भारुड (Bharud) वेडी म्हणतात मला वेडी म्हणतात

भारुड (Bharud) वेडी म्हणतात मला वेडी म्हणतात
भारुड (Bharud) वेडी म्हणतात मला वेडी म्हणतात

भारुड


भजनी मंडळातील बरेच लोकांना गांजा ओढण्याची सवय होती.. ते चिलमीत गांजा भरून ओढत असत..

“गांजा है तो, भजन है..”
“गांजा खतम..भजन खतम.”

हे काहींचे ब्रीद वाक्य असायचे..

चिलम
चिलम



गांजा पिणाऱ्यांना साहित्याची जमवा जमव करावी लागत असते.. सगळ्याच लोकांना  गांजा लागत नसे.. ते फक्त भजने ऐकण्यासाठी किंवा म्हणण्यासाठी येत असत.. गांजा ओढणाऱ्या लोकांच्या एक अलिखित नियम होता. ज्याला गांजा ओढायचा आहे, त्याने येताना स्वतः एक गांजाची पुडी विकत आणावी, तरच त्याला गांजा ओढण्यासाठी बसू दिले जात असे.

अगोदर चिलम फडक्याने स्वच्छ साफ केली जायची.. चिलमीच्या निमुळत्या टोकाकडे फिट बसेल असा एक  खडा चिलमीच्या आत टाकला जायचा.. उद्देश हा की आतील गांजा तोंडात येऊ नये.. नंतर हातावर थोडा गांजा घेऊन त्यावर पाण्याचे दोन तीन थेंब टाकले जायचे.

तंबाखू प्रमाणे तळ हातावर  बराच वेळ मळलेला गांजा चिलमित भरला जायचा.. चिलम गांजा ने फुल भरल्यावर त्याच्या तोंडाशी नारळाच्या दोरीने भली मोठी गाठ मारून  बनवलेली गुंडी.. हो तिला “गुंडी” म्हणायचे.. ठेवली जायची.. गांजा ज्या बाजूने ओढला द्यायचा तिथे फिल्टर म्हणून एक लहानसा कापडाचा तुकडा ओला करून ठेवला जायचा..

या कापडाच्या तुकड्याला किंवा फडक्याला “शापी”  म्हणत असत..हा कापडाचा तुकडा ओला असल्यामुळे चिलम गरम झाली तरी हाताला चटका  लागत नसे..  अशी पूर्ण तयारी झाल्यावर  जो सीनियर भजनी असायचा, त्याला चीलमेच्या पहिला मान दिला जायचा.. तो एका हाताने चिलम तोंडाशी धरून ठेवायचा.. आणि जूनियर माणूस त्याच्या   चिलमेच्या गुंडीला काडी लावायचा..

गुंडी पेटली की लगेच तोंडाचा मोठा आत मध्ये चंबू करून  “कश” मारला जायचा.. त्यामुळे गुंडी अधिक प्रज्वलित होऊन धुराचा मोठा लोळ तोंडाद्वारे फुफ्फुसात भरला जायचा.. त्यानंतर चिलम पुढच्या  सदस्याकडे  बाजूला सरकवली जायची, पुढील इसम  चिलम ओढण्यापूर्वी मंत्र म्हणावा त्या पद्धतीने काहीतरी वाक्य बोलायचा.. उदाहरणार्थ,

“कैलास के राजा,.. “
“दम लगाने आजा..”


किंवा

गजानन… कर दे आनंद..

त्याने “कश “मारल्यानंतर तो ती चिलम पुढच्या सदस्याकडे सरकवायचा..

भजनी मंडळात दोन चिलमी तयार असत.. एक चिलम मंडळात फिरत असे, आणि एक जण दुसऱ्या एका चिलमित  गांजा भरून पुढील  राऊंड ची तयारी करत असे..
चिलम ओढताना भलीमोठी आगीची ज्योत चिलमीच्या तोंडावर तयार होत असे.. अशी ज्योत तयार करणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हते..

त्यांच्या नाकातून सोडण्यात येणाऱ्या गांजाच्या धुरामुळे मला आपोआप नशा येत असे.. मी लहान असल्यामुळे मला चिलम दिली जात नसे.. मात्र मला हलकी सलकी काम सांगितली जात असत.. नारळाची दोरी शोधणे हे त्यातले मोठे काम होते.. उकिरड्यांवर, किंवा गल्ली बोळात फिरून मी नारळाच्या दोऱ्या त्यांना आणून देत असे.. आणि जर कुठेच दोरी भेटली नाही.. तर गनिमी पद्धतीने एखाद्याच्या खाटेची दोरी गुपचूप कापून आणत असे..

दुसरे काम म्हणजे “शापी” ओली करून आणणे..
कधी कधी 
गुपचूप पणे गांजा ज्या ठिकाणी  विकला  जात असे, तिथून गांजाची पुडी विकत आणणे..

ओळखीच्या इसमाशिवाय अशी गांजाची पुडी कुणालाही विकत मिळत नसे.. मला गांजा विकणारे चांगल्या पद्धतीने ओळखायचे.. त्यामुळे मला ती अडचण नव्हती.. मी हे काम आनंदाने पार पाडत असे कारण मला सायकल फिरवायला मिळत असे..
मला त्या काळात जर कोणी सायकल फिरवायला दिली, तर मी कोणतेही दिव्य पार पाडायला नेहमी सज्ज असे..

मला संत कबीरांची, संत ब्रह्मानंदांची भजने खूपच आवडत असत. त्याकाळात मला सुमारे दोनशेच्यावर भजने अगदी तोंडपाठ होती. साधारणपणे ही भजने  निर्गुण, निराकार ,हद बेहद, अद्वैत वादावर  आधारलेली असायची. गावात संध्याकाळच्या सुमारास कोणी मेलं, तर मयताच्या घरी रात्र जागवण्यासाठी भजनी मंडळाला बोलवलं जायचं, मग आम्ही त्या ठिकाणी रात्रभर भजन  म्हणायचो.

रात्रीतून दोन वेळा मिळणारा काळपट चहा व तंबाखूच्या पुड्या हीच काय ती रात्रभराची कमाई असायची. घरात पडलेलं प्रेत, दारात डुलक्या घेणारी प्रेताची अर्धांगिनी, काही अतिशय जवळची नातेवाईक मंडळी उगीच भजने ऐकत असल्याच्या अभिनय करत कशीबशी रात्रभर जागायची.

बऱ्याचदा टाईमपास म्हणून बाजूला पत्ते खेळणारी माणसे त्या ठिकाणी  रात्रभर  पत्ते खेळत बसायची. कोणत्याही मयताच्या ठिकाणी तीच ती मंडळी पत्ते खेळताना दिसायची. ज्या घरी मयत झाली असायची त्यांना त्या लोकांचे कौतुक वाटत असे. त्यांना वाटे की कोणतेही नाते नसताना ही मंडळी आपल्या दुःखात सामील झालीत, पण खरं कारण वेगळेच होते.

पोलिसांच्या धाकाने ज्यांना सार्वजनिक ठिकाणी पत्ते खेळण्यावर बंधने असायची अशी काही जुगारी माणसे संध्याकाळी गावात फिरून कुणी कुठे मेले आहे काय ?याची  रेकी करायची .जर त्यांना कुठेतरी कोणी मेल्याचा सुगावा लागला तर ती माणसे तेथील लोकांना “भजनी मंडळाला बोलावून घ्या त्याशिवाय रात्र काढता येणार नाही” असा अनाहूतपणे सल्लाही देत असत.

इतकेच नाही तर हीच मंडळी “अमुक अमुक ठिकाणी अमका तमका व्यक्ती मेला आहे आपण भजने म्हणायला चला” असं सांगून आम्हाला सुपारी देत असत. 11 रुपये व एक नारळ एवढ्या तुटपुंज्या कमाईवर आम्ही रात्रभर भजने म्हणत असू. भजनाच्या सारांश,  शरीर किती नश्वर आहे ,आत्मा अमर आहे, हे जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा, आपण मायामोहात न गुंतता जगलं पाहिजे वगैरे वगैरे… असायचा.

आमच्या भजनातील गुढ अध्यात्मिक मतितार्थाला त्यांच्या दृष्टीने कोणताही अर्थ नसायचा.आमच्या भजनांमध्ये फार काय कोणाला फारसे सोयर-सुतक नसायचं .

काहीवेळा  आनंदाच्या प्रसंगी  देखील भजनी मंडळाला  पाचारण केले जात असे . अशावेळी  ज्या घरी  भजनाचा कार्यक्रम असायचा  तेथे  भेट देणाऱ्या  लोकांचे मनोरंजन व्हावं म्हणून  आम्ही  अगदी शेवटी शेवटी  काही गवळणी  व एक दोन भारुडे अहिराणी गाणी  सादर करायचो. ही भारूडे व गाणी साभिनय असायची व त्यात नाट्य असल्यामुळे लोकांना हळूहळू आवडू लागली.  या  भारूडांसाठी  ही मंडळी  उशिरापर्यंत  जागे  असायची.  पुढे पुढे  फक्त  पाच भजने म्हणावी लागतील आणि  लगेच भारूडाला व गाण्यांना सुरुवात करावी लागेल ,आम्ही अकरा ऐवजी एकवीस रुपये देऊ  असा आग्रह होऊ लागला.

भजनांचा प्रतिसाद हळूहळू कमी कमी होऊ लागला कारण आमची भजने त्यांना बोअर करीत असत. त्यांच्या डोक्यावरून जात असत. या भजनासाठी तेवढा  प्रेक्षक व रसिक वर्ग (सॉरी भाविक श्रोते) मिळत नसत.

मग मंडळानेही बदलण्याचा निर्णय घेतला .सुरुवातीला पाच भजने म्हणून नंतर भारुड हवे असल्यास एक्कावन्न रुपये मोजावे लागतील असा आम्ही  आमचा दर वाढवला. आम्ही सुद्धा व्यावसायिक उद्देश ठेवायला सुरुवात केली.
आमच्या भारुडाला मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागल्यामुळे आम्ही एका रात्रीचे ‘एकशे एक’ रुपये घेऊ लागलो तसेच आम्हाला भारुड सादर करताना प्रेक्षकांमधून मोठ्या प्रमाणावर ओवाळणी ची रक्कम मिळत असे..

सुरुवातीलाच ..

या आंधळ्याला एक पैसा..
दे रे विठोबा, दे दाता..।


असं एक आंधळ्या-पांगळ्या चे सोंग घेतलेल्या दोन कलाकारांना  पाठवले जाई. त्यांच्या हातात भीक मागायचे कटोरे असायचे. लोकांना पैश्यांसाठी भावनिक साद घातली जायची. या गाण्यातील आंधळ्याचे सोंग घेणाऱ्या कलाकाराचा अभिनय वाखाणण्याजोगा असायचा. लोक त्या कटोऱ्यात पाच दहा पैसे चार-आठ आणे दान म्हणून टाकत असत. मंडळाला बक्कळ पैसा मिळत असे.

एखाद्या माणसाला खूप दिवसांनी पुत्ररत्न प्राप्त झाले तर तो खूप मोठ्या प्रमाणावर बाळाच्या पाचवीचा कार्यक्रम करत असे. त्याचे नातेवाईक व त्यावर प्रेम करणारे मित्रमंडळी हे आवर्जून त्याच्याकडे त्या दिवशी भेट द्यायला येत असत.

आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत हे सिद्ध करण्यासाठी हौशी मंडळी आमचे भारुड सुरू असताना मंडळातील सदस्यांना बोलावून त्यांचे जवळ एक रुपया किंवा दोन रुपये कधीकधी पाच रुपये देऊन अमुक अमुक यांचेकडून या भारुडाला एक रुपया देण्यात येत आहे असे जाहीर करावयास सांगत असे. मग आम्हीही  मोठ्या हौसेने मध्येच भारुड थांबून त्याच्या नावाचा उद्द्घोष करत असू.

त्यामुळे ज्यांच्याकडे कार्यक्रम असायचा, त्यांना कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित आहेत व कोणी कोणी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली याची माहिती मिळत असे .तसेच पैसे सार्वजनिकरित्या जाहीरपणे देणाऱ्याचा चारचौघांत  लौकिक, मान व प्रतिष्ठा वाढत असे. अशाप्रकारे कार्यक्रमाचा यजमान व हजेरी लावणारे पाहुणेमंडळी दोन्हीही गालातल्या गालात हसून खुश होत असत…

लोकांचा हा उत्साह पाहून व गरज पाहून माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली.

गोंधळी समाजाचे लोक किंवा नंदीवाले तिरमल लोक गावागावात फिरून लोकांकडून पैसे घेऊन त्याबदल्यात दान करणाऱ्या  व्यक्तीचे नाव एक जण खुणेने दुसऱ्याला सांगतो व लांबवर उभा केलेला त्याचा साथीदार त्यांनी केलेल्या खाणाखुणांवरून साथीदाराने सांगितलेले नाव अचूक ओळखतो .

हे मी बघत आलेलो होतो,अशा पद्धतीने गोंधळी लोकांची सांकेतिक भाषा आपल्यालाही तयार करता येईल असा विश्वास वाटल्याने मंडळातील माझा चुलत भाऊ लोटन महाजन व मी एक सांकेतिक बाराखडी अर्ध्या तासात तयार केली..
त्याची तासन्तास रिहर्सल केली, प्रथम साधे सोपे शब्द घेऊन प्रॅक्टिस केली नंतर जोडाक्षरे युक्त शब्द घेऊन भरपूर प्रॅक्टिस केली. खुणांवरून नावे ओळखणे यात आम्ही पारंगत झालो.मग या गोष्टीला भारुडात कसं बनवता येईल याचा विचार सुरू केला आणि त्यासाठी…

” आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी”

गोंधळी लोकांचा ड्रेस  तयार करण्यासाठी सप्तशृंगी देवीच्या गडावरून कवड्या विकत आणल्या आणि कवड्यांच्या माळा कवड्यांची टोपी आमच्या मंडळातील सदस्य वसंत चौधरी टेलर यांनी हुबेहूब शिवून दिली.
ह्या भारुडाच्या पार्श्वभूमीवर लोकांची नावे जिंकायला सुरुवात केली. कार्यक्रमाला वाढलेली गर्दी पाहून हे गोंधळीचे भारुड आम्ही अचानक सादर करायचो. कारण गर्दी ओसरल्यानंतर आमचा धंदा पाहिजे तेवढा होत नसायचा.

भारुड
भारुड

मी प्रेक्षकांमध्ये शिरून लोकांकडून एक नाव जिंकण्यासाठी एक रुपया घेऊन सदर व्यक्तीचे नाव खाणाखुणा करून सांकेतिक भाषेत लोटन भाऊला सांगायचो व तो मंडळाच्या रिंगणात मधोमध उभा राहून ते नाव अचूकपणे ओळखायचा व मंडळातील साथीदार ढोलकीच्या तालावर

अमुक अमुक ने एक रूपया दान दिला जी.

असे त्याच्या नावाच्या उद्धार करून म्हणत असत. हा कार्यक्रम सर्वांची उत्कंठा वाढवणारा असा एकमेव कार्यक्रम होता. या कल्पनेतून मंडळाला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ लागला.

आमच्या भजनी भारुड मंडळातील माझे नाव लौकिक व माझा दबदबा चांगलाच वाढला
मंडळाने सर्व सदस्यांची तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली मंडळासाठी बरेचसे साहित्य खरेदी करण्यात आले सर्व सदस्यांना नेहरू शर्ट पायजमा टोपी मंडळातर्फे भेट म्हणून देण्यात आली. मला शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदतही केली. हे मी या ठिकाणी नम्रपणे कबूल करतो.

त्यामुळे त्या काळात संपूर्ण अमळनेर शहर व तालुक्यात आमचे भारुड मंडळ खूपच प्रसिद्ध झाले. व नावारूपाला आले. लोक आमची इज्जत करू लागले. आम्हाला अनपेक्षित मानसन्मान  मिळू लागला त्याकाळी कुणाकडे सत्यनारायणाची पूजा अथवा बाळ जन्माची पाचवी ,बारसे असले की मनोरंजनासाठी भारुडा शिवाय दुसरा पर्याय नव्हता. तसं पाहिलं तर तमाशा हा देखील एक पर्याय होता. परंतु तमाशाच्या आयोजनाला  खर्च जास्त यायचा आणि तमाशाला  स्त्रीवर्ग साधारणपणे जाण्यास दहशत नसत.

आमच्या  मंडळाला भरपूर सुपाऱ्या मिळू लागल्या त्यावेळेस मी शिक्षणशास्त्र पदविका (डी एड)  अभ्यासक्रमासाठी जळगावला रेल्वेने दररोज (विदाऊट तिकीट) अप डाउन करायचो.  रात्री भुसावळ सुरत पॅसेंजर अमळनेरला धडकली की मला बऱ्याचदा रेल्वे स्टेशनवरच मंडळाचे काही सदस्य सायकलवरून नेण्यासाठी हजर असायचे. मग जेवण वगैरे ज्या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम असेल तिथेच करावे लागायचे. सदर भारुडाचा कार्यक्रम पहाटे तीन-चार वाजेपर्यंत सुरू असायचा. रात्रभर जागरण करून सकाळी पुन्हा पॅसेंजरने जळगाव गाठावे लागे. त्यामुळे मी वर्गात नेहमी झोपायचो, म्हणून खूप मार खाल्ला आहे असो..

मी भारुड सादर करताना नेहमी पुरूषपात्र सादर करायचो, देवाने माझ्या चेहऱ्यावर कोणतीही ‘नाजूक कलाकुसर’ केलेली नसल्यामुळे असेल कदाचित, पण मला स्त्री पात्र देण्याचे धाडस कुणी करेना,  तेव्हा आमच्या मंडळातील स्त्रीपात्र करणाऱ्या  सदस्यांचा नेहमी माझ्यावर रोष असायचा, कि नेहमी आम्हीच साड्या नेसायच्यात का? त्यांची तक्रार रास्त होती पण माझा नाईलाज होता.

पण मला एकदा तांबेपुरातल्या पाचवीच्या कार्यक्रमात साडी नेसावीच लागली, मी एवढा राजबिंडा(? ) , त्यात माझे मोठे काका वारल्यामुळे माझ्या डोक्याची पुर्ण हजामत झाल्याने शेंडी सोडली तर डोक्या वर केसांचा पत्ताच नव्हता.
(मी माझ्या हजामती चे समर्थन करताना म्हणालो होतो की,” हा माझा नवरा मला माझे केस धरून मारतो, झोडतो म्हणून मी  हजामत करून केस काढून टाकले आहेत..” यावर सर्व प्रेक्षक वर्ग खदाखदा हसल्याचे मला आजही आठवते)

ते संत एकनाथांचे सुप्रसिद्ध भारूड होते,

“मला दादला नको गं बाई. मला नवरा नको गं बाई….”

भारूडात एक चरण झाल्यावर नवरा बायकोचे संवाद, भांडाभांडी असायची. .  हे संवाद अलिखित, वेळेवर सूचतील तसे असायचे, कलाकाराला संवादाची संपूर्ण मुभा असायची. . 

मी असा काही तोंडाचा पट्टा सुरू केला, कि विचारता सोय नाही , माझ्या पुरूष सहकाऱ्या ला ( सॉरी नव-याला ) काहीच बोलणे उमजेना, माझ्या झंझावाती बोलण्यापुढे तो निष्प्रभ ठरत होता, प्रेक्षक माझ्या बोलण्यावर जोरजोरात हसू लागले व टाळ्या वाजवू लागले, विशेषत: महिला जाम खुश झाल्या. .  त्यामुळे तो “नवरा” पूर्णतः खजील झाला.

भारूड संपल्यावर त्याने ड्रेसिंगरूम मध्ये ( खरं म्हणजे, मातीच्या धाब्याच्या अंधाऱ्या  घरात) संतापून अंगावरचे कपडे, डोक्यातील टोपी भिरकावून “यापुढे मी कधीच या सुदाम्याचा नवरा  बनणार नाही,” अशी त्याने भिष्मप्रतिज्ञाच केली.. तेव्हापासून मंडळात भारूड सादर करताना माझे साडी नेसणे आपोआप बंद झाले..

तरीपण मंडळातील बऱ्याच सदस्यांचा मी साडी नेसावी म्हणून अट्टाहास होताच. त्यांना वाटायचं,की मी एखादी तरी स्त्री भुमिका करावी. मी साडी नेसून बाई माणूस बनावं.

ती संधी त्यांना लवकरच मिळाली मी , मला देवाने दिलेल्या अभिजात सौंदर्याचा(?) उपयोग करून

वेडी म्हणतात मला,वेडी म्हणतात…”
म्हणून बाई मला वेडी म्हणतात..”


हे एकपात्री भारूड सादर करायला सुरूवात केली नि काय आश्चर्य?  ह्या भारूडाची वारंवार मागणी होऊ लागली, कारण मी या भारूडा दरम्यान वेड्या स्त्रीचा जिवंत अभिनय करायचो, (असे लोक मला समक्ष भेटून सांगत असत.)
माझ्या एका हातात केरसुणी असायची. मी कपाळावर भलं मोठं कुंकू लावायचो, चेहऱ्याला  काजळाने काळे फासायचो ,केस अस्ताव्यस्त असायचे, ओबडधोबड लुगडं कसंतरी अंगाला गुंडाळून खोचलेलं असायचं.

मधूनच दात विचकणे, पातेल्यात खिचडी घेऊन त्यातच लाळ गाळून पुन्हा ती खिचडी खाणे, मध्येच जोरजोरात रडणे, पडणे, पळणे, घराला लावलेल्या शिडीच्या पायऱ्यांवर चढून बसणे, कुणाचाही अंगावर उगीचच धावून जाणे, हातातील केरसुणीने मंडळातील  सदस्यांच्या व इतरांच्या पाठीचा चांगलाच समाचार घेणे. .  इत्यादी .

ह्या माझ्या सोंगामुळे लहान मुले खुप घाबरायची,  ओरडायची, रडायची, (आजारी देखील पडायची  असं मला नंतर समजायचं), या भारूडाला सगळ्यात जास्त पैशांची ओवाळणी पडायची.
ते सर्व पैसे मंडळात प्रामाणिकपणे जमा करावे लागत,
या भारूडातून मिळणाऱ्या पैशामुळे मंडळाची कमाई वाढली , म्हणून मंडळ खुश!

याला अखेर साडी  नेसवली कि नाही , म्हणून मंडळातील सहकारी खुश! !


आणि कुणालाही केरसुणीने मनसोक्त झोडता येतं, कुणाचीही बायको बनावी लागत नव्हती, म्हणून मीही खुश! ! !

त्या काळात मी अमळनेरच्या कोणत्याही गल्लीतून जाताना मला मुले,  विशेषत: मुली “तो पहा, ‘येडी म्हन्ता चालना” असं म्हणायचे.

पुढे माझा डी एड चा अभ्यासक्रम पूर्ण झाला. माझे लग्न गल्लीतल्या गल्लीत जमल्यामुळे माझ्या होणाऱ्या बायकोला देखील मुली “वेडी म्हणता ची बायको” असे चिडवू लागल्या. मला त्या भारूडाची लाज वाटू लागली तसेच मी शिक्षक म्हणून बाहेरगावी नोकरीला लागल्यामुळे माझे भारुड सुटले .. ते कायमचेच..

आज सुद्धा  ते  मंतरलेले दिवस  आठवले की  मी माझ्या  त्या भूतकाळात  रममाण होतो. आता आयुष्याचे भारुड व रडगाणे सुरू आहे . जीवनात अनेक पात्र व अनेक भूमिका वठवाव्या लागत आहेत. त्या काळी  माझ्यातील अभिनय गुणांना व हजरजबाबीपणाला भारुडामुळे वाव मिळाला . माझी गरिबी मला भारुडामुळे सुसह्य झाली. माझे शिक्षण त्या भारूडामुळेच पूर्ण झाले.भारूडातील अनुभव, अभिनय गुणांचा मला आज लोकांशी संपर्क साधताना तसेच वकृत्व करताना खूप वेळा उपयोग होतो…

आजही कधीतरी निवांत वेळी सहजपणे तोंडातून श्री संत एकनाथांचे गतकाळातील एक भारुड ओठांवर येतं…

“निर्गुण माळ्याने, माळ्याने ..
एक बाग लाविला ज्याने..”




सुदाम महाजन, अमळनेर, हल्ली मुक्काम नाशिक..
सेवा निवृत्त तहसीलदार..

भारुड
भारुड

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *