सरणावरची माती kavya sangrah
सरणावरची माती
एक आनंदाचा डोह
मनाला भावणारे रसग्रहण
कवी सोमदत्त मुंजवाडकर यांची “सरणावरची माती” ही कविता मानवी मनाच्या अंतरंगात असणारा जो एक स्वप्नांचा डोह असतो, त्यात नियती आपल्याला जीवनभर एक सफर करून आणत असते.ही नियती माणसाला कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे,संघर्षाचे,धैर्याचे, प्रेमाचे मनमोहक असे विविध प्रसंग दाखवत असते.जीवनाचा एकेक पैलू उलगडताना या काव्यातून दिसून येतो. जीवनात येणाऱ्या या सर्व प्रसंगांना स्थितप्रज्ञ राहून त्यांना कसे सामोरे जावे या अनुषंगाने ही कविता माणसाला धैर्य शिकवून जाते.
“कुण्या लोभस परीने
पंख शिरी हा धरीला
धुंद मस्तक करूनी
नेला ऐवज चोरीला”
कवीच्या कल्पनाभरारीची येथे प्रचिती येते.कवीने येथे नियतीला”लोभस परि” म्हटलेले आहे.कवीला ही नियती जणू लोभसवाण्या परीसारखी वाटते.परीकथेतील ही परी डोळ्यांना प्रत्यक्षात ती दिसत नाही पण तिचे मनाला भुरळ घालणारे अस्तित्व परिकथेतून आपण वाचत आलो आहोत.अत्यंत लोभसवाण असे हे चित्रण,लहानांना तर ही प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली पण बालमनाला मोहणारी ही परी फारच हवीहवीशी वाटते.कवी हेच सांगत आहे,की नियती जीवनात एखादा सुखाचा क्षण देऊन जाते. या आनंदाच्या क्षणात आपण धुंद होऊन जातो.परंतु सुख, आनंद हे काही चिरकाल टिकत नाही.क्षणार्धात ते चोरीला जाते.नियती हे सुख लगेच हिसकावूनही घेते.
कवी म्हणतो,
“केश संभारात तिला
राती सपान पहावे
झुले गुलाबाचा झुला
मन मोराने झुलावे”
तर या नियतीकडे असे पहावे,की केश संभारात सुंदर अशी वेणीच जणू माळलेली आहे.आणि त्यामुळे तो केशसंभार खुलून दिसतो,आकर्षक दिसतो.आपण एखादं गोड स्वप्न पहावे ते स्वप्न जीवनात प्रत्यक्षात उतराव असंच काहीसं घडतं.जेव्हा नियती सुखाचं दान पदरी अर्पण करते,मग वाटतं आनंदाने या मनमोराने गुलाबाच्या झुल्यावर झुलतच राहावे. मनुष्याला सुख हे कायमच हवेहवेसे वाटत राहते.पुढे कवी म्हणतो,
“वारे वादळ उठले
गाणे मनात साठले
चहू बाजूंनी फिरुनी
गाव वेशीत सजले”
आयुष्यात कितीही वादळ,संकट आलीत,ती पार करत असताना कितीही संघर्ष करावा लागला,दमछाक झाली तरीही मनात आयुष्याचे गोड गाणं साठवून ते पार कराव लागत. सुखाचे क्षण फिरूनी परत येतील या आशेवरच मनुष्य आयुष्य काढत असतो. संकटांनी आपले मन कितीही भरकटले, अस्थिर सैरभैर झाले. तरीही”गाव वेशीत सजले” याचा अर्थ असा की,गाव जसे वेशीच्या आत बंदिस्त असते, त्याप्रमाणे हे सुख मनाच्या आत बंदिस्त असते.इच्छा-आकांक्षा, सुख-आनंद या साऱ्यांनी गाव सजलेले असते. प्रत्येक गावाची वेस असते.गावाची ती सीमा असते.आपण कितीही लांबून भटकून फेरफटका मारून आलो, वेशीच्या आत घरी परततोच.तसंच काहीसं या मनाचेही आहे.
पुढे कवी म्हणतो,
“ठाव माणसांचा घ्यावा
जाणू मनातला भाव
कधी भरुनी येईल
दुःख अंतरीचा घाव”
जगात आपल्यापेक्षा कितीतरी दुःखी-कष्टी, रोगी अन मनाने खचलेली अशी माणसं आपल्या सभोवताली वावरताना दिसतात. आपण त्यांचे दुःख जाणावे,त्यावर फुंकर घालावी म्हणजे आपले दुःख हे आपोआपच कमी होते.दुसऱ्यांचे दुःख जाणले की, आपल्या दुःखाची दाहकता तितकीशी जाणवत नाही.त्यामुळे आपल्या अंतरीचा दुःखाचा घाव हा कमी होतो.यासाठी मन उदार असावे लागते.
पुढे कवी म्हणतो ,
“पुन्हा भेटेल ती कधी
माझ्या दिलाच्या गावात
सुख सांगेल मी तिला
कुजबुजूनी कानात”
कवीला वाटते की, ही ‘नियती’मजला पुन्हा जेव्हा भेटेल माझ्या दिलाच्या गावात तेव्हा मी तिच्या कानात हळुवार कुजबुजून माझे सुख मागून घेईन.मानवी मन हे कायम सुखाच्या शोधात असते.त्याला सदैव या सुखाची ओढ असते.पण नियती माणसाला कायम झुलवत असते.इकडून तिकडे हा हिंदोळा झुलत असतो.सुखदुःखाच्या या हिंदोळ्यावर मानवी मन झुलत असते.
“भुर्र उडून जाईल
आज माणसांचा थवा
ढगातल्या परीवाणी
रिती पोकळीच हवा”
येथे कवीला जीवन विषयक वास्तवता, सत्यता जाणवते ती ही की,आयुष्य जगत असताना आपले आप्तस्वकीय, मित्रपरिवार,समाज, आजूबाजूला असणारा सारा गोतावळा संकट समयी पक्षांप्रमाणे भुर्रकन उडून जातो.संकट समयी कोणीही कामी येत नाही. आणि मग जाणवते की,ढगातली परी जशी प्रत्यक्षात ती अस्तित्वातच नसते. आपल्या मनाचा तो एक सुखद भ्रम असतो. त्याप्रमाणेच आयुष्याची लढाई ही ज्याला त्याला एकट्याने स्वतःच लढावयाची असते.पुढे कवी म्हणतो,
“गाव माझ्या सपनात
सग्या सोयऱ्यांची नाती
जीव ओवाळून टाकू
सरणावरची माती”
आपल्या मनात स्वप्नांचं एक गाव वसलेलं असतं. प्रत्येकाबद्दल आस, अपेक्षा असते.त्यात आई-वडील,भाऊ-बहीण,नातेवाईक,मित्रपरिवार समाजातील प्रत्येक व्यक्ती आपण ज्यांना ज्यांना ओळखत असतो. ती सारी मंडळी या साऱ्यांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात.तसेच या सर्वांबद्दल वेगवेगळ्या भावना असतात.ज्यात कोणी प्रिय असते तर कोणी अप्रिय असते. एखादी व्यक्ती ही मनाच्या खूप जवळ असते तर कोणीतरी मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजलेली असते. मनात हर तऱ्हेच्या व्यक्ती असतात. या साऱ्यांवर आपण आपला जीव ओवाळून टाकत असतो.इतकेच नव्हे तर आपल्या अंतानंतर “सरणावरची माती” ही सर्वांना अर्पण करीत असतो.मनुष्य मेल्यानंतर त्याच्या शरीराची माती होते. अन ती माती सुद्धा स्वजनांकडून गोळा केली जाते.असा हा मानवी जीवन प्रवास नियतीच्या अधिराज्याने सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलणार हवं-हवं,नको-नको चा ध्यास जपणार जीवन किती क्षणभंगुर आहे हे साऱ्या काव्यातून कवीला व्यक्त करावयाचे आहे.
कवी सोमदत्त मुंजवाडकर आपल्या या काव्यातून जीवन विषयक सत्य मांडतात. तसेच ते माणसांच्या जगण्यातले सुखदुःखाचे अनुभव चढ-उतार,संघर्ष या साऱ्यांविषयी त्यांनी मनातले भाव व्यक्त केले आहेत.मानवाचं जगणं, त्याचं अस्तित्व,त्याची स्वप्नं,त्याची कल्पना एकंदरीत त्याचं भाव विश्व या काव्यातून व्यक्त होताना दिसते. जीवनाच्या वास्तवतेची ओळख त्यांच्या काव्यातून वाचकाला अनुभूती होते.त्यांच्या काव्यात असणारी शब्दकळा ही भावनेशी सुसंगत अशी जाणवते.
भावपूर्ण असे काव्य त्यांनी रसिक वाचकांसाठी सादर केलेले आहे.मानवी जीवन हे जगण्याच्या चौकटीत आखले गेलेले असले तरीही या बंदिस्त अशा चौकटीत जगताना जगण्याचे काही निकष पाळले असता जीवनाचा प्रवास हा सुखद होतो. जीवनाशी नाते जोडू पाहणारी सोमदत्त मुंजवाड़कर यांची कविता रसिक मनाला निश्चितच जवळची वाटते यात शंका नाही. काव्याचा उहापोह करता मलाही असेच जाणवते की,
“हवे नकोचा लोचट भुंगा
मनात घिरट्या घाली
आसावून नियतीचा हा झुलवा
मनास हिंदोळा घाली”

रस ग्रहण
प्रभाकिरण
प्रभावती चव्हाण
नाशिक.
मो.९८९०१२५८७२
कवी,गीतकार, “पस्तावा”कार, अँड़-सोमदत्त मुंजवाड़कर
सटाणा ता.बागलाण,जि. नाशिक
मो.८०८७७३५३६९