श्रावण म्हणजे

श्रावण म्हणजे
श्रावण म्हणजे

श्रावण म्हणजे

श्रावण म्हणजे निसर्गाच्या
कुशीतले एक मधुर गीत

**************************
सण उत्सवांना आपल्या भारतीय संस्कृतीच प्रतीक  म्हटले गेले आहे. शिवाय हिंदू धर्मामध्ये सण व्रतवैकल्ये, उपवास पुजापाठ याला खूप महत्त्व दिले गेले आहे.देव देवतांपासून,तर आपल्या आजोबा पंजोबा त्याच्याही आधीपासून तर आतापर्यंत चालत आलेली धार्मिक सण उत्सवांची परंपरा मोठ्या भक्तिभावाने साजरा करत आहोत.काळ बदलला त्यामुळे सण उत्सवातही काहीसा बदल जाणवतो.नव्या पिढीला अर्थात आजच्या काळातील माणसांना सण उत्सवा बद्दल कदाचीत फारसं काही माहीत नसले तरी सण उत्सवाची परंपरा प्रत्येक घराघरात टिकून आहे. हि फार मोठी जमेची बाजू म्हणावी. जून महिना संपला की सणांना सुरवात होते.म्हणजे श्रावण सुरू झाला  की जणूकाही नवचैतन्य निर्माण होते एक उत्साही वातावरणाचं वलय आपल्या अवतीभोवती फिरत असतं.

श्रावणाच्या गारव्यात
मन शहारून जाते
हिरवी हिरवी हिरवळ
हळूच भुरळ घालते

अशी काही अवस्था श्रावणात होते या दिवसात मन अगदी प्रसन्न असतं प्रत्येकाच्या घरात टवटवीत चैतन्यमय वातावरण निर्माण होतं सगळी कडे पोथी पारायण भागवतकथा किर्तन हरी पाठांच वाचन असतं दानधर्म करून एक धार्मिक सेवा करत असतो.चोहीकडे जशी श्रावणाची हिरवळ भूरळ घालते तसेच आपल्या घरातील परिसरातील अवती भोवतीचे वातावरण उत्साही होते.श्रावण आला की  रक्षाबंधन,गणपती,दिवाळी,दसरा हरतालीका पोळा म्हणजे सणा उत्सवांचा महोत्सव वर्षाअखेर प्रयत्न सुरूच रहातो.

खरतर श्रावण हा फक्त ऋतू नसून आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि सौंदर्याचा सण आहे त्यामुळे त्यात सण,निसर्ग,भक्ती आणि पारंपरिक प्रथेचा हळवा भावस्पर्श या काळात जाणवतो.अर्थात श्रावण म्हणजे निसर्ग,नाते,आणि भक्तीने भरलेला,भावनांनी ओथंबलेला  सणांनी सजलेला उत्सवमय महिना.

पावसाने चिंब झालेली माती, आकाशातून बरसणारा पाऊस,आणि निसर्गाने निर्माण केलेली हिरवळीची शाल सगळं काही मनाला उत्साहीत करत असतं.जुलै ऑगस्टचा महीना म्हटलं म्हणजे पावसाच्या सरींनी चिंब चिंब भिजलेली माती डोंगरमाथ्यांवरून खाली झेपावणारे धबधबे,मातीचा मृदगंध,गंधाळलेला वारा आणि चहाच्या कपात सांडलेले क्षण सारेकाही दैदिप्यमान असतं जणूकाही श्रावणात निसर्ग स्वतःला नव्याने साजरा करत असतो.म्हणून तर या महिन्यात भगवान शंकराची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते.

श्रावण म्हणजे
श्रावण म्हणजे

श्रावण म्हणजे स्त्रियांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते भक्तीमय वातावरणाला आणखीन प्रभावीत करण्यासाठी.मनात लपलेला उत्साह द्विगुणित करण्यासाठी नव्या साड्या,हिरव्या बांगड्या, केसांत गजरा,आणि गाणं म्हणता म्हणता सौंदर्य,स्नेहाचे भाव चेहऱ्यावर, दिसतात.श्रावणात जरी झाडं नवी फुललेली असली,पावसाने रस्ता चिंब झाले असले,तरी मनात कुठंतरी साठवलेल्या जुन्या आठवणीत मन  पुन्हा हरवून जाते वाफाळलेला गरम गरम भजींचा आस्वाद खिडकीत बसून पाहिलेला पाऊस, आणि मागे वळून बघणारी एखादी व्यक्ती खरचं श्रावणात प्रत्येक गोष्ट भावनिक असते.

म्हणून “श्रावण म्हणजे नुसता पाऊस नाही तर तो भूतकाळाच्या सरींमध्ये भिजलेला वर्तमान आहे.”या श्रावणात संस्कृतीचा उत्सव होतो तर निसर्गाची कविता जन्माला येते. श्रावण आपल्याला शांततेच्या मार्गावर नेतो, परंपरांशी जोडतो आणि मनाला नव्याने उत्साहीत करतो.हा महिना भाव भक्तीचा,आध्यात्मिक श्रध्देचा मार्ग दाखवतो.श्रावण प्रत्येक व्यक्तीला ध्यानधारणा नामस्मरण करण्याची प्रेरणा देत असत़ो.आणि  काहीतरी नविन शिकवण देऊन पुढे चालायला शिकवतो.खरतर श्रावणा बद्दल किती आणि काय लिहावं अक्षरशः

मन वेडावून जाते
मन शहारून जाते
भारावलेले मन
गंध फुलांसारखे दरवळते
कळेना कधी केव्हा
मन कुठे हरवून जाते
झुळूक गारव्याची
हळुच मिठीत घेते

   
खरं आहे ना पावसाच्या सरी धावून आल्या की हिरव्यागार डोंगरांची हिरवी हिरवळी डोळ्यात भरून घ्यावीशी वाटते.म्हणून कवी आपल्या काव्यातून श्रावण  निसर्गाच्या कुशीतले एक मधुर गीत असा उल्लेख करतो.आपल्या पुर्वजांनी म्हटलच आहे की श्रावण महिना म्हणजे निसर्गाचं उत्सवमूर्ती रूप दरवळणाऱ्या मातीपासून ते आकाशातल्या इंद्रधनुष्यापर्यंत सगळं काही जसं नव्यानं जन्म घेतं.पावसाच्या रिमझिम सरी मनाला नवे अर्थ देतात. हिरवागार शालू नेसलेल्या डोंगरदऱ्या, वाहणारे झरे,आणि ओलसर वाऱ्याचं गाणं हे सगळं मनाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातं.श्रावण म्हणजे भक्तीची आर्त हाक.महादेवाच्या चरणी ओढ, सोमवारचे उपवास, हर हर महादेवच्या गजराने भारलेली वातावरणं…

कधी घरातल्या तुळशीचं पूजन,कधी नारळी पौर्णिमेचं उत्सवमय रंग हा म्हणून महिन्यात श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम असतो.आणि हो, श्रावण म्हणजे प्रेमही,कोवळ्या आठवणी, हाताच्या ओंजळीत घेतलेले पावसाचे थेंब,आणि सळसळत्या सरीत.मनातल्या भावना या ऋतूत अधिक स्पष्ट होतात,अधिक बोलक्या होतात.श्रावण निसर्ग,भक्ती आणि मनाचा संवाद स्पष्ट करत असतो.म्हणून हा महिना फक्त एक ऋतू नाही तर तो आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा, आणि भावनेचा उत्सव आहे.

संजय धनगव्हाळ
अर्थात कुसुमाई
९४२२८९२६१८
९५७९११३५४७