आई
!!आई!!
नानाभाऊ माळी
आई आसवं माझी
आई हसणे माझे
कसे सहलेसं आई
नऊ मासाचे ओझे!..
किती यातना सहल्या
त्या डोक्यापार गेल्या
राही अर्धपोटी आई
गंगाजमुना एक झाल्या!
अंगी भाजून भाजून
आई सावली तू झाली
चटका बसला पायास
गाय वासराशी आली!
अश्रू ओंजळीत घेई
हुंदके झालीत गाणी
मागे राहीना हो घास
पोट भरीतसे पाणी..!
आई मी तुझं पान
ममता झिरपत राही
स्वतः झरून झरून
झाली चैतन्याची शाई!
देव पाठवितो आई
आई ठेवितो देव्हारी
पवित्र झाली रे काशी
देव झालायं व्यवहारी!
तूझ्या कुशीचं दान
रोज ओढूनी मी घेई
आई फिटेल का ऋण
झालो पालखीचा भोई!
आई कल्पतरू माझी
आई तुकयाचे गाणे
टाळ मृदूंग वाजतो
आई खणखण नाणे!..
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१२ मे २०२४