लेक माझी गेलीना सासरी
लेक माझी गेलीना सासरी
लेक माझी गेलीना सासरी
सुनं झालं घर सुनी ओसरी ||ध्रु||
नाजूक होती फुलासारखी
जाई जुई मोगऱ्या सारखी
जपली होती बापानी लेक
तळहाताच्या फोडाच्यापरी ||१||
ऊन वारा पाहिला ना कधी
आयबाच्या त्या राज्यामधी
मायबाप हे होते राजाराणी
ती पण होतीना राजकुमारी ||२||
दोन हातानं धरली सावली
बापानी लेकीच्या डोई वरी
माळ्यासारखी माया केली
जीव शिंपला वेलींच्या वरी ||३||
कोण कुठला आला तो दारी
भीक मागुनी करतो लाचारी
रीत दुनियेची पाळली तेव्हा
लेक माझी गेली त्याच्याघरी ||४||
ज्याची होती त्यानं हो नेली
चिमणी भुरकन उडून गेली
लहान होती मोठी हो केली
जीवापाड माया वाया गेली ||५||
लेक माझी गेलीना सासरी
सुनं झालं घर सुनी ओसरी
विजय निकम चाळीसगाव