चित्पावनी बोली
Table of Contents
चित्पावनी बोली मार्गदर्शक
अभ्यास ‘चित्पावनी बोली’च्या
निमित्ताने –
मराठीचा विविध बोलींच्या अभ्यासाला एक दीर्घ परंपरा लाभलेली आहे. मात्र हे अभ्यास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेले नाहीत,काही तर विद्यापीठ ग्रंथालयात आजही बंदिस्त आहेत.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भाषावार प्रांतरचना झाली, विविध राज्ये व त्यांच्या भाषांना सरकारी मान्यता मिळाली; पण काही अपवाद वगळता भाषा शिक्षणाकडे गंभीरपणे पाहिले गेले नाही.आजही भारतीय विद्यापीठांतील भाषासाहित्य विभाग पाहिले तर वाङ्मयाचे इतिहास व सोयीच्या साहित्यकृती शिकवण्यात ही मंडळी एवढी तरबेज झाली आहेत की, सर्वसामान्य जनांच्या ‘भाषाकौशल्य विकासा’करिता त्यांच्यापाशी ना अभ्यासक्रम ना भविष्यातील नियोजन.
आम्ही फक्त आमच्या समोरचे प्रवेशित जे विद्यार्थी ‘गण’ बसणार आहेत;त्यांना साहित्य अध्यापनातून (?) भाषाविषयक ज्ञान देणार आहोत अशी एकंदर अशी भूमिका दिसते. (काही अपवाद)दुर्दैवाने भाषाशास्त्र अध्यापन वर्ग वर्षानुवर्षे शिकवणारेही विभागात काही तेच -तेच शोधप्रकल्प नवी नावे देऊन सरकारी मिळालेला निधी अगदी वेळेवर खर्च करत आहेत.
अशा पार्श्वभूमीवर गोमंतकातील सांखळी-वाळपई जवळच्या ‘कडतरी-सोनाळ ‘या आडभागातील निसर्गरम्य गावात रहाणारे अशोक गोविंद नेने यानी काही वर्षांपूर्वी आधुनिक समाज प्रसारमाध्यमांचा आधार घेत एक ‘अभ्यासगट’ तयार केला व त्या माध्यमातून ‘चित्पावनी’ या एका मराठीच्या बोलीचे लोकशिक्षण द्यायला सुरवात केली. ही बोली गोमंतकातील ‘कोकणी’लाही काही प्रमाणात जवळची आहे.
विशेष म्हणजे अशोक नेने हे काही शिक्षक प्राध्यापक नाहीत. (तशी गरजही नाही) पण, आपल्याला अवगत आसलेल्या आणि आता दिवसेन -दिवस ही बोली नष्ट होणार, हे त्यांच्या ध्यानी आल्याने बोलीचे जतन करावे,या भूमिकेतून प्रेरणा घेऊन ते स्वतः बोलीचे शिक्षक
बनले,नि हातात ‘खडू नि समोर फळा ‘ही साधने न घेता तळमळीने शिकवणारे ‘बोली गुरूजी’झाले.
त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.सोलापूरच्या नेहा चक्रदेव,मुंबईचे सुधीर गोरे,पुणे येथील आर्पिता जोशी,सांखळी गोवा येथील प्रदीप मराठे,आरती मोने इत्यादींची या पुस्तकात शेवटी दिलेली मनोगते आपण वाचलीत तरी या अभ्यासगटाचे महत्त्व व मिळालेले यश आपल्या ध्यानी येईल.असाचा एक बोली शिकण्याचा अभ्यासगट मी -‘चला शिकूया मालवणी’ हा अमालवणी लोकांना ‘मालवणी’बोलता यावे म्हणून २०१४ साली तयार केला होता, त्यात ७०जणांनी सहभाग घेतला व मराठीची एक प्रगत बोली म्हणून ‘मालवणी’बोली समजून घेतली होती ‘अभ्यास चित्पावनी बोलीचा ‘ या समाजमाध्यमातून गट जरी निवडक लोकांनी बोलीचे शिक्षण घेतले असले तरी या प्रयत्नाना दुर्लक्षून चालणार नाही.
अभ्यासकांनी भाषा शिक्षणाचे तीन गट पाडलेले आहेत ते असे
१)मातृभाषा शिक्षण २) राष्ट्रीयभाषा शिक्षण आणि ३) ज्ञानभाषा शिक्षण. बोली शिक्षणाचा अभ्यासाचा विचारही डाॕ.कल्याण काळे यांच्यासारख्या या क्षेत्रातील विचारवंतानी केलेला आहे. बोली अभ्यास क्षेत्र बरेच मोठे आहे.१)व्याकरण रचना,२) कोशरचना ३) तौलनिक अभ्यास ही ती अंगे होत.महत्त्वाचे म्हणजे आजच्या व्यापारी,बाजारू काळातही ‘भाषा’हा घटक जागतिकीकरणातही महत्त्वाचा आहे. याचे कारण वस्तू विक्री असो वा भावना व्यक्त करणे यासाठी ‘भाषा’ हेच एक सार्वकालिक माध्यम आहे व पुढेही असणार आहे.
‘चित्तपावन’ या बोलीचा अभ्यास आजवर अनेकांनी केला आहे. या बोलीचा भाषिक अंगानेही अनेकांनी अभ्यास केला आहे.त्यात वसुधा भिडे यांनी ‘चित्तपावन बोलीचा वर्णनात्मक अभ्यास’ हा प्रबंध लिहिला आहे.
शिवाय २००८ साली चित्तपावनी या बोलीचा परिचय करून देणारे ‘सुलभ चित्तपावनी’ (२००८)हे पुस्तक श्रीधर केशव बर्वे यांनी स्वतः प्रकाशित केले. या पुस्तकातून चित्तपावनी या बोलीविषयी अनेक अंगाने माहिती उपलब्ध होते. या पुस्तकाची तिसरी आवृत्ती अलिकडे प्रकाशित झाली.उत्तर गोमंतकातील अस्नोडा या गावी ते रहातात. त्यांनीच अलिकडे २०२० साली ‘निबंरातली सावली’ हे चित्तपावनी बोलीतून वास्तववादी नाटक लिहिले.गोमंतकातील ग्रामीण भागात शेती -बागायती सांभाळत अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या चित्तपावन कुटुंबाच्या समस्या हा नाटकाचा विषय आहे.रंगमंचावर या नाटकाचे काही प्रयोग झाले. यावरून प्रेरणा घेऊन अन्य चित्तपावन लेखकांनी आता वाङ्मय निर्मिती केली पाहिजे व समाजाने या लेखनाला प्रकाशित करायला हवे व ही पुस्तके विकत घ्यायला हवीत.
अलिकडे ‘भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण ‘(पद्मगंधा प्रका.२०१३)हा डाॕ.गणेश देवी यांची दीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावना असलेला, साठ विविध बोलींचा परिचय करून देणारा ग्रंथ प्रकाशित झाला ; पण त्यात चित्तपावनी बोलीला स्थान मिळालेले नाही; मात्र असे असले तरी या बोलीवर महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत.
‘A descriptive study of Citpavni : a Dlalect of Marathi’ (२०१३) हा डाॕ. वसुधा भिडे यांचा ग्रंथ उपलब्ध आहे.अखिल कर्नाटक चित्तपावन ब्राह्मण महासंमेलन म्हैसूर येथे संपन्न झाले होते तेव्हा सौ. सुचेता जोशी यांचे ‘चित्तपावनी म्हण्यो’ प्रकाशित झाले.चित्पावन विषयक संदर्भ साहित्याचे

संकलन म.श्री.दीक्षित यांनी केले आहे .ही बोली व ती बोलणारे चित्तपावन मंडळी यांच्याविषयी अधिक माहिती आपल्याला मिळू शकते. वाचकांना ती मुद्दाम देत आहे.
‘चित्तपावन विनोद ‘ सह्याद्रि, मुंबई, १८७३, पृ. ५०, ४ आणे., ‘चित्तपावन भाग्योदय:’ ल. ना. केणी, मुंबई, १८७५, पृ. ९९, ९ आणे. (पद्यात्मक)
‘सरस्वतीमंडळ अथवा
महाराष्ट्र देशातील ब्राह्मणजातींचे वर्णन:’ रा.भि. गुंजीकर, १८८४, ‘ब्राह्मण व त्यांची विद्या:’ म.शि. गोळे, १८९५,१॥रु.
‘ब्राह्मणेतर वादाचे स्वरूप व ब्राह्मणजातीची सद्य:स्थिती,’वा. कृ. भावे, १९२६,’कोकणस्थ ब्राह्मणांची १४ गोत्रे
यांची विल्हेवारीसह मालिका’, ल.ग. लोंढे, द्वि. आ. १९०५, ४ आणे.,’कोकणस्थ अथवा चित्पावन ब्राह्मणातील लग्नसमारंभ’,राधाबाई जोशी, १९१६, ६ आणे. ‘ब्राह्मणातील पोटजातींचे एकीकरण ‘(उत्तरार्ध खंड १) :महादेवशास्त्री दिवेकर, १९२७ गॅझेटियर ऑफ द बाँबे प्रेसिडेन्सी: (खंड १८ भाग १ पुणे) १८८५
‘चित्पावन’, ना.गो. चापेकर, प्रथमावृत्ती १९३८, द्वि.आ.१९६६ ‘चित्पावन समाजचित्र’, शं. ना. जोशी व ज.स. करंदीकर, १९४०.
‘विश्वनाथ कविकृत वाडेश्वरोदय काव्य ‘,अ. द. पुसाळकर (श्रीस्वामी केवलानंद अभिनंदन
ग्रंथ १९५२)
‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ (वर्ष १ व २/१९२९-३० मधील भाषा व बोलीविषयक लेख) –
कृ.गो.साठे, तसेच १९३० च्या ४ थ्या अंकात प्र.धों.कानिटकर यांनी दिलेली कोकणस्थांची श्लोकबद्ध आडनावे,
‘मराठी लोकांची संस्कृती’,इरावती कर्वे,१९५१, ‘भारतीय संस्कृती कोश’, (खंड ३): महादेवशास्त्री जोशी,’कोकणस्थ चित्पावन ब्राह्मणांचे मानवशास्त्रदृष्ट्या संशोधन’, इरावती कर्वे,
‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’, लिंडा कॉक्स,२२ फेब्रु. १९७ च्या अंकातील ‘चित्पावनांसंबंधी विशेष सचित्र लेख,-‘Anthrometric Measurements and Blood Groups of Maharashtrian
Brahmins.’ (A Thesis)- K.C.Malhotra,1966 महाराष्ट्र ‘चित्तपावन संघ- सुवर्णमहोत्सव १९८३ व हीरकमहोत्सव १९९३ – स्मरणिका’,’पेशवे घराण्याचा इतिहास’ द्वितीयावृत्ती: प्रमोद ओक, ‘चित्पावन ब्राह्मणांचा उगम आणि विकास’ डॉ. अ. व्यं. सावजी,१९९५.ही सर्वच महत्त्वाची शोधकार्ये आहेत. आजची पुणेकर चित्तपावन मंडळी मात्र आपल्या या बोलीबद्दल फारच उदासीन दिसतात.
चित्तपावन आणि चित्तपावनी बोली
चित्तपावन आणि चित्तपावनी बोली-
कोकणात मूळ वसाहत करणारे ‘चित्पावन ब्राह्मण’ हे शेतकरी होते.ते वेद अध्ययन-अध्यापनही करत.बहुतेक चित्पावनांचे कुलदैवत हे गुहागरचा वाडेश्वर, शिवाय हरिहरेश्वर, कोळेश्वर, व्याघ्रेश्वर,वेळेश्वर,सोमेश्वर हे ही काहींचे कुलदेव आहेत.’चित्त स्थानी पावन ते चित्पावन’ किंवा ‘चितास्थानी पावन झाले ते चित्पावन’ अशा काही व्युत्पत्ती या शब्दाच्या आहेत. (अधिक माहितीसाठी पहा – भा. सं. कोश खंड ३, पृ. ४०२ ते ४०४)
१९३१ साली सरकारने केलेल्या जणगणनेत मुंबई इलाखा, बडोदे संस्थान व कोचीन प्रांत यात १,३०,४५९ इतकी लोकसंख्या चित्पावन ब्राह्मणांची होती. (संदर्भ- दै. केसरी, ८ मे १९३४)
‘आम्ही चित्पावन’ या म.श्री. दीक्षित यांच्या ग्रंथात (नीलकंठ प्रका, पुणे,२००३) चित्तपावन व्यक्ती कशी ओळळखावी ? व चित्तपावनी बोली भाषेचे काही नमुने दिले आहेत ते वाचुन या बोलीचे स्वरूप ध्यानी येते.
अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः।
इदं ब्राह्ममिदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
मानरहितः स्वकार्ये पटुश्चतुर्दशच गोत्रप्रथित गोत्र:। मकरालायांतवासी प्रियभक्तचित्तपावनो भगवान् ।।
(विठोबाअण्णा दप्तरदार)
कोकणस्थ: कृशाः सूक्ष्मा ।
रक्तपीतसिता वर्णास्तेषामोदन भक्षणाः ।। न कोकणास्थो न च यत्र पंचा
नासौ च पंचा न च यत्र स्वच्छता । अयं पटो मे पितुरंगभूषण:
पिता महाद्यैरपि सेव्यमानः।
सोऽयं मया कक्षपुटेन धार्यते
श्रीमत्पुत्रपौत्रानपि भूषयिष्यति ।।
चूतस्य बीजे मषिका निधाय, ते चार्कपत्रेषु लिखन्ति बाला: । तस्मात्तु रत्नाकरतीरवासिनां भवन्ति रम्याणि चाक्षराणि ।। स्त्रीणां समाजोल्पतरोऽस्ति कोकणे नीराजनार्थ बहुसंकटा जना: भित्तौ च दीपं विनिधाय कीले कुर्वत्यधो वै शिरसो विकंपनम् ।।
(हे श्लोक द. वा. पोतदार यांच्या संग्रहातील ‘कोकणस्थ समाचार’ नामक १८ श्लोकांच्या हस्तलिखित पत्रातील आहेत. श्लोक करणारा अज्ञात.)वरील रचनांचा अनुवाद असा-
“भगवान अमानी, आपल्या कार्यात निपुण, चौदा गोत्रांमध्ये ज्याचे गोत्र (सर्वांत) प्रसिद्ध आहे, समुद्रकिनाऱ्यावर करणारा, आपल्या प्रिय भक्तांचे चित्त जो पावन करतो.. (असा आहे.)
‘कोकणस्थ हे कृश, (बुद्धीने) सूक्ष्म, दर्शनीय व मनोरम आणि भात खाणारे,ज्यांचे वर्ण तांबूस, पिवळसर व गोरा असे आहेत (असतात).
-असा कोकणस्थ नाही की ज्याच्याजवळ पंचा नाही,असा पंचा नाही की जो स्वच्छ नसतो, हे वस्त्र मी कंबरेवर धारण करतो. तो माझ्या पुत्रांचे व नातवांचेही भूषण होईल.आंब्याच्या कोयीत काजळी (शाई) घालून मुले रुईच्या पानावर लिहितात. म्हणून तर कोकणच्या मुलांची अक्षरे सुंदर होतात.कोकणात महिलावर्ग फार थोडा आहे.आरतीसाठी तेथे पुष्कळ गर्दी होते. भिंतीवर टांगून दिवा ठेवून खाली लोक पुनःपुन्हा मान वाकवतात.
(‘कोकणस्थ समाचार’) अर्थात आता हे संदर्भ कालबाह्य झाले आहेत.(आ.चि.पृ.१२,२३)
‘चित्पावन’ या शब्दासंदर्भात इरावती कर्वे यांनी ‘मराठी लोकांची संस्कृती ‘या ग्रंथात पुढील नोंद केली आहे.
‘चित्तपावन ह्या नावावरून अति तर्कवितर्क झाले आहेत.पण त्याचा अर्थ कोणास कळला नाही.जातीला मोठेपणा देण्यासाठी इतर काही जातींना विश्वकर्मा,चांद्रसेनीय वगैरे उपपदे आहेत त्यापैकीच हे असावे असे वाटते.वरती मुख्यत्वे रत्नागिरी जिल्हा.ऋग्वेदी व कृष्णयजुर्वेदी दोन्हीही शाखेची घराणी आहेत व त्यांचा बेटीव्यवहार होतो. यावरून ही जात जुनी असावीशी वाटते.आता घाटावरील त्यांची वस्ती बरीच झालेली आहे.मामाच्या मुलीशी लग्न करण्याचा प्रघात नाही.’
कृ. गो. साठे यांनी १९२९ दरम्यान या बोलीवर पुण्याच्या म. सा. प. मध्ये अभ्यासपूर्ण लेख लिहिला. या लेखाच्या आधारेच ‘चित्पावनी बोली’चा येथे थोडा परिचय करून घेऊया.
प्रसिध्द साहित्यिक ह. मो. मराठे यांनी पुणे ‘सकाळ’मध्ये (९ ऑक्टोबर २००५) ‘कुलभाषा’ या शीर्षकाचा एक लेख या बोलीसंदर्भात लिहिला आहे. या लेखात कुलभाषेविषची त्यांनी जिव्हाळा व्यक्त केला आहे. त्यांच्या ‘बालकांड’ या आत्मचरित्रवर पुस्तकात या बोलीचा वापर केला आहे.
चित्पावनी बोली
चित्पावनी बोली-
रत्नागिरी जिल्हयातील राजापूर तालुक्यातील ‘गोठणे देवाचे’ या गावाचे निवृत्त मुख्याध्यापक कृष्णाजी गोविंद साठे यानी १९२९ च्या जानेवारी महिन्याच्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या अंकात ‘चित्पावनी भाषेचो नमुनो’ (वर्ष १, अंक ४) प्रसिध्द केला आहे.
त्यातील काही भाग असा –
‘बाबी, केडला आयलोश? सगळी खुशालस तनी? हातपाय घोवलेश का ? तुला गुळपाणी मिळाला नी ? आमचे एठा चहाकाफ्याची सवय नाय. बाबी कोणाला, नि आम्ही तो आणीतय नाही. थोडे पहूबिहू खाचश का ?
भुकायलो सशील.एताजेव्वेला देखील लोकरच होएल.आज बळकट दिवस देवळा गेल्या नसत्या.आज सोमवारचा देवदर्शन घेवनी येवासा वाटला म्हणी गेल्या. देवदर्शन घेतला ओळखीदेखीच्या चार बायको भेटल्यो.तेचे जवळ अमळशी बोलत बेसल्या, म्हणी दोन घटका उशीर झालो ? (पृ.३५१ वरील उतारा म्हणजे एक चित्पावन स्त्री नुकत्याच घरी आलेल्या आपल्या भाच्याशी बोलते आहे ते भाषण आहे.)
‘चित्पावन’ म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण.रत्नागिरी जिल्हा व गोमंतकापर्यंतचा चित्पावन समाज ही चित्पावनी बोलीभाषा पूर्वी बोलत होता.आजही काही प्रमाणात बोलतो.
कृष्णाजी गोविंद साठे ‘अस्सल चित्पावनी भाषा व्याकरण विषयक सामान्य विचार’ या लेखात म्हणतात,”चित्पावनी ब्राह्मणांची खास भाषा म्हणजे आपसात बोलण्याची भाषा आहे. आलिकडे मुंबई वगैरे व इतर प्रांती बायका मुलांसह जाण्या-येण्याचे वगैरे दळणवळण वाढल्या पासून शहरातून क्वचित खेडे गावातूनही चित्पावनी भाषा बहिष्कृत होऊ लागली आहे.”
चित्पावनी शब्दस्वरूप
चित्पावनी शब्दस्वरूप-
नातेवाचक शब्द ‘श’ कारन्त
उदा आईश, बापूश, भाऊश, बहणीश, चुलतीश, जाऊश नंदश मराठीतील ‘आ’कारानी शब्द चित्पावनी ओकारान्त होतात.
उदा- घोडे, भोपळो, चौथरो, पोश्यो, लाडको,शाहाणो,आयलो, ठेपलो या शिवाय केळा, सोना, भांडो, फुला, गेल्या, म्हटला, फुटला, येस, ठेय, करय, फिरयला,सोपयचे,घेवयला, जावनी, येवनी,खावनी,घेवनी, करनी,शिकनी,वानी,चावनी या बोलीत धातूला ‘नी’ प्रत्यय लागतो.
काही खास शब्द-
असा -असे,आंगचा- गोवर,
इतलो इतका,उपलवट -बडबड,
एठाठी – येथून,कसो-अंगरखा
अहूर-पूर,आंदुळो -झोपळा,
इतल्यो -इतक्या,एठा -येथे,
एता -आता,करेने-करावयास,
कडगुला बांगडी,किडला- कशाला,केहेठी- कुठून,
कोठिबो-सखल अंगण,
चखोट-चांगले,जोवणां – वीज चमकणे,ठावला -भांडे,
तेडला – तेव्हा,धुकट- धूर,
पाष्टी -पासून,बोडयो-मुलगा,
घोऊश-नवश,परावो- परका,
शेरणी -खिरापत,
मिरसांग -मिरची,मे-मी,
पावठणी-पायरी,किना- काय,
केडला -केव्हा,के-कोठे,
खेड-फणसाच्या आठल्यांची सुकी भाजी,चटोर- चाव –
झोरो- कूशता,डगुल – मोठा फणस,देख्श दीर –
पाटो-लहान फणस ,
पिढां – पाट,मोरळी -निळी,
जर – तापशाक-भाजी
माथान -माझ्याजवळ
मोघो -लोटा,पुतो -वरंवटा,
वाढवण-केससुणी,कढीपत्ता-करवील, करवंद-काण्णां,
कपडे-मुस्ताकी,सुतार-मेस्त,
सदरा -पैरण,अंगठी-मुदी,
कुत्री-कोलुक.सरडा-शेड्डो,
बोंडू-म्हुट्टे, सीताफळ -आतेर,
उपीट-उफिट, असे अनेक ‘अस्सल चितपावनी’ बोली शब्द अशोक नेने यांनी या मार्गदर्शकात नोंदवले आहेत.
चित्पापवनी बोलीतील संवाद
एक चित्पापवनी बोलीतील
संवाद- (एक भाऊ आपल्या बहिणीकडे भेटायला गेला तेव्हा त्या दोघांमध्ये झालेला संवाद
बहीण – बरोसस ? ( बरा आहेस का ?) –
भाऊ -बरोसा ( बरा आहे)
बहीण – वैनी बरीसे ? ( वहिनी बरी आहे का ?)
भाऊ- बरी से पण सारकी पिरंगत सचे.आज कमो डोस्कांच दुकला, उद्या किता कितां डोस्काच दुकला अद्या किता कमरच दुकली. परना किता पोटातच दुखत से आहे. ने बरचं म्हणायचं झाला दुखत जे आहे ने बरचं म्हणायचं झाला.
बहीण -भुर्गी बाळा बरी सत ? ( मुलं ठीक आहेत ?)
भाऊ -‘तेना किताधाड भर्ली से ? खासत पिसत हुंदडसत.. एक जण रां-चो अभ्यास म्हणी करे वे तयार नाय.’
( त्यांना काय धाड भरली आहे? खाऊन पिऊन हुंदडत असतात एक जण कोणी अभ्यास करीत नाही.)
चित्पावनी बोलीतील काही वाक्ये फार पूर्वी मो. गं.जोशी यांनी संपादन केली होती, यावरून ५०-६० वर्षापूर्वीच्या या बोलीचे नमुने उपलब्ध झाले.
चित्पावनी भाषाचो नमुन
चित्पावनी भाषाचो नमुनो-
(वृद्ध बाई तरुण मुलीला उद्देशून)
‘माणसान घे म्हटले आपलेपण सोडूं नये.दुसरेचां चखोट सेल तां घेवां,पण उठले सुटले दुसरेच्यो सगळ्योच तन्हा घेणां अगदी वाईट.खाणां,पिणां,पोशाक, बोली,आचार,विचार,धर्म, हें जेचा तेणीन सोडता कामा नये. तेत आपलेपणाचो अभिमानच हवो. आतांशा पुरुष, बायको, धाकटी बघेवी ती अगदींच आपली शिळपट दिसचत.तरणे-ताठे बांड पुरशांना पहिले म्हातारैचा अवसान नि रग नाही. मे अजुनी दोन दोन तीन तीन कुठवांचे पहू कांडू लागल्या तर मुसळ खाल ठेयणार नाही.
नि एतांच्यो तरण्यो बायाको दोन पायल्यांचा भाताचा तपला उतरतांना हासामूस होचत. दिवसान् दिवस सगळ्याच गोष्टींत भिकारपण नि दुबळेपण वाढत चाललां. रोज सकाळी उठलेबरोबर आदी पोरांबाळांसकट चाहा नि भिस्कुटां हवीं; ते शिवाय म्हणे परसाकडाच होत नाही. कसल्यो घाणेरड्या ह्यो सबई! (आ.चि. पृ.१२६)
++
पुढील चित्तपावनी वाक्ये मो.गं. जोशी यांनी संपादित केली आहेत –
‘हेगडा आयलोस नीऽऽ की बघ! तंगडां मोडचां की नाय तां!’ नतलां जायवेचां त तसो सांग, म्हंजे माला आपला दुसरा कोणतरी जाणारा शोधेये बरां!”
‘अडवणूक करेयची म्हंचे किती करेयची? तेला काय सुमार ?? रांडेच्यांनो आमचांच खाचा नि आपलाच बोलचा, हो केंचो न्याय ?”
तुला की नायूऽऽ देव हेचेबद्दल शासन केलेशिवाय रेहेवेचो नाय ?”
“तुला कितां वाट्लां ? में पार्टीसरन् ? मुळिंच नाय !’
हे तू काय आरंभलांसस ? हें बरेचा लक्षण नहीं!”
“गण्या, तुला जेव्वे जायवेचांसे हे लक्षात् सेनी ?’
“जायवेचां त जायवे लागा! एतां वाट कोणाची बघचा ?’
‘मेल्यांनो, तुमला लाज कशीरे नायू वाटली आमच्या दारांतल्या आंबेच्या झाडावर धोंडो मारवे ? दम धरा हो.”
++
चित्पावनी बोलीतील पदां
चित्पावनी बोलीतील पदां-
कृष्णा तुझो धटकी बायो।
कृष्णा तुझो धटकी गोरवा राखचे दिसचे ।
मोठो म्हणजे तुम्ही वटकी चालचे। दुडदुड बोलचे फडफडा नाचचे । जसो नटकी मोठो होचे लहान बोडयो तुझो चटकी ।
++
पुढील चित्तपावनी बोलीतील काव्य महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत फार पूर्वी प्रकाशित झाले होते ते असे-
एतां कितां करूं बायो, एतां कितां करूं।
बांधो जाचां पळों लागचे कसो हेला । ध्रु.॥
यशोदाबाई सांगों आयल्यां गोविंदाच्यो खोड्यो।
दिसचे गरीब मेंगळतोंड्यो, लाडको तुझो वोड्यो।
एतां कितां ।।
हळूच येवनी डेरेंत बघचे खाचे सगळां लोणी थेंब नाही दुमतेचो ग्ये, फोडनी टाकचे दुधाणी।। एतां कितां ।।
गाई सोडनी, त्येच्या जागां, बईल सगळे बांधचे। धार काढवेला जांय तो माझी फसगत होथे।
एतां कितां ।।
++
दा. कृ. केळकर यांनी चित्पावनी भाषेतून ‘चित्तपावन’संघटने संदर्भात त्याच बोलीतून कसे विचार व्यक्त केले आहेत ते पहा.
“हे पाडवेन् ‘चित्पावन ब्राह्मण संघ’ स्थापन होवनी दोन वर्षां पूर्ण झालीं.सगळे गोंवेंतले चित्पावनंची माहिती एकठांय करेचो हेतू मनात धरनी ही संस्था स्थापन केली से. हे दोन वर्षांत जवळ जवळ २५० लोकांची माहिती एकठांय झालीं सें.अणखी बरांच काम हयवेचां से.पण हे कामाबद्दल लोकांचो प्रतिसाद मात्र उत्तम मिळळो. ज्याहां ज्याहां गेलों त्याहां त्याहां लोकांनी कवतुक केलींय. अशी संस्था हवीच.चित्पावनांची माहिती एकठांय हयवे हवीच. असा बहुतेक लोकांचा मतसे. पण आमीच अजून सगळे लोकांकडापावत नाय. आमची सगळी कामा करनी हैं काम करीत सले कारणान् वेळ लागचे.
ते करतां एक स्वतंत्र माणूस जर नेमे आयलो सलो तर बरां हणार सलां.पण तां कसां हणार? तेकरतां पोटतिडकीनं काम करणारो माणुस हवो आणि तेला देवे पैसे हवे. ते दृष्टीन् हे वर्षा कितांयतरी योजना आंखे हवी. ते शिवाय स्नेहसंमेलन, गुणीवयोवृद्धांचो गौरव, गुणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्यो वधुवरसूचक मंडळ, हेय ही कार्यक्रम सतच. ते सुद्धा कसे करेचे हेचो सुद्धां विचार इयवे हवो. ते करतां सगळे चित्पावनांचा मार्गदर्शन, तेंच्यो निरनिराळ्या उपयुक्त सूचना, हेंची अत्यंत गरज से. तरी ते दृष्टीन सगळेंनी विचार करनी हे चित्पावन ब्राह्मण संघाचे रूपान् लायलेल्या रोपाला खतपाणी घालनी तेचां मोठां झाड करेचो प्रत्न करे हवो.”
अलिकडे चित्तपावनी समाजाची गोवा, पुणे येथे संमेलने झाली, नव्या पिढीला चित्पावनी भाषा समजणे बोलणे अवघड जाते. एका संमेलनात वक्त्यांची चित्पावनी भाषा कोणाला समजेना…तेव्हा त्याने इंग्रजीतून भाषण केले या विषयी ह.मो मराठे म्हणतात,”याला परक्या भाषेचे सांस्कृतिक आक्रमण समजायचं की मर्यादित जनसंख्ये पुरत्याच असलेल्या बोलीभाषेचा कालोघात अटळपणे होत जाणारा अस्त समजायचं ?”ह. मो मराठे यांचा हा प्रश्न बोलीभाषेसंदर्भात विचार करताना वैश्विक स्वरूपाचा आहे असे म्हणावे लागते.
बोलीं अभ्यासाची गरज-
या संदर्भात भाषा अभ्यासक डाॕ कल्याण काळे म्हणतात “एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपीय अभ्यासकांचे बोलींच्या अभ्यासाकडे लक्ष वेधले गेले. काही अभ्यासकांना जगातील काही बोली नष्ट होत आहेत, असे लक्षात आले. तेव्हा त्या पूर्णपणे नष्ट होण्यापूर्वीच त्यांचे व्याकरण,त्यांचे कोश तयार करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला.तो करत असताना बोलींच्या ध्वनिपरिवर्तनाचे नियम निरपवाद असतात, या नव्या वैयाकरणांच्या सिद्धान्ताबद्दल त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यांच्या संशोधनांतून त्या नियमांना छेद देणारी अनेक उदाहरणे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आली.तेव्हा नव्या वैयाकरणांच्या सिद्धान्तांना.
आव्हान देण्यासाठी त्यांनी आपल्या अभ्यासाचे क्षेत्र अधिक सखोल आणि व्यापक करून अधिकाधिक पुरावे गोळा करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले.त्यांच्या प्रयत्नातून बोलींच्या अभ्यासाचे मोठमोठे प्रकल्प उभे राहिले आणि बोलींच्या अभ्यासाचे क्षेत्र समृद्ध झाले. प्रादेशिक बोली आणि प्रमाण बोली एखाद्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलींपैकी एखादी बोली राजकीय, वाङ्मयीन, सांस्कृतिक कारणांनी प्रतिष्ठा पावते आणि तिला प्रमाणभाषेचा दर्जा प्राप्त होतो. सर्व औपचारिक व्यवहारात तिचाच वापर केला जातो. शिक्षण,न्यायालय, शासकीय कार्यालये, प्रसारमाध्यमे यातून तिचाच वापर होतो.
तिला मिळालेल्या महत्त्वामुळे प्रदेशातील सर्व उपप्रदेशांत तिचा प्रचार होतो. आणि त्या प्रदेशांतील बोलीच्या जोडीने तिचा वापर होऊ लागतो. निरनिराळ्या उपप्रदेशांत निरनिराळ्या प्रादेशिक बोली बोलल्या जात असल्या तरी सर्व औपचारिक व्यवहारासाठी प्रमाण बोलीचाच स्वीकार केला जातो. त्यामुळे प्रमाण बोली त्या भाषेच्या सर्व उपप्रदेशांतील लोकांना समजते.”
पण बोली मात्र आपल्या आपल्या मर्यादित क्षेत्रातच बोलल्या जातात तसेच एका समाजात ,
कुटुंबात बोलल्या जातात हे लक्षात घ्यावे लागते,जसे मालवणी-कोकणी बोली संपूर्ण प्रदेशात बोलली जाते ; मात्र क-हाडी वा चित्तपावनी या बोली त्या-त्या उपशाखेत- आपआपसात बोलत असताना उपयोगात आणल्या जातात. या निमित्ताने मी केलेले निरिक्षण येथे नोंदवत आहे ते असे की, कोकणातील चित्तपावन समाजापेक्षा गोमंतकातील चित्तपावन ब्राह्मणांनी ही बोली आजही चांगल्या प्रकारे जतन केलीआहे,मात्र तेथेही आजोबा-आजी मुलगा चित्तपावनी बोलतो त्याच घरात सून आणि मुले -नातवंडे चित्तपावनी बोलीभाषेबाबत संपूर्णपणे अनभिज्ञ दिसली,
एवढेच नव्हे तर आजोबा बोलत असलेली बोली आपण बोलावी, प्रयत्न करावा अशी उत्सुकताही फारशी जाणवली नाही.. या सरळ अर्थ असा येत्या काही वर्षात या बोली नामशेष तर
होणार नाहीत ? कारण बोलीभाषा ह्या मौखिक परंपरेनेच टिकून रहातात. या पार्श्वभूमीवर अशोक नेने यांनी आपल्या बोलीचे भविष्य आणि भवितव्य जाणले आहे, म्हणूनच त्यांनी चित्तपावनी बोलीचा अभ्यास करून हा मार्गदर्शक सिद्ध केला आहे या बद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत.
अभ्यास चित्पावनी बोलीचा
अभ्यास चित्पावनी बोलीचा’ विषयी-
हा बोली मार्गदर्शक बनवताना काही आवश्यक प्रेरणा त्यापैकी महत्त्वाची म्हणजे हा मार्गदर्शक वाचून वाचक,जिज्ञासू यांना ती बोलता यावी आणि म्हणून (डाॕ. ) नेने सर आपल्याला कानाला धरून बसवतात. आपल्या मनोगतातच मराठीतील आकारांत शब्द चित्पावनित कसे ‘ओकारान्त’ बोलले जातात? हे ते सांगून कान टोचतात.
चित्पावन मंडळी शक्यतो फापट पसारा करत नाही, जे असेल ते मोजून मापून.तेव्हा नमनालाच घडाभार तेल संपवणारे नेने गुरूजी नाहीत, तर ‘जास्तीत जास्त सुलभ करुन वेगवेगळी उदाहरणे देऊन,अनुवाद करुन, ही बोली शिकण्यासाठी हा मार्गदर्शक उपयुक्त कसा होईल व बोली शिक्षण शिकण्यासाठी सोपी व उपयुक्त होईल असा प्रयत्न आपण केल्याचे सांगतात आणि ते खरेच आहे,कारण लगेचच आपण’ चित्तपावनी बोलीचे खास विशेष सांगायला सुरवात करतात.
या ‘चित्तपावनी मार्गदर्शका’चे विशेष नोंदवणे मला आवश्यक वाटते एखादी बोली बोलायला शिकायची तर त्या बोलीतील दैनंदिन व्यवहाराततील शब्द तसेच खास शब्द माहित हवेच,ते अशोक नेने यांनी सुरवातीलाच दिले आहेत.
उदा. मी-में,तो-ताॕ,हा-हाॕ, ह्याला -हेला,ज्याला -जेला.मी आणि तू संबंधातील चित्तपावनी शब्दांची ओळख झाल्यावर दोन तीन शब्दांची वाक्यते देतात त्यामुळे व्यावहारिक संवाद सुरु करता येईल.उदा.-मी शिकतो-में शिकसां, मे बोलसां,मे येसां,
मी आहे-मे सां.मी रहातो-में -हेसां.अशी भरपूर वाक्ये आपण वाचतो.
नंतर समोरच्या व्यक्तीकडे संवाद उपयुक्त शब्दांर्थ ते देतात मराठी शब्दांतील शेवटचे अक्षर तेच रहाते मात्र चित्तपावनीत त्यामागील अक्षरे कशी बदलतात हे एकदा समजले क्रियापदे करायला सोपे जाईल.
उदा. असुदे-सोंदे, जाऊदे-जांवदे,पुढे महत्त्वाची क्रियापदे आपण समजून घेतो.
मराठी शब्दांचं आकारांत रूप चित्पावनीत कसं होतेते ते सांगतात उदा.-करायचं -करेचा.
बोलायचं -बोलेचां.याप्रमाणे जावयेचां,येवेचां,जेव्वेचां, खेळेचां, उठेचा,बसेचा,मिळवेचा अशी अनेक शब्दरुपे आपण करु शकतो. पुढे त्यांनी आपल्याच ‘खडतर जिणां’ या चित्पावनी पुस्तकातील काही कठीण शब्दांर्थ दिले आहे.
आठवड्याचे वार,जेवणातील पदार्थ,घरातील जागांचे शब्द , भांडी,अंक,वाक्-प्रचार अशी या बोलीची सहज सोपी ओळख आपल्याला होत जाते.
पुढे बोलताना सहजपणे वापरता येतील असे सुविचार,संवाद मराठीसह देतात.हे सारे नीट अवलोकन केलेल्या विद्यार्थ्यांला आता चित्पावनी बोलणे फारसे अवघड जाणार नाही.
पुढे ही बोली बोलताना जी सामान्य माहिती हवी ती ते देतात आणि पुढील अभ्यास मार्गदर्शक घटक मोठ्याने नीट वाचले तरी प्रत्यक्ष बोलण्याचे तुमचे काम झालेच म्हणून समजा. हे बोलण्याचे कौशल्य आत्मसात करताना सोबत घ्या आणि सुरवात करा तुम्हाला ‘फाडफाड इंग्रजी बोलण्या’स शिकवणा-या डाॕ.महादेव कोकाटे यांची आठवण नक्की आल्यावाचून रहाणार नाही.
सुस्पष्ट चित्पावनी बोली बोलता यावी म्हणून विविध परिच्छेद,काण्यो (कहाण्या),
म्हणी,अंक,नातीगोती
विषयक माहिती दिल्यावर आवश्यक तेवढे व्याकरण ते देतात नि आपण एका दिव्यातून सहजपणे सहिसलामत बाहेर पडतो.
नि म्हणतो…
‘हें पुस्तक वाचनी माला चित्तपानवी सहज बोले येव लागली !…’
‘हें पुस्तक वाचनी में चित्पावनी सहज शिकलों !’
‘हें पुस्तक वाचनी में चित्पावनी सहज बोलों लागलों !’
आणि हेच खरे यश या पुस्तकाच्या मांडणीचे आहे.अन्य बोली शिकवायलाही हा आदर्श नमुना ठरू शकतो.
मागे वळून पहाताना नि पुढे पहाताना-
म्हणून या प्रकारचे बोलीभाषा विषयक मार्गदर्शक तयार करणाऱ्या अशोक नेने यांच्या कष्टाचे अन्य बोलीभाषकांनी नुसते कौतुक नव्हे तर अनुकरण करायला हवे असे मला वाटते. केवळ भाषा संचालनालय आणि शासन,विद्यापीठे,साहित्यभाषा विषयक स़ंस्था यावर अवलंबून न रहाता आता भाषा असो वा बोली यांच्या जतनासाठी त्या-त्या समाजभाषकांनी सार्वजनिक न्यास स्थापन करून एक फंड निर्माण करायला हवा आणि बोभाषा बोली शिक्षण हे समाज घटकाने आपल्या हाती घ्यायला हवे.
राजकारणी व्यक्तीना व राजकारण खेळणा-याना सामान्य मानवी समुह ‘शाणा’ झालेला कधीच नको असतो.त्यांना तो अर्धवट झोपलेल्या अवस्थेत हवा असतो कारण यातच त्यांचे हितसंबंध शाबूत रहातात म्हणून त्यांना कटाक्षाने दूर ठेवले (खरे तर दूर फेकून दिले )पाहिजे.तर आणि तरच पुढील पिढी कौशल्याधिष्ठित आवश्यक भाषा बोली शिक्षण घेऊन आपला सर्वांगीण विकास करतील व सुखी होतील असा माझा आशावाद नव्हे; तर ठाम विश्वास आहे.
या दीर्घ व काहीशा कंटाळवाण्या प्रस्तावनेच्या शेवटी लेखक-अभ्यासक अशोक नेने यांचा वाचकांना थोडक्यात परिचय करून मी माझे कर्तव्य समजतो.
श्री.अशोक गोविंद नेने हे
कडतरी -सोनाळ,ता.सत्तरी – वाळपई,गोवा येथे रहातात
त्यांचे शिक्षण बी.काॕम.पर्यत झाले आहे.१९७९ ते १९८० या दोन वर्षे माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. कौटुंबिक कारणांमुळे नोकरी सोडून ते शेती व बागायतीमध्ये रमले.सुपारी,भात,काजू,नारळ, मिरी व केळी इ.उत्पन्ने घेऊ लागले.अनेक संस्थांमधुन सामाजिक कार्यही ते करतात
एकेकाळी केळ्यांचा घाऊक व्यापारी म्हणून २६वर्षे व्यवसाय करणारे अशोकराव ‘साहित्य मंथन’या संस्थेचे (सत्तरी)सदस्य २०११आहेत.काही काळ सचिव म्हणून काम केले.जुन्या काळातील ग्रामीण समाज जीवन दर्शवणारं लेखन ते करत असतात. दै.’सुनापरांत’ वर्तमान पत्रात ‘चित्पावनी मिसळ’ या सदरात लेख प्रसिद्ध झाले आहेत अनेक , मराठी -कोंकणी दिवाळी अंकांतून लेखन केले आहे.
” खडतर जिणां “हे पूर्ण चित्पावनी पुस्तक मार्च २०१७. मध्ये प्रकाशित झाले तर
‘काळजातले कुकारे ” हे पूर्ण चित्पावनी पुस्तक ऑगस्ट २०२० मध्ये प्रकाशित झाले. लवकरच ते ‘चित्पावनी – मराठी – कोंकणी’ असा दहा हजार चित्पावनी शब्दांचा शब्दकोष सिद्ध करणार आहेत.चित्पावनी सामाजिक कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक, ‘ ना घर ना दार ‘ हे लिहून पूर्ण केले आहे.चित्पावनीचा प्रचार व प्रसार कार्य करतात.’ चिपावनी बोलीभाषा ‘ फेसबुक समूह कार्यरत आहे.’चिपावनी बोली ‘ यु ट्युब चॕनेल वर कार्यरत असतात काष्टशिल्प ,लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात पण त्यांची खरी ओळख एक निसर्गप्रेमी अशी आहे.
कडतरी सारख्या आडभागात राहून आपले वाङ्मयीन व अन्य कार्य करत असतात.यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या शेजारच्या आंबेडे गावातील भारतीय संस्कृती कोशकार पं. महादेवशास्री जोशी यांच्या वारसा ते चालवत आहेत हे लिहिताना मन भरून येत आहे.
असो.चित्पावनी बोली भाषा अभ्यासक अशोक नेने यांना शुभेच्छा. या मार्गदर्शकाचे सर्व वाचक यांना खूप-खूप स्वागत करतील. यात शंकाच नाही.त्यांच्याकडून मानवविकासाचे हे सर्वश्रेष्ठ कार्य नियमितपणे होत राहो. ही अपेक्षा.!
आपला,
बाळकृष्ण रामचंद्र लळीत
मराठी विभाग प्रमुख,
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय,शिरूर -घोडनदी ता. शिरूर.जि.पुणे. ४१२२१०.
(९६६५९९६२६०/brlalit@gmail.com )
प्रा.डाॕ बाळकृष्ण लळीत हे सध्या उपाध्यक्ष,मराठी बोली साहित्य संघ,नागपूर,मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र,सिंधुदुर्गचे अध्यक्ष आहेत .
१९९७ साली पुणे विद्यापीठातून भाषाशास्रज्ञ डाॕ. कल्याण काळे यांच्या मार्गदर्शननाखाली ‘मालवणी बोली साहित्यावर पीएच.डी. प्राप्त.सातत्याने विविध बोली, लोककला ,लोकसाहित्य या संदर्भात लेखन करत असतात.)