सावळीरामजी व्यक्तिमत्व लेख विशेष
अंतर्यात्रेचा अक्षरयात्री,
सावळीरामजी तिदमे :
आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने,
शब्दांचीच शस्त्रे, यत्न करु.
शब्दची आमुच्या, जीवाचे जीवन,
वाटू शब्द धन, जनलोका.
मराठी व्यक्ति विशेष लेख सावळीरामजी
प. पू. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे आपलं आयुष्य शब्दसाधनेत घालवणारा एक शब्दयात्री नाशिक पुण्यभूमीत आज वयाच्या त्र्यहात्तरीत प्रवेश करीत आहे. शब्दाशब्दात गोडवा, वाणीत माधुर्य, वागण्यात विनम्रता आणि साधनेत समर्पण असणारे सावळीरामजी तिदमे म्हणजे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व. वय वाढत आहे तशी त्यांची विनम्रता वाढत आहे. मित्रांचा गोतावळा वाढत आहे. अनुभवाचा संग्रह समृध्द होत आहे.
त्यांची आणि माझी भेट वाॅटसअपच्या अभासी माध्यमातून झाली. माझ्या एका लेखावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया इतकी मनभावन होती की आपसूक त्यांच्याशी जोडलो गेलो. आज आमच्या मैत्रीला चार वर्षे होत आहेत. मी त्यांना प्रत्यक्ष एकदाच सूर्योदय संमेलनात, जळगावी भेटलो आहे. मात्र, आमची ओळख पन्नास वर्षांपासून असावी इतका स्नेह आमच्या मैत्रीत जाणवतो. ही सारी शब्दाक्षरांची किमया आहे.
सतत लिहत राहणं, दुसऱ्याचं लिहिलेलं वाचणं, त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणं ही त्यांची खासियत आहे. हल्ली हे गुण दुर्मिळ होत असतांना सावळीरामजी यांची ही श्रीमंती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचे वाढदिवसानिमित्त देवरुप परिवारातर्फे मनःपूर्वक अभिष्टचिंतन.!
शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी,
नांदतो देव हा, आपल्या अंतरी !
आवाजाचे बादशहा महम्मद रफीसाहेबांनी गायलेलं आणि वंदना विटणकर यांनी लिहिलेलं हे गीत सावळीरामजी प्रत्यक्ष जगत आहेत. माणूस बाहेरच्या अनेक यात्रा करतो. देवाचा शोध घेतो. मात्र, तो स्वतःच्या मनाची अंतर्यात्रा कधी करत नाही. स्वतः स्वतःला कधी भेटत नाही. ते काम सावळीरामजी गेल्या ४४ वर्षापासून करीत आहेत. दिसामाजी काही तरी लिहावे.! या उक्तीप्रमाणे ते रोज काही तरी सकस लिहतात.
![मराठी व्यक्ति विशेष लेख](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/img-20240317-wa00146205532817443332885-820x1024.jpg)
गेल्या ४ वर्षापासून ते अंतर्यात्रा लिहत आहेत. हे लेखन रोज हजारो रसिकांपर्यंत पोहचतं. त्यांचं प्रबोधन होतं. यातील एखादा जरी आपल्या मनात डोकावू शकला तर ते माझे लिखाणाचं यश अस ते मानतात. त्यांना मिळणाऱ्या प्रतिक्रियांवरुन ते योग्य दिशेने वाटचाल करत आहेत हेच सिद्ध होते.
नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात रोहिले हे सावळीरामजी यांचे मूळ गाव. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात १७ मार्च १९५२ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गोपाळराव नामदेव तिदमे हे जेमतेम २री पर्यंत शिकलेले. त्यांनी ईमाने इतबारे स्वकष्टाच्या भांडवलावर शेती केली. त्यांचे आजोबा नामवंत पहिलवान होते.
१९६२ -६३ ला शेतकरी असलेले वडील नकळत राजकारणात आले आणि गावातील त्यांच्या सौहार्दपूर्ण वागणुकीमुळे बिनविरोध ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. ते सलग १५ वर्षे सरपंच होते. हा त्यांचा व्यक्तीमत्वाचा गौरवच होता. आपल्या कामातून त्यांनी गावाचा चेहरामोहराच बदलवून टाकला. याची पावती म्हणून ते नाशिक पंचायत समिती सदस्य म्हणूनही निवडून आले होते.
राजकीय सत्तेतून जनहितैषी सेवाकार्यांचा आविष्कार हा त्यांचा जीवनमंत्र होता. तोच सावळीरामजी यांनी घेतला आणि आपल्या तिन्ही मुलांकडे योगेश, निलेश आणि प्रविण तिदमे यांना वारसाहक्काने सुपूर्द केला. त्यांनी नाशिकला बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेऊन एचएएल मध्ये ३७ वर्षे सेवाकार्य केले. निवृतीनंतर त्यांनी स्वतःला स्वाध्याय परिवार, पत्रकारीता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यात गुंतवून घेतले.
यातूनच त्यांना मानसिक आणि शारीरीक बल प्राप्त होत आहे. जेष्ठ नागरीकांसाठी सावळीरामजी एक आदर्श रोल माॅडेलच आहेत. जीवन जगणं ही एक कला आहे, हे त्यांच्या जगण्यातून दिसून येते.
एच. ए. एल. मध्ये सेवारत असताना त्यांनी ३३ वर्षे नियमीत सुविचार फलक लेखनाचे अनोखे कार्य केले. यातूनच त्यांना आपल्या अंतर्मनात डोकावण्याची सिध्दी प्राप्त झाली. आत्मचिंतनाने आपले वर्तन , व्यवहार , आचरण , कार्यप्रणाली यातील दोष, दुर्गुण, उणीवा कमी कमी होत जातात. सहा विकारांचा प्रभाव क्षीण होत जातो .सद्गुणांची वृद्धी होते. यासाठी प्रत्येकाने विचार, चिंतन, स्वपरीक्षण करायला हवे असं ते मानतात. ते केवळ उपदेशच करत नाहीत तर स्वतः कृतीयुक्त आचरण करतात म्हणून त्यांची वैचारिक अंतर्यात्रा प्रभावशाली आहे, असं मला वाटतं.
प्रत्येक व्यक्तीमध्ये दैवी आणि राक्षसी वृत्ती असतातच. आपला परिवार, त्यातील संस्कार, शिक्षण, भोवतालची माणसं यामुळे या दोहोंपैकी एक कमी होते आणि एकीची वृध्दी होते. आपण राक्षसी प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी स्वतःतील व इतरांमधील सद्गुणांचा विकास करण्याचा ध्यास घेऊन कृतिशील व्हायला हवं ही त्यांची भूमिका माऊलींच्या पसायदानाशी नातं सांगणारी आहे. स्वतःतील सदगुणांच्या शक्तींचे उन्नयन व सदुपयोग करण्यासाठी प्रत्येकाने आत्मचिंतन करायलाच हवे हा त्यांचा आग्रह समाजाला सकारात्मकतेचं बाळकडू देणाराच आहे. या पध्दतीने मी स्वतःला सतत जागं करण्याचा अभ्यास करतो. कारण स्वतःला आजही विद्यार्थी समजतो ही त्यांची भावना त्यांना विद्यार्थी म्हणून सतत चिरंजीव ठेवते.
आपलं चिंतनातून आलेलं वैचारीक अक्षरधन व्यापक व्हावं यासाठी १९७३ पासून विविध माध्यमातून लेखन करीत आहेत. यातून त्यांची अक्षरांशी, शब्दांशी, वाक्यांशी, लेखांशी गट्टी झाली. या वाचन – लेखनातून त्यांच्या जगण्याला गुणवत्ता, व्यापकता आणि विवेकाची बैठक प्राप्त झाली. प. पू. पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराच्या कार्यात ते १९७९ पासून कृतिशील स्वाध्यायी झाले. त्या विचारांनी प्रभावीत होत त्यांनी पू. दादाजींच्या स्वाध्याययातून प्रेरणा घेत काही ग्रंथांची निर्मिती केली. स्वाध्याय कार्यावर त्यांची एकूण ४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
नाथाघरचा पांडूरंग, स्वाध्यायसूर्य, आत्मकमलांचा सुगंध आणि स्वाध्यायाची शिदोरी या शिवाय संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार आणि पर्यावरण – सर्वधर्मियांचा प्राणेश्वर इ. ग्रंथ संपदा त्यांनी संपादित केली आहे. कोरोना काळात अंतर्यात्रा वाॅटसअपवर सुरु झाली. या अक्षरयात्रेची जादू सगुण साकार होऊ लागली.
ती निर्गुण निराकाराकडे जाण्यास प्रेरणा देवू लागली. यातून समविचारी माणसांचा गोतावळा निर्माण होवू लागला. बघता बघता ही अक्षरयात्री अक्षरवारी झाली. अक्षरांची पताका घेवून नाचणारे अनेक अक्षर वारकरी एकमेकांशी जोडले गेले. हा बंध अतुट आहे. अक्षय आहे. अक्षर आहे. हेच त्यांच्या साधनेचे फळ.
साहित्य शिरोमणी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांच्या हस्ते उत्कृष्ट आध्यात्मिक लेखनाबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या बहुआयामी सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र राज्याचे महमहीम राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
सेवेत असतांना आपल्या कामाबद्दलचे समर्पण आणि कामातील कुशलता बघून त्यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाला आहे. पत्रकारीतेतील प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना नाशिक जिल्हा पत्रकार संघाचा सामाजिक कार्यप्रवण पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गेल्या वर्षी गिरणा गौरव प्रतिष्ठान व गिरिजा महिला मंडळ आयोजित अखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात साहित्यिक कार्याबद्दल त्यांना जीवनसाधना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे तर ४४ वर्षे अखंड अक्षरलेखन साधने बद्दल कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये प्रकाशक लेखक संघाच्या साहित्य संमेलनात त्यांना अक्षर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
सावळीरामजी यांचा सुपुत्र प्रविण तिदमे राजकारणात सक्रिय आहे. नाशिक मनपामध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या मित्र आणि सहकार्याच्या गोतावळ्यात ते भावी आमदार म्हणून ओळखले जातात.
खरंतर, राजकारण हे सावळीरामजी यांच्या घरात आणि रक्तातच आहे. तरी ते स्वतः राजकारणापासून अलिप्त आहेत. महानगरीय चकाचौंध, बेगडी उत्सवी उपक्रम त्यांना फारसे आवडत नाहीत. म्हणून ते आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करतात. एकदा त्यांनी ग्रंथ तुला करुन वाचनालय, शाळा, महाविद्यालयांना ग्रंथ भेट दिले.
कधी गीता ग्रंथाचे वितरण तर कधी पू. पांडूरंग शास्त्री यांच्या विचारधनाचे दान त्यांनी केले. जुने सिडको येथे पाच वृक्षसेवी सहकाऱ्यांच्या सहयोगाने त्यांनी १०० देशी वृक्ष लावून वाढविले. गत वर्षी ७१ फुलझाडे सिडको परिसरात लावून वाढदिवस साजरा केला.
अध्यात्म, साहित्य, ग्रंथ आणि वृक्षांच्या सानिध्यात रमणारा हा अक्षरयात्री सामाजीक भान जपून आहे. महानगरात रहात असले तरी त्यांना गावाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. रोहिले गावी पाण्यासाठी ल.पा.बंधारे योजना यावी यासाठी ते ४४ वर्षांपासून शासनदरबारी खेटे घालत आहेत.
गेल्या वर्षी ही योजना मंजूर झाली असली तरी लालफितीच्या कारभारातून ती अजूनही बंधमुक्त झालेली नाही. मात्र, सावळीरामजी थकले नाहीत. हरले नाहीत. ते आजही सकारात्मक आहेत. ही योजना होणारच यावर ते ठाम आहेत. त्यासाठी कार्यप्रवण आहेत. त्यांची दुर्दम्य ईच्छाशक्ती बघता तो दिवस दूर नाही जेव्हा रोहिले गाव पाण्याने समृध्द होईल.
आपण कधीतरी, कुठेतरी सावळीरामजींना भेटला असाल. त्याच्याशी आपला सुसंवादी झाला असेल. नसेल भेटला, बोललात तर (८००७९ ७५७६०)या क्रमांकावर बोलू शकता. एका जिद्दी आणि समरर्पित व्यक्तिमत्वाची आपला संवाद होईल आणि आपलीही मनातल्या अंतर्यात्रेला प्रारंभ होवू शकेल.
त्यांच्याकडे शब्दांचे धन आहे आणि शब्दांची अस्त्रसुध्दा आहेत. ते कधी, कुठे आणि कसं वापरावं याचं कुशल ज्ञान आणि संवेदनशील भानही आहे. अशी माणसं कधीही एकटी नसतात. ती एका कुटुंबाची कधीच नसतात. ती समाजाची झालेली असतात. ते व्यक्ती रहात नाहीत, संस्था बनतात.
अध्यात्म, साहित्य आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम असलेले सावळीरामजी आज ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या निरोगी, सुदृढ आणि आध्यात्मिक आरोग्यामागे सौ. तिदमेताईंचे पाठबळ आणि समर्थ सोबत लाभली आहे. त्यांनी उभयतांनी शंभरी गाठावी या देवरुप शुभेच्छा !
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
४२५१०५. (९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)
Pingback: कलाकार ते कवी ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे - मराठी 1