगाव आयोजित उपक्रम
विषय:-महामानवाची गौरव गाथा
शीर्षक:-अंधारातला दिवा
खितपत पडलो होतो अंधारात
तुच झालास अंधारातला दिवा
रात्रंदिन कष्ट करून आमच्यासाठी
तुच झालास आमचा कैवारी भिवा..
कोणतेच अधिकार नव्हते आम्हाला
जगणे होते गावकुसाबाहेर
कुत्र्या मांजराला करीत जवळ
मात्र आम्हाला ठेवत होते दूर……
तुझ्या मुळेच भीमा आम्हाला
मिळाला जगण्याचा अधिकार
मनुस्मृती जाळून बाबा तुम्ही
केला आमच्या जीवनाचा उद्धार….
शिका,संघटीत व्हा संघर्ष करा
दिला आम्हास मंत्र जगण्याचा
घेवून लेखणी आपल्या हातात
लिहीलेस संविधान भारताचा…..
तुझ्या संविधानाची किमया
आहे सर्वांना एक अधिकार
सर्वांना एकसमान कायदा
मालीक असो किंवा चाकर…
बौद्धधम्म स्विकारून आपण
दिले आम्हाला धम्माचे दान
खरच तुझ्या मुळेच भीमराया
समाजात मिळातोआम्हाला मान….
लोपामुद्रा शहारे
नागपूर मानेवाडा
महामानवला मानवंदना
स्पर्धेसाठी रचना …
नालांडविश्र्व साहित्य समूह भाहादपुर,जळगाव
आयोजित,
स्पर्धा
विषय :- महामानवाची गौरव गाथा
शीर्षक :- महामानवला मानवंदना
अस्पृश्यतेच्या च्या अंधाराला
जवाब देण्या कायद्याने,
सूर्योदय तो महुगावी न्यायचा
झाला ईश्वराच्या कृपेने …..
दलितांचा आवाज होवूनी,
झाला विधानाचा शिल्पकार,
देश घडवण्यात या महामानवाच
योगदान आहेत आभाळभर…
भारताचा रत्न शोभला
परदेशीही डंका वाजला,
त्याची देणं मोठी
या समजाला घडवण्याला….
समाज म्हणजे काय? सांगीतले;
संस्काराचे धडे शिकवले,
दलितांचा पालनहार होवूनी
चवदार तळ्याचे पाणी केले….
ऋण मोठे तुमचे
साहेब आहे आम्हावरी,
पांग कधी फिटणार
नाही हे जन्म दाही….
©®सेजल सस्ते
जिल्हा वाशिम
महामानव
नालंदाविश्व साहित्य समूह भहादरपूर,जळगाव
आयोजित
विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त खुली भव्य स्पर्धा.
दिनांक :- १४ एप्रिल २०२४
वार :- रविवार
विषय :- महामानवाची गौरव गाथा..!
शीर्षक : महामानव
बोलावे मी किती तुजविषयी
कमीच पडते सारे काही
भारतीय राज्यघटना अजुनही
देते कार्याची तुझ्या ग्वाही
किती भोगविलास वनवास
साहिला अन्याय , अपमान
जिद्दिच्या बळा वरती उभा राहुनी
वाढविला राष्ट्राचा अभिमान
लढण्यास शिकवले तु
चालण्यास शिकवले तु
अनाथांचा, बहुजनांचा
झालास नायक तु
टळला अंधकार आता
पेटली विज्ञानाची वात
शिक्षणासाठी नाही विचारत
आता कोणी कोणाची जात
कृतज्ञ आहोत आम्ही तुझे
कसे फेडू या उपकाराला
जयंती निमित्त शत शत नमन
करते या महामानवाला
कु सासवडे वैष्णवी संतोष खुंटेफळ (वाटे) ता-आष्टी जि-बीड
संविधानाचे जानकार
नालंदा साहित्य समूह बहादरपूर जळगाव
विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काव्य लेखन स्पर्धा.
विषय = महामानवाची गौरवगाथा
शीर्षक = संविधानाचे जानकार…
घटनेचे खरे शिल्पकार
महा मानव डाॅ. बाबासाहेब…
दिले जनतेला मुलभूत अधिकार
संविधानातून देतो आज खरा जवाब…!!
लेखणीच्या जोरावर
मोठे बॅरिस्टर झाले
दिन दुबळ्याचा वाली
जगी उदयास आले…!!
रथाचे मानकरी
गोर गरिबांचे कैवारी
मनुवादी विचार्यांना
आज लागते जिव्हारी…!!
सत्याचा मार्ग धरला
जगात राजा ठरला
परदेशी डंका वाजतो
एकच जानकार घडला…!!
मुकनायकातून डरकाळी फोडली
आन्याय विरूद्ध मैदानी थंड थोफटले
हूकांर दिली अस्पृश्यतेला दुर करण्याची
जगी सुर्य चंद्र खरा उदयास आले…!!
गौरव गाथा अलौकिक बाबासाहेबांची
अंगी ह्रदयी शहारे दाटून येती…
एकट्या मर्दगडीने दिले संविधानाचे दान
आज रांगडे लोकशाहीत अधिकार गाजवती…!!
नमन माझे सुर्यपुत्राला
कनखर बाणा व्यक्तिमत्त्वला…
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना
मान वंदना करतो पावण जयंतीला..!!
Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
दिनांक =१४-०४-२०२४
संविधानाचे शिल्पकार
नालंदाविश्व साहित्य समूह भहादरपूर,जळगाव
आयोजित
विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त खुली भव्य स्पर्धा.
दिनांक :- १४ एप्रिल २०२४
वार :- रविवार
विषय :- महामानवाची गौरव गाथा..!
शीर्षक :- संविधानाचे शिल्पकार…!
महामानवाची गौरव गाथा
अजरामर आहे या जगात
कशी वर्णावी त्यांची महंती
घटनेचे शिल्पकार हे विश्वात…!!१!!
ज्ञानवंत प्रखर बुद्धिवादी मानव
ज्ञानाचा तूच अथांग महासागर
जगाने तुला गौरविले सन्मानात
ज्ञानाच प्रतीक आहे अजरामर…!!२!!
हजारो वर्षापासून जगणारा
निद्रिस्त वंचित समाजाची व्यथा
जातीधर्माची कीड लागलेली
बुद्धीजीवी माणसांची विकृत कथा..!!३!!
कर्मकांड अंधश्रद्धा रुढीपरंपरा
छेद देऊन घडविला इतिहास
पशुपेक्षा दैनिय अवस्था मानवाची
जगण्याचा अधिकार दिला हमखास…!!४!!
पुस्तकांच्या ज्ञानातून घडविले
स्वतःचं व्यक्तिमत्त्व शिक्षणात
महासूर्य संबोधले समाजाने
तुझी गौरव गाथा ही हृदयात…!!५!!
कवीनंदेय..
वांद्रे, मुंबई.
मो.-८९२८२९७७४७
तडपता सूर्यच
शिर्षक:-तडपता सूर्यच
अस्पृश्यांना नव्हता कोणी वाली,
भीमरायांचा मग उदय झाला,
हताशच त्या जणू पीडितां साठी,
तडपता सूर्यच जन्मी आला,
..१..
जातीयवाद अती अतीच होता,
नव्हतीच कोणती पण मुभा,
अस्पृश्यांची चूक असली लहान,
शिक्षेसाठीच भरवायचे सभा,
..२..
विहिरीवरती पाणवठ्यावर पण,
देत नव्हतेच पिण्याचे पाणी,
बोलणारे नव्हते कोणी कोणीच,
नव्हता उभा पाठीशी कोणी,
..३..
तेंव्हा मग नशिबाचे दार उघडले,
आले बाबासाहेब आंबेडकर,
कर्म त्यांचीच फळाशी आलीत,
आज ख्याती त्यांची जगभर,
..४..
मिळाली प्रेरणा जगण्या साठी,
बाबा साहेबांची हि पुण्याई,
आठवते आज ही जिवन गाथा,
धन्य धन्य ती होती भीमाई..
..५..
(चूक-भूल क्षमस्व)
राजेंद्र रामदास बनसोड
श्री.साईधाम नगरी,गणोरी रोड
बाभूळगाव,जि.यवतमाळ
(महाराष्ट्र)पिन कोड-४४५१०१
मो.नं. ९९६०७३३८३४
गौरवगाथा बाबासाहेबांची
नालंदा विश्व साहित्य समूह बहादूर पूर आयोजित स्पर्धा
विषय:गौरवगाथा महामानवाची
कविता:गौरवगाथा बाबासाहेबांची
गौरवगाथा बाबासाहेबांची लिहिता
लिहिता ऊर अभिमानाने येतो दाटून
म्हणूनच पिढ्यान्पिढ्या आमच्या
जयंती साजरी करतात नटूनथटून.
राष्ट्रीय सण म्हणूनच या जयंतीला
मानतो इथला समाज सर्व
अभिमान वाटतो बाबा तुमचा
तुम्ही दिले आम्हां आनंदाचे पर्व.
पाण्यासाठीही संघर्ष केला
जी क्षुल्लक नव्हती बाब
तुमच्या राज्यघटनेने इथे
साऱ्याच मानवजातीला दिला लाभ.
शिक्षणाची ओळख नव्हती
अज्ञानी होता समाज सारा
संघटीत करून ह्या समाजाला
दिला शिक्षणाचा तुम्ही नारा.
विषमता होती देशात या
मनुस्मृतीने पेरलेली ठायीठायी
नष्ट करून ही विषमता सारी
संविधानाने दिली समतेची ग्वाही
माणूस म्हणून माणसाला
तुम्ही दिले घटनेत सारे हक्क
अंधार होता ज्या झोपडीत
तिथे ज्ञानाचा प्रकाश दिला लख्ख
वर्गाच्या बाहेर बसूनही तुम्ही
ठरलेत बाबा इथले विद्यापती
अशी तुमची गौरवगाथा
मी शब्दात वर्णू तरी किती
© गणेश रामदास निकम
चाळीसगाव गणेशपूर
अन सूर्य उदयास आला
नालंदा साहित्य समूह बहादरपूर जळगाव
विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काव्य लेखन स्पर्धा.
विषय_ महामानवाची गौरवगाथा
शीर्षक-अन सूर्य उदयास आला
देऊनी हाती समतेची मशाल
माणुसकीचा दिप उजळला
अन सूर्य उदयास आला,
न्याय दिला चवदार तळ्याला
लढा उभारूनी काळाराम मंदिरी
अन सूर्य उदयास आला,
स्वाभिमानी जळता ज्वालामुखी
जुलमाविरुद्ध उगारुनी वज्रमूठ
अन सूर्य उदयास आला,
माणुसकीच्या न्याय हक्कासाठी
जातीभेदावर अन विषमतेवर
भेदले सुदर्शन चक्र
अन सूर्य उदयास आला,
मुकनायकातून वाचा फोडी
अन्याया विरुद्ध थोपटी दंड
हुंकार मातीचा बहिष्कृत भारत
अन सूर्य उदयास आला,
शिल्पकार ते
भारतीय राज्यघटनेचे
अजरामर नाव झाले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
अन सूर्य उदयास आला…
वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
सिन्नर ( नाशिक )
(७०२०३०३७३८)
महामानव
नालंदा साहित्य समूह बहादरपूर जळगाव
विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काव्य लेखन स्पर्धा.
विषय_ महामानवाची गौरवगाथा
महामानव
बाबा किती बोलावं…….
अन काय बोलावं …….
तुम्ही केलेल्या उपकाराबद्दल,
खरंच असा महामानव आमच्या,
देशात जन्मला हे आमचं भाग्य.
बाबा थोड्या संकटांना धीर खचतो हो आमचा,
पण तुम्ही तर बालपणापासूनच,
संकटावर मात करत आला.
बाबा घटना लिहून……
देशात एकता आणली तुम्ही,
रंजल्या -गांजलेल्या समाजाचा,
आधार झाला तुम्ही…….
स्त्रियांना समाजात मानाच्या स्थानासाठी,
स्त्री- पुरुष समानता कायदा लागू केला.
पण बाबा थोडं वाईट वाटतं,
तुम्ही सर्व सुंदर भेट दिली.
पण लोकांनी त्याची कदरचं नाही केली,
आजसुद्धा प्रगत समाजात,
जातीवरून मारामारी होत आहेत.
देव ,धर्माच्या नावाखाली ……
निष्पाप लोकांना फसवलं जात आहे.
स्त्रियांच्यावर अत्याचार होत आहेत,
भ्रष्टाचार समाजात फोफावत आहे,
काही लोक नकारात्मकता पसरवत आहेत.
खरंच हे सर्व थांबायला हवं………
बाबा… परत तुम्ही जन्माला यायला हवं.
पण विचार आला……….
तुम्ही तर आमच्यातच आहात,
चांगले आचार बनून…….
चांगले विचार बनून……
गरज आहे तुमच्या विचारांना समजण्याची,
ते विचार समाजात रुजण्याची.
बाबा तुमच्यासारखं थोडं तरी,
वागण्याचा प्रयत्न करू……
तुमचा आदर्श आम्ही बाळगू,
समाजाच्या सुधारण्यासाठी,
आम्ही सुद्धा पुढाकार घेऊ.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवू,
शिक्षणाचे महत्त्व समाजाला सांगून,
महामानवाची गौरवगाथा,
आम्ही नेहमी गाऊ…..
बाबा हीच आदरांजली….
आम्ही तुम्हाला वाहू…..
श्रीमती लता आप्पासाहेब माने
संकेश्वर जिल्हा- बेळगाव
भिमा तुझ्या मुळे
नालंदा साहित्य समुह बहादुरपुर जळगांव
विश्व भुषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काव्यलेखन स्पर्धा
विषय-महामानवाची गौरव गाथा
भिमा तुझ्या मुळे!
नव्हत्याचे होते झाले भिमा तुझ्या मुळे
चक्र गतीला आले भिमा तुझ्या मुळे
जातीने जाळलेला मातीने माखलेला
तो माणसांत आला भिमा तुझ्या मुळे
निर्जीव जीवनाच्या जीवात जीव आला
श्वासात श्वास आला भिमा तुझ्या मुळे
होता हयाती ज्यांच्या अंधार दाटलेला
तो स्वयंदीप झाला भिमा तुझ्या मुळे
डोळ्यात पावसाळा देह झेलती उन्हाळा
जन आले सावलीला भिमा तुझ्या मुळे
घडवीले घटना शिल्प तु ऐसे शिल्पकारा
जीव आला शासनाला भिमा तुझ्या मुळे
विद्वान पंडितांचा प्रज्ञा प्रदीप जळता
आली विद्या गौरवाला भिमा तुझ्या मुळे
उन थंडी वर्षाधारा असे लक्तरी सहारा
सुटाबुटात देह सजला भिमा तुझ्या मुळे
अन्याय पोसलेला उन्मादी झिंगलेला
मनुवाद बाद झाला भिमा तुझ्या मुळे
पुण्याईची महती झाली पुण्य महु धरती
आले तीर्थरुप तीला भिमा तुझ्या मुळे
महाडच्या भूमीचे चवदार त्या तळ्याचे
पाण्याचे बंध तुटले भिमा तुझ्या मुळे
मनुवाद्यांच्या गडाला हादरा एक दिला
मनुस्मृती राख झाली भिमा तुझ्या मुळे
तुझ्या बा ॠणाला ना विसरतील महिला
जखडबंद तुटली बेडी भिमा तुझ्या मुळे
बुद्धमय भारताचे होते स्वप्न पाहिलेले
स्वप्नास जाग आली भिमा तुझ्या मुळे
ती दिक्षा भूमी स्मरते नी चैत्य भूमी रडते
भरती सागराला येते भिमा तुझ्या मुळे
मधुकर गोपनारायण.
नागपूर
विश्वाचा तारा महान
नालंदा साहित्य समूह बहादरपूर
.. जळगाव..
१४ एप्रिल विश्व भुवन, भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा..
दिनांक १४ एप्रिल २०२४
विषय – महामानवाची गौरव गाथा
विश्वाचा तारा महान
शिक्षणाची त्यांना तहान
घेतले शिक्षण कायद्याचे
झाले बॅरिस्टर देशाचे
लढाई होती दीनांची
जाती मधील हिनांची
हक्का साठी लढले
न्यायासाठी झटले
बहुजनांचा मान
होती नावात शान
प्रज्ञासुर्य भारताचे
माणूस होते हक्काचे
चवदार तळे स्पर्श केले
हजार लोक सोबत नेले
स्त्रियांसाठी घटनेत स्थान
कायद्याने दिले त्यांना मान
हिंदूंचा मनुस्मृती ग्रंथ
ग्रंथात होते अस्पृश्याचे मंथ
ग्रंथ जाळून केली
वाईट रुढीवर मात
बाबासाहेबांचा मोठा हात
दिन दुबळ्याचा कैवारी
बाबासाहेबांची हत्ती वरुण सवारी
महामानवाची गौरव गाथा
सगळे टेकवतात पायावर माथा.
नयना कांबळे. (नयनकाव्य)
कोल्हापूर.
औक्षण करुया क्रांतिसूर्याचे
स्पर्धेसाठी ( पूर्वी पोस्ट केलेली कविता माझ्याकडून डिलीट झाली आहे त्यामुळे परत पोस्ट करीत आहे. क्षमस्व…! )
नालंदा विश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव आयोजित
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
काव्यलेखन स्पर्धा
दि. १४ एप्रिल २०२४ वारः- रविवार
विषयः- महामानवाची गौरव गाथा
औक्षण करुया क्रांतिसूर्याचे
सर्वश्रेष्ठ संविधानकर्ते क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर
अहर्निश परिश्रमून साकारले स्वप्न बहिष्कृतांचे धुरंधर
दलित अस्पृश्य जनकल्याणार्थ बाबांचा विचार आचार
कृतिशील सांगड जीवनात दिव्य तत्त्वज्ञानी हा अवतार
मोडून परंपरेची कवाडे अस्पृश्यांना दिला मंदिरी प्रवेश
शिक्षण हे वाघिणीचे दुध प्राशुनी निर्मिला क्रांतिआवेश
रंजल्या गांजल्यांच्या न्याय हक्क स्वातंत्र्याचे ते कैवारी
शिक्षण नोकरी भाकरी शिदोरी संविधान हे सर्वां तारी
घणघोर काळास झुंज देऊन उभारिला सत्याग्रही मेळ
पिढीजात बहिष्कृत शोषकांचा संपविला समूळ खेळ
अत्याचार हिंसा जुलूम जोखड गुलामी होती शिरावरी
जातिधर्म विषमतेच्या अनिष्ठप्रथा परंपरा गाढल्या दरी
कर्दनकाळ आंतरजातीय विवाह नि पाण्याचा विटाळ
घातक विचारांची करुनी होळी केले दुष्टाचार घायाळ
शिका संघटीत व्हा संघर्ष करा प्रजेस अर्पिला मूलमंत्र
अस्पृश्य भारताला सुसंस्कृत जगण्याचे दिले दिव्यतंत्र
कायदा आखिला बहुमोल ज्यावर चालतो राष्ट्रकारभार
असो सानथोर वा राजा रंक सर्वांनाच समान अधिकार
लंडनात मूर्ती साकारणा-या हेझल मॉर्गन तैलचित्रकार
विश्वनायका ह्या मरणोत्तर सर्वोत्तम अर्पिला पुरस्कार
धम्म स्वीकारक पुनरुत्थानक बहुआयामी हे स्तंभाधार
विश्वात गावोगाव पुतळे बाबांचे घेऊ आदर्श कार्य सार
झाले बहु होतील बहु परि या सम हा न दुजा अद्वितीय
औक्षण करुया क्रांतिसूर्याचे मनोभावे आपण भारतीय
पांडुरंग आडबलवाड
धर्माबाद.जि.नांदेड
मो. नं. 9158551975
प्रज्ञासूर्य
स्पर्धेसाठी
नालंदा विश्व साहित्य समूह बहादूरपूर जळगाव आयोजित
14 एप्रिल विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काव्यलेखन स्पर्धा
दिनांक : 14/04/2024
वार : रविवार
विषय : महामानवाची गौरवगाथा
शीर्षक : प्रज्ञासूर्य
” प्रज्ञा सूर्य “
चला करूया साजरी
जयंती गुरु शिष्याची
होते मुहूर्तमेढ ते
समाज्याच्या भविष्याची
ज्ञानसूर्यासाठी माझ्या
गुरु होते क्रांतिसूर्य
विश्वरत्न भारताचा
शिष्य होते प्रज्ञासूर्य
वर्णावे कसे कळेना
त्या भीमरावांचे कार्य
व्यवस्थेवर प्रहार
अन क्रांतिकारी धैर्य
ठेऊनी जोतिरावांच्या
पावलावर पाऊल
मनी बाबासाहेबांच्या
असे क्रांतीची चाहूल
कायद्याने समतेच्या
सम केल्या धर्म, जाती
या भारतवासियांच्या
दिले संविधान हाती
सचिन टोंगळे. चिंचोली ( सोलापूर )
प्रज्ञा सूर्य भारताचा असे
स्पर्धेसाठी
नालंदाविश्व साहित्य समूह बहादरपुर जळगाव
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त काव्यलेखन स्पर्धा
दिनांक :- १४/०४/२०२४
विषय:- महामानवाची गौरव गाथा
काव्यप्रकार :- दशाक्षरी काव्य
शीर्षक :- मानवतेचे पुजारी
रचना :- स्वरचित
प्रज्ञा सूर्य भारताचा असे
आंबेडकरांना मानतात
समानता आणि बंधुभाव
स्वतंत्रता ते शिकवितात…….//१//
सारथी बहुजनांचे असे
कर्तृत्वाचा मान मिळवला
जातीभेद विसरुनी त्यांनी
सत्याचा हा मार्ग दाखवला……//२//
बॅरिस्टरचे घेई शिक्षण
लढे हाती घेऊनी लेखणी
साऱ्यांच्याच मनामनात
रुजवी समतेची पेरणी……..//३//
संघर्ष पाण्यासाठी केला
खुले केले तळे चवदार
अस्पृश्यता दूर करुनिया
दिन दुबळ्यांचा हा उध्दार…….//४//
राज्यघटनेचे शिल्पकार
अजरामर आज तळपला
एकत्रित करे समाजाला
मानवता धर्म शिकवला………//५//
असे मानवतेचे पुजारी
ज्ञान दिले आंबेडकरांनी
नमन या महामानवाला
झळके देश दिव्यतेजांनी……..//६//
किती वर्णावी जीवनाची या
महामानव गौरव गाथा
आज असुनी जयंती त्याची
वंदन करु टेकवू माथा….//७//
सौ.मेघा प्रज्योत शहा.
जिल्हा / शहर :-कोल्हापूर
बा भीमा
नालंदाविश्व साहित्य समूह पहा बहादपूर जळगाव
दिनांक 14/4/2024
विषय- महामानवाची गौरवगाथा
शीर्षक-बा भीमा ..
निळ आकाश ,निळा समुद्र,निळा रंग
आपली निशाणी आहे,
आकाशाहून उंच, समुद्राहून खोल
बा भीमा तुझी कहाणी आहे ।।धृ।।
बा भीमा जिंकलीत तुम्ही
लढाई जातीयतेची,
तोडलीत क्षितिजेही
सारी ज्ञानाची
आपुल्या ज्ञानापुढे गगनही ठेंगणे आहे
आकाशाहून उंच, समुद्राहून खोल
बा भीमा तुझी कहाणी आहे ।।धृ।।
कैक अंधरूढी ,अंधश्रद्धा गाडील्यास
बा भीमा तुम्हीच,
अन् मनूच्या मनुस्मृतीला जाळीलेही
बा भीमा तुम्हीच
बा भीमा तुमच्यामुळेच बुद्ध धम्माचे मंथन कळाले आहे,
आकाशाहून उंच, समुद्राहून खोल
बा भीमा तुझी कहाणी आहे ।। धृ ।।
बा भीमा तुमच्या सत्याग्रहाने महाडचे
चवदार तळेही थरारले,
विद्रोहाच्या उच्छवासाने
आभाळी गहिवरले
चवदार तळ्याचे पाणी पिऊन इतिहास घडला आहे,
आकाशाहून उंच, समुद्राहून खोल
बा भी तुझी कहाणी आहे ।।धृ ।।
वाकविलेत पोलादी गज तुम्ही
काळाराम मंदिराचे,
उघडून द्वार मंदिरांचे हक्क
दिलेत समानतेचे
बा भीमा तुम्हीच आमचा ईश्वर आहे
आकाशाहून उंच, समुद्राहून खोल
बा भीमा तुझी कहाणी आहे।।धृ।।
तुम्ही आलात अन् दिलेत आम्हा
स्वातंत्र्याचे मूल्यभान,
तुमच्या समर्थ लेखणीने घडविले
जनतांत्रिक संविधान
आज संविधान हाच खरा राष्ट्रीय ग्रंथ आहे,
आकाशाहून उंच, समुद्राहून खोल
बा भीमा तुझी कहाणी आहे।।धृ।।
।। जय भीम ।।
श्री अंकुश नथुराम जाधव, निवी रोहा
अत्त दीप भव
सर,
विशेषांकात कविता समाविष्ट करून उपकृत करावे
अत्त दीप भव
बाबासाहेब तुम्ही गेलात
घोटभर पाण्यासाठी पाणी पेटवून
मानवी हक्कांसाठी काळाराम लंघून
गोलमेज गाजवली वेशीबाहेर गाडलेल्यांना स्मरून
जाता जाता
आमच्या उर्वरित आयुष्यासाठी
संविधानात पेरलीत सूर्यफुले
शास्त्रोक्त सम्यक धम्म देऊनी उद्धारली कोटी कुळे
आम्ही –
साचेबंद उत्सव साजरे करतो
जयभीम नावाचा गगनभेदी उद्घोष करतो
सोयीनुसार धम्म अनुसरतो
22 प्रतिज्ञा वेळ पाहून बदलतो
विसरतो आम्ही
शिका, संघटीत व्हा —-चा नारा
मनुवाद्यांनी आमच्या पूर्वजांचा केलेला कोंडमारा
विसरतो आम्ही
दलितांच सांघिक कांड
आयाभगिनींची नग्न धिंड
धम्म छेदणारा श्रद्धेचा फसवा प्रवास!
हीच का तुम्ही सांगीतलेली अस्तित्व लढाई?
भीमसैनिकांनो,
बाबांचे स्मरण करतांना
माणसांनी माणसांशी कसं वागावं याच भान ठेवू या
सम्यक क्रांतीचक्र लक्ष लक्ष हातांनी फिरवू या
अन्याय,अत्याचारी, भ्रष्टाचारी अन् फितूर हात
कलम करू या
युगंधरास स्मरून,
आपणच आपले भाग्यविधाता होवू या
विद्रोही कवी, साहेबराव मोरे
चाळीसगाव, जळगाव
९४०४०४८६०१
भारताचे शिल्पकार
शीर्षक _भारताचे शिल्पकार
प्रकार _मुक्त छंद काव्य लेखन
दिनांक _१४/०४/२०२४
महामानवाची गौरव गाथा
होते थोर आदर्श, हुशार
जन्म झाला महू गावी
भारताचे शिल्पकार
संघर्षाने लढा सारे
शिका संघटित व्हारे
नका बोलू खोटे कधी
कास सत्याची धरारे
चौदा एप्रिल जयंती
माणुसकी शिकविली
वागा माणसा सारखे
लढा आंदोलने केली
महाडचा सत्याग्रह
मनुस्मृती दहनही
केले दलितांसोबत
इतिहास देतो ग्वाही
उच्च शिक्षण घेऊन परदेशी
घेती कायद्याचे सखोल ज्ञान
भिमरावांचे कार्य निस्वार्थी
म्हणती अज्ञानी करा सज्ञान
काळाराम मंदिर चवदार तळे
केले सर्वांसाठी कायमचे खुले
अमिषाला कोणत्याही
नाही कधीच भुलले
झाले लग्न रमाईशी
तिने त्यांना साथ दिली
केला सोन्याचा संसार
वेळ प्रसंगी दागिन्यांची विक्री केली
कवयित्री
सौ श्रध्दा सुहास शिंदगीकर
वारजे पुणे
संपर्क नंबर
७२७६०१३१३२

औक्षण करुया क्रांतिसूर्याचे
नालंदा विश्व साहित्य समूह बहादरपूर जळगाव आयोजित
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
काव्यलेखन स्पर्धा
दि. १४ एप्रिल २०२४ वारः- रविवार
विषयः- महामानवाची गौरव गाथा
औक्षण करुया क्रांतिसूर्याचे
सर्वश्रेष्ठ संविधानकर्ते क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर
अहर्निश परिश्रमून साकारले स्वप्न बहिष्कृतांचे धुरंधर
दलित अस्पृश्य जनकल्याणार्थ बाबांचा विचार आचार
कृतिशील सांगड जीवनात दिव्य तत्त्वज्ञानी हा अवतार
मोडून परंपरेची कवाडे अस्पृश्यांना दिला मंदिरी प्रवेश
शिक्षण हे वाघिणीचे दुध प्राशुनी निर्मिला क्रांतिआवेश
रंजल्या गांजल्यांच्या न्याय हक्क स्वातंत्र्याचे ते कैवारी
शिक्षण नोकरी भाकरी शिदोरी संविधान हे सर्वां तारी
घणघोर काळास झुंज देऊन उभारिला सत्याग्रही मेळ
पिढीजात बहिष्कृत शोषकांचा संपविला समूळ खेळ
अत्याचार हिंसा जुलूम जोखड गुलामी होती शिरावरी
जातिधर्म विषमतेच्या अनिष्ठप्रथा परंपरा गाढल्या दरी
कर्दनकाळ आंतरजातीय विवाह नि पाण्याचा विटाळ
घातक विचारांची करुनी होळी केले दुष्टाचार घायाळ
शिका संघटीत व्हा संघर्ष करा प्रजेस अर्पिला मूलमंत्र
अस्पृश्य भारताला सुसंस्कृत जगण्याचे दिले दिव्यतंत्र
कायदा आखिला बहुमोल ज्यावर चालतो राष्ट्रकारभार
असो सानथोर वा राजा रंक सर्वांनाच समान अधिकार
लंडनात मूर्ती साकारणा-या हेझल मॉर्गन तैलचित्रकार
विश्वनायका ह्या मरणोत्तर सर्वोत्तम अर्पिला पुरस्कार
धम्म स्वीकारक पुनरुत्थानक बहुआयामी हे स्तंभाधार
विश्वात गावोगाव पुतळे बाबांचे घेऊ आदर्श कार्य सार
झाले बहु होतील बहु परि या सम हा न दुजा अद्वितीय
औक्षण करुया क्रांतिसूर्याचे मनोभावे आपण भारतीय
पांडुरंग आडबलवाड
धर्माबाद.जि.नांदेड
मो. नं. 9158551975