आखाजी अक्षतृतिया

खान्देशी संस्कृती आनी आखाजीना सण
खान्देशी संस्कृती आनी आखाजीना सण

आखाजी अक्षतृतिया

“आखाजी .. अक्षतृतिया               

                  आपण भारतीय अत्तिशय सण आणि उत्सव प्रिय आहोत . विविध संस्कृतिने विविध चालिरितींनी धार्मिक रूढी ‘ धार्मिक परंपरांनी नटलेला आपला देश आहे .                                    

          खान्देश संस्कृती तर विचारायलाच नको . खान्देशची महती काय वर्णावी ? खान्देशची समृद्धी डोळ्यासमोर येते . खान्देशातून कड्या कपाऱ्यातून वाहत जाणाऱ्या नद्या डोळ्या पुढे येतात . अन्न धान्याने भरलेला खान्देश ‘ पाण्याने बहरलेला खान्देश ‘ पाण्याने ओसंडून वाहणारा खान्देश ‘ दुध ‘ तूप ‘ लोणी फुलबागा ‘ फळ बागा ‘ यांनी बहरलेला खान्देश . सांस्कृतिक दृष्टया देखिल आमचा खान्देश संपन्न आहे .

साधी सरळ प्रगल्भ विचारांची उत्तुंग शिखरा सारखी दिमाखाने वागणारी येथील संस्कृती आहे . कुठल्यान कुठल्या भागातून ही सांस्कृतिक गंगा वाहतांना आम्ही बघत आलोय . त्यातून आमची बोली भाषा अहिराणी . रसाळ आणि मधाळ ।           

आखाजी अक्षतृतिया

                 

खान्देशात अनेक सण उत्सव अगदी पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे .                                             

  शुक्ल पक्षातील तृतियेचा दिवस म्हणजे आनंदी दिवस . आखाजीच्या सणाचा दिवस . अक्षतृतियेचा दिवस

खान्देशातील अत्तिशय महत्वाचा सण . वसंत ऋतु ‘ नव्या फळा फुलांच्या पालवीच्या साक्षीतला आनंददायी नव वर्षाची चाहूल घेऊन येणारा हा आखाजीचा सण ।                                   

फार अल्हाददायक मंगलमय वातावरण सृष्टीत संचारलेलं असतं . सत्य युगाची सुरवात देखिल झालेली असते . स्वच्छ गार हवा ‘ हवेत छान गारवा निर्माण करते . सृष्टीतील विविध पाने फुले एक वेगळा सुगंध पसरवित असतो .                             

आपल्या वाडवडिलांनी आपल्यावर जे संस्कार केलेले असतात त्यांनी आपल्यावर जिवापाड प्रेम केलेलं असतं त्या वाडवडिलांना ‘ पितरांना स्मृति करण्याचा हा दिवस … !                

                             

  खान्देशच्या वैशिष्टय सांगणाऱ्या खापराच्या तलम पिवळ्याशार रेशमा सारख्या पुरणाच्या पोळ्या . या पुरणाच्या पोळ्या चतुर सुगरणच करू शकते . त्यात ती आपलं कौशल्य पणास लावते . सोबत कुरडाळ्या ‘ पापड ‘ रशी ‘ त्याला आमटी म्हणतात . त्या बरोबर भात ‘ भजे ‘ पुरणाच्या पोळी बरोबर आंब्याचा रस ‘ फारच रुचकर ‘ व स्वादिष्ट जेवण बनविले जाते .                                      

आखाजीला नवी घागर पूजन करतात . त्याला डेरगं असं म्हणतात . त्या बरोबर छोटासा मातीचाच लोटा असतो . त्या घागरीला चंदनाने स्वस्तिक व ओम काढतात ‘ पूजा करतात . त्या घागरीवर रुचाकिनच्या फुलांची माळ घालतात . त्या पूजनात एक भावना जोडलेली असते .                                 

आपल्या वाड वडिलांना नैवेद्य दिला जातो . त्याच्या पध्दती प्रथे प्रमाणे चालत आल्या आहेत . त्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी त्या घागरीची हळद कुंकूवाने पूजा करण्याची प्रथा आहे . त्या घागरीत प्रत्येकाने थोड् थोड् जल ( पाणी ) टाकून ती घागर भरावयाची असते . त्याला खान्देशात ‘  डेरगं भरणं . . ” हा प्रचलित शद्ब आहे .                                    

त्या दिवशी जेवणा साठी ‘ पित्तर .. . म्हणुन जावयास बोलावले जाते किंवा ते उपलब्ध नसतील तर त्या सम कोणी देखिल चालु शकतो . त्यांना मात्र आग्रहाने वाढण्याची पद्धत असते . ते पोटभर जेवतील तर स्वर्गातून आलेले आपले पूर्वज पोटभर जेवले अशी एक भावना त्या मागे जपली जाते .                                                   

  याच दिवशी शेतात काम करणाऱ्या सालदारांचे नवं वर्ष ठरविलं जातं . त्यांना नवे कपडे ‘ भेट म्हणुन शेतकरी देत असतात . त्यांचा सन्मान देखिल करतात .                      

                     

संध्याकाळ केव्हा होते एकदाची असं माहेरी आलेल्या मुलीनां झालेलं असतं . छान रंगी बेरंगी जरतारी साड्यांनी त्यांना आधीच वेड लावलेलं असतं . आज सर्व माहेरी आलेल्या मुली भेटणार असतात . सर्व मुली अगदी नटून थटून टिपर्‍या खेळत ‘ गाणी म्हणत आपल्याच तालात दंग असतात .                    

Khandeshi Akhaji

गवराई उनी आखाजीलें

आखाजीलें

Ahirani language Akhaji poetry

गवराई ना सनले

अत्तिशय सुंदर वातावरण असतं या दिवसात . आकाश निरभ्र असतं . दुपारी उष्णता संध्याकाळी आणि रात्री हवेत गारवा असतो . शेतकरी खुष असतो . पीक पाणी किवा फुलांचा फळांचा बहर बहरलेला असतो . सृष्टीत एक वेगळा गंध पसरलेला असतो .                                      

  खास या आखाजी च्या सणा साठी सासुरवाशीणी नववधु मुली या माहेरी आलेल्या असतात . आपल्या माय माऊलीच्या पदराच्या सुख सावलीत येऊन सुखावतात .

नववधु नवीन आनंदाची बातमी माहेरी घेऊन आलेल्या असतात . जणू वसंत ऋतुतील बहरलेली फुले ‘ फळे ‘ हाच संकेत तर देत नसतील ना ! अशी शंका हमखास मनात आल्या वाचुन राहत नाही .           

                  

  गवराई ‘ म्हणजे पार्वती ।                 सुतारा कडुन बनवून आणलेली एक लाकडाची प्रतिकृती . दोन अजुबाजुला ‘ सुशोभित दोन लाकडी स्तंभ ‘ त्याला छानसा पाळणा किवा झोका . जणु त्यावर गौराई बसुन येणार अशी सुंदर कल्पना केलेली आहे गवराई म्हणजे शंकराची पार्वती . पार्वती ज्या पाळण्यावर बसणार असते त्याला बंगई असं देखिल म्हटलं जातं .

त्या पाळण्यावर झोके खाणार . त्या बंगईच्या स्तंभाला आजुबाजुला दोन घोडे जणू तो एक रथ अशी कल्पना करण्यात आली आहे . त्या लाकडी पाळण्यावर महादेवाची पींड कोरलेली असते . त्यावर आदिशक्तीचे पावले कोरलेली असतात अशा प्रकारची लाकडी गवराईची मांडणी करतात .                                                

मुली गवराईला छान पैकी सजवतात . आखाजीचा सण हा शेती संस्कृतिशी संबंधीत असल्यामुळे गवराईला फुलांचे हार न घालता विविध फळांच्या माळा ‘ वाळलेल्या बोरांच्या माळा ‘ शेंगाच्या माळा ‘ डांगर टरबुजांच्या माळा ‘ बीयांच्या माळा ‘ सिताफळ ‘ रामफळ ‘ कैरीचां घड ‘ अशा प्रकारे सजवतात . गहू किंवा धान्यावर पाण्याने नदीच्या पवित्र जलाने भरलेला तांब्याचा कलश ठेवतात . त्या कलशात मंगलमय आंब्याची पाच पाने रोवलेली असतात .                            

   ज्या कोनाड्यात गवराईची मांडणी केलेली असते त्या मातीच्या भिंती असलेल्या कोनाड्याला एखाद्या काडीला कपाशी लावून हळद व कुंकु ‘ च्या सहाय्याने छान नक्षी काढुन सजवतात . ही प्रथा त्या वेळेस रंग ब्रश ग्रामीण भागात उपलब्ध नसायचे म्हणुन हीच प्रथा चालत आली आहे .                                           

चैत्राच्या पोर्णिमेला गवराईची स्थापना होऊन बरोब्बर पंधरा दिवस रोज पूजा अर्चा सुरु असते . गाणी टिपऱ्यांचा ताल ‘ फुगड्या नुसती धम्माल सुरु असते .                                                  

  मुली रोज नदीवर जातात . गाणी म्हणतात . फुगड्या खेळतात . गाण्यांच्या ठेक्यावर टिपरीचां ताल धरतात . नदी किवा विहिरीचं स्वच्छ पाणी ‘ आंब्याची पाने ‘ डोक्यावर कलश आपल्याच नादात टिपरींच्या तालावर गाणी म्हणत असतात .                             

” चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय वैशाखाचं उन्हं …                  

खडके तापुनी झाली लाल वं माय ‘ तापुनी झाली लाल . . ”                                     किवा ……..                                            अथानी कैरी ‘ तथानी कैरी कैरी झोका खाय वं …                           कैरी तुटनी खडक फुटना झुय झुय पानी व्हाय वं …                           झुय झुय पानी व्हाय तठ्ठे कस्साना बज्जार वं …            

  अशी सुरेख गाणी म्हणत असतात .

ही गाणी पारंपारिक आहेत . कुणी लिहिली कुणी स्वरबद्ध केलीत याचा कुठेही उल्लेख नाही .                                                   

आखाजीच्या आदल्या दिवशी कुंभाराच्या घरी शंकर पार्वतीला घ्यायला सासरी आलेला असतो . जावाई तो . गावाच्या बाहेर कुंभाराच्या घरीच थांबतो अशी कल्पना केली गेली आहे.

पार्वती लेकीला आई छान जेवण करते . पण शंकर घ्यायला आल्यावर कळल्या वर पार्वती आईला म्हणते .              

” कशी मी जेवू आई ‘ शंकर घोड्यावरी ..                    शंकर घोड्यावरी गौराई चाले पायी ”                               अशी छान छान गाणी मुली या आखाजी च्या सणाला टिपरीच्या तालावर गात असतात .    

                      आखाजीच्या दिवशी मुली छानच सजलेल्या असतात . जणू त्या पार्वती च्या सखी … काठा पदराच्या साड्या ‘ केसांचा अंबाडा ‘ नाकात नथ ‘ बाडगीत पेरलेल्या गव्हांच्या रोपांची छान पिवळी वेणी ‘ गाणी म्हणतात . झोके खेळतात . . धुंद होऊन नाचतात .

देहभान विसरतात .                                              झाडानां झोके बांधलेले असतात . मुली हसतात . खिदळतात ‘ निसर्गाच्या सानिध्यात रमतात . टिपरीच्या तालावर अत्तिशय लयबद्द गाणी गात असतात . सर्व सर्व विसरून त्या तल्लीन होतात . स्वर्गीय आनंद जणू त्या उपभोगीत असतात असच समजा .                                

अशा प्रकारे हा आखाजी ‘ चा दिवस मुली साजरा करतात .                                      

दुसऱ्या दिवशी गवराईला नदीवर आंघोळीला घेऊन जातात . गवराईला निरोपाचा कार्यक्रम . सर्व मुली भावूक झालेल्या असतात . गवराई ला निरोपाचा कार्यक्रम . गंभीर प्रसंग .

मग सर्व माळा नदीवर उतरवतात . सांजोऱ्या ‘ बोरे ‘ माळांचे पदार्थ प्रसाद म्हणुन खातात . पण जेव्हा माघारी घरी परततात . त्यांची पावले जड पडतात . गौराईला निरोप फार जड अंतःकरणाने देतात .   व तशीच गंभीर गाणी म्हणत त्या मुली घरी जड अंतकरणाने घरी परततात .            

                                      अशा रितीने खान्देशातील आखाजी ‘ अक्षतृतिया हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो .                                           

विश्राम बिरारी ‘ धुळे .               

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *