महाराष्ट्राचं एव्हरेस्ट शिखर कळसुबाई
( ता.अकोले, जि. अ. नगर )
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*****************************
(भाग-०१)
… नानाभाऊ माळी
विमान उंचावर उडत असतं!हेलिकॉप्टर उंचावर उडत असतं!अंतरीक्ष यान उडत असतं!किती किती उंचावर उडावं बरं? संपूर्ण आकाश पालथे घालून उडावं!मनसोक्त उडावं!जीवनानंद घेत उडावं!आकाश कवेत घेऊन उडावं!आकाश ठेंगणे होऊ लागतं!आकाशातून भुमातेकडे पाहात राहावं!अगम्य ते डोळे भरून पाहातं राहावं!भुमातेच्या सर्वोच्च टेकडीवर घाम गाळत उभे राहात म्हणावं म ,’मी जिंकलो आहे बरं!तसंच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर उभे राहून घामाचा आनंद साजरा करावा!अत्यानंदाने म्हणावं,’मी महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर कळसूबाई जिंकले आहे बरं!’
सर्वोच्च शिखरावरून भुमातेला वंदन करीत डोळे भरून पाहावं राहावं!निसर्गसुंदर विश्वाचं चमत्कारी, विस्मयकारी रूप पाहात राहावं!त्याच्याशी एकरूप व्हावं!सृष्टी सौंदर्यातं एकरूप होऊन जावं!उंच उंच पर्वत शिखरं,उभट खोल खोल दऱ्या,मन लहरी वातावरणाशी एकरूप होऊन व्हावं!अतिसुंदर रूपाचं दर्शन घेत राहावं!जे जे विलोभनीय दिसतं ते सारं सारं डोळ्यातून पिवून घ्यावं!साक्षात्कारी अविष्कार हृदयात भरून घ्यावा!हृदयाच्या तृप्तीनें हिमालय ठेंगनां होत रहावा!सह्याद्री,विंद्याचल ठेंगनां वाटावा!अरुपारूप एक होत राहावं!आम्ही अशाचं साहसी सफरीला गेलो होतो!सृष्टी सौंदर्याचं विलोभनीय रूप दर्शन घ्यायला गेलो होतो!
हिमालयातील एव्हरेस्ट शिखर विश्वातील सर्वोच्च शिखर आहे!महाराष्ट्रातील सर्वोच्च *कळसुबाई शिखर* असून आम्ही ते सर करण्यासाठी गेलो होतो!काल गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केलं होतं!उंच शिखरावर अत्यानंदाने नाचतं होतो!तेथील अतिविशाल काळ्याशार कातळावर गेलो होतो!पाहून थक्क झालो होतो!कळसूबाई मातेचं दर्शन घेऊन आलो होतो!रात्री ३-०० वाजता निघून पहाटे ६-०० वाजता,घामाघूम होतं शिखरावर पोहचलो होतो!शिखरावरील हवेतल्या गारव्याने कष्ट,घामाचं चीज झालं होतं!मन मोर होऊन नाचू लागलं होतं!
आम्ही पूण्याहून दुपारी निघालो होतो!जवळपास १७७ किलोमीटर लांब अंतर पार करून नारायणगाव, ओतूर,ओझर क्षेत्र श्री.विघ्नहर गणपती दर्शन घेऊन बोरी,ब्राम्हणवाडा,राजुरा मार्गे रात्री दहा वाजता *बारी* या गावी पोहचलो होतो!पुणे ठाणे, नगर अन नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर अतिशय घनदाट जंगलांनी वेढलेल्या, नगर जिल्ह्यातील अकोले तालूक्यातील बारी गावाला स्पर्श करणाऱ्या उंच उंच डोंगरावर उंच शिखर *कळसुबाई* शिखर आहे!कल्याणपासून जवळपास ६० किलोमीटर, नाशिकपासून अवघ्या ६५ किलोमीटर लांब तर नगर जिल्ह्याच्या संगमनेर पासूनही जवळपास ५० किलोमीटर अंतरावर कळसुबाई शिखर आहे!
आम्ही २९ तारखेला बुधवारी रात्री साडेदहा वाजता बारी गावातील छोट्याशा पण नीट नेटक्या लॉजमध्ये मुक्कामी गेलो होतो!रात्री जेवण केलं!नवीन ठिकाणी झोप तरी किती येणार होती?आम्ही रात्री दिड वाजता उठलो!रात्री बारा वाजेनंतर गुरुवार सुरू झाला होता!आम्ही दिड वाजता उठलो!रात्री थोडं ताजेतवाने होऊन बरोबर ब्रम्हपहाटे ३-०० वाजता *कळसुबाई शिखर* चढण्यासाठी निघालो होतो!💐
बारी गावापासून रात्री तीन वाजता दोन किलोमीटर अंतर पार करून चालतांना अचानक चढाला सुरूवात झाली होती!आम्ही अवघड चढाईला सुरुवात केली होती!अंधार रात्र होती!आधल्या दिवशी अमावस्या होती!चंद्र झोपला होता!आम्ही निवडक पाच जन सोबतीला होतो!चढ चढतांना त्यातीलही दोन ट्रेकर मागे राहिले होतें!आम्ही तिघे अति तीव्र चढ चढत होतो!अरुंद कच्चा खडकाळ रस्ता आमचा मार्गदर्शक होता!कुठे भरकटू नये म्हणून पांढऱ्या रंगात वळणा वळणावर बाण दाखविले होतें!🚩
घनदाट जंगल!उभट चढ!कच्चा रस्ता!त्यात रात्रीचे ०३ वाजले होतें!आमची साहसी चढाई सुरू होती!समुद्रसपाठीपासून ५४०० फूट उंचावर असणाऱ्या महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील *बारी* गावं पायथ्याला आहे!गावाला लागून सह्याद्री पर्वतांची उंच रांग समोर होती!कळसूबाईच्या पर्वत रांगेत अतिशय रात्रीचा हा अवघड ट्रेक म्हणजे अतिशय थ्रील होतं!आमच्याकडे टॉर्च नव्हती आमच्या जोडीदाराकडे अजून एक टॉर्च असल्याने लाल मातीचा निसरडा, घसराडा, दगड धोंड्याचा, अंगावर येणारा उभट पर्वत चढत होतो!टॉर्चच्या उजेडात समोरचं दिसत होतं!
भीती नावाचं एक भूत डोक्यातं बसून असतं!नेहमी भीती दाखवत असतं!हे जंगल हिंस्र पशुनी व्यापित असून भीतीचें प्रतिनिधी आहेत!भीती आपल्या हिमतीची परीक्षा घेत असतें!वाघ, बिबटे, सरपटणारे प्राणी सर्वांनाच आमच्या रक्षणाची जबाबदारी देत भीतीच भूत मागे ढकलीत वर चढत होतो!अंगावर येणाऱ्या उतार चढावर उभी झाडं मूळ्यांना घट्टपणे धरून उभी होती!ती झाडं आमची मार्गदर्शक अन ऊर्जा होती!झाडांवरून रातकीड्यांचा किर्रर्रर्र आवाज कानावर येत होता!एक एक दणकट पावलं नेमक्या एखाद्या छोटया खड्यात, दगडावर,खडकांवर ठेवून अंगावर येणाऱ्या चढावर चढत होतो!अंधारात सर्व भयंकर असलं तरी मनात जिद्द होती!आव्हान जबरदस्त होतं!आमच्या अंगात घाम होता!उभट अंगावर येणारी नागमोडी वाट मार्गदर्शक बनून शिखराकडे नेत होती!
(अपूर्ण भाग-०२ मध्ये पाहूया)
💐👏🏼💐👏🏼💐👏🏼💐👏🏼
*************************
… नानाभाऊ माळी
महाराष्ट्राचं एव्हरेस्ट शिखर कळसुबाई
(ता.अकोले,जि.अ.नगर)
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
****************************
(भाग-०२)
… नानाभाऊ माळी
अंधार वादळ वाऱ्यासंगे
आमुची झाली आहे मैत्री
पाऊस, थंडी उन्हात रमणे
आता वाटू लागली खात्री!🚩
माती सुगंध झाड वेलीसं
आता भेटूनी घेतो रात्री
स्पर्श अपुला जाणून घेतो
सारा निसर्ग देतो खात्री!🚩
झाड फुलांची शिकवण आहे
जग हृदयी घेऊनि चालतो
आहोत सारे माती गोळा
आम्ही हसत रोज फुलतो !🚩
चढूनी जाता शिखरावरती
घामात काया भिजतें
आनंद फुलतो हृदयातुनी
खोल दरी डंका वाजते!🚩
उंच जाता चढूनी शिखर
अवघी सृष्टी डोलू लागते
श्वासातील आनंद फुलतो
आमुची दृष्टी बोलू लागते!🚩
आव्हान कठीण असतं!पेलणेही कठीण असतं!शरीर तंदुरुस्तीचं साधन असतं!गुडघ्यात अस्तर टाकून चालत राहावं!आव्हान आहेर असतो!कधी चांगला असतो तर कधी साधाही असतो!शरीराच्या आतलं हृदय धडधडत असतं!पाय पुढे पडत असतात!चढ उताराला अंगावर घेत उद्देशापर्यंत पोहोचायचं असतं!आम्ही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर *कळसुबाई* सर केलं होतं!… पण पण अति कष्टातून…..
आम्ही ३० जानेवारी २०२५ रोजी अ. नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील बारी गावाला लागून सर्वोच्च शिखर *कळसुबाई* चढत होतो!पर्वत चढ-उतारावर, खडकावर लालसर माती आमच्या पायांना घसरून जाण्यास मदत करत होती!उभट चढावर पाय ठेवताच घसरून खाली सरकत होतो!तोल सावरून झाडांच्या फांदया हाती घेत वर चढून पाय नेमक्या जागी ठेवून आम्ही शिखराकडे निघालो होतो!अंधार रात्र असल्यामुळे तीन-चार ठिकाणी रस्ता भरकटलो होतो!एका हातात टॉर्च होती उजेड रस्ता खडकाळ रस्ता दाखवीत होता!मध्येच काही तरुण देखील भेटले!आपल्या उद्देशाकडे घाम गाळत पर्वत चढत होतें!वेड्यावाकडया वाटेवरून एका मागोमाग मुंग्यासारखे शिखराकडे वाटचाल सुरू होती!🚩
आम्ही अति उंच,उभट लोखंडी जीन्यावरून वर चढत होतो!वर मान करून पाहिले असता काहीही दिसतं नव्हते!खाली खोल खोल दरी असावी असं जाणवतं होतं!रात्रीचा कळकुट्ट अंधार असल्याने स्पष्ट काहीही दिसतं नव्हतं!जवळपास ८० अंशांत लोखंडी जीना उभट कड्याला ड्रीलिंग करून उभा केलेला असावा!चढायला भीती वाटतं होती!डोळे गरगरत होतें!पण डोळयांत स्वप्न होतं!काहीही करून माघार घेणारं नव्हतो!जीना संपल्यावर पुढे निघालो तर पुन्हा दगड धोंड्यांची वाट आम्हाला पुढे नेत होती!साधारण तिरकस चार किलोमीटर अंतर चढलो असतील पुन्हा तसाच दुसरा ८० अशांतील लोखंडी जीना चढून वर चढत होतो!भीतीला डोळ्यात बंदिस्त करून वर चढत होतो!आव्हान तगडं होतं!आव्हानास सामोरे जाणारे आम्ही देखील जिद्दी होतो!🚩
कधी लोखंडी जीना तर कधी खडकाळ,घसरगुंडा अवघड चढ परीक्षा घेत होतें!जिथे चढणेचं शक्य नव्हतं तिथे उंच उभट कड्यापासून खाली लोखंडी जीना लावलेला होता!असे पाचं ठिकाणी जिने लावलेले होतें!शेवटी अतिउचं जीना आमची परीक्षा घेण्यासाठी थांबला होता!वाऱ्याची झूळूक गारव्याला घेऊन अंगाला स्पर्श करीत होती!शेवटचा लोखंडी जीना चढत होतो!उभट सत्तरऐक फूट दगडी जीना चढून वर पोहचलो!आमचा घाम थंडगार हवेत उडू लागला होता!समोर पाहिले असता साक्षात कळसुबाईचं मंदिर दिसत होतं!
आम्ही स्वप्नात होतो जणू!पायथ्यापासून रात्री तीन वाजता चढाईला सुरुवात झाली होती!सकाळचे सहा वाजले होतें!तरीही अंधाराची चादर पांघरून सृष्टी झोपली होती!आम्ही कळसुबाई मंदिरा शेजारी बसून आकाशाकडे नजर लावून बसलो होतो!अनंत चांदण्या आपल्याचं नादात लुकलूकत होत्या!पूर्व दिशा हळूहळू उजळू लागली होती!आम्ही अंधारात किती उंचावर बसलो होतो? ५४०० फूट उंचावर बसलो होतो!महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर आम्ही उजेडाची वाट पाहात बसलो होतो!अंधार असल्यामुळे आम्ही अंधारात होतो!सभोवती काय आहे याचा अंदाज नव्हता!
पूर्वेकडून उजेडदेव त्याच्या प्रकाश किरणांनी अंधारचादर काढून घेत होता!अनेक तरुणांनी उगवत्या सूर्यदेवाचं दर्शन व्हावं म्हणून मंदिर प्रांगणात गर्दी केली होती!काळ्या कातळावर आम्ही उभे होतो!सूर्यदेव क्षितिजावर पाऊल ठेवत होता!आम्ही त्यासं मोबाईल कॅमेऱ्यात पकडतं होतो!सूर्यदेव आपल्या रथावर बसून धरतीवर पाऊल ठेवीत होता!सभोवती नजर फिरत होती!सृष्टीचं अतिविलोभनीय दर्शन डोळ्यात साठवीत होतो!🚩
दूरवर जिकडे पाहावें तिकडे सह्याद्री पर्वत पंख पसरून विशालतेच दर्शन देत होता!आम्ही महाराष्ट्राच्या सर्वोच्च ठिकाणी उभे होतो!जिथं उभे होतो तो काळ्याशार उंच कातळ खंड होता!वरून अंडाकृती दिसतं असावा!त्याचा सर्वसाधारण व्यास सत्तर मीटर असावा!तर कातळ खंडाची उंची देखील साधारण सत्तर मिटरचं असावी!अशा त्या काळ्याशार कातळ खंडावर आम्ही उभे होतो!आम्ही *कळसुबाई शिखरावर* होतो!सकाळी गार हवेच्या झूळकीत सहा वाजेपासून तर सूर्य वरती येईपर्यंत आठ वाजेपर्यंत निसर्गाचा सुंदर अविष्कार पाहण्यात दंग झालो होतो!इतिहास,भूगोल,भुगर्भशास्र सर्व एकत्र आले होतें!डोळ्यातून क्षण नं क्षण सृष्टी सौंदर्य प्राशन करीत राहिलो!ध्येय,उद्दिष्ट साध्य झालं होतं!घामाचा गंध कष्टाची फळं वाटीत होता!जन्म सिद्ध झाला होता!प्रत्येक क्षण चंदन झाला होता!पाहिलेलं स्वप्न सत्यात अनुभवत होतो!आम्ही प्रो. डॉ. अशोक धुमाळ सर, श्री. खामकर सर, श्री.गिरीशजी लेले,… सर्व वयाने साठी पार *कळसुबाई शिखर* सर केलं होतं!अन परतीच्या प्रवासात घसरड्या, निसरड्या, अरुंद, चिंचोळ्या, खडकाळ, नागमोडी पायवटेच्या आशिर्वादामुळे खाली उतरून आलो होतो!उन तपायला लागलं होतं!घाम पुन्हा अंगात घेत आम्ही सकाळी साडेअकरा पर्यंत खाली उतरलो होतो!चढाईची भीतीयुक्त लढाई लढून शिखर सर करून खाली पोहचलो होतो!
आनंद उरात मावत नव्हता!आम्ही लढाई जिंकलो होतो!महाराष्ट्राचं एव्हरेस्ट कळसुबाई शिखर सर केलं होतं!
💐💐🚩🚩💐💐🚩🚩
*************************
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०१ फेब्रुवारी २०२५
nanabhaumali.blogspot.com