मराठी लघुकथा वाड्यातली सुनबाई
एक लघुकथा
गावगाड्याच्या जगरहाटीत तारापूरच्या तुकातात्या व बायजा काकूला खुपच मान सन्मान आदर होता.
पंजाआजा पासून ते स्व:ताच्या कमाईने तात्यांच्या मेहनतीने शेतीबाडीत खुपच प्रगती केली होती . साहजिकचं घरीदारी शिवारी, सालगड्या पासुन ते घरगड्या पर्यंत सर्वांचाच राबता असे.
त्यात सात नवसाच्या कुलदिपकाला भावकीतल्याच एका लांबच्या नातेवाईकाची, शहरात वावरणारी मुलगी नुकतीच सुन करुन आणली होती. नव्याची नवलाई संपली, काकणं सुटलं, हळद फिटली, देव देवस्कीचा भंडारा उधळला गेला. कुळधर्म, कुळाचार, ओटी भरणे,कुंकूंम मार्जन पर्यंत सर्व सोपस्कार साग्रसंगीत पार पडल्या नंतर
पहिल्या मुळाला सुनबाई गावकुसाच्या रितीरिवाजा प्रमाणे पहिलं मुळं पालटणीला माहेरी गेली आणि इकडे बायजा काकू गावकुसाच्या वाड्या वस्त्या गल्ली बोळातून कुटूंब वत्सल सुन मिळाली ह्या आनंदानं दुपारच्या वेळी घरी दारी जाऊन सुनेचे कोडकौतूक करीत राहील्या.
आज चक्क बायजा काकुने संस्कार संस्कृती आणि माझी सुनबाई ह्या विषयावरं वाड्यात गावगाड्यातल्या साऱ्या बायकांना बोलाऊन हळदी कुंकूंवाचा कार्यक्रम ठेवला होता .
गावातल्या भावकीतल्या साऱ्या बायका, सुना सहावारी, नऊवारी’ साड्या चापून चोपून नेसून आल्या होत्या.
बायजा काकू देखिल पायात जोडवा, चांदीचे कडे, हातात दंडकडे, मनगटी पाटल्या, त्यात भरगच्च चुडा, गळ्यात मंगळसुत्र, भलं मोठंडोरलं, कानी कुंडल, भरजरी शालू, कपाळी भलं रुपया एवढा लाल कुंकंवाचा मळवटं, डोक्यावरं पदर अशा थाटामाटात सजून स्वःतासह आलेल्या सर्व सवाष्ण आया बायांची हळदी कुंकूं देऊन ओटी भरत होत्या.
सांज संध्येच्या दिवा लावण्या वेळी सर्व सवाष्ण महीला लक्ष्मीच्या रुपानं बायजा काकू कडून ओटी भरून घेत होत्या.
सर्वत्र उत्साह आनंदी आनंद वातावरणात बायजा काकू हाती कुंकूंवाचा कंरडा घेऊन हळदी कुंकू लावीत होत्या. सुर्य मावळतीला आला होता. त्याच वेळी बायजा काकूची सुनबाई शहरातून पहिलं मुळ पालटून सासरी आली ती चक्क जिनपँट टी शर्ट, पाठीवरं मोकळे केस सोडलेले, गळ्यात पर्स, पायात बुट, हातात ना चुडा ना भाळी कुंक ना हळद,सांज संध्येच्या वेळी लक्ष्मी पुजनाला सुनेकडे पाहून बायजा काकूच्या हातातील कुंकंवाचा कंरडा निसटला सर्व वाड्यात एकच गोंधळ उडाला.
भरल्या वाड्यात सर्व सवाष्ण लेकी सुनेच्यां बेल भंडार्यात कुंकूवाच्या सड्यात बायजाकाकू न्हाऊन निघाली होती .सुनबाई मात्र डोळ्यावरचा गॉगल काढून सांज संध्येला वाड्याच्या उंबऱ्याला प्रवेश करीत गॉगल वरचा हळदी कुंकूंवाचा बेल भंडारा पुसुन वाड्यात प्रवेश करती झाली
लेखक : गावगाडाकार साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर ह . मु नाशिक