निर्णय
निर्णय: मानवी जीवनातील अटळ गोष्ट
काही निर्णय आपल्या हाती कधीच नसतात. अशा बाबतीत दुर्दैवाने आपल्यासाठीचे निर्णय दुसराच कोणीतरी घेत असतो. आपल्यासाठी निर्णय घेणारा हा दुसरा कोणीतरी कधी कधी आपल्याला ज्ञात असतो, तर कधी कधी तो संपूर्ण अज्ञात असतो. असं असलं तरी “आम्ही कोणताच निर्णय घेत नाही.” असं कुणी म्हणत असेल तर ते चुकीचं बोलत आहेत असंच आपण म्हटलं पाहिजे. कारण आपण सर्वजण काही ना काही निर्णय घेतच असतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक माणसाला काही ना काही तरी निर्णय घ्यावाच लागतो. हे सत्य उलगडून दाखवणारा हा लेख वाचकांच्या निर्णयक्षमतेला बळ देणारा व त्यांच्या जाणीवा समृद्ध करणारा ठरेल.

आपला हक्क बजावताना, जबाबदारी पार पाडताना, आपल्या अधिकारांचा वापर करताना किंवा अगदी कर्तव्याचं पालन करताना प्रत्येक माणूस काही ना काही निर्णय घेत असतो. त्याचा हा निर्णय त्याच्या स्वतःबरोबरच इतरांच्या जगण्यावरही कमी-अधिक परिणाम करीत असतो. अनेकदा माणूस विचारपूर्वक निर्णय घेत असतो. क्वचित कधीतरी निर्णय घेताना तो कोणताच विचार करीत नाही असंही दिसून येतं. कधी कधी माणसं अगदी त्यांच्याही नकळत काही निर्णय घेतात. मानवी जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटना-प्रसंगाला माणसाने दिलेला प्रतिसाद किंवा त्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही त्याचा त्यावेळचा निर्णयच असतो.

आपले सर्व निर्णय योग्य ठरावेत म्हणजेच ते आपल्या फायद्याचे ठरावेत असं आपल्याला वाटत असतं. आपले ध्येय, उद्देश, हेतू, इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षांची पूर्तता करणारे निर्णय आपल्याला घ्यायचे असतात. कधी कधी आपण असा योग्य निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसतो. अशावेळीदेखील आपण कोणताही निर्णय न घेण्याचा निर्णय घेत असतो! खरंतर कोणताही निर्णय बरोबर किंवा चूकीचा असं निर्णय घेताना ठरवता येत नाही. एखादा निर्णय घेतल्यानंतर अनुभवास येणारे त्या निर्णयाचे परिणामच त्या निर्णयाची योग्यता किंवा अयोग्यता ठरवू शकतात. काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय त्याचे परिणाम मिळू शकत नाहीत. त्यामुळे निर्णय घेण्याचा धोका प्रत्येकाला पत्करावाच लागतो. तो कुणालाही चुकविता येत नाही. त्या अर्थाने निर्णय ही मानवी आयुष्यातली अतिशय महत्त्वाची व अटळ अशी बाब आहे. या पार्श्वभूमीवर आपणास योग्य व अचूक निर्णय घेता यायला हवा! असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे.

निर्णय घेणं ही एक कला आहे! असं काहीजण म्हणतात. त्याचवेळी निर्णय घेणं हे एक कौशल्य आहे! असं म्हणणाऱ्या लोकांची संख्याही भरपूर आहे. माझ्या मते, निर्णय घेणं हे कला की कौशल्य? या वादात पडण्याआधी आपण निर्णय घेणं म्हणजे नेमकं काय? हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आपल्याला योग्य निर्णय घेता यावेत यासाठी ते जास्त श्रेयस्कर ठरेल. माझ्या समजुतीनुसार, निर्णय ही नकाराची प्रक्रिया आहे! विशिष्ठ परिस्थितीत तुमच्यासमोर उपलब्ध असणाऱ्या अनेक पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून इतर सर्व पर्यायांना तुम्ही “नाही” म्हणण्याची ही प्रक्रिया आहे. इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कोणत्याही निर्णयात आपल्या निवडीच्या होकारापेक्षा आपल्या निवडीचा नकार हा अधिक मोठा असतो. आपल्या निवडीचा हा होकार आणि नकार जितका अचूक असेल तितका त्या निर्णयाचा अधिक फायदेशीर परिणाम आपल्या पदरात पडत असतो. या प्रकारचा आपला निर्णय अचूक समजला जातो. आपल्या निवडीच्या होकार-नकारात आपण अचूक ठरलो नाही तर मात्र आपला निर्णय नुकसानीचाच ठरतो आणि अशा निर्णयाला चुकीचा निर्णय असेच म्हटले जाते.

माणसं निर्णय घेताना वेगवेगळया प्रकारांचा उपयोग करताना दिसतात. जसं की, काही माणसं आपल्या तर्कबुद्धीचा वापर करून आपल्या निर्णयाचे काय आणि कोणते परिणाम येवू शकतील याचा पूर्वअंदाज घेऊन मग त्यानुसार निर्णय घेतात. काही माणसं आपल्या पूर्वानुभवाच्या आधाराने निर्णय घेतात. काही माणसं निर्णय घेण्यासाठी अनुभवी माणसांचा सल्ला व मार्गदर्शन मिळवतात. काही माणसं आधीच यशस्वी झालेल्या लोकांचं अनुकरण करीत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे निर्णय घेतात. काही माणसं चूका आणि शिका या पद्धतीनं आपला निर्णय बेधडकपणे घेऊन टाकतात. काही माणसं आपला आतला आवाज नीटपणे ऐकून त्यानुसारच आपला निर्णय घेतात. निर्णय घेण्याच्या या सर्व पद्धती प्रचलीत आणि सर्वमान्य आहेत. आपण सर्वजण आपले निर्णय घेताना या किंवा यातील काही पद्धतींचा वापर करीत असतो.
काहीवेळा काही निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज असते. वेळेआधी किंवा वेळेनंतर घेतलेले निर्णय चुकीचे ठरण्याची शक्यता असते. निर्णय घेण्यासाठीची ही नेमकी व योग्य वेळ साधता येणं ही एक कला आहे. अशी कला सर्वांना प्राप्त होत नसते. ज्यांना ही कला प्राप्त झाली आहे, त्यांचं निर्णय घेणं ही एक कला ठरत असते! काहीवेळा आपल्याला हवा असलेला निर्णय घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसते. परिस्थिती प्रतिकूल असताना घेतलेले निर्णय फसण्याची शक्यता असते. अशावेळी या प्रतिकूल परिस्थितीचे रुपांतर अनुकूल परिस्थितीत करून घेण्याचं कसब आपल्या अंगी असावं लागतं. असं अंगीकृत कसब वापरून निर्णय घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून मग निर्णय घेणाऱ्यांचं निर्णय घेणं हे एक कौशल्य ठरत असतं! अशा अर्थानं निर्णय घेणं ही कला तर आहेच; पण ते एक महत्त्वाचं कौशल्यदेखील आहे.
सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही त्याच्या जीवनात दर क्षणाला लहान-मोठे अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्याचे जीवन यशस्वी व्हावे, सुखी व्हावे, आनंदी व्हावे यासाठी त्याच्याकडून घेतले जाणारे सर्व निर्णय अचूक ठरायला हवेत. आम्हाला असे अचूक निर्णय घेता यावेत यासाठी आम्ही नेमकं काय करायला हवं? असा प्रश्न तुमच्या मनात अजुन पिंगा घालू लागला नसेल तर ते नवलच म्हणावं लागेल. तुम्हाला अचूक निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमचा अभ्यास आणि अनुभव परिपक्व असायला हवा. तुमच्या भोवतालची परिस्थिती आणि तिथं वावरणाऱ्या माणसांविषयीचं तुमचं आकलन निर्दोष असायला हवं. तुमच्या भवतालाचं तुम्ही केलेलं निरीक्षण अचूक असायला हवं. तुम्ही वस्तुनिष्ठ व साक्षेपी विचार करू शकत असाल आणि त्याचा पूर्वग्रहविरहीत दृष्टीने निःसंशय स्वीकार करू शकत असाल तर तुम्हाला अचूक निर्णय घेणं फ फारसं कठीण होणार नाही.
निर्णय घेताना अनेकदा आपण ताण-तणावाला सामोरे जात असतो. हे की ते? असं की तसं? हो की नाही? आता की नंतर? अशा टू बी ऑर नॉट टू बी टाईपच्या प्रश्नांच्या गुंत्यात आपण गुंतत जातो. प्रश्नांचा हा गुंता त्यांच्या उत्तरादाखल उपलब्ध होणाऱ्या पर्यायांमधल्या गुंत्यामूळे आणखी कठीण होत जातो. योग्य निर्णय घेता येत नाही अन् मग अशावेळी आपल्याकडून बहुधा चुकीचाच निर्णय घेतला जातो. निर्णय घेताना येणारा हा ताण सर्वसाधारणपणे कोणत्या संदर्भात असतो असा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की, निर्णयाचा परिणाम मानवी नात्यांवर होणार असेल तर असा निर्णय घेताना आपल्यावर ताण येतो. कुटूंबीय, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, सखे, सोबती, सहकारी, अनुयायी, मार्गदर्शक अशा नात्यांचा व नातेसंबंधांचा आपल्यावर सर्वाधिक ताण येतो. हा ताण आपल्याला पेलवता आला पाहिजे. तुमच्या भोवतालची परिस्थिती आणि तिथं वावरणाऱ्या तुमच्या माणसांविषयीचं तुमचं अचूक आकलन तुम्हाला तुमचा हा ताण पुरेसा हलका करण्यासाठी मदत करीत असतं. कधी कधी हा ताण आर्थिक नफा-तोट्याचाही असू शकतो. त्यातून बाहेर पडता यावं यासाठी तुम्ही नेहमी वस्तुनिष्ठ आणि पूर्वग्रहविरहीत असायला हवं. एखादा निर्णय घेताना त्यासाठी आवश्यक माहिती आपण मिळवतो. या माहितीचं विश्लेषण करताना या माहितीमध्ये बिटवीन द लाईन दडलेला अर्थही आपणास शोधता आला पाहिजे. वाजवी संशय मनात ठेऊन निर्णयासाठी पूर्वपिठीका तयार करण्यात काही वावगं नसलं तरी आपला संशय हा निःसंशयपणे वाजवीच असावा, अवाजवी नव्हे! योग्य निर्णयासाठी अशी काळजी घेतली जाणं खूप आवश्यक असतं.
निर्णय घ्यायच्या वेळी कोणताही निर्णय हा केवळ निर्णय असतो. तो बरोबर किंवा चूकीचा असत नाही. कारण निर्णय घेणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ही नेहमी त्या वेळच्या परिस्थितीला साजेसा असाच निर्णय घेत असते. घेतलेला निर्णय काटेकोरपणे अंमलात आणल्यावरच त्याचे परिणाम दिसू लागतात. या परिणामांवरून आपला निर्णय चुकला की बरोबर झाला याचं प्रत्यंतर येतं. आपला निर्णय चुकला असल्यास आपण तो दुरुस्त करण्याचा नवा निर्णय नक्कीच घेऊ शकतो. अर्थात काही वेळा नवा निर्णय घेण्याची संधी उपलब्ध नसते. अशावेळी नुकसान स्वीकारण्याचा निर्णय घेऊनच पुढं जावं लागतं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते हेच म्हणता येईल की निर्णय ही मानवी जीवनातली अत्यंत अटळ गोष्ट आहे.
लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर,