हिंसेची पाळंमूळं नष्ट करायला हवीत

हिंसा
हिंसा

हिंसेची पाळंमूळं नष्ट करायला हवीत

हिंसेची पाळंमूळं नष्ट करायला हवीत!

“बुद्ध हवाच!” असं उच्च रवानं सांगणाऱ्या माणसाच्या समग्र जीवनाला युद्धाचा खूप मोठा इतिहास आहे. आजवर जगभरात झालेल्या सर्व लहान-मोठ्या लढाया आणि युद्धांत मोठा हिंसाचार झालेला आहे. स्वतःला विकसित म्हणवणारी अनेक राष्ट्रं इतर विकसनशील किंवा अविकसित देशांनी आपापसात नेहमी झुंजत रहावं असा नियोजनपूर्वक प्रयत्न सतत करीत असतात. त्यांच्या या प्रयत्नातून अनेक अतिरेकी निर्माण झाले आहेत. त्यांच्या अतिरेकी कारवायांमुळे जगभर दहशतवाद फोफावला आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या हेतूने अनेक क्रांतीकारक व त्यांच्या संघटना आपापल्या कुवतीनुसार जमेल तशी हिंसा करीत असतात. गंमत म्हणजे “जगात शांती नांदली पाहिजे!” असं म्हणत आपल्या सत्तेचा विस्तार व्हावा यासाठी दुर्बलांचं प्रचंड शोषण करण्यात येतं.

हिंसेची
हिंसेची

अलिकडच्या काळात हिंसाचारानं जगभर थैमान घातलं आहे. भारत-पाकिस्तान, युक्रेन-रशिया, इस्त्रायल-इराण यांच्यातली युद्धं ही हिंसाचाराची काही ताजी आणि निवडक उदाहरणं आहेत. जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये अशी अनेक युद्धं झालेली आहेत, होत आहेत आणि पुढेही ती होत राहणार आहेत. त्यातून अपरिहार्यपणे मोठा हिंसाचार झाला आहे, होत आहे आणि पुढेही तो होत राहणार आहे!

राष्ट्रांतर्गत पातळीवर धर्म, जात व वर्गाच्या आधारे सत्तेचा सारीपाट सहज जिंकता यावा म्हणन “बटेंगे तो कटेंगे” यासारख्या घोषणा दिल्या जातात. मतांचं ध्रुवीकरण करण्याच्या नादात सामान्य जनतेला दोन वेगळ्या ध्रुवांवर नेऊन ठेवणारी चिथावणीखोर भाषणे केली जातात. सत्तेचा गैरवापर करीत विरोधकांचा आवाज दाबला जातो. संविधान पायदळी तुडवीत सत्तेचे राखण करणारे कायदे निर्माण केले जातात.

भाषा व प्रांतिक अस्मितेच्या नावाखाली मतांचा जोगवा मागत भावनांशी खेळलं जातं. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांचे नाव घेऊन जनतेला फसवलं जातं. कहर म्हणजे “राजकारणात कुणीही कुणाचा मित्र वा शत्रु नसतो!” असं म्हणत स्वतःला शाबूत ठेऊन जनतेची माथी मात्र भडकावली जातात. अशावेळी सामान्य जनता एखाद्या अविचाराला बळी पडल्यामुळे जातीय व धार्मिक तेढ निर्माण झाल्यानंतर होणारी दंगल, जाळपोळ ही केवळ हिंसा करणारी असते. सरकार कोणाचंही असो, कोणत्याही पक्षाचं वा विचारसरणीचं असो, या सर्व गोष्टी आजवर आपल्या देशात कमी अधिक प्रमाणात घडत आल्या आहेत, घडत आहेत आणि तशा त्या यापुढेही घडत राहणार आहेत!

केवळ एखाद्याला शारिरीक इजा करणे, मारहाण करणे, शारिरीक अथवा मानसिक छळ करणे किंवा एखाद्याचा जीव घेणे म्हणजे हिंसा होय. असे आपणास म्हणता येणार नाही. हा हिंसेचा अतिशय वरवरचा व उथळ असा अर्थ होईल. आपण हे नीट समजून घ्यायला हवं. एखादी व्यक्ती, समूह किंवा समुदायाच्या इच्छा मारून टाकणं, त्यांचं दमन करणं, त्यांच्या स्वप्नांची राख-रांगोळी करणे, त्यांची स्वप्नं उध्वस्त करणं, त्यांना फसवणं, लुटणं, त्यांचे कष्ट चोरणं किंवा त्यांच्या कष्टाचं मोल त्यांना मिळू न देणं, त्यांचे हक्क हिरावून घेणं, त्यांचे अधिकार गोठवणं, त्यांच्यावर अनेक वेगवेगळ्या मार्गांनी बंधनं घालणं आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा संकोच करणं ही देखील हिंसाच आहे! गंमत म्हणजे जगातले सर्व देश ही अशा प्रकारची हिंसा करण्यात अग्रेसर आहेत.

लाखो वर्षांच्या मानवी जीवनप्रवासात शिक्षणाचे अनेक प्रवाह आले, आधुनिकता आली, विज्ञान आले, अध्यात्म आले, देवधर्म आले, विवाह, कुटूंब, शासन, प्रशासन यासारख्या अनेक संस्था आल्या. त्यांच्या माध्यमातून संस्कार आले, नियम आले, अटी आल्या, शर्ती आल्या, कायदे आले. इतकं सगळं अस्तित्वात आल्यानंतरही मानवी जगण्यातली हिंसा जराही कमी झालेली नाही. असं का झालं असावं? हा खरा प्रश्न आहे.

हिंसेची
हिंसेची

आपला संपूर्ण समाज प्रदेश, जाती, धर्म, वंश, वर्ग, शिक्षण, व्यवसाय, वय, उत्पन्न, लिंग, लोकसंख्या व संघटन यासारख्या अनेक गोष्टींच्या आधारे विभाजित करण्यात आला आहे. हे विभाजन माणसा-माणसांत मोठा भेदभाव निर्माण करणारे आहे. हा भेदभाव कायम टिकवून ठेवणाऱ्या अनेक प्रथा, परंपरा, चालीरिती, आणि लिखित व अलिखित स्वरुपाचे संकेत समाजात प्रचलीत आहेत. त्यांच्याच आधाराने वृद्ध, अपंग, स्त्रिया, दलित, आदिवासी, भूमीहिन, मजूर, अल्प भूधारक यासारख्या समाजघटकांना वंचित ठेवले जाते. त्यांचे शोषण केले जाते. अस्तित्व आणि सत्ता यांच्याशी निगडीत असलेल्या अनेक बऱ्या-वाईट धारणा याच्या मुळाशी असल्याचे दिसते.

त्यामुळे हे भेदभाव कायम असेच टिकून राहिले पाहिजेत अशीच शिक्षण, अध्यात्म, व्यापार, उद्योग, शासन व प्रशासन अशा सर्व क्षेत्रातल्या जागतिक पटलावरील सर्व सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. विवाह, कुटूंब, शाळा, समाज, शासन आणि प्रशासन यासारख्या कित्येक सामाजिक संरचना मानवी प्रगतीचे द्योतक म्हणून उभ्या राहिलेल्या आपणास दिसत असल्या तरी त्या सर्वांची कार्ये हिंसेला जन्म देणारी अशीच आहेत.

शिक्षण, रोजगार, राजकारण, समाजकारण, अर्थकारण या प्रत्येकाच्या मुळात हिंसा आहे. तुम्हाला जे आणि जसं शिकायचं आहे ते तसं शिकू दिलं जात नाही! तुमच्यातल्या क्षमतांचा तुमच्या शिक्षणासाठी वापर करू दिला जात नाही. तुमच्याकडची कौशल्ये शिक्षणासाठी वापरली जात नाहीत. तुम्हाला हव्या असलेल्या विचारांची माणसं सत्तेवर येत नाहीत. आली तरी मिळालेली सत्ता टिकविणं हाच त्यांचा एकमेव अजेंडा उरतो आणि ती माणसं तुमचं पोषण करणारे निर्णय घेण्याऐवजी तुमचं शोषण करणारेच निर्णय घेतात! इतकंच काय जन्मदाते मायबापही आपल्या मुलांचे पालक नव्हे तर मालक बनुन राहातात.

आपल्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा त्यांच्यावर लादून मुलांच्या इच्छा-आकांशांचा बळी घेतात! त्यांनी काय खावे? काय प्यावे? काय ल्यावे? कुणाशी मैत्री करावी? कुणाशी करू नये? कोणत्या शाळेत जावं? कोणतं शिक्षण घ्यावं? याविषयीचे आपल्या धारणांवर आधारीत असणारे नियम तयार करून त्यानुसार मुलांना वागवलं जातं. मुला-मुलींनी लग्न कधी करावं?, कुणाशी करावं? कसं करावं? याबाबतही मुलांचे पालक नेहमी त्यांच्या मालकाचीच भूमिका वठवत असतात. संस्काराच्या नावाखाली या यमनियमांचं कठोर पालन करताना मुलांच्या अंगभूत क्षमता मारून टाकल्या जातात. तुमच्या-आमच्या घरात वा कुटूंबात रोज घडणारी ही अत्यंत मोठी हिंसा आहे.

मानवी जीवनातल्या वाढत्या हिंसेची पाळं-मुळं नेमकी कुठे आहेत? हे शोधण्याचा प्रयत्न करताना एक गोष्ट ठळकपणे आपल्या दृष्टीपथात येते ती ही की, माणूस हा मूळातच एक हिंस्त्र प्राणी असुन हिंसाचार हा त्याच्या स्वभावाचा इनबिल्ट असा एक पैलू आहे. माणसाच्या ठायी असणारे काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे षडरिपू हीच या हिंसेची खरी पाळं-मूळं आहेत. ती ओळखून आपण प्रयत्नपूर्वक नष्ट करायला हवीत. “हिंसा हे माणसाचे वास्तव आहे!” हे लक्षात घेऊनच माणसातील ही हिंसा कमी करण्याच्या दृष्टीने संतश्रेष्ठांनी व अनेक सामाजिक विचारवंतांनी अहिंसेची कल्पना मांडली व तिच्या प्रचार आणि प्रसारासाठी माणसाला त्याच्यातलं प्रेम जागृत करायला शिकवलं.

“अहिंसा परमो धर्म” असं म्हणत महात्मा गांधींनी सर्व जगाला अहिंसेच्या वाटेवरून चालण्याचा इतका कठोर आग्रह केला की, अहिंसा हीच गांधींची ओळख बनली. या अहिंसेच्या वाटेवरून ते स्वतः अविरत चालत राहिले आणि करोडो भारतीयांची त्यांना भक्कम साथ मिळाली. परिणामी इंग्रजी सत्तेच्या शेकडो वर्षांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र होऊ शकला. अहिंसा ही माणसाची कल्पना आहे व कल्पना ही वास्तवाहून सुंदर असू शकते! यावर आपण विश्वास ठेवायला हवा. याच विश्वासाने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पसायदानात “जो जे वांछिल तो ते लाहो” अशी प्रार्थना विश्वात्मकाकडे केली तर साने गुरुजींनी आपल्या काव्यात “जगाला प्रेम अर्पावे!” असा आग्रह सर्व जनसामान्यांकडे धरला याचं भान आपण नक्कीच ठेवायला हवं.

लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहिल्यानगर, संपर्क: 9766668295