बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे
निसर्गसख्याची अक्षर जयंती,
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे :
प्रासंगीक
कवितेत निसर्ग पहावा कि निसर्गात त्यांच्या कवितेची अनुभूती घ्यावी ? असा प्रश्न पडावा इतका निसर्गाशी तादात्म्य पावलेला निसर्गसखा म्हणजे बालकवी. आज १३ ऑगष्ट. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची १३४ वी जयंती.
“हे अमर विहंगम गगनाचा रहिवासी,
त्या नीलसागरावरचा चतुर खलाशी.
प्रियसखा फुलांचा ओढ्यांचा सांगाती,
त्यांच्यास्तव धुंडून ताराकण अधाशी.
आणसी धरेवर अक्षर धनराशी !
असे वर्णन कवी कुसुमाग्रजांनी बालकवींचे केले आहे. बालकवींचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. १३ ऑगस्ट १८९० मध्ये खानदेशच्या काळ्या मातीत साहित्यातील या अद्भूत अलौकिक रत्नाचा जन्म झाला. बालपणीच काव्याची देणगी लाभलेले बालकवी हे स्वतंत्र व्यक्तीमत्वाचे निसर्ग कवी होते. त्यांच्या कवितेत निसर्ग पहावा कि निसर्गात त्यांच्या कवितेची अनुभूती घ्यावी असा प्रश्न पडावा इतका निसर्गाशी तादात्म्य पावलेला निसर्गसखा म्हणजे बालकवी.
बालकवींनी निसर्गावर अतोनात प्रेम केले. त्यांच्या सर्वच कवितेत निसर्ग सजीव झाल्यासारखा वाटतो. चैतन्यमय निसर्गकविता हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या “औदुंबर” कवितेतला हिरवाळी घेऊन वाहणारा झरा, कुरणांमधून चालणारी पायवाट, आणि जळात पायटाकून बसलेला औदुंबर, तसेच “पाऊस” कवितेत वर्षादेवीने भरून ठेवलेला माल हाताने उडवून देणारा मरूत, आनंदाने भरार्या मारणारा आनंदी पक्षी, सदैव सस्मित डोलणारे तृणपुष्प, फुलपाखराला ‘या आता अंत किती पाहता नाथा’ असे म्हणणारे फूल, मोठ्या प्रेमाने तार्याला अंगाईगीत गाणारी रजनीदेवी, या का अशा अनेक ठिकाणी बालकवींच्या निसर्गातील चैतन्य अनुभवता येईल. त्यांच्या “फुलराणी” कवितेमध्ये तर मानवी आविष्कारांची परिसीमाच गाठली आहे.
सन १९०७ मध्ये जळगांवला महाराष्ट्रातले पहिले कविसंमेलन भरले होते. त्याकाळी कविता करणे ही एक मनातली हौस किंवा आंतरिक ऊर्मी असे . कविसंमेलनाला पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, इंदूर वगैरे दूर अंतरावरील ठिकाणांहून शास्त्री, पंडित, कवी आणि रसिक श्रोते मंडळी आली होती. जवळपास राहणा-या स्थानिक लोकांनी गर्दी केली होतीच.
एकंदर २३ कवी या संमेलनात आपले काव्यवाचन आणि गायन करणार होते. त्यातच एक १७ वर्षाचा मुलगा अचानक मंचावर चढला आणि त्याने थेट सभेचे अध्यक्ष कर्नल डॉ.कीर्तीकर यांचेजवळ जाऊन त्यांना आपले मनोगत तिथल्या तिथे रचलेल्या चार ओळीतून ऐकवले.
ते ऐकून सर्वानुमते त्यालाही मंचावर येऊन आपल्या कविता सादर करायची अनुमती दिली गेली. त्याने म्हणजे त्र्यंबकने सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या शीघ्रकवित्वाने स्तिमित केले. रीतीप्रमाणे त्याचाही सत्कार झाला तेंव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अध्यक्षांनी त्याला बालकवी ही उपाधी दिली आणि त्यानंतर ते त्याच नांवाने ओळखले जाऊ लागले.
त्यांनी अनेक सुंदर रचना केल्या. त्यात निसर्गसौंदर्याची अत्यंत रसिकतेने केलेली वर्णने आहेतच, कांही कवितामध्ये एक सकारात्मक जीवनदृष्टी आहे. माझे गाणे या कवितेत ते लिहितात………
ते असेही सांगतात,
सुंदरतेच्या सुमनावरले दंव चुंबुनि घ्यावे,
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.
ते निसर्गाशी एकरूप झाले होते. पण आपल्या कवितेतून निसर्ग वर्णिताना त्यातील सुंदरताच वर्णन करण्याचे जणू त्यांनी ठरविले होते. खळाळत जाणारा ‘निर्झर’, आनंदाने विहरणारा ‘आनंदी पक्षी’, पायदळी तुडविले जाऊनही सदैव सस्मित आणि वार्यावर डोलणारे ‘तृणपुष्प’ , गगनात स्वैरपणे झुलणारा ‘बालविहग’ ,या सर्यांच्याच चित्रणातून बालकवींनी निसर्गातील केवळ सौंदर्यच वर्णिले आहे.
“जे न देखे रवी ते देखे कवी”
ही उक्ती खरी ठरावी इतके निसर्गातील बारकावे त्यांनी आपल्या नेत्रांनी टिपले आणि त्यांना चैतन्यरूप दिले. म्ह्णूनच अगदी मोजक्याच शब्दात ते “औदुंबरा” सारखे शब्दचित्र रेखाटू शकले. त्यांच्या “जीर्ण दुर्ग”, “खेड्यातील रात्र”, “पारवा”, अशा कितीतरी ठिकाणी हीच सूक्ष्म निरिक्षण दृष्टी दिसून येते. त्यामुळेच त्यांचा निसर्ग कविता वास्तववादी बनल्या आहेत. त्यात कल्पनेचा लवलेशही सापडत नाही.

वास्तववादी कविता रंगविताना चित्रकाराला लाजवतील अशा रंगांच्या विविध छटा त्यांच्या कवितेत ठिकठिकाणी विखुरलेल्या आढळतात. “औदुंबर” कवितेतील कृष्णवर्ण आणि गोकर्ण रंगांचे ढग, “मेघांचा पाऊस” कवितेतील इंद्रनीळाचा रंग फासून बसलेला गिरी, शुभ्र धुक्याचे वस्त्र लेऊन आगमन करणारी उषा , संध्यासमयी सोन्याहूनही पिवळे पडणारे ऊन, अशा अनेक ठिकाणी रंगांची पखरणच त्यांनी केली आहे. “चौबाजुला थाट दाटला हिरवाळीचा ” हे दृष्य सतत पहाणार्या त्या खानदेशच्या बालकाला हिरवाळीचा हिरवा रंग तर अधिकच प्रिय. त्या हिरव्या रंगाच्या विविध छटांचे वर्णन त्यांनी आपल्या कवितांमधून केले आहे.
श्रावणमासी हिरवळीकडे बघून हर्षभरीत झालेल्या या कवीने “हिरवे हिरवे गार गालिचे ” जसे पाहिले तशी पाचूंची हिरवी रानेही पाहिली. आणि वनमालांचा हिरवा शेला जसा त्यांना दिसला तशीच शेतमळ्यांची हिरवी गर्दीही त्यांनी अनुभवली. निसर्ग जसा सौंदर्याने भरलेला आहे, तसाच तो संगीतमयही आहे, असे बालकवी मानत.
“तव गीते भरली सारी,
गाण्यांनी भरली राने.
वरखाली गाणे गाणे,
गीतमय स्थिरचर झाले.
गीतमय ब्रम्हांड डुले !
असे निसर्ग वर्णन ते आपल्या कवितेत करतात. निसर्गात संगीत शोधणार्या या कवीने आपल्या कवितेत नादमयताच आणली आहे. अशा प्रकारे निसर्गातील दिव्य सौंदर्य व अलौकिक आनंद आणि मानवी जिवनाची अपूर्णता नादमय शब्दात आविष्कृत करणारा कवी या सम हाच. बालकवींच्या कवितेमध्ये निसर्गवर्णनावर विशेष भर आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैत्यनाचा प्रत्यय येतो .नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्टय सांगितले जाते.
ऐल तटावर पैल तटावर,
हिरवाळी घेवुनी.
निळा सावळा झरा वाहतो,
बेटाबेटातुनी.
औदुंबर ही त्यांची अजरामर कविता. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडवलेला आविष्कार यामुळेच त्यांना ‘निसर्गकवी ’म्हटले जाते. ५ मे १९१८ ला वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी भादली नशिराबाद रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडतांना त्यांचा अपघाती व अकाली मृत्यू झाला. सामान्य माणसं मृत्यूनंतर कालपटात गुडूप होतात. बालकवींसारखा अक्षरप्रभू १३४ वर्ष झाली तरी रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवित आहेत. अक्षरकवी कधीही विस्मरणात जात नाहीत. ते त्यांच्या साहित्यात चिरंजीव झालेले असतात. बालकवींना विनम्र अभिवादन.!
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगाव.
(९४२३४९२५९३)