वारकरी
येरे वारकरी राया!
येरे वारकरी राया l
हाक माऊलीने दिली ll
वारी पंढरीच्या वाटे l
ताला-सुरात निघाली ll
निघताना सोड आता l
मागे सारा मायाजाळ ll
विठ्ठलाला आळवाया l
हाती घेई वीणा-टाळ ll
टाळ वाजत नाचत l
आतुरल्या माय-लेकी ll
वृंदावन डोईवरी l
अंतरात भक्ती-नेकी ll
नेकी दावा बोलण्यात l
वर्तनात चिंतनात ll
व्हा रे भजनात दंग l
लीन व्हा रे! किर्तनात ll
किर्तनात पांडुरंग l
धुंद होऊनी नाचेल ll
भक्तिभाव अंतरगी l
कणा कणात साचेल ll
साच साचून मळभ l
मन गेले तुझे वाया ll
लाव भाळावरी टिळा l
चित्त विठूमय व्हाया ll
व्हारे भेटीसाठी सज्ज l
आली पंढरी जवळी ll
आलिंगूनी विठोबाला l
मनोभावे कवटाळी ll
कवटाळी विठोबाला l
गळा भेट त्याची घे रे ll
कर विनवणी त्याला l
“रोज सपनात येरे ll”
बंधू-भगिनींनो!
काही वर्षापूर्वी मी करुन बघितलेला हा प्रयोग मी आज परत करुन बघितला. या अष्टाक्षरीत प्रत्येक चरणात आलेले अंत्याक्षर पूर्णतः किंवा अंशतः पुढील चरणाच्या प्रारंभी येते व अंतीम चरणातील अंत्याक्षर अर्थातच पहिल्या चरणाचे आद्याक्षर असते अशा रितीने ही साखळी पूर्ण होते.
तर कसा वाटला हा प्रयोग? थोडा त्रास होतो पण तितकाच आनंददायकही वाटतो!
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.
Pingback: आषाढी वारी - मराठी 1