पार्वती खान्देशची लेक आणि शिव जावई

पार्वती खान्देशची लेक आणि शिव जावई

पार्वती खान्देशची लेक आणि शिव जावई

पार्वती खान्देशची लेक आहे, आणि शिव जावई आहे!

पार्वती अनेक रूप घेऊन जन्म घेते ती खान्देशची लेक बनुन आणि त्या प्रत्येक जन्मात महादेव खान्देशचा जावाई बनून आला आहे.

खान्देशातील आखाजी हा सर्वात मोठा सण आहे. अक्षय तृतीयेला खान्देशात आखाजी म्हणतात. क्ष हे मुळाक्षर उच्चार करायला कठीण आहे म्हणुन बर्‍याच ग्रामीण बोली भाषेत क्ष चा उच्चार ख करतात. मराठी ग्रामीण भाषेत अक्षय तृतीयेला अखिती म्हणतात, गुजराती ग्रामीण भाषेत आखीत्रि म्हणतात.

तस अहिराणी भाषेत आखाजी म्हणतात. अहिराणीत नक्षत्राला नखीतर म्हणतात, द्राक्षांना दराखा म्हणतात. इथे प्रत्येक वेळी क्ष च्या जागी ख वापरला गेला आहे. तस अक्षय तृतीयेच अहिराणी रूप आखाजी आहे.

या आखाजी सणाला पार्वती गौराई बनून महिनाभर माहेरी विश्रांती घ्यायला येते. तेंव्हा तीला परत घरी घेऊन जाण्यासाठी आखाजीला महादेव खान्देशात येतो आणि सासरी तीन दिवस खूप मोठा पाहुणचार झोडतो. जगातील प्रत्येक स्त्री ही जावयाचे खूप लाड करते. तसा लाड खान्देशातील स्त्रिया सुद्धा महादेवाचे करतात.

खान्देशात आखाजी सणाला जेव्हढे पक्वान्न बनवितात, गोड धोड करतात, तेव्हढे कोणत्याच सणाला करत नाहीत. अगदी दिवाळीत सुद्धा नाही. कारण या सणाला लेक माहेरी आलेली असते आणि जावई तीला न्यायला आलेला असतो.शेवया, सांजोर्‍या, लाडू, खापरा वरच्या पुरण पोळ्या, साजूक तूप, सर्व प्रकाराचे तळन, आमरस असे एक ना अनेक पक्वान्न असतात.

शंकर हा खांदेशी मुलींचा पवना म्हणजे मराठीत दाजीबा आणि हिंदीत जिजाजी आहे. या मुली महादेवाच्या साल्या आहेत म्हणुन मग त्या दाजीबाची मनसोक्त थट्टा मस्करी करतात. तस एक गाण आहे बघा,

घार्‍या र्‍हान्दु पुर्‍या र्‍हान्दु येव गौराई जेवाले l
उंदीर मारू भरीत करू ये रे संकर जेवाले ll

बघा या खान्देशच्या पोरी देवाधिदेव महादेवाला अपशब्द बोललात. तो त्यांचा अधिकार आहे. दक्षिण खान्देश जिल्हा नाशिक मध्ये सुरगाणा तालुका आहे. या तालुक्यात केम नावाचा डोंगर आहे. केम हे क्षेम या शब्दाचे अहिराणी रूप आहे. केम म्हणजे क्षेमकुशल, आनंदी, सुखी. या केमगिरी तून गिरणा नदीचा उगम होतो.

म्हणजे केम डोंगरात गिरणा नदीचा जन्म होतो. गिरणा म्हणजे गिरिजा म्हणजे पार्वती. इथे ती खान्देशातील केमगिरीची कन्या म्हणुन तीच नाव गिरिजा आहे. तिला आता आपण गिरणा म्हणतो. इथेही ती खान्देश कन्याच आहे. म्हणजे गिरिजा पती महादेव पुन्हा जावई.

बानू ही गंगा आहे किंवा पार्वतीची दाशी जया आहे. तिने बानूच्या रुपात चंदनपुरीत जन्म घेतला. म्हणुन ती खान्देशची लेक आहे. बानू पती खंडेराव हा महादेव आहे. म्हणजे इथेही तो खान्देशचा जावईच झाला.

खान्देशातील चंदनपुरी जगातील अस एकमेव तीर्थक्षेत्र आहे जिथे पार्वती नदी रुपात आहे आणि नदी काठी मंदिरात शंकरगंगेच म्हणजे खंडोबा बानूच मंदिर आहे. हे अस जगात कुठेच नाही.


प्रत्येक तीर्थक्षेत्रावर शंकर पार्वतीच मंदिर आहे आणि बाजूने नदीच्या रुपात गंगा वाहत आहे. चंदनपुरीत मात्र उलट आहे. इथे शिव आणि गंगेच मंदिर आहे आणि बाजूला नदीच्या रुपात पार्वती गिरिजा आहे.

खंडोबा खान्देशचा जावई असल्यामुळे खंडोबाला सर्वत्र खंडोबा म्हणातात तर खान्देशात खंड्याराव महाराज म्हणतात. सप्तशृंगी गडावरची देवी पार्वती आहे. त्या सुंदर मूर्तीची मान वाकडी आहे. त्या बाबत अस म्हणतात की, ती मान वाकडी करून आपले माहेर खान्देशकडे पाहत आहे.

या सोबत आई सप्तशृंगी मातेचे मराठीत तयार केलेल्या गाण्याची लिंक पाठवत आहे. ती उघडून बघा. या गाण्यात खान्देशातील सर्व देवींची नाव शेवटच्या कडव्यात दिली आहेत. जी आता पर्यंत कोणीच कुठल्या गाण्यात घेतली नाहीत.

हे गाण आवडल तर सबस्क्राइब करा, लाईक द्या आणि पुढे फॉरवर्ड करा. खांदेशी संस्कृती घराघरात पोहचवा!

 पुढच्या भागात बघू या खान्देश कन्या गिरिजा (गिरणा) आणि महादेव यांच्या विवाहाची कथा.
क्रमशः “गिरणा नदीची पौराणिक कथा: शिव आणि गिरिजाचा विवाह आणि खान्देशातील जीवनरेखा


बापू हटकर