मनाची मुंबई का तुंबते? मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्य

मनाची मुंबई का तुंबते? मानसिक आरोग्य

मनाची मुंबई का तुंबते?

मुंबई तुंबली! अशा अर्थाच्या बातम्या आपल्याला दरवर्षी जून-जुलैच्या पावसात वाचायला व ऐकायला मिळतात. अशा बातम्या आल्या की, राजकीय आरोपांची राळ उडते. विरोधक आक्रमक होऊन सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढतात. त्यानंतर मुंबईचे प्रशासन हलते आणि त्यांच्याकडून तुंबलेली मुंबई मोकळी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलून कारवाई करण्यात येते. त्यानंतर तुंबलेली मुंबई आता मोकळी झाली! अशा अर्थाच्या बातम्या प्रसारित होतात. हे दरवर्षी अगदी असंच घडत राहतं.

मुंबई का तुंबते? या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे? याचा अभ्यास केल्यावर आपल्याला कळतं की, मुंबई हे अरबी समुद्राच्या कुशीत वसलेल्या विविध बेटांचं मिळून बनलेलं एक मोठं शहर आहे. या शहराचं सांडपाणी आणि मैला वाहून जाण्यासाठी समुद्राशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पावसाळ्यापूर्वी ही सांडपाण्याची गटारे पुरेशी स्वच्छ केलेली नसतील आउटलेट जाम होतो आणि मुंबई तुंबते!

मित्रहो, आपल्या मनाची मुंबईदेखील अनेकदा अशीच तुंबत असते. फरक इतकाच त्याची कुठेही बातमी येत नाही. जरी आलीच बातमी, तरी त्यावरून कुणाला जबाबदार धरलं जात नाही. कुणावरही आरोपांची राळ उडत नाही किंवा कुणी काही कारवाईसुद्धा करीत नाहीत. असं का होतं? हे समजून घेता यावं यासाठी आपल्याला प्रथम मनाची मुंबई म्हणजे काय? हे समजून घ्यावं लागेल. आपल्या मनाची मुंबई तुंबते म्हणजे नेमकं काय होतं? ती का तुंबते? त्याचे आपल्या रोजच्या जगण्यावर काय दुष्परिणाम होतात? ते टाळण्यासाठी आपण कोणती उपाय योजना करायला हवी? यासारख्या काही प्रश्नांचा धांडोळा आपणास जाणीवपूर्वक घ्यावा लागेल.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जा असलेलं मेट्रो शहर आहे. तिथं जगभरातल्या विविध जाती, धर्म, वंश, वर्ग व भाषेचे भिन्न उत्पन्न गटातले चांगले-वाईट लोक राहतात. आपल्या मनाचंही अगदी तसंच आहे. आपलं मनही एक असं ठिकाण आहे, जिथे चांगल्या-वाईट प्रकारच्या विविध इच्छा, आकांक्षा, वृत्ती, प्रवृत्ती, मतं, कल्पना, विचार आणि भावना निवास करीत असतात.

या साधर्म्यातूनच मला मनाची मुंबई ही संकल्पना सुचली आहे. ही आपल्या मनाची मुंबई अनेकदा तुंबत असते. बरेचदा ती तुंबली आहे हे आपल्याला सहजपणे कळून येत नाही. त्यामुळे आपल्याकडून त्यासाठी करावयाच्या उपायांचा विचारही केला जात नाही. त्यातून अनर्थ होतो आणि मग नकोशा असलेल्या अप्रिय घटना घडतात. कधी कधी आपल्या मनाची मुंबई तुंबली आहे हे आपल्याला कळत असतं; पण त्यावर नेमका इलाज काय करायचा? हे आपल्याला ठाऊक नसतं. कधी कधी इलाज ठाऊक असूनही तो करता येत नाही. आपण हतबल आणि अगतिक होतो. या गर्तेतून बाहेर कसं पडायचं ते आपल्याला मुळीच समजत नाही.

एकमेकांशी तुलना किंवा स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात आपली आवड, इच्छा आणि गरजांबाबत अनेकदा आपण थोडं सैल होऊन वागत असतो. असं करताना आपण तथ्य आणि सत्य यांचा फारसा आग्रह न धरता मुखवटे धारण करून स्वतःला जगापुढे सादर करीत असतो. वर नमुद केल्याप्रमाणं एखाद्या क्षणी जेव्हा आपण अगतिक होतो तेव्हा आपले हे मुखवटे गळून पडतात. आजवर मिथ्यांच्या आड लपवलेलं सत्य समोर येतं, तेव्हा त्याला झाकण्याचे आपले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. विशेषतः

आपण जमवलेल्या सत्ता आणि संपत्तीच्या बळावर प्रेम, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा यातलं काहीच मिळत नाही किंवा मिळवता येत नाही, तेव्हा आपण संपूर्ण उघडे पडतो. अशावेळी आपल्याला आपल्या मनातली ही सल व्यक्त व्यक्त करावीशी वाटते; पण दुर्दैवानं आपण तसं काही करू शकत नाहीत. आपण ज्याच्याजवळ मोकळेपणानं व्यक्त व्हावं अशी माणसं आपल्याला भोवतालच्या कोणत्याच परिप्रेक्षात सापडत नाहीत.

स्पर्धा आणि तुलनेमुळं समोरच्या व्यक्ती किंवा समूहाच्या मनात आपल्याबद्दल मत्सर किंवा असूया निर्माण होईल किंवा आपलं अपयश उघडं पडेल आणि आपलं हसू होईल, या भीतीनं आपण आपल्या जवळच्या, नात्यातल्या कुणाशीही बोलत नाहीत. आपलं दुःख, आपली अडचण, आपला प्रश्न कोणत्याही स्वरुपात व्यक्त होऊ देत नाहीत.  माणसं एकमेकांचं अंतर राखण्याऐवजी एकमेकांत अंतर राखू लागतात. परिणामी आपली सल मनात रुतून बसते. मनात रुतून बसलेली ही सल प्रचंड वेदनादायक असते. या वेदनेच्या पोटातून स्त्रवणारं दुःख अधुनमधुन कळा मारत रहातं. त्यानं त्याची तीव्रता अधिक वाढते. आपल्याला कुणाशी बोलताच येत नाही. हळूहळू ही वरवर दिसायला फार छोटी असणारी बाब मोठं आणि गंभीर स्वरूप धारण करते. त्यावेळी परिस्थिती आपल्या नियंत्रणात रहात नाही.

हुकूमशाहीचा प्रनेता असलेल्या हिटलरपासून मातेसमान कनवाळू असलेल्या साने गुरुजींपर्यंत अनेकांच्या आयुष्यात हे असंच घडलं आहे. लोणावळ्याच्या मन:शक्ती केंद्राचे स्वामी विज्ञानानंद, आध्यात्मिक गुरु अशी ओळख असलेले भैय्युजी महाराज, पॉझिटिव्ह विचार देणारे चित्रपट करणारा अभिनेता सुशांतसिंग राजपुत, नैराश्याशी लढा कसा द्यायचा? हे शिकवणाऱ्या शीतल आमटे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम ही काही ठळक उदाहरणं आहेत, ज्यांना व्यक्त होता आलं नाही आणि परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. व्यक्त होण्यासाठी कोणतंही आउटलेट नसलेली ही माणसं माणसांच्या गर्दीत वावरत असली तरी आतून खूप एकाकी झालेली असतात. अशा एकाकी झालेल्या माणसांच्या इच्छा, आकांक्षा, वृत्ती, प्रवृत्ती, मतं, कल्पना, विचार आणि भावना यांचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे त्यांच्या मनाची मुंबई तुंबते!

मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्य

दुर्दैवानं सध्या ‘एकही जवळचा मित्र नाही’ असं सांगणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. सामाजिक संबंध वाढविणारे उपक्रम व असे उपक्रम राबविणाऱ्या संस्था कमी झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली आलेला माणूस स्वकेंद्री होत चालला आहे. खरंतर माणसाचं माणुसपण हरवलं असुन त्याचं फक्त एक मशीन बनलं आहे. मैत्रीमुळे माणसांचं मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारतं असं संशोधनाअंती सिद्ध झालं असुन तुमचे निकटवर्तीय संबंध आणि मैत्री ही तुमच्या आनंदी जीवनाचं महत्त्वाचं लक्षण असल्याचं दिसुन आलं आहे.

एकीकडे सत्ता, पद, प्रतिष्ठा, प्रसिध्दी यामुळे माणसाचं आऊटलेट आकुंचन पावतं. ग्लॅमरस व्यक्तीला आपला दिखावा जपावाच लागतो. त्यामुळं मोकळं बोलता येत नाही. दुसरीकडे शोषित, वंचित, दुर्लक्षित आणि गरिब लोकांना असं आउटलेट मुळी उपलब्धच नसतं. याचा अर्थ इतकाच की गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना आउटलेट नसणं हीच खरी समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीला हे आउटलेट उपलब्ध असायला हवं; पण ते उपलब्ध करण्याची जबाबदारी दुसऱ्या कुणाची थोडीच आहे? ज्यानं त्यानं आपलं आउटलेट निर्माण केलं पाहिजे. ते प्रयत्नपूर्वक जपलं पाहिजे आणि नियमितपणे तरीही पुरेसा संयम राखूनच त्याचा उपयोग केला पाहिजे. माणसा-माणसांतला संवाद हा जर सुसंवाद ठरला तर त्या सुसंवादातूनच या आउटलेटची पायाभरणी होते.

त्याने संबंध प्रस्थापित होतात. या संबंधातल्या व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात. हे संबंध जितके अधिक मैत्रीपूर्ण असतील तितके त्यांच्यात अधिक चांगले ऋणानुबंध निर्माण होतात. आपल्या मनाची मुंबई तुंबू द्यायची नसेल तर आपले सामाजिक संबंध अधिक सुदृढ रहायला हवेत. आपली मित्रयादी वाढायला हवी. त्यांच्याशी आपले ऋणानुबंध जडायला हवेत. थोडक्यात “भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे!” हे पसायदानातलं ज्ञानेश्वर माऊलींचं मागणं प्रत्यक्षात उतरायला हवं!

#लेखक#
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहिल्यानगर, संपर्क: 9766668295