दसऱ्याच्या मुहूर्तावर मी केलेला संकल्प
॥श्री॥
दसऱ्याच्या मुहूर्तावर मी केलेला संकल्प..
वि.स खांडेकरांचा एक पाठ होता, इ.१२ वी ला.
“संकल्प” नावाचा. खांडेकरांचे सारेच निबंध,
लघुनिबंध अत्युत्तम दर्जाचे आहेत. शंकाच नाही. लेखकाच्या लिखाणाने समाजाला काही
दिले पाहिजे या भावनेतूनच त्यांचे समग्र लिखाण झाले आहे. ह्या साठी-सत्तरीतल्या
लेखकांनी आमची पिढी घडवली, पोसली. त्या
लिखाणाचा खूप मोठा पगडा आमच्या पिढीवर
होता.
“संकल्प” लेखाची सुरूवातच त्यांनी, दसऱ्याच्या साफसफाई पासून केली आहे. बायकोने त्यांना माळ्यावर चढवून काही ट्रंका
डबे, बिनकामाचे सामान बाहेर काढायला सांगितले. तसे ते वर चढले व त्यांनी तिथेच
एक एक ट्रंक उघडून पहायला सुरूवात केली.
नि ते अक्षरश: चक्रावून गेले. कारण वेळोवेळी
केलेल्या संकल्पांच्या कितीतरी याद्या तिथे होत्या. एका वहीत लिहिले होते, ठरले तर मग,
आज पासून व्यायामाचा संकल्प करून टिळकांप्रमाणे शरीर कमवायचे. नंतर त्या संकल्पाचे काय झाले माहित नाही. पण आज तो संकल्प असा वहीत बंदिस्त त्यांना सापडला.
अशा अनेक संकल्पांची त्या पेटीत भाऊगर्दी होती.उदा. एका वहीत लिहीले होते, ठरले तर
मग, आजपासून ही कादंबरी लिहायला घ्यायची. ठरले म्हणजे ठरले.. आज पासून लिखाण सुरू. पंधरावीस पाने लिहून होताच
तो ही संकल्प बासनात पडला नि मग असे अनेक संकल्प या पेटीत अडगळीत पडले.
खांडेकर म्हणतात,याचा अर्थ मी संकल्प पूर्ण
केलेच नाहीत असा नव्हे. माझ्या अनेक कथा
कादंबऱ्यांची बीजे इथे पेटीत बंदिस्त पडलेली
असली तरी मी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्याच ना? एक गोष्ट खरी की, मी शंभर
संकल्प केले त्यातील कदाचित पन्नासच पूर्ण
झाले असतील. असेना का? काहीच संकल्प
न करण्यापेक्षा काही संकल्प मनाशी निश्चित
करून त्यातील काहीच जरी पूर्ण झाले तरी काय हरकत आहे? म्हणून माझे बरेच संकल्प
पेटीत धुळखात पडले तरी मला खंत वाटण्याचे
कारण नाही. माझे हे पेटीतील बंद संकल्प आता मी बाहेर काढणार नि निदान त्यातले
काही तरी पूर्ण करण्याचा आज मी संकल्प
करतो.
तुम्ही पन्नास संकल्प केले व त्यातील दहा जरी
तडीस गेले तरी हरकत नाही. एकही संकल्प न
करणे या पेक्षा काही संकल्प करून त्यातील
काही तडीस नेणे निश्चितच आनंददायी गोष्ट
आहे.
बायको खालून ओरडत होती, अहो, वर एकटेच
काय हसत बसलात, खाली या, तेव्हा त्या
व्यायामाच्या संकल्पाविषयी मी बोलताच ती
छद्मीपणे हसू लागली. झाला हो झाला..” तुमचा व्यायामाचा संकल्प पूर्ण! “मी काही तिच्या वाकड्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही नि तिने वर टाकलेल्या गाळण्या नरसाळे स्टोव्हच्या पिना खाली टाकू लागलो तेव्हा तिला जणू घबाड सापडल्याचा आनंद झाला.अय्या.. अरे! ह्या पीना वर होत्या तर.. कोणाचे काय तर कोणाचे काय.. जाऊ द्या..
असे म्हणत मी खाली उतरलो व खाली उतरवलेल्या ट्रकांमधील सुस्त पडलेल्या
संकल्पांपैकी किती संकल्प पूर्ण करायचे
याची नव्या उत्साहाने यादी करू करू लागलो.
माझी बायको कितीही उपहासाने हसली तरी
माझा हा उत्साह तसूभरही कमी होणार नव्हता
ही गोष्ट वेगळी..
तर मंडळी, मी देखील दरवर्षी अनेक संकल्प करून ते हवेत विरून गेले याचे देखील मला
स्मरण राहिले नाही तरी खांडेकरांप्रमाणे मी देखील आता काही संकल्प तरी तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहे.
हसायचे नाही हं… वजन कमी करणे हा पहिला संकल्प…
तुम्हाला खोटे वाटेल पण जवळ जवळ दररोज
हा संकल्प मी करते पण.. माहित नाही कुठे माशी शिंकते, दुसऱ्या दिवसापर्यंत हा संकल्प
मी पार विसरून गेलेली असते. त्याचाच परिपाक म्हणजे गेले कित्येक वर्ष हे माझे वाढत चाललेले वजन होय. पण नाही, आता मी पक्के
ठरवले आहे,रोज व्यायाम व डाएट
कंट्रोल करायचा. वर्षभरात निदान पाच किलो
वजन कमी करण्याचा माझा संकल्प मी ह्या
वर्षी नक्की तडीस नेणार म्हणजे नेणार ही काळ्या दगडावरची(मला का बरे कोणाच्या
हसण्याचा भास होतो आहे, तुम्ही नाही ना?)
रेघ समजा मंडळी. बघाच आता, अगदी चवळीची शेंग जरी झाले नाही तरी पडवळा इतकी बारीक मी नक्कीच होणार नि मग तुम्ही
मला न ओळखल्यामुळे मी तुम्हाला अगदी हात
धरून थांबवून म्हणणार..
“ अहो माया ताई, अहो मी सुमती पवार”
आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ८ ॲाक्टोबर २०२४
वेळ: सकाळी ११/१८
Pingback: दसरा सण एक परंपरा एक आनंद - मराठी 1