श्रावण मराठी कविता
Table of Contents
श्रावण प्याला!
श्रावण आला ये सखये
जीव कावला गे सखये
वर्षा मोहीत करते बघ
अंग भिजव चल ये सखये
कळ्या फुलांनी वन सजले
बावरले मन ये सखये
उंच डोंगर गहिवरले
सोड अबोला हे सखये
निर्झर वाहे झरझरझर
चल आलिंगन दे सखये
वेल बिलगली वृक्षाला
घट्ट बिलगना हे सखये
सप्तरंगी बघ इंद्रधनू
प्रणय अंबरी ने सखये
चिंब चिंब हे तन भिजले
पांघर कुंतल गे सखये
लालबुंद हे अधर मधुर
चाखायाला दे सखये
मयुर नाचती धुंद जिथे
नर्तन करण्या ने सखये
शृंगाराला सज्ज ‘किरण’
श्रावण प्याला दे सखये
शिवाजी साळुंके,’किरण’
हल्ली मुक्काम- नाशिक

श्रावण धारा
श्रावण धारा :
“”””””””””””””””””””
ऊन सावली, खेळ खेळता,
अवचित येती, श्रावण धारा.
रिमझिम सर सर, बरसतांना,
अवखळ होती, श्रावणधारा.
घन अमृताचे, करून रिते,
चिंब भिजवती, श्रावणधारा.
हिरवा शालू, भूमातेला,
लेवून जाती, श्रावणधारा.
व्यथा वेदना, पळवूनी नेती,
मनोहारी त्या, श्रावणधारा.
जगण्यासाठी, नवसंजीवन,
पेरून जाती, श्रावणधारा.
© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३)

येरे पाऊस श्रावणी
🌦येरे पाऊस श्रावणी🌦
आला म्हणता आलास
आला पाऊस श्रावणी
पाण्यासाठी नको आम्हा
फिरवूस रानीवनी॥धृ॥
नदी नाले धरणेही
देरे तुडुंब भरुनी
तुझी राहिन रे ऋणी
मीही माझीही धरणी॥१॥
धरा माझी तहानली
बघ जरा रे अजुनी
आस तिलाही तुझीच
तृप्त तिला जा करुनी॥२॥
बोलावते कविताही
तिची ऐक बोलावणी
शब्द तिचे घे ऐकूनी
नको आता भुलावणी॥३॥
तुझी झिमझिम झारी
झरझरची झरणी
अशी चालू दे फिरुनी
येरे पाऊस श्रावणी॥४॥
पुर महापुरास रे
येेरे दुरुच सारुनी
सरो आता वनवास
नको दुष्काळ फिरुनी॥५॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
मो. नं. ९३७१९०२३०३.
🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦🌦
