आखाजीचे जेवण
आखाजीचे अमृत जेवण जेवा…
——©MKभामरेबापु
अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर जिचे नाव दिमाखाने डोलते,त्या भारतीयं संस्कृतीचे आपण वारसदार..
या संस्कृतीत साहित्य,कला,संगीत,सण,ऊत्सव,रुढी,परंपरा,संस्कार,आचार विचार हे सर्व तर आहेतच,पण त्यासोबत आहे ती खाद्य संस्कृती.
पुरातण काळापासुन ॠतुला अनुसरुन आहार घेण्याची उज्वल परंपरा आपल्या संस्कृतीत आहे,
सण उत्सव ही या ॠतुनुसारच साजरा होतात.
त्यामुळे जुन्या जमान्यातील जुनी माणसे आरोग्याप्रती व आहाराप्रती किती जागरुक होते याचा प्रत्येय येतो.
आत्ता ग्रिष्म ॠतु सुरु आहे.
अक्षयतृतिया अर्थात आपल्या खान्देशचा आखाजीचा सण आज आला आहे.
दिवाळी हा सणांचा राजा असेल तर अक्षयतृतीया राणीच!
या दिवशी घराघरातला पुरणपोळीचा स्वयंपाक हा तोंडाला पाणी व मनाला भुरळ घालणारा आहे,
बाहेरच्या कडक उन्हामुळे शरीरही उष्ण झालेले असते.त्यासाठी आंब्याचा रस हा प्रभावी मेनु.
जो पर्यंत अक्षय तृतीयेची घागर भरली जात नाही,तिला आंब्याचा नैवेद्य दाखवला जात नाही तो पर्यंत आंबा खायचा नाही असे संकेत प्रचलीत आहे.
कारण कुठलीही कैरी ही अक्षयतृतिये पर्यंत परीपक्व होत नाही.
असे नैसर्गिक पिकलेले फळच खावे ही त्यामागे धारणा.
परंतु माणुस बदलला,
काळ बदलला,
कृत्रीम रित्या फळे पिकवावीत व लगेच खावीत ही घाई झाल्याने आपण कैरीला बळजबरी पिकवुन तिला आंबा करुन खातो.
अक्षयतृतीयेला मिळणारं आंबाजेवु हा परीपुर्ण पाहुणचार.
आंब्यांना धुणे,त्यांना घोळणे,नरम होईपर्यंत चोळणे व पुर्ण रस निघेपर्यंत पिरगळणे यांत जी मजा आहे ती रेडीमेड आणलेल्या रसात कुठुन येणार,
आताशा पुरणपोळी ही आयती मागवतात,पण
दाळ शिजवणे,पुरण तयार करणे,उरलेले पाणी आमटीसाठी काढणे ही प्रक्रिया मजेशीर असते. घरातल्या चुलीवर ठेवलेले खापर,चुलीतुन निघणारा जाळ व धुर,नळीने विस्तववर फुंकर घालणे,धुर डोळ्यात गेल्यावर डोळे चोळणे,डोळ्यात पाणी येणे. परातीवर पोळी लाटणे,मग हातावर घेवुन तिला मोठी करणे,खापरावर टाकणे,ती शेकणे,तिची दुमडुन घडी घालणे..
हे सर्व पाहण्यातही मजा असते,त्यात आमच्या आयाबहीणींची माया असायची.त्यामुळे त्या पुरणपोळीचा स्वादच और असायचा.
मातीचा नवा घडा मांडायचा.त्यावर छोटे मडके,त्यावर डांगर,
या कलशाचे पुजन करायचे.
डांगर,टरबुजच्या बियां,मुरमुरे,शेंगदाणे यांच्या माळा ल्यालेल्या गौराई चे पुजन करायचे.सांजोरीचा नैवेद्य,
देवुन
घरात सर्वांची पंगत बसते,मांडी वाळुन सतरंजीवर बसायचे.
अशावेळी कुणी अनाहुत जरी आला तरी त्याला
“या जेवायला”
अशी आग्रहाने बोलावण्याची आपली संस्कृती आहे,
त्यावर तो म्हणतो
“अमृत जेवण जेवा”
किंवा
“घ्या देवाचे नाव”
असं उत्तर देतो.
किती सुंदर भावना यात आहे.
ताटात जे काही आहे त्याला अमृत समजुन प्राशन करा.वा जेवण देणार्या देवाचे नाव घेवुन कृतज्ञता व्यक्त करा.
ही आपली महानता.
वदनी कवळ घेता हा मंत्र म्हणुन ताटाला पाणी फिरवुन मग जेवणावळ सुरु होते,
गरमा गरम वरण भात ,त्यावर फिरवलेली साजुक तुपाची धार.वरुन तीन बोटांनी पिळलेला लिंबु , आंब्याचा पातळसा रस पुरणपोळी ,कटाचीआमटी भजी कुरडाई पापड ,
सांजोरी ,असं सर्व स्वादांनी युक्त रंगीबेरंगी दिसणारे साग्रसंगीत जेवणाची मजाच न्यारी.
आपल्या खान्देशची जेवणावळ तशी अघळपघळच.
रसात पुरणपोळी कुचकरुन मिटक्या मारत खायचे.नंतर झणझणीत आमटीचा भुरका मारायचा.कुरुम कुरुम आवाज करत कुरकुरीत कुरडाई खावी.हांऽऽ ऊंऽऽ करत गरमागरम मिर्चीची भजी खावी.
शेजारच्यालाही आग्रह करायचा,वाढणाराही आग्रहाने वाढतो,
या पंगतची रंगतच वेगळी हो,ढेकर देत पोटभर जेवण करायचे,
“अन्नदाता सुखी भव” म्हणायचे.
घरातल्या चंचीतुन पान काढायचे,काथा चुना बडीशेप टाकुन ते तांबुल खायचे.
नि मस्तपैकी खाटेवर जावुन वामकुक्षी घ्यायची..
Pingback: कान्हदेश संस्कृती आनी आखाजीना सन - मराठी