अज्ञाताकडून अज्ञाताकडे

अज्ञाताकडून अज्ञाताकडे
अज्ञाताकडून अज्ञाताकडे

अज्ञाताकडून अज्ञाताकडे

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्वांनी मिळून संपूर्ण निसर्ग बनला आहे. सृष्टी या नावानेही आपण त्याला ओळखतो. माणूस या निसर्गाचा किंवा सृष्टीचा एक अविभाज्य घटक आहे. माणसाचं निसर्गातील स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्याला निसर्गाने बुद्धिचं वरदान दिलेलं आहे. याच बुद्धिच्या आधारे माणूस स्वतःला निसर्गापासून वेगळा मानू लागला असून विज्ञानाच्या मदतीने तो निसर्गावर मोठी मात करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. माणसाला जोपर्यंत निसर्गाच्या गूढतेचं संपूर्ण आकलन होणार नाही तोपर्यंत त्याचा हा प्रयत्नप्रवास सुरुच राहणार आहे. असं असलं तरी माणसाच्या आजवरच्या या प्रयत्नप्रवासाचं वर्णन केवळ ‘अज्ञाताकडून अज्ञाताकडे’ असंच आपल्याला करावं लागणार आहे. हे आपण समजून घ्यायला हवं.*

विज्ञानाच्या मदतीने माणसानं ग्रह ताऱ्यांचा शोध घेतला आहे. त्यांची लांबी, रुंदी आणि पृथ्वीपासूनचं त्यांचं नेमकं अंतर मोजण्याचाही प्रयत्न त्याने केला आहे. तिथे जीवसृष्टी अस्तित्वात आहे की नाही हे शोधण्याच्या प्रयत्नात तो कित्येक वर्षे खपतो आहे. भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन मानवी जीविताला व त्याच्या साधनसंपत्तीला सुरक्षित करण्याचा माणसाचा प्रयत्न अथकपणे सुरु आहे. पाऊस आणि वाऱ्याचा थोडाफार अंदाज माणूस लावू शकत असला तरी बऱ्याचदा त्याचे हे अंदाज निसर्ग चुकवित असल्याचे आपल्या अनुभवाला येत असते.

आपलं जगणं अधिक सुखकर व सुरक्षित करण्याच्या हेतूने माणूस सृष्टीच्या रहस्यांचा भेद करू पहात आहे; मात्र या जीवसृष्टीची निर्मिती कशी आणि का झाली? या प्रश्नाचं जे नेमकं व स्पष्ट उत्तर माणसाला हवं आहे, ते त्याला अद्याप मिळालेलं नाही. कदाचित त्यासाठी त्याला सृष्टीच्या अनेक रहस्यांचा भेद करावा लागेल. तसा तो करेलही. असं असलं तरी माणसाचा जीवनप्रवास अज्ञाताकडून अज्ञाताकडेच होत राहील असं मानण्यास पुष्कळ वाव आहे.

अज्ञाताकडून अज्ञाताकडे
अज्ञाताकडून अज्ञाताकडे

तसं पहिलं तर माणसाचा जन्मच मुळी एका अज्ञात कुटूंबात होतो. एकीकडे आपण जन्माला का आलो आहोत? किंवा याच कुटूंबात आपला जन्म का झाला आहे? आपलं या भूलोकात काय स्थान आहे? आपल्या वाट्याला कोणतं कार्य येणार आहे? यातलं काहीच माणसाला ठाऊक नसतं. दुसरीकडे त्याच्या वाट्याला आलेल्या जीवनाचं तसूभरही भविष्य त्याला ठाऊक नसतं. एका अर्थाने एका अज्ञातातून दुसऱ्या अज्ञाताच्या दिशेने माणसाचा जीवनप्रवास सुरु होतो.

आपल्या जन्मदात्यांचं मातृत्व आणि पितृत्व आपल्या जन्माने सिद्ध आणि साध्य झालेलं असतं. त्यामुळं ते आपल्या जन्माने आनंदी होतात. आपल्यामुळे त्यांना हा आनंद मिळाला या जाणीवेतून त्यांच्या मनात आपल्याप्रति प्रेम उत्पन्न होतं. या प्रेमापोटी ते आपल्या असंख्य अक्षम्य चूका पदरात घेत प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन आपलं पालन-पोषण करतात. असं करताना त्यांनाही त्यांच्या भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलं आहे? याची मुळीच कल्पना नसते. सृष्टीच्या नियमानुसार बदलत्या काळाबरोबर सगळ्या गोष्टी बदलत जातात. एकीकडे आपण स्वतः बदलत जातो. आपले विचार बदलतात. आपल्या कल्पना बदलतात. आपल्या इच्छा बदलतात. आपल्या आकांक्षा बदलतात. आपली स्वप्नं बदलतात. आपल्या गरजा बदलतात. इतकंच काय आपल्या आवडी-निवडीही बदलतात.

त्यानुसार आपल्या जगण्याचे प्राधान्यक्रम बदलतात. दुसरीकडे आपल्या भोवतालची परिस्थिती बदलत जाते, सोबतची माणसं बदलत जातात. त्यामुळे आपली साथ-संगत बदलते. आपली प्रेरणा आणि श्रध्दास्थानंही बदलतात. हे सगळे बदल आपल्या मर्जीने व्हावेत यासाठी आपण कसोशीचा प्रयत्न करीत राहातो. किंबहूना तसा प्रयत्न आपण सतत करीत राहीलं पाहिजे असंच आपल्याला शिकवलं जात असतं. आपल्या याच प्रयत्नांना आपण संघर्ष किंवा लढाई असं म्हणत असतो. कुणी कितीही संघर्ष केला तरी यातले बरेच बदल आपल्या मर्जीने होत नाहीत. असंच आपल्या अनुभवाला येतं. असं का होतं? या प्रश्नाचं खरं उत्तर आजवर खचितच कुणाला मिळालं असेल. कुणा अज्ञाताच्या मर्जीनेच आपलं संपूर्ण आयुष्य हलतं, डुलतं आणि बदलत राहातं. कदाचित म्हणूनच आपल्या जीवनाची सुरुवात जशी होते तसा त्याचा अंत कधीच होत नाही.

आपलं संपूर्ण आयुष्य हा एक गुढ आणि रहस्यमय वाटावा असा प्रवास आहे. या प्रवासासाठी आपण कोणतंही पूर्वनियोजन करू शकत नाहीत असं वाटावं, इतक्या दुर्बलतेनं व हतबलतेनं आपला हा प्रवास सुरु असतो. आपण कोठून आलो आहोत? आपल्याला कोठे जायचं आहे? आपला प्रवास कुणासोबत आणि कसा होणार आहे? आपला प्रवास कधी संपणार आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपणास ठाऊक नसतात. एकूणच काय तर आपण आपल्या संपूर्ण जीवन प्रवासाबाबत संपूर्ण अज्ञात असतो.

अज्ञाताकडून अज्ञाताकडे
अज्ञाताकडून अज्ञाताकडे

“मी कोण आहे?” असा टाहो फोडून या अज्ञानाचा पडदा फाडून टाकण्याचा प्रयत्न काहीजणांनी केल्याची काही उदाहरणे इतिहासांत काही ठिकाणी दिसतात. अर्थात असा प्रयत्न करणाऱ्यांना हा अज्ञाताचा पडदा फाडता आलाय की नाही हे कळायला मार्ग नाही. कारण पुढे जाणाऱ्या यातल्या बहुतेक महानुभवांनी “अत्त दिप भव!” असं म्हणत प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी ज्याची त्यानंच घ्यावी असंच सुचवलं आहे. माझ्या आयुष्यातले घटना-प्रसंग हे कोणाच्या मर्जीने घडत आहेत? असा प्रश्न विचारणाऱ्या पार्थालाही पार्थसारथ्याने “तत्वमसि!” म्हणजे “तो तूच आहेस!” असं बजावून सांगीतलं आहे. इतकंच नव्हे तर “कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन्” हेही निग्रहपूर्वक सांगीतलं आहे. पार्था, तू कोणत्याही फळाची अपेक्षा न करता फक्त तुझं कर्म करीत रहा. असं योगेश्वरानं पार्थाला स्पष्ट सांगीतलं असलं तरी त्यांनही अज्ञातावरचा पडदा हटत नाही.

मानवी जीवन हे एखाद्या अवखळ नदीसारखं बेमालूम असंच राहिलं आहे. नदीचा प्रवाह वाट मिळेल तसा वाहात जातो. नदीला तिच्या प्रवाहाचा मार्ग निश्चित करता येत नाही. ती कोणत्या प्रदेशातून वाहत जाईल? तिच्या प्रवाहाने कुणाचा लाभ होईल? वा कुणाचं नुकसान होईल? याचा ठाव तिला कधीच लागत नाही. प्रवासाच्या दरम्यान आपल्या वाट्याला काय येईल हे त्या प्रवाहाला ठाऊक नसतं. तो प्रवाह फक्त पुढं जायचंय एवढंच जाणतो. पुढं म्हणजे नेमकं कुठं हे त्या प्रवाहाला कुठं ठाऊक असतंय?

या अज्ञाताचंच माणसाला भय वाटत राहतं. तन-मनाची असुरक्षितता माणसाला व्याकूळ बनवते, काळजी करायला लावते. भविष्यचिंता त्याला सतत पोखरत राहते. या भय, चिंता आणि काळजीवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात माणूस आणखी जास्त अज्ञाताच्याच आहारी जात राहतो. अशा रितीनं अज्ञानाकडून ज्ञानाकडे निघालेल्या, अंधाराकडून प्रकाशाकडे धावणाऱ्या आणि तिमिराकडून तेजाकडे वेगाने दौडणाऱ्या माणसाला अज्ञाताची कास धरण्यावाचून दुसरा कोणताच प्रत्यवाय उरत नाही आणि अज्ञाताकडून अज्ञाताकडे प्रवास करीत राहणं हेच माणसाचं प्राक्तन बनुन राहतं!

#लेखक#
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क: ९७६६६६८२९५