मांजरसुंभा किल्ला
मांजरसुंभा किल्ला
चला जाऊया गड-किल्ल्यांवर मांजरसुंभा किल्ला,जि.अहमदनगर
मांजरसुंभा किल्ला भाग-०१
कधीतरी मी दगड व्हावे
पायरी होऊनि पवित्र व्हावे
राजे येतील जातील मजवर
छत्रपतींच्या ऋणात राहावें!
पायऱ्यांवरुनी चढूनी जाता
धूळ पावलांची मजवर राहावी
सांगत राहिलं अभिमानाने मी
निष्ठा माझी दाखवून द्यावी..!
पायरीवरुनी बुरुज दिसतो
बुरुज छाती दणकट असतें
शत्रूनांही तो पुरुनी उरतो
भगवा निष्ठा फडकत दिसते!
किल्ला उभा शिखरावरती
मजवर धूळ माखुनी घ्यावी
पायऱ्यांवरुनी चढूनी जाता
शान पायरीची राखुनी जावी!
कणखर दणकट शूर मावळे
मजवर थोडी विश्रांती घेतील
पावन होईन रोज रोज मी
पुन्हा शिवारायांचे युगें येतील!
रोज रोज मी एक स्वप्न पाहतो, सिंहासनावरतीं शिवराजे बघत राहातो!स्वप्नी लढाऊ किल्ल्यावरतीं, मुजरा करोनी शब्द वाहतो!मुखी रोज शब्द फुटतात,राजे तुम्ही पुन्हा यावे!राज्य करण्या रयतेवरती,दर्शन आपुले पुन्हा व्हावे!राजे लढले होते आमुच्यासाठी, रयतेचे ते वाली होते!शाहीर चौफेर कर्तृत्व पोवाडे,वीर रसातूनी गात होते!किल्ल्यांवरती भगवा फडकतं, हिंदवी स्वराज्य पाहात होते!
जगणे मरणे स्वराज्यासाठी,तेव्हा राजनिष्ठा हृदयात होती!दऱ्या खोऱ्यातली घोडदौड, अखंड तेव्हा चालूचं होती!जंगलं तुडवीत इतिहास घडवीत,शूर मराठे अडवीत होती!गनिम भेटले खिंडीत गाठले,हल्ल्या नंतर बडवीत होते!मर्द मराठे लढूनी जिंकले,जय शिवाजी म्हणत होते!रायगडाचे विशाल काळीज रयत वाटुनी घेत होते!भगवा झेंडा फडकत राहिला,इतिहास नवा खडकत राहिला!
डोळ्यात सह्याद्री भरुनि घ्यावा, जन्मोजन्मी हृदयी राहावा!डोळ्यात सातपुडा भरुनि घ्यावा, डोळ्यातून त्यासं पाहात राहावा!वंदन त्यांसी करीत राहावे!कडेकपारी हिंस्र श्वापदं जीव वाचवूनी मावळे लढलें, वाट कठीण घनदाट जंगल शत्रू शोधूनि हल्ला व्हावा!घन अरण्य तुडवीत पायी चालता,शिवरायांसाठी प्राण द्यावा!छत्रपतींची भूमी लढावू शत्रूअजगर कापीत जावा!चहूबाजूनी वेढुनि किल्ला,जिंकूनी आमुच्या हाती यावा!
महाराष्ट्र शूर वीरांची भूमी,लढाऊ मर्द मराठ्यांची भूमी!कडव्या देश भक्तांची भूमी!संत ज्ञानोबा-तुकारामांची भूमी!बुद्ध-महाविरांची भूमी!कातळ उभट किल्लांची भूमी!कठीण काळ्याशार पाषाणाची भूमी!छत्रपती शिवराय मावळ्यासंहित लढले होते!बलिदान तेव्हा केले होते!महाराष्ट्र भूमी देशासाठी लढलेल्या शूर सैनिकांचीं भूमी आहे!दिल्ली तक्त ओलांडून पुढे पानिपतापर्यंत जिंकून पुढे गेलेल्यां विरांची भूमी आहे!शक्ती, भक्ती, श्रद्धा देशार्पण केलेल्यांची भूमी आहे!महाराष्ट्र अनंत किल्ल्यांची भूमी आहे!डोंगर दऱ्यांची भूमी आहे!लढाऊ बाण्याची भूमी आहे!
गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या सीमा अन विशाल समुद्र किनारपट्टीचीं महाराष्ट्र भूमी आहे!महाराष्ट्र भूमीतील अनंत किल्ले इतिसातील पाने उघडून देत आहेत!काही किल्ले लहान आहेत!काही खूप मोठेही आहेत!आज आम्ही अशाचं अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला पहायला गेलो होतो!किल्ला सर करायला गेलो होतो!दिनांक २८ जुलै २०२४ रोजी आमच्या मोहिमेचे सरसेनापती आदरणीय वसंतराव बागूल सरांच्या सोबत गेलो होतो!पुण्यातल्या चंदननगरहून पहाटे ५-३० ला आमची बस अहमदनगरच्या दिशेने निघाली होती!
पहाटेच्या सुंदर, विलोभनीय सकाळी आम्ही निघालो होतो!कडेकडेने पाऊस झाल्याच्या खाणाखुणा हिरवळीच्या रूपात सुंदर दर्शन देत होत्या!बस पुढे पळत होती!झाडं, शेतं, गावं, अनेक कारखाने सूर्योदया आधी शांत झोपली असावीत!वरती ढगांची दाटीवाटी पाण्याच्या घागरी घेऊन थांबले होते!काही ठिकाणी पावसाची भुरभूर, शिरशीर सुरूचं होती!मेघ भुमातेला घागरी ओतणार अंघोळ करीत होते!गावं पावसाने अंघोळ करून तृप्त झालेली दिसतं होती!चिखल, डबकी, गवत गावांचं वैभव वाढवतं होती!शेतातली पिकं हालत-डुलत होती!हिरवी शाई शिंपडल्यागत हिरवळ नजरेला बांधित होती!
नगररोडने बस पळत होती!आज रविवारचा दिवस आहे!झिमझिम पावसात आम्ही रांजणगावच्या महागणपतीला येऊन पोहचलो!हलक्या पाऊस धारांसोबत महागणपतीचं दर्शन घेतलं!हृदयातली श्रद्धा पाऊससरीत,भक्तीतं न्हात होती!महागनपतीच्या आत महादेवाचंही दर्शन घेतलं!शेजारीचं खोल बारव दिसली!तुडुंब भरलेली विहीर पावसाची उत्तम साक्ष देत होती!महागणपतीचं दर्शन घेऊन आम्ही अहमदनगरच्या दिशेने निघालो होतो!
अहमदनगर पार करून, साधारण २१ किलोमीटरवर छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या आत निजाम राजवटीच्या खाणाखुणा असलेल्या किल्ल्यावर जात होतो!नगर जिल्ह्यातील किल्ल्यावर चढाईसाठी निघालो होतो!अहमदनगर पासून छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या आत असलेल्या ‘मांजरसुंभा’ गावा शेजारी असलेल्या ‘मांजरसूंभा’ किल्ल्याच्या पायथ्याशी अरुंद डांबरी रस्ता पार करीत येऊन पोहचलो!मांजरसुंभा म्हणजे ‘मंजरसुभा!’जो पर्शियन शब्द आहे!याचा अर्थ प्रसन्न,सुंदर सकाळ असा होतो!
आम्ही पायथ्यापासून किल्ल्याच्या शिखराकडे पाहात होतो!आमचे सेनापती श्री.वसंतराव बागूल सरांच्या आदेशानुसार आम्ही सर्व मावळ्यांनी मांजरसूंभा किल्ला चढाईला सुरुवात केली!रस्ता कच्चा अन दगड धोंड्यांचा होता!दगड काळा पाषाण होता!एक एक पावलं टाकीत वर चढत मागे पाहात होतो!खाली वर हिरवळ दिसत होती!पावसाचे तुषार स्वागत करीत होते!
छत्रपती शिवराय की जय!राजमाता जिजाऊ की जय!जय भवानी हृदयातला आवाज मुखे येत होता!अंगात स्फूर्ती संचारली तसा आमचा चढाईचा वेग वाढला होता!अवघ्या २० मिनिटांनी आम्ही मुख्य प्रवेशद्वारा जवळ येऊन पोहचलो!खाली पाहात खोल दरी दिसत होती!
१४ व्या शतकातील निजामकालीन मांजरसूंभा किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पाहून आश्चर्य वाटलं!इतके उन वारा,पावसाळा खाऊनही उत्तम स्थितीत दिसतं होता!दगड चुण्याचं बांधकाम अजूनही उत्तम स्थितीत दिसतंय !प्राचीन नावीन्यपूर्ण कलाकूसरीचं बांधकाम अजूनही शाबूत आहे!आश्चर्य वाटण्यासारखंचं आहे!
याचाचं अपूर्ण मुख्य अंश भाग-०२मध्ये पाहू
चला जाऊया गड-किल्ल्यांवर मांजरसूंबा किल्ला,जि.अहमदनगर)
मांजरसुंभा किल्ला भाग-०२
किल्ले नेहमीचं सत्ता,शौर्य,शक्ती डावपेचांचीं केंद्र राहिलेली आहेत!त्यात काही किल्ले सत्तेच्या मुख्य प्रवाहात होती!राजगादीचीं मुख्य ठिकाणं होती!तर काही किल्ले सत्ता टिकवून ठेवण्यासाठी वापरली जात होती!टेहळणीसाठी वापरली जात होती!शत्रू आगमनाची पूर्व सूचना देणारे अगर हेरगिरीसाठी वापरले जात होती!असे अनेक किल्ले अपरीचित राहिली!दुय्यम स्थानी राहिली!अपरीचित राहिली!त्यांची कदाचित वास्तवदर्शी नोंद देखील उपलब्ध नसेल!ना पुरातत्व विभागाकडे असणार!
ना फॉरेस्ट खात्याकडे असणार!असे कित्येक डोंगरी किल्ले असतील!पडझड, ढासळलेल्या अवस्थेत आपलं अस्तित्व टिकवून उभे आहेत!अशा किल्ल्यांचा इतिहास सबळ पुराव्याअभावी अपूर्ण वाटत असतो!मनाच समाधान होत नाही!त्यातीलच नगर जिल्ह्यातील ‘मांजरसूंबा’ किल्ला आहे!
मांजरसूंबा किल्ला पूण्याहून साधारण १२० किलोमीटर अंतरावर असेल!अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या डाव्या बाजूने वांबूरी रस्त्याच्या मांजरसूंबा गावाला आहे हा किल्ला आहे!गावाचंच नाव किल्ल्याला देण्यात आलं असावं!….आम्ही ‘निसर्गाच्या सानिध्यातील एक दिवस’ डोंगर दऱ्यातील आव्हान स्वीकारीत अशा साहसी ट्रेकला जात असतो!स्वतः शिकण्यासाठी,निसर्गाचं नवीन अनुभवण्यासाठी ट्रेकला जात असतो!
‘साहसातून आरोग्याकडे’ अशी संकल्पना जपत स्वतःचं आरोग्य सांभाळीत असतो!गतइतिहास जाणून घेत असतो!आम्ही देखील श्रीं वसंतराव बागूल सरांसोबत दिनांक २८ जुलै २०२४ रोजी ‘मांजरसूंबा’ या अपरिचित पण उल्लेखनीय किल्ल्यावर गेलो होतो!
किल्ल्याच्या पायथ्या शेजारी हनुमानाचं मंदिर आहे!दर्शन घेऊन पायथ्यापासून दगड धोंडे पार करीत साधारण २० मिनिटात किल्ला चढलो!मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहचलो होतो!निजामकालीन अपरीचित किल्ल्याचं गत वैभव त्याच्या पडक्या अवशेषातून दिसत होतं!
मुख्य प्रवेशद्वार पाहातांना त्याची भव्यता जाणवतं होती!९०० ते १००० वर्षें उलटून गेली असतील, वास्तू जशीच्या तशी शाबूत कशी आहे?’ मोठं कोडं आहे!भक्कम बांधकाम अन निजामकालीन वास्तुकलेचा अप्रतिम नमुना डोळ्यांनी अनुभवत होतो!चौरसाकृती एका रेषेतलं दगड-चुण्यातलं अप्रतिम बांधकाम आहे!वास्तू शिल्पकलेचीं प्रसंशा करावी तेवढी कमीच होईल!प्रवेशद्वाराच्या आत विश्रांती घेण्यासाठी,सैनिकांसाठी देवळ्या बांधलेल्या दिसल्या!आतील छत घुमटाकार असून अत्यंत सुरेख,सुबक, खूबसूरत दालन दिसलं!अत्यंत सुंदर कलाकुसरीतून वास्तू बांधलेंली दिसली!
प्रवेशद्वाराच्यां छतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत!छत छोट्या भाजलेल्या विटा अन चुण्याचा प्रचंड मोठा थर लावून बांधलेलं असावं!उंच छतावरून सभोवतालचां परीसर न्याहाळत होतो!डोळ्यांची तृप्ती होईपर्यंत सुंदर प्रवेशद्वार पाहात होतो!छतावरून दूरवर नजर जात होती!हिरवगार दृश्य डोळ्यात भरतं होतं!
खाली पायथ्यावरून येणारा रस्ता,शेती,खोल दरी,दूरवरून दिसणार मांजरसूंबा गाव सगळं सगळं अलौकिक वाटत होत! त्याकाळात नजरेच्या टप्प्यात येणारा शत्रू दिसावा अशी रचना मुख्य प्रवेश द्वाराचीं केली असावी!निसर्गाचा सुंदर नजारा पाहात असतांना पावसाने हजेरी लावायला सुरूवात केली होती!अंगावर उडणाऱ्या तुषारांसोबत हलकासा वाराही सुटला होता!पाऊस -वारा अंगाला झोबंत होता!सुंदर नजारा डोळ्यात भरून छतावरून खाली उतरलो!
मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे जाता जाता चढावर प्राचीन पायऱ्यांवरून पुढे निघालो!समोर पडका महाल दिसतं होता!नजरेस पडणारा उभट ढासळलेला पडका कंकालं म्हणजेचं महालाची अवशेष दिसत होते!त्याच्या उंचीवरून तो महाल निश्चितच चार ते पाच मजली असावा!आज भग्न, जीर्ण, ढासळलेंल्या अवस्थेत दिसत असला तरी गतवैभवाच्या खाणाखुणा ठेवून उभा दिसला!
आता महालाचां फक्त उभट सापळा अस्तित्व दाखवीत उभा दिसला!खोल नजरेतून पाहिले असता त्या तीन-चार मजली उभट भिंती कधी पडतील सांगता येतं नाही!भिंती शेजारी उभं राहायची भीती वाटत होती!एवढी पडझड का झाली असावी बरं? कदाचित मराठे किंवा मोघलांच्या तुंबळ युद्धात तोफा डागून महालाचीं अशी दुराअवस्था केली असावी!
लांबच्या लांब लाकडी आडव्या तुळया अधांतरी लटकून दिसतं आहेत!केव्हा खाली पडतील याची शास्वती नाही!महालाखालीचं तळमजल्यावर खोलगट भागात गेलो असता दगडचून्यातीलचं भक्कम खोल्या बांधलेल्या दिसल्या!अजूनही उत्तम अवस्थेत आहेत!वरून महालाचा उभट पडका ढाचा दिसतो!खाली दगड चुन्यात बांधलेलं हें तत्कालीन भक्कम बांधकाम आजही जीर्ण अवस्थेत,अवशेष जपून उभे आहेतं!
येथे सर्व काही एक नजरेत भरतं होतं!बांधकामासाठी लाल-गुलाबी रंगाच्या दगडांचा वापर केलेला दिसतो!असा दगड महाराष्ट्रात उपलब्ध नाही!कदाचित लांबवरून, राजस्थानहून मागवला असावा!महालाशेजारीचं सुस्थितीत असलेली वास्तू दिसते!तिला सर्व बाजूनीं झरोके दिसलें!आतल्या दोन्ही खोल्यांमध्ये छानसा उजेड दिसला!कदाचित ती वास्तू भटारखानाचीं,स्वयंपाक खोली असावी!शेजारीच शौचकुंभ दिसलें!प्राचीन सौचालयाची सोय असावी!
हा वैभवशाली महाल १४ व्या शतकातील निजामाचा सरदार सलाबत खानने बांधला असावा!सभोवती शत्रूवर नजर व देखरेख राहावी असा उद्देश असावा!आम्ही पडक्या महालापलीकडे गेलो!तेथे झरोख्या सारख्या खोल्या दिसल्या!बाहेरून उजेड येत होता!कदाचित तिथे बसून उडणाऱ्या कारंज्याचा आनंद घेत असावेत!त्या उडत्या तुषारांचा आनंद घेत असावेत!कारंज्याचं भक्कम बांधकाम नजरेत भरत होतं!
पडक्या महालाखालच्या टप्प्यात एका खोलीत दर्गाही दिसला!तेथून पूढे डाव्या बाजूला गेल्यावर अतिशय भव्य अन सुस्थित असलेला मोठा तलाव दिसला!त्याची खोली साधारणता सहा फुटाची असावी!हा तलाव अति भव्य आहे!त्यात पाणी नव्हतं!तेथून जवळचं अंग पसरून एक चिंचेचं झाड उभं दिसलं!पावसाच्या हलक्याशा सरी अंगावर तुषार उडवीत होत्या!आम्ही पळत जाऊन काही वेळ त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन थांबलो!झाडासमोरचं एक छोटीशी पडकी कमान दिसली!कदाचित प्राचीन काळी त्या कमानीतूनच तलावाकडे जाण्या येणासाठी वापर होतं असावा!
चालत पुढे गेलो असता किल्ल्याचा बुरुज दिसला!बुरुजाच्या भक्कम छतावरून सभोवताली नजर टाकली!खाली खोल खोल दरी दिसत होती!दरीत झाडं उभी दिसतं होती!लांबवर शेती दिसतं होती!हिरवाईचीं चादर नेसून सृष्टी नाचत असल्याची जाणीव होतं होती!बुरुजाच्या खाली जायला पायऱ्या होत्या!पायऱ्या उतरून खाली गेलो असता आम्ही आश्चर्यचकित झालो!डोळे विस्फारले गेल!बुरुजाखालीचं घुमटकार खोल्या दिसल्या!प्राचीन वैभवाची साक्ष देणारी ही वास्तू जशीच्या तशी उभी आहे!
डाव्या उजव्या बाजूला दगडात बांधलेंले मोठे दरवाजे दिसत होते!समोर खालच्या बाजूला खोल दरी दिसतं होती!भिक्तीयुक्त पण सुंदर नजारा पाहून डोळे दिपून गेले होते!बुरुजावरून न दिसणारं दृश्य बुरुजाच्या आतून दिसत होतं!
शत्रुवर नजर ठेवता यावी यासाठी हा टेहळणी बुरुज असावा!अप्रतिम वास्तुकलेचा, कलाशिल्पाचां जीवंत अनुभव डोळ्यात भरून घेत होतो!येथे कमी पडझड झालेली दिसली!तेथेच खाली नजर वळवल्यावर चौकोनी बोगदा दिसला!खोल खोल दरीकडे जाणारा हा चौकोनी दगडी बोगदा रहस्यमय वाटत होता!त्यात एक एक दगड पुढे आलेले होते!ज्यांचा उपयोग विहिरीतील पायऱ्यांसारखा केला असावा!त्या दगडांच्या आधाराने खाली खोल दरीत उतरण्याची सोय असावी!शत्रूपासून धोका झाल्यास या मार्गाचा उपयोग करत असावेत!
सुस्थित असणाऱ्या बुरुजाखालून दुसऱ्या बाजूने खोल दरीकडे दगडी पायऱ्या घेऊन जात होत्या!मध्येच पडझडं झालेल्या पायऱ्या पडझड कदाचित ढसाळल्यामुळे खाली अर्धवट खोल दरी दिसते!खोलगट दरीचं भयावह दृश्य पाहून अनामिक भीती देखील वाटतं होती!
मांजरसूंबा किल्ला अपरिचित असला तरी साहसी ट्रेकसाठी आवाहन करतांना आव्हानही देत असतो!निजामशाही सुरक्षित राहावी म्हणून टेहळणीसाठी एका उंच टेकडीवर किल्ला बांधून चहूबाजूनीं शत्रूवर लक्ष केंद्रित करता येतं असावं!
असा हा मांजरसूंबा किल्ला पाहत साहसी प्रवासासोबत निसर्ग सानिध्यात रमता आलं!अवघ्या दिड तासात किल्ला पाहून पुढे दुसऱ्या घनदाट जंगलात वेढलेल्या उंच टेकडीकडे निघालो होतो!आम्ही गोरखनाथ गडावर श्रीं गोरखनाथांच्या दर्शनासाठी निघालो होतो!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
नानाभाऊ
आपण आपल्या या ग्रुपचे अमोल असे हीरे आहात… आपणामुळेच ग्रुप इतक्या उच्च पदावर पोहोचला आहे. ग्रुप मधील प्रत्येकाला आपल्या विषयी अभिमान वाटतो, गर्व वाटतो…
आपणास खुप खुप शुभेच्छा…