(आयरानी दुसरा कविता संग्रहना दहावा जलमदिन)
‘नियतीना सूड’-लतिका चौधरी
अहिरानी बोलीतील पहिली स्त्रीवादी कविता
——————————————
प्रा.डॉ.फुला बागूल, शिरपूर
अहिराणी बोलीत आत्मविष्कार करणाऱ्या या काव्यसंग्रहाच्या कवयित्री लतिका चौधरी या आधुनिक बहिणाबाई ठराव्यात ईतक्या सुंदर ,मनभावन,हृदयस्पर्शी कविता त्यांनी लिहिल्या आहेत. अहिराणी बोलीतील ही
पहिली स्त्रीवादी जाणिवेची कविता आहे असे म्हणण्याचे धाडस करणे वावगे ठरणार नाही. अहिरानी रचना करण्याचा स्तुत्य प्रयत्न त्यांनी या संग्रहात केला आहे.
‘मनमोर’ या पहिल्या कवितेत मुग्ध प्रेमाविष्कार आहे.
“काया ढग दुखना मनवरना थंडा व्हयी बरसना”,
“आनंदना पख लाईनी भिरभिरस तुना भवते”‘
यासारखी ललितरम्य शब्दकळा त्यांनी योजिली आहे.
प्रियकराची आतुरतेने वाट पाहणारी प्रिया ‘रातराणी’
या कवितेत दिसते.
उपमा अलंकाराचे सुंदर वर्णन, दर्शन आहे.
जसे-” जसं फुल रातरानीनं, तसा सुवास मनमा”,
या काव्यपंक्तीतून दिसतो.अहिरानी ओव्यांशी
साधर्म्य दर्शविणाऱ्या खालील ओळी या कवितेत आहेत.
“धरनीनागत मी येडी आगासमिलनले झुरस,
दिनरात झुरी झुरी आसूना दवबिंदू मी करस”
या ह्या अहिरानी कवितेतील आधुनिक ओवी आहे.म्हणूनच मी लतिका चौधरी यांनी आधुनिक
अहिराणीतील बहिणाबाई’ संबोधत आहे.या
ओवीतून मनीचा अंतर्भाव प्रकटला आहे.
‘माय’ या कवितेतून आईची थोरवी सांगून झाल्यावर कवयित्री आईला अपूर्व विनंती करते,
-“तुना दिलनं कलेजं मी,तू मना जीवना उगम,
तुनासंगे लई जाय,दुन्या करस जुलूम ..”
वास्तवतेत समाजाकडून होणारा छळ असह्य
झाल्याने कवयित्री आईसोबतच वैकुंठात जाण्याची ईच्छा व्यक्त करते.जीवनातल्या दु:खास
कवयित्रीने देवाला जबाबदार ठरवून –
“माझा सुखरूपी सखा,साजन कुठे लपविला ,त्याला मी शोधून काढीन आणि दैवाला हरविन ” हा भाव ‘डाव’या कवितेत प्रकट झाला आहे.
.: ‘घर’या कवितेतून पुन्हा प्रेमभाव अविष्कार दिसून
येतो.’सुखना डोंगर’ ही रचना अप्रतिम आहे.
सूर्याला चंद्राबद्दल वाटणारी असूया यात दिसते.
“सुऱ्यालेबी वाटस मनमा, मनावर कोनी गाणं
लिखो,
चंद्रना गत कोनी नारी ,गायनीमा माले देखो”
हे सांगून झाल्यावर सर्वांना सर्व प्रकारचे सुख
कधीच मिळत नाही हे सारतत्व अधोरेखित केले
आहे.
‘भुंगानी भुरभुर ‘ही प्रतिकात्मक कविता असून
‘फुल’ आणि ‘भृंग’ हे प्रियकर प्रेयसी कल्पून, वारा
खलनायक असल्याचे दर्शविले आहे. वारा भृंगाला भेटू देत नाही.फुल मात्र वाऱ्याला हुलकावणी देताना कधी झुकूनही जाते.फुल
भृंगाला आत घेते आणि वाऱ्याचा पराभव होतो.
शेवटी नैसर्गिक न्यायतत्वाने फुल आणि भृंगाचे
मिलन होते. वाऱ्यालाही प्रेमाचे गीत गावेच लागते. ईतका अप्रतिम कल्पनाविलास या कवितेत आहे.
जीवनात पावलोपावली दुःख वाट्याला आले
,तरी कवयित्री कमालीची आशावादी आहे. कवयित्री म्हणतात, “नियतीले हाराईनी मी खदखद हासस,
चित पाडीनी दुःखले ,हिरदले मी जीकस”
जळालेले झाडही एकदा फुलून येते तर मी काळ्या रात्रीला का घाबरू? असा प्रश्न स्वतः लाच विचारत आशावाद,धैर्य,संयम दाखवत आहेत. आधुनिक काळात जगणारी,अनेकविध
संकटांशी झुंजणारी ,शाळेत मूल्यशिक्षण देणारी ही कवयित्री स्वतःलाच धीर देते. त्यासाठी तत्वज्ञानाचा आधार घेते.
“माझं दैव माले कये” असं म्हणतात तर
“पानझडना कायलेबी जानं पडस ” असं लतिका चौधरी म्हणतात. येथे दोघींमधला समान दुवा म्हणजे आत्मविश्वास, वैज्ञानिक दृष्टीकोन ,भ्रमात न राहणे, वास्तवता स्विकारणे,दौर्बल्य झटकणे हा आहे.
‘माहेरपण’ ही सर्वोत्कृष्ट कविता आहे. यातले प्रत्येक कडवे अर्थसमृद्ध आहे. रक्ताची नाती विपरीत वागली तरी त्यांचे भले होवो असे इच्छिणारी ही विशाल मनाची कवयित्री आहे.
“जीव बयीनी खाक व्हस ,दिल देस दुवा त्यासले
दुरथीन का व्हयेना ,जगोत,नांदोत,लखलाभ
त्यासले” असे भाव काव्यात मांडत मनाचा प्रांजळपणा सिध्द करते.
दुःख असह्य झाल्यावर ,जीव तोडून प्रयत्न केल्यावरही अपयश ,अवमान झाल्यावर कवयित्री आत्ममग्न होऊन शेवटी दैवालाही दोष देते.
“दिवाईले चंद्रले ववायस , लाखीले देवले लाखी भांदस ,
“देवबी कोठे मन्हा भाऊ व्हयना
वैरी बनी तो दुःखज दी र्हायना”
‘धरणीनं दुःख’ही प्रतिकात्मक कविता आहे.
स्वजीवनात काहीतरी अपेक्षित न भेटल्याने
भ्रमाचा भोपळा फुटल्याची जाणीव मनाला होते.
कवयित्री म्हणतात,”धरनी आगासनं मिलन खोटं
ऱ्हास ,आगास धरनीनं मिलन नई,तो भास ऱ्हास”
कवितेच्या प्रारंभी झाडे,दऱ्या, डोंगर,
आकाशाला भेटूच शकत नाहीत ,मात्र आकाश
स्वतः धरणीला भेटायला येते,ही कल्पना अप्रतिम
आली आहे.’नियतीना सूड’ कवितेत वैयक्तिक
जीवनातील घटनांचा संदर्भ आहे.त्या घटना गुपित
आहेत.कवयित्री लिहितात, “त्या सुखनं एक रातनं
सपन, मन्हावरी झोपमा देखायी गयं ,
ते खरं समजी रातनं कर्ज मन्हा डोकावर व्हयी गयं”
ज्याला देवमाणूस मानलं, आता प्रेमझरा लाभला अशा आनंदात सुखाने रात्रभर झोपणारी प्रेयसी
,त्या देवमाणसानेच विस्तावाचा स्पर्श दिला.तरीही
तो दुःखद स्पर्श ती हसत हसत घेऊन फिरणार
आहे ही भावनाच अजब,हृदयस्पर्शी, मनाला हेलावून सोडणारी आहे. मधूराभक्तीपेक्षाही प्रेमकर्ज चुकविण्याची रीत अनोखी आहे.यामुळे
या कवितेला अधिकच उंची आणि खोली लाभली आहे. प्रेमभंग व विरहसदृश हे काव्य हृदयाला पीळ पाडते.’काटा’या कवितेतही निसर्गप्रतिमांच्या
साहाय्याने रोजच्या जगण्यातले तत्वज्ञान कवयित्रीने मांडले आहे.
“कोना दिन बठी नई ऱ्हातस,
झोपडीना महल व्हवू सकस
फुल मुडदासंगे बवू सकस
काटा पायना निंघावर सुख वाटस”
स्वयंपाकगृहाशी निगडित प्रतिके, -‘हातधरनं’,
या कवितेत कवितेचा विषय होणं ही अपूर्व घटना
आहे.कुणाच्याही खिजगणतीत नसलेलं हातपुसनं
आपली कहाणी सांगत आहे.स्वतः कवयित्रीचे
जीवन हातधरण्यासारखे झाले आहे ही दुःखद कल्पना यात दिसते.
‘तिरंगा’च्या रुपातलं तिचं संघर्षातून वर जाणं
अतिशय सुंदर ,सूचक,प्रतिकात्मक काव्य उच
नीच ,प्रगती -अधोगती, अवमान अशी मनोव्यथा
या काव्यातून दिसून येते.”कापूस बनी वावरमा
उगनू, वात बनी देवपुढे बयनू,
दिवा बनी आंधारं दूर काढं ,ऊजायं देवाले बयनं
पडं ..”या ओळी कवयित्रीचे अध्यात्मिक भाव
,अंधार म्हणजे अज्ञान दूर करणे म्हणजे ज्ञानदान
,आणि बयनं पडं ‘हे शब्द कवयित्रीचे संसारासाठी
चंदनागत झिजणे दर्शविते.आपला सर्वांनी वापर
केला,सन्मान कुणी केलाच नाही हे दुःख अप्रत्यक्ष
पणे व्यक्त होते.
“पटी तो रंग टाकी रंगीत करं,
कोणी वयखं नई मन्ह रूप खरं
देसना तिरंगाबी मनाज बनावा
पायपुसनं, हातधरनाबी मनज बनावा”
दुर्लक्षित अशा पण सर्वांनाच उपयुक्त हातधरण्या चे साम्य स्वजीवनाशी असल्याने कवयित्रीला
अप्रत्यक्षपणे सुचवायचे आहे.’मजाक’ कविता
शिर्षकाप्रमाणे नसून वास्तवात ती गंभीर कविता
आहे. दुरावलेल्या प्रियतमाच्या आठवणीत चिंब
भिजलेली ही कविता आहे. विरह त्यात ओतप्रोत
भरला असून विरहाने कवयित्रीचे हृदय आक्रोश
करीत असलेले दिसते.
“मरन ते जित्तापणे उनं पण सरग भेटावू नई..”
अशी हतबलता येथे व्यक्त झाली आहे.’दुखनी वस्ती’ ही सर्वोत्कृष्ट रचना आहे. संपूर्ण प्रतिकात्मक रचना असे स्वरूप आहे.’हिरदना खोपा ‘,’जीवनं पाखरू’, ‘हातनं खुरपे’,पायना
नागर’,देहनं वावर’,जीवनी हेर’,रंगतनं पानी’,भावनानं खत’,कर्मनं पीक’, या प्रतिकातून
ही कविता फुलत जाते.कवयित्री म्हणतात,-
“सुन्नाट ढोरेसना घोयका आडदांड ,
दैना करी मन्हा कष्टना पिकनी..” मोठ्या कष्टाने
जीवनाची ईमारत दुष्टांनी नष्ट करावी असे दुःख
या काव्यात प्रकटले आहे.कर्मनं पीक हे प्रतिक
तत्वज्ञानाशी आपलं नातं सांगते.स्वप्नांचं पीक ‘खलनायक’वृत्तीच्या दुष्ट लोकांनी नष्ट केलं ही
दुःखद भावना या कवितेत आहे.’दुरावा’ ही कविता ना.धो.महानोरांच्या निसर्ग प्रतिकरूप
कवितांची आठवण करून देते.मनातील
विवंचना निसर्गप्रतिकांच्या आधारे कवयित्रीने
रेखाटली आहे.
“सुऱ्यानं किरन रातले नई भेटस ,चंद्रना थंडावा
दिनले नई भेटस”
“पायठनं संध्याकायले भेटनं मुस्किल,
दुरावाना दुखमा सपने छिनभिन..”
संसारात हरविलेल्या ,छिन्नभिन्न झालेल्या
स्वप्नांचे दुःख ,नशिबाचे भोग,दुःखदायक जीवन
प्रवाह या भावनांचे प्राबल्य दाखवते.एका अर्थाने
हा काव्यसंग्रह म्हणजे कवयित्रीचा कारुण्यगर्भ
जीवणगाथाच आहे.स्वजीवनाची दशा ‘मढ्या’पेक्षा वेगळी नाही. शरीर जीवंत, मन मृत
अशा बेहाल अवस्थेचे वर्णन प्रतिकात्मक अशा
‘मढं’या काव्यात आले आहे.-“मढावर भावनान्या
चिंधड्या लागण्यात….
डोळ्यात आसू व ओठावर हासू असा अभिनय करावा लागला.
लोकांना सोंगाचे दुःख कसे कळणार? शेवटी
अश्रू पिऊन जत्रा साजरी करावी लागते.देशाच्या
विविध लीला सांगतांना ‘नाव’ आणि ‘बदनामी’ सुध्दा देवच देतो असे कवयित्री म्हणते. एकांतवासाची भयानक शिक्षा नशिबी आलेल्या व्यक्तीच्या जगण्याचे वर्णन करताना कवयित्री
लिहिते.
“कायना ईस्तोले कोनी हाते नई धरस
बयस आसा ते धुक्कयबी नई निंघस”
आता दुःखाशीच नाळ जुळली आहे,सुख अपरिचित वाटायला लागले आहे.त्यामुळे
कवयित्री सुखाला बजावते ,
“म्हणीसन सांगस,तू माले चालावू नई
दुःखनं नी मन्हं सूत जमेल शे
सुखनं नी मन्ह पटाऊ नई ..”
जीवनातील दुःख वास्तवता प्रकट करताना कवयित्री लिहितात,’बदनामी’ आणि ‘बदनशीबी’
नी शिदोरी जलमताज सटीनी संगे भांदी दिन्ही,
‘बद’ काढी ,’नाव नशीब ‘कमाई ,सावसारनी नाव
किनारे लाई दिन्ही.कवयित्रीने कठोर संघर्ष करून
जिद्द व चिकाटीने प्रयत्न करून स्वतःचा लौकिक
करून दाखविला ही कौतुकाची भावना या कवितेत अविष्कृत झाली आहे.भावना जाळून
,सोंग समजून,भोवतालचे लोकं टर उडवत आहेत
.बदनामी करत आहेत.दुर्दैवाने पराभव करून
गुढी उभारली आहे.या यातनेने स्त्रीवादी जाणिवेतून वर्णन करताना कवयित्री लिहितात,
“अफवानं पुरन भरी, जीवनी कनिक रेंदी ऱ्हायनात, ईच्छा चेंदी ,सार करिसन मन्हा हालना
पाचपकवान करी खाई ऱ्हायनात.
‘अफवानं पूरन’ ,’जीवनी कनिक’ ही स्वयंपाकाशी
निगडित समर्पक अर्थवाही प्रतिके वापरून गृहिणी असलेल्या कवयित्रीने योजिली आहेत.
रात्रंदिन तिला स्वयंपाक करताना प्रतीकांचा गुणधर्म प्रत्ययास येतो. त्यातून कवयित्री त्यांच्या जीवाचे,मनाचे,भावनांचे हाल, घालमेल सांगू इच्छिते. ‘अमोस्या’ ही सुद्धा
प्रतिकात्मक कविता आहे.काळे ढग,काळी धरणी
,पाणी, चांदणं, फुल,हरीण,सूर्य,चंद्र या निसर्ग
प्रतिमांच्या साहाय्याने या कवितेत कवयित्रीने
प्रणयभाव ,विरहभाव चितारला आहे.
“भुंगाले आतुरता फुलमा कैद व्हवानी ,
रातले घाई सुऱ्याले घडीभर निजाडानी”
आमोशाले घाई घरमा चंद्रले दपाडानी….
…….अशी अनेक प्रतिमा ,उपमांची प्रेमभाव
कल्पनासमृद्ध योजना आहे.
‘चित्तानं घोंगडं’ ही सर्वाधिक सुंदर कविता आहे.
तिचा बाज कथानात्मक शैलीचा आहे. जसे-
“जंगलमा हारीन घाबरत घाबरत चरत व्हती,
जीव मूठमा धरी आथी तथी दखत पयत व्हती…
यातून एकट्याने जीवनप्रवास तिच्या मनाची
भययुक्त अवस्था दिसते.-“येडी हारीनचित्तानासंगे
दोस्ती करी बठनी ,
तिले काय म्हाइत चित्ताना रुपमा……”
या ओळी रहस्यवृद्धी दाखवतात. वाचकांची
उत्कंठा येथे ताणली जाते.
लोककथा सदृश ही कविता शेवटी रहस्यस्फोट
करते. “तुफान वारा वादय सुटनं, जंगल व्हयनं पुरं हैरान,
हारीनले ते सवय व्हती,चित्ता घाबरी व्हयना बेफाम,
वारा वादयले तोंड देत,हारीननी मन कयं पक्कं
डोकावर झाडनं पत्त पडताज ससानी चित्तानं
घोंगडं फेकं”
ज्याला बलिष्ठ ,भक्कम ,धैर्यवान चित्ता समजून
स्विकारलं, प्रत्यक्षात तो ‘ससा’ भित्रा,पळपुटा
असल्याचा दुःखद अनुभव आला.फसगत झाली.
खरे स्वरूप उलगडले.यात जीवनाचा पूर्वार्ध जो
कष्टाने साध्य केला होता तो जळून खाक झाला
हे दुःख या कवितेतून प्रकट होते.हताश,निराशा,
हतबलता या भावनांचे प्राबल्य ‘प्रेमना तारा’ या
कवितेत उमटले आहे. कोणताच दीप जीवनातला
विरहरूपी अंधार दूर करायला येत नाही.म्हणून
कवयित्री हताश होतात.
समाजात चोहीकडून केवळ दुःख मिळाल्याने
कवीमनाची अशी विदारक स्थिती झाली आहे.
हृदयाचे असंख्य तुकडे झाले आहेत.आता चंद्राची
अपेक्षाच राहिली नाही,दुःख इतके प्रिय वाटायला
लागले की कवयित्री चंद्राला म्हणते-
“मन्हं जग आंधारेल शे,आंधारेलज ऱ्हावू दे,
माले उजायं देवाना पयले,पुनीले वचन दे”
माझ्या अंधाऱ्या जगाला प्रकाशमान करू नको
आणि करायचेच असेल तर पुनीला (पौर्णिमेला)
अगोदर कल्पना दे,संमती घे,वचन घे,आणि मगच
माझे जीवन प्रकाशमान कर. कारण तुझ्या
सामर्थ्यावर ,प्रेमावर खरा अधिकार पौर्णिमेचा आहे.अमावस्या काय,बोलूनचालून अंधारी.
दुःखरूप अंधाऱ्याची सवय झालेली म्हणून
स्वाभिमानाने कुणाच्या ताटातले मला नको.
दया म्हणून तर नकोच नको.त्यापेक्षा अंधार काय
वाईट? अंधार का असेना पण स्वाभिमान गहाण
ठेवून प्रकाश(सुख) नको.ही कवयित्रीची तात्विक
भूमिका विशेषच!
‘परदेशी पाखरू’ ही कथात्मक शैलीची कविता
आहे.म्हणींची समर्पक योजना या कवितेत
उत्कृष्टपणे केली आहे. ‘उखल्लालेबी यक दिन
देव पावस ‘ या म्हणी ,तसेच ‘कुढत बसणे’,
‘गुलूगुलू हसणे’हे वाक्प्रचार कौशल्यतेने वापरलेले
आहेत. कवितेत ‘मन ‘व ‘बुद्धी’ यांचे कौतुकास्पद
द्वंद्व मांडले आहे. बुद्धी व्यावहारिक तर मन
भावनिक असते.त्यामुळे बुद्धीचा प्रभाव नेहमीचा
मनावर राहतो.’नशिबाचे भोग’ म्हणून मन कुढत
कुढत बुद्धीची सेवा करते. म्हणजे मन जाळून
जगरहाटीचे नियम पाळते. दैवयोगाने एक ‘परदेशी पाखरू’ हाती आलं.त्याची चांगली
बडदास्त ठेवली.पण शेवटी प्रखर बुद्धीसमोर
(समाज तत्वांपुढे) आपला टिकाव लागणार नाही
हे जाणून पाखरू उडून जाते. मनाला शेवटी
बुद्धीच्याच नियमानुसार चालावे लागते. जीवनात
पुन्हा शून्यच हाती येते हा भावार्थ या रूपकात्मक
कवितेतून प्रत्ययास येतो.’पोर’ ही कविता त्यातल्या त्यात प्रतिकात्मकतेमुळे व रचना
वैविध्यामुळे लक्षणीय आहे. मुलगी ,आई -वडील
सासर यांच्या दृष्टीने काय असते हे विविध प्रतिकांच्या साहाय्याने सांगितले आहे. प्रत्येक
कडव्यात प्रारंभी पोरीचे स्थान सांगून झाल्यावर
कडव्याचा शेवट ‘पोर ऱ्हास’ या शब्दांनी केला
आहे. कवयित्रीचे विवंचनापूर्ण जीवन ‘अतृप्त’
या कवितेत पुन्हा व्यक्त झाले आहे.
“मना खोपा शेनना व्हयी गया, आयुष्य त्याले नई,
राघूबी उडी गया ,जगनं …व्हयी गयं”
राघू मैनाचं प्रेममय जीवन ,त्याच्या सुखाचा खोपा
आपल्या जीवनात पारखा झाला हे शल्य या
कवितेत प्रकटले आहे.या कवितेतही म्हणींची
योजना आहे.उदा.”रंगतना नाताले आयुष्य नई,
जीव पानीना बुडबुडा’ यामुळे कविता आशयघन
झाली आहे.’सपन’ या उत्कृष्ट कवितेत पुन्हा
दुखऱ्या भावनांची, मनाच्या यातना, वेदना ,
हताशतेची अभिव्यक्ती आहे. कवयित्री लिहिते,
-“मना सपनना पावले पुढे पडाले घाबरतस,
पुढे व्हयी खाई ,सपन ते जित्ता ऱ्हावू देवो,त्यासले
सोडाना जीव व्हत नई” माझ्याच वाट्याला दुःख,
बदनामी ,अपयश,मानहानी ,विवंचना का येते?
हा कवयित्रीचा प्रश्न आहे.समुद्र पाण्याने भरलेला
, आभाळ चांदण्यांनी ओसंडलेले तरीही तहान
कशी मिटत नाही?
“नजरनी भाषा शब्दले येस नई,हिरदनं दुःख
बुद्धीले नई” ही अप्रतिम रचना कल्पनाशक्तीचा
विलास आहे.म्हणूनच ही कवयित्री एक वेगळी
कवयित्री ,प्रतिभासंपन्नता ,कल्पनाविलास कौशल्याने वापरणारी ठरते. तत्वज्ञानाचे, जीवनानुभवांचे अधिष्ठान या कवितेस असल्याने
हे वेगळेपण आले आहे.’नातं’ या कवितेत विविध
नात्यांच्या कसोट्या सांगितल्या आहेत.
“रंगतनं नातं कर्तव्यमा ,प्रेमनं नातं इस्वासमा ऱ्हास,
नातं निभावता देह न्यारा श्वास एक ऱ्हास”
हा तो जीवनानुभव! या कवितेत वास्तवाचा अविष्कार आहे. कल्पनारम्यतेला दुःखी,वंचित,
कष्टपूर्ण जीवनात स्थान तरी कसे राहील?
संपूर्ण कविता आणि कवितेवरील भाष्य, प्रतिक्रिया ,परिक्षण वाचत असता वाचकास असे वाटते की कवयित्री कुणाच्यातरी प्रेमात पडली असून तिचा प्रेमभंग झालाय.पण शेवटी ही उत्सुकता, धारणा,कल्पना पूर्णपणे बदलते. शेवटची रचना म्हणजे वाचकाला धक्काच!
भारतीय ग्रामीणसंस्कृतीत मुलींचे लवकर लग्न होते. होणारा नवरा,किंवा झालेला नवरा यांचा लग्नानंतर परिचय होतो.म्हणजेच आधी लग्न नंतर प्रेम. कोणतीही स्त्री ही अतिसंवेदनशील
असते.लग्नाच्या वेदीभोवती शपथ घेतानाच ती
मनोमन त्याला वरते. आयुष्यभर त्याच्यासाठी जगते,खपते .खाणे,पिणे आधी त्याचे मग तिचे.
कवयित्री त्याच वातावरण जन्मली,वाढली.व तेच संस्कार रुजले. लग्नानंतर तन मन धनाने नवऱ्याला जपले पण दुर्दैव! त्याला नवरा म्हणूनच काय साधे माणूस म्हणून जगता येऊ नये ह्याची खंत व्यक्त करते. त्याला कुणाचे ऐकणे ,समजून घेणे येतच नाही.
कवयित्री तरी आपले कर्तव्य, आपले नशीब म्हणून खूप सोसले, भोगले .अखेर अपयश पदरी आले त्या वेदना कवयित्री आपल्या रचनेतून, लेखनातून मांडते.
इथे मात्र वाचकाचा भ्रमनिरास झाल्याशिवाय रहात नाही. शेवटी कवयित्री परिस्थितीशी जुळवून घेते.आणि जुळवून घेताना ज्या वेदना झाल्या त्या कागदाला सांगत जाते,हलकी होत जाते.आणि शेवटी तिची तपश्चर्या फळास येते. घराला तिच्या कष्टाचे ,सोसण्याचं मोल कळतं . अखेर संसार पार पडतो. नवऱ्याला तिची किंमत कळते. जसे सोने आगीतून तावून सुलाखून निघते तशी कवयित्री आगीतून प्रवास करते.पण हे आयुष्य,अनुभूती झळाळून निघते.आणि नियतीचा सूड घेत काव्यसंग्रह तयार होतो.
गझलसदृशरचना,गेयता,लालित्यपूर्ण
शब्दकळा,अस्सल जीवनानुभव ,मांडणीतील
उत्कटता व प्रामाणिकता ,तत्वज्ञानाशी नाळ, कारुण्यरुदन ,आशावाद ,खास दोंडाईचा परिवारातील अहिराणी बोलीतील शब्दांची
योजना,म्हणी, वाक्प्रचार, विचार,भावनांची
समर्पक योजना अशा अनेकविध गुणवैशिष्ट्यांमुळे हा काव्यसंग्रह नक्कीच लोकप्रिय ठरेल हा माझा ठाम विश्वास आहे.
लतिका चौधरी यांना त्यांच्या पुढील लेखनकार्य वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/img-20240323-wa00374436373895074312784-1024x818.jpg)