एकट्यास ना जगता येते
नाशिकहून प्रकाशित होणाऱ्या दै. गावकरीच्या आजच्या रविवारच्या अंकातील आस्वाद पुरवणीमधील समाजभान या सदरात प्रसिद्ध झालेला माझा लेख…
(दै. गावकरीचे मा. संपादक व त्यांच्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार.)
एकट्यास ना जगता येते!
परवा एका ठिकाणी मी वाचलं होतं की, “परिस्थिती तुमचं भविष्य घडवीत नाही, तर तुम्ही स्वतःच तुमचं भविष्य घडवीत असता!” हे वाचल्याबरोबर “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!” हा विचार माझ्या मनात चमकून गेला. भारतीय तत्त्वज्ञानातील अधिकांश दर्शनशास्त्रांनी स्वीकारलेला कर्माचा सिद्धांतदेखील आपल्याला हेच सांगतो. “माणूस आपल्या कर्माने आपलं भविष्य स्वतःच लिहीत असतो.” असा जो अर्थ यातून विदीत होतो तो कितपत खरा आहे? हे आपण तपासून पहायला हवंय की नकोय? असा प्रश्न मला नेहमीच पडत असतो.
खरंच, आपल्यापैकी कितीजणांनी हे तपासून पाहिलंय? किमान तसा प्रयत्न तरी तुम्ही कुणी केलाय का? कुणी तसा प्रयत्न केला असेल तर त्या प्रयत्नातून तुमच्या नेमकं काय लक्षात आलंय? की तुम्ही असा प्रयत्न केलाच नाहीय? मला ठाऊक आहे की असा प्रयत्न करणं हे आपलं काम नाही असं समजून आपल्यापैकी बरेचजण त्या फंदात कधीच पडत नाहीत.
आपल्या आयुष्यातले अनेक बारकावे तपासून, विविध घटना-प्रसंगांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण केल्यावर एखादा माणूस केवळ त्याच्या स्वतःच्या कर्माने त्याचं भविष्य स्वतः लिहू शकतो. या विधानावर संपूर्ण विश्वास ठेवता येत नाही. असा विश्वास ठेवता येणं खरंच खूप कठीण आहे. असं असुनही आपण सगळेच “एकटा जीव सदाशिव!” असं नेहमी म्हणत असतो. या पार्श्वभूमीवर आपल्या अवती-भवती अनेक माणसं एकटं राहत असलेली दिसतात. त्यांचं एकूण जीवन सर्वसामान्य परिस्थितीत चांगलं चाललं आहे असं जे आपणास दिसत असतं; पण ते खरं असतं का? काही माणसं अपघाताने एकटी राहिलेली असतात. काही माणसं परिस्थितीची गरज म्हणून केवळ नाईलाजानं एकटी रहात असतात.
तर काही माणसांना एकटंच राहायला आवडतं. ते आपली आवड म्हणून एकटं राहात असतात. एकटं राहाणारी ही सर्व माणसं खरंच एकटी राहात असतात का? तशी ती राहू शकतात का? यासारखे काही प्रश्न आपल्याला विचार करायला लावतात. या संदर्भात थोडं जागरुकपणे विचार केला असता असं लक्षात येतं की, जगाच्या पाठीवरती आपण कुणीही एकटं राहून जगू शकत नाही! आपल्यापैकी अनेकांना माझं हे विधान हास्यास्पद किंवा निरर्थकही वाटू शकेल; मात्र माझं हे विधान हास्यास्पद वा निरर्थक मुळीच नाही हे आपणास ते नीट समजून घ्यावं लागेल.
एकटं राहणारी माणसं खरंच एकट्यानं आयुष्य जगत असतात असं आपलं म्हणणं असेल तर ते केवळ भाबडेपणाचं आणि खुळेपणाचंही आहे असंच म्हणावं लागेल. भलेही एखादी व्यक्ती एकटी राहात असेल, तिच्यासोबत कुणी मित्र, मैत्रीण, कुटूंबिय, नातेवाईक, सहकारी, पार्टनर यासारखा जोडीदार किंवा कम्पॅनियन राहात नसेल; पण म्हणून ती व्यक्ती एकट्यानं आयुष्य जगतेय असं कसं म्हणता येईल? अशी एकट्यानं राहणारी माणसं त्यांच्या घरात किंवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी एकटी राहात असली तरी ती त्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी बाजारात, दुकानांत, मॉलमध्ये जात असतात.
त्यांना प्रवास करायचा असतो तेव्हा ते बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन किंवा अगदी विमानतळांवरही जातात. आपल्या मनोरंजनासाठी ही माणसं थिएटर, नाटयमंदीर, रंगभवन, सभागृह यासारख्या ठिकाणीही जातात. आपलं शिक्षण-प्रशिक्षण करण्यासाठी ही माणसं शाळा, महाविद्यालय किंवा प्रशिक्षण संस्थांमध्ये जातात. क्वचित आजारी पडल्यावर लवकर बरं वाटावं म्हणून ही माणसं दवाखान्यात जातात.
आपल्या गरजा भागविण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी म्हणजे अर्थाजनासाठी ही माणसं आपल्या कामाच्या ठिकाणी म्हणजे कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जातात. इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी ही माणसं इतक्या वेळा जात असतील तर ही सर्व माणसं एकट्यानंच जगतात असं आपण म्हणू शकतो का?
समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र आणि समाजकार्य या विषयांचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की, मानवी जीवनात सामाजिकीकरणाची प्रक्रिया फार महत्त्वाची असते. मूल जन्माला आल्यानंतर त्याला आई, वडील, कुटूंबिय, मित्र, शाळा, नातेवाईक आणि समाज यांचा सहवास क्रमाक्रमाने मिळत असतो. या सहवासाने त्या मुलाची एक व्यक्ती म्हणून जडणघडण होत असते. त्या व्यक्तीची ही जडणघडण म्हणजे केवळ शारीरीक वाढ व विकास असत नाही. तर त्या व्यक्तीच्या या जडणघडणीत त्याची इच्छा, आकांक्षा, वृत्ती, प्रवृत्ती, विचार, मतं, आणि त्याचा एकूण स्वभाव तयार होत असतो.
त्याआधारे त्याच्या भावनांचा परिपोष होत असतो. एक प्रकारे त्याच्या भावनिक बुद्धीचा विकास होत असतो. एखाद्या व्यक्तीच्या या जडणघडीच्या काळात त्याच्या कुटूंबाची व समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि राजकीय परिस्थिती कशी आहे? हे खूप महत्त्वाचे असते. कारण या परिस्थितीनुसारच त्याला विकासाच्या विविध संधी मिळणार की नाही हे ठरत असते. आपल्या वाट्याला येणारी ही परिस्थिती आपले व्यक्तीमत्व घडवीत असते.
त्यानुसारच आपल्या प्रयत्नांची दिशा आणि स्वरूपही निश्चित होत असतं. याचा सरळ अर्थ असा होतो की, भविष्यातली आपली कर्म कशी असतील? हे ठरविण्यात या परिस्थितीचा सिंहाचा वाटा असतो. असं असेल तर, “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!” असं म्हणणं म्हणजे त्या व्यक्तीलाच संपूर्ण दोष देऊन त्याच्यावरचा दबाव वाढवणं नव्हे काय?
एखाद्या माणसाच्या वाट्याला येणाऱ्या परिस्थितीला त्याचे कुटूंब, शाळा, ‘ त्या-त्यावेळचा समाज आणि सत्ताधारी शासन हे मुख्य घटक जबाबदार असतात. आपली ही जबाबदारी झटकून टाकणे सुलभ व्हावे म्हणून याच घटकांकडून “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!” किंवा “एकटा जीव सदाशिव!” अशा अर्धसत्य सांगणाऱ्या स्लोगन प्रसारीत केल्या जात असाव्यात असं मानायला पुष्कळ वाव आहे.
गेल्या काही दशकांमध्ये भौतिक सुखाच्या शोधात प्रचंड धावपळीचे आयुष्य जगणाऱ्या माणसाने विज्ञान व तंत्रज्ञानाचा पर्याप्त वापर करून आपला वेळ व श्रम वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या प्रयत्नाने तो आणखी एकलकोंडा होत गेला आहे. सारे जग आपल्या मुठीत आले आहे असं म्हणत असतानाच हा माणूस एकटेपणाच्या दुःखानं कण्हत आहे! आनंद, दुःख वा प्रेम यासारखी भावना मोकळेपणाने व्यक्त करता येईल इतकीही माणसं त्याच्या मुठीत सापडत नाहीत. सारे ताण आणि तणाव त्याला एकट्यालाच झेलावे लागत आहेत. अशावेळी माणसाची मनःशांती हरवून जाते.
जगणं अगदीच असह्य होऊन जातं. आपलं असह्य झालेलं जगणं सुसह्य व्हावं यासाठी माणूस आधार शोधू लागतो. माणसांच्या गर्दीत हा आधार शोधणारा माणूस आतुन पूर्ण एकाकी झालेला असतो. सांप्रतकाळी मंदीर आणि प्रार्थनास्थळांची वाढत असलेली संख्या, त्याच प्रमाणात तिथं होणारी माणसांची गर्दी, आणि फेसबुक, व्हाटसॅप, ट्वीटर, इन्स्टाग्राम, युट्यूब-रील्स येथे होणारी गर्दी हे सारं पहिलं की माणसाचं एकाकीपण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे लक्षात येतं. दुर्दैवानं येथील प्रत्येकजण एकाकी झाला आहे, तरीही त्याला दुसऱ्या तशाच माणसाबद्दल जराही जवळीक वाटत नाही.
अशाने माणसाचं दुःख कमी तरी कसं होणार? हा खरा विचार करण्याचा मुद्दा आहे. एकाकीपणा हा मानवासाठी एक प्रकारची सजाच असते. म्हणूनच गुन्हेगारांना त्यांच्या गुन्हयाची शिक्षा म्हणून तुरुंगातल्या एकांतवासात ठेवलं जातं. शेवटी इतकंच म्हणावं लागतंय- “कुणी कितीही संपन्न असला तरी माणूस एकट्यानं चांगलं जगू शकत नाही हेच खरं आहे!”
लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहिल्यानगर, संपर्क: ९७६६६६८२९५