मौन: असं काही तसं
मौन: असं काही तसं!
मौनातून माणसं आपला होकार अथवा नकार सोईनुसार व्यक्त करू शकतात या अर्थानं मौनं सवार्थ साधनम्! असं म्हटलं जातं. मौन उर्जादायी असतं. मौन माणसाला आत्मपरिक्षण करायला लावतं. मौनात आपण आत्मचिंतन करू शकतो. मौनात आपण स्वतःशी स्वैर संवाद करू शकतो. या आणि अशा अनेक गोष्टींसाठी मौन फायदेशीर मानलं जातं. असं असलं तरी स्वेच्छेने धरलेलं मौन आणि सक्तीनं धरावं लागलेलं मौन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची दखल आपणास घ्यावीच लागते.
मनःशांतीसाठी किंवा एकाग्रतेसाठी माणसं स्वेच्छेनं मौन धरतात. अनेक साधू, संन्याशी, अध्यात्मिक गुरु, विचारवंत अशा प्रकारचं मौन धरत असतात. अगदी काल – परवापर्यंत समाजसेवक श्री अण्णा हजारेंचं मौन चर्चेत असायचं. असं विशिष्ठ हेतूंसाठी स्वेच्छेनं धरलेलं मौन बऱ्यापैकी फायदेशीर ठरतं याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतू आपल्या आजूबाजूला रोज वावरणारी हजारो माणसं अनेकदा मूग गिळून बसतात. सख्खी भावंडं एकमेकांशी बोलत नाहीत, आईवडिल त्यांच्या मुलांशी किंवा मुलं त्यांच्या आईवडिलांशी बोलत नाहीत, पती-पत्नी एकमेकांशी बोलत नाहीत. या त्यांच्या अबोल राहण्यातून राखलं जाणारं मौन प्रत्येकवेळी स्वेच्छा मौन असतं का? तसं नसेल तर या मौनाचा आपण काय अर्थ लावायचा? या मौनाचे कोणते फायदे मिळतात? आणि ते कुणाला मिळतात? यासारख्या प्रश्नांचा दंश आपल्या मनाला होतोय की नाही?

वास्तविक विविध सामाजिक आणि मानसशास्त्रीय सिध्दांत असं स्पष्टपणे नमुद करतात की, बुद्धि, कल्पना, विचार आणि भावनांच्या स्वरुपात मिळालेल्या निसर्गदत्त शक्तीचा पर्याप्त वापर करून माणसानं अभिव्यक्त व्हायला हवं. अभिव्यक्ती ही माणसाची अतिशय महत्त्वाची मानसिक गरज आहे. मनात साचलेल्या असंख्य बऱ्या-वाईट कल्पना, विचार आणि भावनांचा या ना त्या मार्गानं निचरा होणं गरजेचं असतं. मात्र हे सगळं नीटपणे कळत असुनही अनेक माणसं अनेक प्रसंगात मौन बाळगतात. ती बोलत नाहीत. प्रतिसाद देत नाहीत किंवा प्रतिक्रियाही व्यक्त करीत नाहीत. माणसं असं अबोल आणि अव्यक्त का रहात असतील? हा खरा प्रश्न आहे.
अभ्यासांती असं लक्षात येतं की, माणसं असं अबोल आणि अव्यक्त राहण्याची दोन मुख्य कारणं असतात. एक म्हणजे बऱ्याच माणसांना अभिव्यक्त होण्यासाठी लागणाऱ्या विशिष्ठ भावनांचं व्यवस्थापन नेमकेपणानं करता येत नाही. भाषेची अडचण असते. नेमके शब्द निवडता येत नाहीत. मान मर्यांदांचं उल्लंघन होईल किंवा आपल्याकडून काही चूक होईल अशी भीती वाटते. कधी कधी आपला संकोची स्वभाव आडवा येतो. दुसरं म्हणजे अनेक माणसांना व्यक्त व्हायला अनुकूल अशी जागाच उपलब्ध होत नाही.
काय आणि कसं बोलायचं हे चांगलं ठाऊक असुनही कुणाजवळ बोलायचं? याचं उत्तर मिळत नाही. या दोन्ही प्रकारच्या लोकांना व्यक्त होता येत नाही. अशावेळी माणसाला सक्तीचं मौन राखावं लागतं. सक्तीनं राखलेल्या या मौनात माणसं वरून अबोल दिसत असली तरी त्यांच्या आत मात्र मोठी खळबळ सुरु असते. त्यातून आतल्या आत प्रचंड उलथापालथ होत असते. या खळबळीचा आणि उलथापालथीचा मनोशारिरीक स्वरुपाचा मोठा परिणाम अशा माणसांवर होत असतो. परिणामी त्यांची स्वप्रतिमा बाधित होते. त्यांचे विचार बाधित होतात आणि अंतिमतः त्यांचे वर्तनही बाधित होते.
जेव्हा एखाद्या गैरसमजामुळे मनाला ठेच लागते, स्वाभिमान डिवचला जातो किंवा भावना दुःखावली जाते तेव्हा माणसाचा क्रोध अनावर होतो. त्यावर धीर, धैर्य आणि संयमाचं पांघरून घालून त्या उसळणाऱ्या क्रोधाला कुणी कितीही आवरलं तरी मनावर उमटलेले दुःखाचे चरे मिटत नाहीत. हे दुःखाचे चरे भरून काढण्यासाठी माणसं मौन होतात. या मौनाखाली मोठी आग धुमसत असते. आदर, प्रेम, विश्वास, स्नेह आणि आपुलकी यासारख्या महत्त्वाच्या जीवनदायी गोष्टी या आगीत होरपळणार नाहीत याची खबरदारी घ्यावीच लागते नाहीतर मैत्री आणि नात्यांचे बंध तुटायला एक क्षणही पुरेसा ठर शकतो.
कधी कधी या मौनात माणसं इतकं काही गिळून टाकतात की, काही शिल्लकच राहत नाही! फक्त डोळ्यांत थांबलेलं पाणी आणि ओठांची थरथर तेवढीच मागे उरते. त्यांचं स्वत्व देखील त्यांनी गिळून घेतलेलं असतं. आपली अगतिकता व हतबलता झाकण्यासाठी त्यांनी हा तोट्यातला सौदा केलेला असतो. एखादा संबंध किंवा एखादं नातं वाचवण्यासाठी त्यांनी ही खूप मोठी किंमत दिलेली असते. अशावेळी माणसानं धरलेलं मौन आतून “का असं बोललं गेलं?” किंवा “का समजून घेतलं नाही?” किंवा “का मला ऐकून घेतलं नाही?” असे सवाल विचारीत अक्षरशः आक्रंदत असतं!
त्याक्षणी आपण आपल्या मनाच्या खोल कप्प्यात असलेल्या अशा असंख्य प्रश्नांना गप्प बसायला सांगतो. हे सगळे प्रश्न मनात तसेच ठेऊन आपण हसायचा प्रयत्न करतो. त्या आपल्या हसण्यामागे हे नातं संपू नये ही एकच आशा असते. ही आशाच आपल्याला हतबल करते, अगतिक करीत असते. आपण गप्प राहतो, कारण बोलून चित्र बदलणार नाही हे आपल्याला माहीत असतं. कदाचित आपण बोलल्यावर जे आहे, तेही आपल्या हातातून निघून जाईल आणि आपल्याला नातं आणि मनःशांती या दोन्ही गोष्टी गमवाव्या लागतील ही भीती आपल्याला छळत असते. समोरून अनुकूल प्रतिसाद मिळावा अशी आशा आपण बाळगल्यावर समोरून मिळणारा प्रतिसाद मौन असेल तर आपल्याला मौन धरण्यावाचून अन्य कोणताच पर्याय उरत नाही.
शेवटी आपण इतकंच लक्षात घ्यायला हवं की, मौन हे जसं बळाचं, प्रेमाचं, होकाराचं आणि आशेचं प्रतिक असतं तसंच ते दुर्बलतेचं, त्यागाचं, रागाचं, नकाराचं आणि निराशेचंही प्रतिक असतं. आपल्याला ते नेमकं ओळखता आलं पाहिजे.
लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहिल्यानगर, संपर्क: 9766668295