होळी बद्दल माहिती
होळी बद्दल माहिती
होळी (हुताशनी पौर्णिमा)
संकलन :- अशोककाका कुलकर्णी
बरेच गृपवर होळी बद्दल उलट सुलट मेसेज फिरत आहेत . या वर्षी फाल्गुन शुक्ल १४ रविवार सायंकाळीं प्रदोषकाळी पौर्णिमा तिथी आहे. दुसरे दिवशीं पौर्णिमा प्रदोषकाली नाही . धर्मसिंधु नुसार पौर्णिमेला भद्रामुख सोडून होलिका प्रदीपन करावे असे उल्लेख आहेत .
त्यामुळे प्रदोष काळातच होलिकादहन करावे. नेहमीप्रमाणे सूर्यास्तानंतर २ तास २४ मिनिटे या काळात होलिकादहन करावे फक्त भद्रा मुखाचा कालावधी रात्री ८:०८ ते रा.१०:०८ या वेळात होलिकादहन कटाक्षाने वर्ज्य करावे .
होळी
दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवात अनेक अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे .
होळी तिथी
देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५ – ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.’
होळी इतिहास
पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना.‘नगरातील मुलांना त्रास देणार्या ‘ढुंढा’ नावाच्या राक्षसिणीचा प्रतिकार कसा करावा ?’, याविषयी नारद मुनि सम्राट युधिष्ठिराला पुढील उपाय सांगतात. ते युधिष्ठिराला म्हणतात, ‘नगरातील सर्व लोकांना तू अभय दे. त्यामुळे ते आनंदित होतील. त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत. त्यानंतर –
सञ्चयं शुष्ककाष्ठानाम् उपलानां च कारयेत् ।
तत्राग्निं विधिवत् बुद्ध्वा रक्षोघ्नैः मन्त्रविस्तरैः ॥
ततः किलकिलाशब्दैः तालशब्दैः मनोरमैः ।
तम् अग्निं त्रिः परिक्रम्य गायन्तु च हसन्तु च ॥
जल्पन्तु स्वेच्छया लोकाः निःशङ्का यस्य यन्मनः ।
तेन शब्देन सा पापा होमेन च निराकृता ॥
अदृष्टिघातैः डिम्भानां राक्षसी क्षयम् एष्यति ।
सर्वदुष्टापहो होमः सर्वरोगोपशान्तिदः ॥
क्रियतेऽस्यां द्विजैः पार्थ तेन सा होलिका स्मृता । –भविष्योत्तरपुराण
अर्थ : वाळलेली लाकडे आणि गोवर्या यांचा ढीग रचावा. तेथे रक्षोघ्न (राक्षसांना नष्ट करणार्या) मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करावा. त्यानंतर लहान मुलांप्रमाणे हर्षभरित शब्द करत (किलकिलाशब्दैः), मनोरम अशा टाळ्या वाजवत (तालशब्दैः मनोरमैः) अग्नीला ३ प्रदक्षिणा घालून गाणे गावे आणि आनंदाने हसावे. लोकांनी निःशंकपणे आणि स्वेच्छेनुसार त्यांच्या मनातील पाहिजे तेवढे बोलावे. अशा आनंदी शब्दांनी आणि (रक्षोघ्न) होमाने लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीण लोकांची दृष्टी पडल्याविनाच क्षीण होईल.
हे राजा ! फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात; म्हणून या तिथीला विद्वानांनी ‘होलिका’ असे म्हटले आहे.
या श्लोकांत अग्नीला प्रदक्षिणा घालतांना कुठेही शिवीगाळ करावी, असा उल्लेख नाही. याउलट ‘किलकिल’, ‘मनोरम तालशब्द’ असे शब्द आले आहेत. यांचे अर्थ वर दिले आहेत.
‘उत्तरेमध्ये होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पूतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात.
एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ या नावाने यज्ञ होऊ लागले.’
‘या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी विष्णूला यज्ञकुंडातून बाहेर येण्यास ‘यर्व्य’ ऋषींनी प्रार्थना केली. भगवान विष्णूने धरतीवर पाय ठेवताक्षणीच स्वर्गातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली.’ (स्वर्गातून झालेली ती प्रथम पुष्पवृष्टी होय. याच कारणास्तव उत्तर हिंदुस्थानात आजही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या ठिकाणी होळीचे प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन ती हवेत उडवली जातात. त्या फुलांना ते ‘पलाश के फूल’, असे म्हणतात.)
‘ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्याच्याभोवती टिपर्या खेळतात.
होळीची पूजा
प्रदीपानन्तरं च होलिकायै नमः इति मन्त्रेण पूजाद्रव्य-प्रक्षेकात्मकः होमः कार्यः ।
स्मृतिकौस्तुभ
अर्थ : अग्नी प्रज्वलित केल्यावर ‘होलिकायै नमः’ या मंत्राने पूजाद्रव्ये वाहून होम करावा.
निशागमे तु पूज्येयं होलिका सर्वतोमुखैः ।
पृथ्वीचंद्रोदय
अर्थ : रात्र झाल्यावर सर्वांनी होलिकेचे (वाळलेली लाकडे आणि गोवर्या रचून पेटवलेल्या अग्नीचे) पूजन करावे.
होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र
अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।
अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥
– स्मृतिकौस्तुभ
अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्या रचून पेटवलेल्या अग्ने), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.
होळीच्या दुसर्या दिवशी करायच्या धार्मिक कृती
प्रवृत्ते मधुमासे तु प्रतिपत्सु विभूतये ।
कृत्वा चावश्यकार्याणि सन्तर्प्य पितृदेवताः ॥
वन्दयेत् होलिकाभूतिं सर्वदुष्टोपशान्तये ।
– स्मृतिकौस्तुभ
अर्थ : वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी सकाळी प्रातर्विधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे.
होलिकेच्या विभूतीला वंदन करतांना म्हणायचा मंत्र
वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥
– स्मृतिकौस्तुभ
अर्थ : हे विभूती देवी ! तुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेवही वंदन करतात. त्यामुळे हे देवी, तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला वैभव देणारी हो.
होळी बद्दल माहिती
होळी (हिंदी उच्चारण: [‘hoːli:]) हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते. याव्यतिरिक्त, हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकशिपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते, परंतु भारतीय डायस्पोराद्वारे (देशांतरित जनसमूह)आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागांमध्ये देखील पसरली आहे.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी केला जाणारा बेत – पुरणपोळी, कटाची आमटी, मसालेभात
होळी साजरी करताना लोक
होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. हे वसंत ऋतु कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आवाहन आहे. हे एक रात्र आणि एक दिवस चालते, हिंदू कॅलेंडर फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी (पौर्णिमेचा दिवस) सुरू होतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने साम्भोदले जाते.होळी हा रंगाचा सण आहे.[१] होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत.[२] होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात.
Pingback: होळी आयुष्याची लघूकथा - मराठी 1