गुलाबाईची गाणी : २ :
कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई :
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
( उत्सव / प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३)
पूर्वीच्या काळी मौखिक पध्दतीने शिक्षण आणि संस्कार दिले जायचे. त्यासाठी सण-उत्सवांचं आयोजन केलं जायचं. यातून गाणी आणि खेळांच्या माध्यमातून जूनी पिढी नव्या पिढीला जगणं, वागणं अप्रत्यक्ष पध्दतीने शिकवत असे. आखाजी, दिवाळी, कानबाई आणि गुलाबाईची गाणी ही खान्देशात खूप लोकप्रिय आहेत. या गीतातून त्या काळातील समाजजीवन, समाजासमाजातील चाली, रिती, परंपरा यावर प्रकाश टाकला जायचा. ही मौखिक गाणी म्हणजेच लोकवाङ्मय होय. हे वाड्गमय जेव्हा लिखित स्वरुपात आले तेच लोकसाहित्य झाले. पुर्वापार चालत आलेला हा लोकसाहित्याचा ठेवा म्हणजे अस्सल बावनकशी सोनं आहे.
काळ बदलला, रुढी, परंपरा बदलल्या मात्र त्याच्या खाणाखुणा या लोकवाड्मयात आणि लोकसाहित्यात आढळतात. गुलाबाईच्या या गाण्यातून तत्कालीन समाजजीवन, एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडविले आहे. एखाद्या मोठ्या कुटुंबात सुनेला माहेरी जायचं असेल तर तिला किती जणांची परवानगी घ्यावी लागत होती आणि सूनही प्रत्येकवेळी आज्ञा पालन करुन सांगितलेला पर्याय स्विकारत होती त्याचं दर्शन या गीतातून घडते. आजच्या बदलेल्या, प्रगत, स्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्या युगात हा विचार कालसंगत नसेलही. तरीही ग्रामीण भागात आजही काही घरांमध्ये अश्या पध्दती स्वेच्छेने सुरु आहेत. कुटुंबातली एकमेकांची मर्जी आनंदाने सांभाळली जात आहे. खटके उडत असतील.
भांड्याला भांडं लागतही असेल परंतू एकमेकांचा मान-सन्मान जपला जात आहे. ज्या प्रमाणे एखाद्या कंपनीत बाॅस, मॅनेजर, महाविद्यालयात प्राचार्य, शाळेत मुख्याध्यापक असतो तसेच घराघरात ही भूमिका सासूबाईकडे असते. कुठे स्वखुशीने, कुठे नाखुशीने तर कुठे लोकलाजेस्तव आजही घराच्या चाब्या, सूत्रं सासूच्याच हातात असतात. कुशल सासू सुनेकडून कलाकलाने काम करुन घेते. तसेच मनकवडी सून सासूच्या कलाने घेत आपले ईप्सित साध्य करुन घेते. या दोघांमध्ये जिथं सु-संवाद असतो तिथं लक्ष्मी – सरस्वती सुखात नांदतात. घरात शांती, सुख, समृध्दी येते. घरातील माणसं देवरुप भासतात.
या दोघांमध्ये जिथं विसंवाद होतो तिथून सरस्वती, लक्ष्मी पाय काढून घेतात. त्या घरात शांती नांदूच शकत नाही. माणसं एकमेकांचे वैरी बनतात. समृध्दी कोसो दूर पळते आणि घरादाराची शकलं होतात. या गीतातील कुशल सासू सुनेकडून घरातील कामं कशी पूर्ण करुन घेते यातून तिचं वेळेचं व्यवस्थापन आणि कामाचं नियोजन प्रकट होतं आणि संस्कारी सून सर्वांचा मानपान ठेवत कशी आज्ञापालन करते त्यातून तिचा संयम दिसून येतो. नात्यांचं सुंदर चित्रणच या गीतात आलं आहे.
प्रस्तुत गीतात सूनेला माहेरी जाण्यासाठी मूळ आलं आहे. त्यासाठी ती सासूकडे परवानगी मागते. सूनेला नाही तर म्हणायचं नाही आणि पटकन होकारही द्यायचा नाही हे तंत्र सासू अवलंबते. ती चालढकलपणा करते. एक एक काम पुढे करुन वेळ मारुन नेते. सुनेची कशी परिक्षा घेते ते यातून स्पष्ट होते.
सासूबाई सासुबाई मला मूळ आलं,
जावू कां मी माझ्या माहेराला माहेराला.
कारल्याचं बी पेर गं सुनबाई,
मग जा अपूल्या माहेराला माहेराला.
कारल्याची बी पेरलं हो सासूबाई,
आता तरी धाडा मला माहेराला.
कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई,
मग जा अपूल्या माहेराला माहेराला.
कारल्याला कोंब आलं हो सासूबाई,
आता तरी धाडा माहेराला माहेराला.
कारल्याला वेल येऊ दे गं सुनबाई,
मग जा अपूल्या माहेराला माहेराला.
कारल्याला वेल आला हो सासूबाई,
आता तरी धाडा मज माहेराला माहेराला.
कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई,
मग जा अपूल्या माहेराला माहेराला.
कारल्याला फुल आले हो सासूबाई,
आता तरी धाडा मज माहेराला माहेराला.
कारल्याला कारले लागू दे गं सुनबाई,
मग जा अपूल्या माहेराला माहेराला.
कारल्याला कारले लागले हो सासूबाई,
आता तरी धाडा मज माहेराला माहेराला.
कारल्याची भाजी कर गं सुनबाई,
मग जा अपूल्या माहेराला माहेराला.
कारल्याची भाजी केली हो सासूबाई,
आता तरी धाडा मज माहेराला माहेराला.
कारल्याची भाजी खा गं सुनबाई,
मग जा अपूल्या माहेराला माहेराला.
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई,
आता तरी धाडा मज माहेराला माहेराला.
कारल्याचा गंज घास ग सुनबाई,
मग जा अपूल्या माहेराला माहेराला.
कारल्याचा गंज घासला हो सासूबाई,
आता तरी धाडा मज माहेराला माहेराला.
यात कारल्याचं बी पेरण्यापासून तर त्या बीला कोंभ येणे, वेल वाढणे, फूल येणे, फळ येणे, त्या फळाची भाजी करणे, भाजी झाल्यावर साऱ्यांनी जेवणं करणे, भांडीकुंडी आवरणे इतपर्यंतची कामं क्रमाने आली आहेत. हे सारं सासरी लेकीला करावं लागतं, करावं लागेल याचा तो परिपाठ आहे. बालपणीच हा संस्कार लहान मुलींवर हसत खेळत बिंबणे म्हणजेच शिक्षण आहे. कानावरून गेलेल्या गोष्टी अचानक संसारात समोर आल्या तर नववधू बावरु नये, गांगरु नये म्हणून ही शिकवण असावी. कोणतिही सासू वाईट नसते. तिला आपला मुलगा-सून वाईट नसतो.
परंतू तिने जे कष्ट, हाल भोगलेले असतात त्याचीच उजळणी ती सुनेकडून अपेक्षित करते. त्यातून तिच्यात कठोरपणा आलेला असतो. घराचं घरपण ती जपत असते. अर्थात काही सासूनी सूनांचा केलेला अनन्वित जीवघेणा सासूरवास सासूंना बदनाम करणारा आहे. त्यामुळे समस्त सासवा वाईटच असतात हा समज समाजात दृढ झाला आहे. याला काही सन्माननीय अपवाद आहेत. अश्या सासूबाई सूनांना लेकीची वागणूक देतात. त्यांच्यात आई-मुलीचं नातं निर्माण होतं.
या गीतातली सासू सुनेकडून सर्व कामं करुन घेतल्यावर माहेरी जाण्याची परवानगी सासरा, जेठ, दिर, नणंद आणि शेवटी नवऱ्यापर्यंत टोलवते. एकत्र कुटुंबात हा सिनिआरीटीचा, मानपानाचा क्रम ठरलेलाच आहे. तो पुढे कसा विस्तारत जातो ते पुढच्या टप्प्यात येते.
मला काय पुसते बरीच दिसते,
पूस आपल्या सासऱ्याला साऱ्याला.
मामंजी मामंजी मला मूळ आलं,
पाठवता का मज माहेराला माहेराला.
मला काय पुसते बरीच दिसते,
पूस आपल्या जेठजीला जेठजीला.
दादाजी दादाजी मला मूळ आलं,
पाठवता का मज माहेराला माहेराला.
मला काय पुसते बरीच दिसते,
पूस आपल्या जावेला जावेला.
जाऊबाई जाऊबाई मला मूळ आलं,
पाठवता का मज माहेराला माहेराला.
मला काय पुसते बरीच दिसते,
पूस आपल्या नन्देला नन्देला.
वन्सबाई वन्सबाई मला मूळ आलं,
पाठवता का मज माहेराला माहेराला.
मला काय पुसते बरीच दिसते,
पूस आपल्या दीराला दीराला.
भाऊजी भाऊजी मला मूळ आलं,
पाठवता का मज माहेराला माहेराला.
मला काय पुसते बरीच दिसते,
पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला.
घराघरात नववधूला, नव्याने आलेल्या सूनेला हक्काचा भाऊ म्हणून लहान दिर मदतीला येतो. सासरी जणू तो तिचा बंधूच असतो. मित्र असतो. सखा असतो. ती त्याच्याजवळ हक्काने आपलं मन मोकळं करु शकते. हसू शकते. टिंगल-टवाळी करु शकते. सुखदुःखाच्या गोष्टी त्याच्याशी बोलू शकते. तिची सारी कामं तो आनंदाने करुन देतो. दिर म्हणजे तिच्यासाठी सासरी असणारा एक आनंदाचा कोपरा असतो. त्याच्याकडे जेव्हा त्याची भावजई माहेरी जायची परवानगी मागते तेव्हा खरंतर तो लाजतो. त्यात मला काय पुसायचं.? पूस तुझ्या नवऱ्याला असं म्हणून तो बाहेर धूम ठोकतो. जीवाभावाचं नातं ज्याच्याशी जुळलं, ज्याच्या सोबत सप्तपदी चालली, ज्याला देवरुप मानलं त्या नवऱ्याकडेच शेवटची परवानगी अडली. आता त्यांना कसं विचारायचं असं मनात येवून लाजून चूर झालेली असते. शेवटी हिम्मत करुन, मनाचा हिय्या करुन ती घरधनीला विचारते.
पतीराज पतीराज मला मूळ आलं,
पाठवता का मज माहेराला माहेराला.
आन फणी आणि घाल वेणी,
मग जा अपूल्या माहेरा माहेराची.
पत्नी जेव्हा पतीला विचारणा करते तेव्हा केलेल्या कामाने आणि मानपान देतदेत ती श्रमलेली असते. थकलेली असते. तिचा दमलेला, शिणलेला अवतार बघून तो तिला आधी स्वतःला सावरायला सांगतो. सवरायला सांगतो. वेणीफणी करायला सांगतो आणि आता कुणाचीही परवानगी मागायची गरज नाही याची शाश्वती देतो. खरंतर ही परवानगी तोच देणार होता. परंतू, त्या आगोदर साऱ्यांची मनं सांभाळायची होती. ती सांभाळली गेली. पती तिला माहेरी जायला होकार भरतो. ती आनंदते. ही सून म्हणजे गाण्यात भुलाबाई आहे. तिचा पती म्हणजे भुलोजी आहे. तो साधा,भोळा, सांब सदाशीव आहे. सहज हुरळणारा आहे. भुलाबाईने केलेली विचारणा, तिला सासूबाईने सांगितलेली कामं, नात्यांची ओळख, त्यांचे मानपान, मर्यादा हे सारं प्रतिकात्मक आहे. यातून जून्यापिढीने खूप सारं घेतलं म्हणून जगाचे व्यवहार सुरळीत चालले. संसार फुलले. बहरले. शेवटी वेणीफणी करुन ही गुलाबाई आनंदाने आपल्या माहेरी जाते.
आणली फणी आणि घातली वेणी,
भुलाबाई गेल्या माहेराला माहेराला.
या गीतातून भुलाबाईचा संयम, तिचं वेळेचं मॅनेजमेंट, तिची कुटुंबियांप्रतीची आत्मियता, तिचा कर्मयोगाबद्दलचा संस्कार आणि नात्यांची वीण जुळवून ठेवण्याची नम्रता, हुशारी तुम्हा आम्हाला जगण्याची नवी दिशा देते. सासर, सासू, जेठ, दिर, नवरा हे प्रतिकं आहेत. आजच्या तरुणींसाठी सासर म्हणजे तिचं घराबाहेरचं कार्यक्षेत्र झालं आहे असं मला वाटतं. तिचा बाॅस म्हणजे तिची सासूच नाही का.? घरातल्या सासूपेक्षा नोकरीच्या ठिकाणच्या या नव्या सासूंचा जांच मुलींना छळतो आहे. अनेक मल्टिनॅशनल कंपनीत कामं करणाऱ्या तरुणी कामाचा ताण असह्य होवून आपली जीवन यात्रा संपवत आहेत. हे दुर्दैवी असलं तरी कटू सत्य आहे.
कामाच्या ठिकाणचे तिचे सहकारी हेच तिच्या जेठ, दिर, नणंद, जावांची भूमिका वठवत आहेत. यात एखादा हक्काचा मित्र, मैत्रिण मिळाले तर तेच बहिण-भाऊ. मन जाणुन घेणारा जोडीदार हाच संसाराचा जोडीदार. असं सारं मनासारखं जुळून आलं तरच जगणं आनंददायी होतं. घर, कुटुंब यांची सीमा ओलांडून स्त्री घराबाहेर पडली, तरी तिचा सासूरवास चुकलेला नाही. सासूची रुपं बदलतील. सासूरवास तोच आहे. या सासूरवासाला संयमाने कसं तोंड द्यायचं, याचं व्यवस्थापन या गीतात आहे. आलेल्या संकटाला कसं भिडायचं आणि त्यातून तावून, सुलाखून निर्मळ मनाने कसं बाहेर पडायचं याची शिकवण भुलाबाई, गुलाबाई देते.
म्हटलं तर हे एक बडबड गीत आहे. बालगीत आहे. परंतू, वेगळ्या नजरेने बघितलं तर हे संसाराचं व्यवस्थापन आहे. नात्यांची गुंतवणूक आहे. समस्यांची उकल आहे. सुखी आणि सुरक्षित जीवनाचा मंत्र आहे. म्हणून, गीतांचा – गाण्यांचा हा संस्कार जपला पाहिजे. नव्या पिढीच्या हाती नव्या दृष्टीसह सोपवला पाहिजे. नवी पिढी सजग आणि सक्षम करायला हवी.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
४२५१०५.
(९४२३४९२५९३)