आई
आई जाण आपुला ईश्वर,
काळजावर कोरून ठेव…
आंधळ्या मानवा कारे,
दगडात शोधतो देव…?
नऊ मास कारावास,
गर्भ भोगतो पोटात…
चोरून चारापाणी कोण,
देतो ह्या ओठात…?
लेकराच्या मुक्तीसाठी,
माता मृत्यूशी भांडते…
स्वागताला पायघड्या,
रुधिराच्या ती मांडते…!
येत्या पिढीचं रे ओझं,
उदरी हर्षात पेलते…
उकीरडा मलमूत्राचा,
अंगावर ती झेलते…!
अमृताच्या धारेनं ती,
संस्कार सांधते…
त्याच बळावर कीर्ती,
लेकरांची रे नांदते…!
मांडीवर जोजुनिया,
दिला चांदोबा खेळाया…
सांगा जगामाजी कुठे,
आहे ही किमया…?
सृष्टीचक्र फीरविण्याचा,
जिचा अधिकार…
सांगा कुठे आहे दुजा,
देव अवतार…?
प्रकाश पाटील (पिंगळवाडेकर) अमळनेर