आई सुगंधी चंदन

आई सुगंधी चंदन

आई सुगंधी चंदन

आई सुगंधी चंदन

नानाभाऊ माळी

साय ओतूनी मायेची
आई जगी थोर झाली
दुःख वेदना चारित्र्यं
आई सांभाळीत आली!

घरा दारात राबलीं
घर दाराचीचं झाली
भाव विभोर नात्यांचे
धागे विणीत आली!

ठेवी काट्यावरी पाय
वेदना सहत ग गेली
काट्याकुट्यात चालणे
रक्तबंभाळ तू झाली!

आई जन्माची पदवी
पूर्ण साहसातूनी झाली
स्त्री जगण्याचं सार्थक
पहिल्या नंबरातं तू आली!

आई तारेवर कसरत
काळीज देऊन दानी
उघडें पापणी झाकण
भिजे डोळ्यात  पाणी !

देव संस्काराचे बोट
धरूनि देवपुत्री झाली
तूझ्या वाचूनि गं अधुरे 
राहे घर खाली खाली!

घरात मुलगी जन्माला येते!मोठी होतें!मोठी होते!लग्न होऊन सासरी जाते!तिचं मुलगी आई होते!कर्तव्याच अवघड ओझं घेऊन नव्या घरात पाऊल ठेवते!जन्म कुठे? जगणं कुठे?पाय घरासाठी पळतं असतात!भोवरा होतांत!पळणारा भोवरा सासरी कर्तव्य पूर्तीसाठी फिरत असतो!स्वतःचं दु:ख सहन करीत, बाजूला ठेवीत माहेरची मुलगी सासरी रमून जाते!माहेर हळूहळू दूर जाऊ लागतं!लांब जाऊ लागतं!पुढे अस्पष्ट दिसू लागतं!

माहेर हृदयात जपत संसारी राबते!सासरची झूल अंगावर घेत असतें!सासरच्या प्रसारात प्रसव वेदनेतून मुलांना जन्म देतं असतें!ऐके दिवशी ती ‘आई’ होते!प्रसव वेदनेचा आनंद सुखावून जात असतो!स्त्री जन्माच सार्थक झालेलं असतं!कर्तव्य पार पाडतं आई जगत असतें!सिद्ध होत असतें!सहनशिलतेची देवपुत्री झिजण्यासं आयुष्य मानत असते!क्षणोक्षणी आई घडत असतें!



देवाने हसू अन अश्रुंचा मोठा तलाव सोबतीला दिलेला असतो!दुःख सहन करण्यापलीकडे गेलं की अंतरीचा उमाळा डोळ्यात गोळा करायचा!डोळे उघडून तलाव रीता करायचा!अतीव,असहनीय भाव भावनांचा कोंडमारा मोकळा करायचा!निचरा होऊ द्यायचा!काही काळ पापणीचं झाकण उघडेचं ठेवायचं!एकांतीचा ईश्वर जवळ येऊन अश्रू पुसीत बसतो!

आपल्या पुत्रीला सहनशक्तीचं गुणकारी औषध देत असतो!डोक्यावरून हात फिरवत असतो!कुरवाळत असतो!हृदयाशी धरून चार गोष्टी समजून सांगत असतो!देवपुत्री हे सारं सारं समजून घेत असतें!मन हलके करीत असतें!जगण्याच्या नव्या उमेदीने,नव्या दमाने संसारी रमायला लागते!सासर हृदयी वसवू लागते!ही करुणा हृदयी पती,मुलांच्या रहाट गाडग्यात अडकून आयुष्य झोकून देते!हसूनही घराला घरपण देत असतें!अशी ती आईचं असतें!जन्मदात्री असतें!


आई,पत्नी अन मुलगी या तीन हृदयात पुरुषाचं जीवन सामावलेलं असतं!त्याचं अस्तित्व असतं!तिघीही मातृ हृदयी असतात!सोशिक असतात!त्यांचे प्रेम, माया, ममता, कनवाळू भाव नैसर्गिक असतात!अंतःकरण ओलाव्याने तुडुंब भरलेलं असतं!स्त्री हृदयात मातृत्वाचं देणं खच्चून भरलेलं असतं!तीनही नाते माणसाला परिपूर्णतेकडे घेऊन जात असतात!

एक जन्म देते!दुसरी आयुष्य सहचरणी असतें!तिसरी सतत काळजी घ्यायला सांगत असतें!म्हणून स्त्री परिपूर्ण आई असतें!मनुष्य जीवनाची दृष्टी असतें! आई ममत्वाची पेहरणी असतें!तिचे संस्कार मनी उगवत असतांत!म्हणून आकाश काळीज घेऊन हिंडणारी ती आईचं असतें!

प्रत्येक स्त्रीयांच्यां डोळ्यात अश्रूसागर तुडुंब भरलेला असतो!एकेक घटना उलगडत जातात!सुख दुःखाच्या लाटा सतत उसळी घेत असतात! डोळ्यांच्या किनाऱ्यावर अदळत असतात!कधी ओहोटी येते!असह्य दुःख असुनही ओहोटी येते!अश्रू सुकून जातात!स्त्री सतत त्यातून जात असतें!तिचं हृदय पिळवटून निघतं!तरीही चेहऱ्यावर हास्य असतं!प्रत्येक स्त्रीतं आई फुलत असतें!आई शोभेची बाहुली नसते!ममतामयी विशाल सावली असतें!अमृताचा घडा असतें!घराघरात अशीच आई असतें!

आई शब्दातील ‘आ’ अक्षराच्या डाव्याकडीलं उभ्यारेषेवर दोन फांदया दिसतात!त्या ‘आ’अक्षर वृक्षाच्यां खोडावरील सुंदर फांदया भासतात!उभ्या खोड्यावर डोलानें उभ्या फांदया ‘आ’ अक्षराला कुटुंबवत्सल बनवीत असतात!सावली होण्याची ग्वाही,दिक्षा देत असतात!कैवल्य,ममता गूण घेत असतात!आश्रय देतं असतात!तिथे अपारसिंधू आई असतें!

‘ई’ हे अक्षर चिंचेसारखं असतं!वेडीवाकडं असतं!’आ’ जवळ खेटून उभ असतं!ईर्षेवरती मात करून कनवाळू, कृपाळू, दयाळू, सहनशील होण्याचं वरदान प्राप्त करून घेतलेलं ‘ई’ अक्षर घट्ट काळजाने जोडलं जातं! ‘ई’ अक्षरात ईश्वररूप दिसत असतं! ‘आ’ अन ‘ई’ जोडून ‘आई’ शब्द तयार तयार होतो!ईश्वराने स्वतःच्या सुपूत्रीस हे नाव दिले असावे!आईला जीवन रहाट गाडग्यात संसार सार वेचण्यासाठी पृथ्वीलोकी पाठविले असावे!दुःख हसत झेलणारी सहनीय माता,देवपुत्री ‘आई’ विशाल काळीज घेऊन आलेंली असते!काळीज वाटता वाटता स्वतःस हरवून बसलेंली असतें!

जीवन अर्पून बसलेंली असतें!म्हणून आई पुण्यधाम आहे!पून्यश्लोक आहे!पृथ्वी तलावरील अमृतझरा आहे!प्रत्येक घराचा उंबरा आहे!म्हणून ‘आई’ चारित्र्य शुद्ध आहे!पवित्र फुलातील सुगंध आहे!सत्संगत देणारी आई आयुषभर मुलांच्या हृदयात जाऊन बसत असतें!तिच्या अस्तित्वाने घराघराचं देवघर,माजघर,स्वयंपाक बनून टाकते!घर उजळून निघत!आनंदी, समाधान,प्रसन्नता, उत्साहाच्या या ‘आई’ दैवतास कोटी कोटी नमन करतो!

नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मोनं-९९२३०७६५००
       ७५८८२२९५४६
दिनांक-२१ ऑक्टोबर २०२४